जेव्हा डोळे पाणावतात.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
22 Apr 2009 - 7:57 am

मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या.
"अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?"
असं मनोहर मला म्हणाला.
मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल हा होतच राहणार.आमच्या वेळेला असं असं होतं म्हणून आताही तसंच असलं पाहिजे हा काही प्रगल्भ विचार म्हणता येणार नाहीत.
"आमचे आजी आजोबा आणि आम्ही ह्या मधलं नातं,जवळीक,ह्या गोष्टी त्यावेळच्या त्या समाजाच्या जडणघडणीवर बर्‍याचश्या अवलंबून होत्या.ते त्यावेळच्या वातावरणात शोभून दिसायचं.पण अलिकडे जरी दुनियादारीच्या घाई गर्दीत तसंच वातावरण ठेवता नाही आलं,तरी माणसा-माणसा मधली ओढ,लपून छपून कुठेतरी वर उचंबळून येतेच."
मनोहरला असं सांगून काही तरी नवीन घटना माझ्याकडे उघड करायची होती हे मी तेव्हांच ताडलं.
मला म्हणाला,
"माझ्या ताईची सासू अलिकडेच वारली.तिला मी भेटायला म्हणून गेलो होतो.ती घरी नव्हती पण तिची एकुलती एक मुलगी सुलभा एकटीच घरी होती.
सुलभाची आजी गेल्याचं सुलभाला बरचसं मनाला लागलेलं दिसलं."

ती मला म्हणाली,
"ह्या वेळी दिवाळी संपता संपता उजाडलेली ती उदासिनता आणणारी सकाळ मला आठवते.मी शाळेत जाण्याच्या तयारीत होते आणि तशी चिंता करण्यासारखं काहीही उगवत्या दिवसाने माझ्या समोर आणून ठेवलं नव्हतं. तेव्हड्यात फोनची घंटा वाजली.
माझी आत्या मला म्हणाली की आजीला कसंस वाटतंय म्हणून तिला हॉस्पिटलमधे घेऊन जावं लागणार आहे.मला मनात थोडा धक्का बसला.कदाचीत आजी मला पुन्हा भेटणार नाही अशी चिंतेची पाल मनात चुकचुकली.

खरं तर आजी हॉस्पिटलात गेल्यानंतर जवळ जवळ आठ एक दिवसानी तिचं निधन झालं. तिला घरी आणली आणि तिचं शेवटचं कार्य करीत असताना पाहून मला जरासुद्धा रडूं आलं नाही.माझी आई, आत्या आणि काका खूपच रडत होते,दुःखकरून मुसमुसून रडत होते. परंतु,माझ्या डोळ्यातून एक टिप ही आलं नाही."
मी सुलभाला म्हणालो,
"अगं,तुला तर आजी खूप आवडायची.तुझ्या लहानपणी मी पाहिलंय तू आणि आजी कितींदा खरेदीला गेलेल्या दिसायचा."
" माझी आजी मला आवडायची. पण मी जेव्हा ह्या अभ्यासाच्या रामरग्याड्यात अडकले तेव्हा तिच्याशी जवळीक केली नाही."

असं म्हणून सुलभा तिची आजी गेल्याच्या त्या दिवसाच्या घटनेचं वर्णन करीत म्हणाली,
"जेव्हा बाकी सर्व रडत होते,दुःख करीत होते,त्यावेळी माझं आणि माझ्या आजीचं नातं ह्याचा मी विचार करीत असता मला आठवलं की तिच्या लहानपणाच्या दिवसा विषयी मी तिला कधीच विचारलं नाही.तसं न केल्याने मला बरंच दुःख झालं. आणखी काही जून्या गोष्टी आजी कडून ऐकायच्या असतात त्या मी तिला विचारून घेऊन ऐकू शकले नाही.मी असं का करू शकले नाही याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी ह्या गोष्टीची चिंता केली नाही.मला त्यावेळी वाटायचं की मी आणखी थोडी मोठी झाल्यावर तिच्याशी जवळीक साधीन आणि तोपर्यंत मी थोडी पोक्तपण होईन."

मी तिला म्हणालो,
"आता होऊन गेलेल्या गोष्टी बाबत खंत करण्यात काय उपयोग.माणसाची चूक होते."
"म्हणून तर माणसाने चूकीतून सुधारलं पाहिजे.तिच चूक किंवा तसलीच चूक पुन्हा करणं म्हणजे आपल्याला माणूस म्हणून घेणं बरोबर नाही."
"मग तुझं आता काय म्हणणं आहे?"
हा माझा प्रश्न पूरा होण्यापुर्वीच सुलभा मला म्हणाली,

"तथापि माझ्या ध्यानात आलं की माझा मोका मी घालवून बसले आणि याउप्पर आता मला कधीही हा मोका मिळणार नाही.तत्तक्षणी माझ्या लक्षात आलं की मी सचेत राहिलं पाहिजे. यदा कदाचीत माझं एखादं जवळचं माणूस असंच सोडून गेलं तर ही परिस्थिती येऊं नये म्हणून. अवतीभवती असलेल्यांबरोबर मी माझा थोडा वेळ खर्च करायला हवा.मी यातून शिकले की आला मोका साधला पाहिजे.ह्यासाठी मला त्यांच्याशी परिचित राहिलं पाहिजे. जीवनातला प्रत्येक क्षण संपादित करायला ह्याची जरूरी आहे.जे उदास असतील त्यांना दिलासा दिला पाहिजे, माझ्या आईला घरकामात मदतीचा हात पुढे केला पाहिजे, कुतूहल करून सहानुभूतिपूर्वक प्रश्न विचारून खरंच त्या व्यक्तिबद्दल चिंता दाखविली पाहिजे."

खरोखरच सुलभाचे हे विचार ऐकून मी तिला पाठीवर शाबासकी देत म्हणालो,
"सुलभा, असं केल्याने तू अप्रत्यक्षपणे आजीला श्रद्धांजली दिल्यासारखीच होईल."

"माझ्या आजीचं शेवटचं कार्य होत असताना मी मला बदललं.त्या अपूर्व क्षणापासून मी इतरांबद्दलची चिंतेची धारणा माझ्या मनात पक्की केली.ह्यापुढे कुणावर मी प्रेम करावं आणि त्यांच्या सानिध्यात राहावं ह्याची संधी मिळाल्यावर तो मोका हातातून सुटू देणार नाही असं मनात पक्कं केलं."
तिला रडूं कोसळणार ह्याचा अंदाज बघून मी तिला जवळ घेत म्हणालो,
"वेडी रे वेडी,खूप मनाला लावून घेतलंस"
हुंदके देत देत मला बिलगून म्हणाली,
"माझ्या आजीला उचलून घेऊन जाताना पाहून मी खूप रडले."
"हे ऐकून माझेही डोळे पाणावले."
आणि मनोहरकडून हे ऐकून माझे पण.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Apr 2009 - 12:14 pm | यशोधरा

:(

प्राची's picture

22 Apr 2009 - 12:31 pm | प्राची

सामंत काका,छान लिहिले आहे.मनाला भिडले,जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

स्मिता श्रीपाद's picture

22 Apr 2009 - 2:56 pm | स्मिता श्रीपाद

काय प्रतिक्रीया देउ तेच कळत नाहीये..डोळ्यातुन पाणी काढलंत
फारच सुरेख लेखन...

-स्मिता