छळतो अजूनही का

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
21 Apr 2009 - 8:06 pm

पाऊस कालचा तो छळतो अजूनही का
जाळून काळजाला झरतो अजूनही का

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का

होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची
उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का

पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा
विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का

आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या
मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का

जयश्री अंबासकर

गझलप्रकटन

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

21 Apr 2009 - 8:09 pm | क्रान्ति

अप्रतिम गझल!
तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा जळतो अजूनही का?
खास!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

अनामिक's picture

21 Apr 2009 - 8:14 pm | अनामिक

सुंदर गझल.

-अनामिक

शितल's picture

21 Apr 2009 - 8:17 pm | शितल

सहमत. :)
जयवीताई,
खुप सुंदर गझल रचली आहेस. :)

यशोधरा's picture

21 Apr 2009 - 8:44 pm | यशोधरा

वा!

प्राजु's picture

21 Apr 2009 - 9:22 pm | प्राजु

शब्द संपले माझे....
खूपच सुंदर...
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

21 Apr 2009 - 9:32 pm | संदीप चित्रे

तुझी गझल म्हणजे वाचायला मेजवानी असते, जयश्री !

तन पावसात भिजले आणि पाऊस मित्र माझा हे दोन शेर विशेष आवडले.

उमेश कोठीकर's picture

21 Apr 2009 - 9:59 pm | उमेश कोठीकर

प्रतिक्रिया द्यायला पण धन्यता वाटते. जयश्रींची गझल वाचतो हे पण अभिमानाने सांगावेसे वाटते.

बेसनलाडू's picture

21 Apr 2009 - 10:05 pm | बेसनलाडू

कोरडा आणि वणवा विशेष आवडले.
(ओलाचिंब)बेसनलाडू

सुवर्णमयी's picture

21 Apr 2009 - 11:02 pm | सुवर्णमयी

मस्त. गझल अतिशय आवडली.

मदनबाण's picture

22 Apr 2009 - 10:05 am | मदनबाण

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का
व्वा.
केवळ अप्रतिम... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

राघव's picture

22 Apr 2009 - 10:36 am | राघव

सगळीच गझल सुंदर!

त्यातही -

ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का

तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का

पाऊस मित्र माझा, मैत्रीस जागणारा
विरहात मात्र ऐसा, छळतो अजूनही का

हे अतिशय खास!

राघव

उदय सप्रे's picture

22 Apr 2009 - 10:45 am | उदय सप्रे

अप्रतिम आहे गझल !

चेतन's picture

22 Apr 2009 - 10:46 am | चेतन

या गर्मीत पावसाचा शिडकावा सुखद वाटला

आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्या
मी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का

मस्तचं

चेतन

जागु's picture

22 Apr 2009 - 1:55 pm | जागु

सुंदर गझल.

चन्द्रशेखर गोखले's picture

22 Apr 2009 - 2:00 pm | चन्द्रशेखर गोखले

अ प्र ति म दुसरे काय म्हणु !

पाषाणभेद's picture

22 Apr 2009 - 2:31 pm | पाषाणभेद

फारच छान.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

जयवी's picture

22 Apr 2009 - 2:43 pm | जयवी

तहे दिल से शुक्रिया यारो..... :) खूप खूप सुखावलेय :) असंच प्रेम असू द्या.

सुधीर कांदळकर's picture

22 Apr 2009 - 6:42 pm | सुधीर कांदळकर

कोरडा आणि वणवा तर झकासच.

सुधीर कांदळकर.