बुट पॉलीश

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Apr 2009 - 4:10 pm

"बाबु, सिर्फ दो रुपीया लेगा. एकदम चकाचक पालीस करताय साब. पयले पालीस करवावो ..पसंद आया तो फीर पैसा देव, साब." मी लोकसत्तामधुन डोकं वर काढलं.

'एक तर दोन रुपयात पॉलीश आणि ते सुद्धा, तो आधी पॉलीश करणार...पसंतीस उतरलं तर पैसे द्यायचे.'
काही तरी वेगळाच अनुभव होता हा.

मला लगेच बोरीबंदरचे ते तथाकथीत अधिकृत पॉलीशवाले आठवले. त्यांच्या समोरच्या ठोकळ्यावर पाय ठेवले की फटदिशी पहिला प्रश्न येतो," छुट्टा है ना, बाद में झिगझिग नै मंगताय !" त्या पार्श्वभुमीवर हा सुखद वगैरे म्हणता येइल असाच धक्का होता.

मी पेपर बाजुला ठेवला, त्याच्या कडे नीट पाहीलं. जेमतेम १०-११ वर्षाचं वय. खपाटीला गेलेलं पोट.....

आत्तापर्यंत ट्रेनमध्ये बुटपॉलीश करणारी अनेक पोरं पाहीली होती. कधी सहानुभूती म्हणुन तर कधी स्वस्तात होतंय म्हणुन त्यांच्याकडुन बुटपॉलीश करुनही घेतलं होतं. या पोरांचं दिसणं अगदी सारखं असतं, अगदी एकाला झाका आणि दुसर्‍याला काढा असं. रापलेली कातडी, खपाटीला गेलेलं पोट, तोंडावर कमालीचे तेलकट भाव, केसाला मात्र वर्षानुवर्षे तेलाचा स्पर्ष नसतो, तसेच मेणचटलेले कपडे... खांद्यावर ती पॉलीशच्या सामानाची कळकट्ट पिशवी... शक्यतो तोंडात मावा किंवा तत्सम काहीतरी तंबाखुजन्य पदार्थ आणि चेहेर्‍यावर कमालीचे बेरकी भाव . त्याच अपेक्षेने मी त्या आवाजाच्या मालकाकडे पाहीलं..पण इथेच मला आश्चर्याचा पहीला धक्का बसला.

अंगावर साधेच, खरेतर थोडेसे फाटकेच म्हणता येतील असे पण स्वच्छ कपडे. अगदी एरीयलमध्ये नसतील धुतलेले पण स्वच्छ होते. पायात अंगठ्यापाशी शिवलेल्या, त्याला थोड्याशा मोठ्याच होणार्‍या रबरी सपाता.(स्लीपर) खांद्यावर तशीच एक हिरव्या रंगाची पण धुतलेली एकदोन ठिकाणी ठिगळे मारलेली पिशवी. हातात तो पॉलीशचा लाकडी ठोकळा आणि चेहेर्‍यावर चक्क प्रसन्न हास्य. त्याचा चेहरा पाहिल्यावर त्याला नाही म्हणायची इच्छाच होईना. खरेतर मी कधीच बाहेर पॊलीश करत नाही. तेवढीच बचत. असा कोणी मागेच लागला तर मी त्यालाच वर निर्लज्जपणे म्हणतो," फोकटमे करेंगा क्या? तो बिचारा (मनातल्या मनात का होईना) शिव्या देत निघुन जातो. पण आता याच्या निर्मळ चेहर्‍याकडे पाहुन त्याला नको म्हणावेसेच वाटेना.

मी दोन्ही पाय त्याच्यापुढे ठेवले आणि पुन्हा वर्तमानपत्रात डोके घातले. राजेश पवारने पुर्वेला गारद करताना अर्धशतकही झळकावले होते. मनातल्या मनात आपल्या निवडसमीतीला शिव्या देत ती बातमी वाचत होतो. बघाना इतके गुणी खेळाडु इथे स्थानक स्पर्धांमध्ये सडताहेत आणि नाही नाही ते वशील्याचे तट्टु राष्ट्रीय संघात निवडले जातात.

"साबजी....!" पुन्हा समोरुन हाक आली.."आता काय बाबा !"

"साब, शेवागने कितना बनाया !"

च्यायला, हा पॉलीश करतोय की पेपर वाचतोय. पण त्याचे हात सराईतपणे चालुच होते. आधी त्याने व्यवस्थीतपणे फडक्याने बुट पुसुन घेतले होते. एका ठिकाणी थोडासा चिखल साठुन वाळला होता तो त्याने जवळच्या पत्र्याच्या तुकड्याने हळुवार खरडुन काढला होता. थोडेसे पाणी लावुन ती जागा साफ करुन घेतली आणि आता त्यावर पॉलीशचा हात मारणे चालु होते.

"नही यार, ये वो वाला क्रिकेट नही है, ये तो हमारा दुलीप ट्रॉफीका मॅच है! इसमे सहवाग नही है, सारे रणजी प्लेयर्स है!"

"साबजी, रणजी बोले तो....

"अरे यार, रणजी बोले तो..इथे मात्र मी अडकलो कारण हे सगळं हिंदीत त्याला सांगणं म्हणजे आजुबाजुला बसलेल्यांना खुसखुस करायला संधी देण्यासारखं होतं. माझं हिंदी म्हणजे अगदीच धन्य आहे..उदा. "तु चल पुढे, मै तांब्या ठेवके आत्या !"

मी क्षणभर ब्लॉक झालो. त्याला माझी समस्या कळाली की काय कोण जाणे पण त्याचं पुढचं वाक्य चक्क मराठीत होतं. मग मात्र मी त्याला मराठीत सगळं समजावुन सांगीतलं. इंटरनॅशनल क्रिकेट आणि रणजी मॅचेस, दुलीप ट्रॉफी यातला फरक समजावुन सांगीतला.

"या अल्ला, बोलेतो हमारे गल्ली क्रिकेटके माफिक है तो! ऐसाबी होताय क्या साब, वो नसीम खालाका अन्वर है ना, क्या बोलींग करताय साब !! उसको लेगा क्या ये तुम्हारा रणजीवाला ?"

आता मात्र मला राहवेना. मी लोकसत्ता बाजुला ठेवला आणि त्याच्याशी बोलु लागलो.

नाम क्या है तुम्हारा, किधर रहते हो?

"पता नै साब, जबसे समज आयी है, सब्बी लोग छोटु कैके बुलाते है, नाम का तो कुच अता पता नै! वईसे तो उल्लासनगर मे रैताय अपुन. वो इस्टेशन के बाजु वाली झोपडपट्टी मे खोली नं. ११३. खोली क्या साब अपने नसीमखाला का झोपडा है, वोईच अपना ठिकाना. कबी कबी लेट हो जाताय तो इदर किदर बी सो जाताय. अब हवालदार आके उठाताय डंडा मारके पन क्या करे, साला अपनी किस्मतच लावारीस है, तो हवलदारको क्या बोलनेका ! " दुसरा पैर रखो साब ... बोलता बोलता त्याचे हात चालुच होते.’

आता मला त्याच्यात स्वारस्य वाटायला लागले होते.

"इसका मतलब पढाई - लिखाईके नामसे तो ठणठण गोपाळच होइंगा", मी पुन्हा एकदा आपलं हिंदी पाजळलं.

"नै साब, अपुन रात के इस्कुल मे जाताय ना ! वो टीचर दीदी है ना उसनेच सिखाया मेरेकु ये सब साफ सुफ रहनेका बोलके."
तो थोडासा पुढे झुकला आणि मला पुढे झुकण्याची खुण केली, आजुबाजुची माणसे बघत होती. पण आता मला त्यांची पर्वा नव्हती, मी थोडासा त्याच्याकडे खाली वाकलो..तो माझ्या कानाशी आला आणि हळुच म्हणाला ,"साहब, मेरे बोलनेपें मत जाना, मै इतनी घटीया जबान नही बोलता. लेकीन क्या करु साफसुथरी हिंदी बोलुंगा तो मुझसे पॉलीश कौन करवायेगा? पेट के लिये करना पडता है साब? लेकीन हा, गंदगी मुझसे बर्दाश्त नही होती!"

त्याक्षणी मात्र मला माझ्या हिंदीची खरंच लाज वाटली. मी मनोमन ठरवलं की याच्याशी फक्त मराठीतुन बोलायचं. ती एकच भाषा मी स्वच्छ आणि शुद्ध बोलु शकतो ना !

"किती कमाई होते रे दररोज? तुझ्या खालाला पण पैसे द्यावे लागत असतील तुला, तिच्या कडे राहतोस ना! मग या शिक्षणासाठी कुठुन पैसा आणतोस."

"अरे साब चाह है उधर राह है, हो जाता है इंतजाम. हौर रैने का बोले तो खाला येक पैसा भी नै लेतीय, उल्टा मै कबी कबी वडापाव लेके जाताय उसके लिये तो गुस्सा करती मेरेपे. अम्माको पैसेका रुबाब दिकाताय क्या करके पुछती उनो !"

आता पॉलीश करुन झाले होते. त्याने पिशवीतुन त्याचा तो जरासा रफ असणारा, ऑर्गण्डीच्या कापडासारखा फडका काढला आणि त्याने बुटावर शेवटचा हात मारायला सुरुवात केली.

"साब, अपुनने अपनी अम्मीको नै देखा, खाला बोलती मै उसको पटरीके पास मिला था ! लेकीन मेरेको लगताय की अल्लाकोच मेरे पे तरस आ गया होयेगा जो खाला की नजर पड गयी मेरेपे. अब वोईच मेरी अम्मी है हौर वोइच अब्बा ! कबी कबी कम पडता फ़ीस का पैसा तो खालाईच देतीय ना ! हौर एकाद बार उसके पास बी नै हुवा तो टीचरदीदी भर देती है! "

मला उगाचच लाजल्यासारखं झालं. खरतर त्याच्याशी किंवा त्याच्या खालाशी, टीचरदीदीशी माझा काही संबंध नव्हता कधी येण्याची शक्यताही नव्हती पण उगाचच वाटुन गेले की ही खाला काय किंवा ती टीचरदीदी काय ही माणसं कुणाच्या नजरेतही न येता आपापल्या परीने समाजाची सेवा करताहेत आणि आपण मात्र आपल्या बिझी वेळापत्रकाचा बाऊ मिरवुन नामानिराळे होतो. किती तोकडे, खुजे असतो ना आपण.

"हो गया साब, देखो कैसा चमक रहा है !" मी एकदम भानावर आलो. पाहीलं तर गाडी बोरीबंदर स्थानकात शिरत होती. मी खिशात हात घातला, पाकीट काढले ..पाहिलं तर पाकिटात पाच ची एक नोट होती, दहाच्या दोन तीन, पन्नास ची एक आणि काही शंभराच्या नोटा होत्या. मी त्यातली पन्नासची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली.

"यार छुट्टे नही है मेरे पास! एक काम करेगा वो बुक स्टॉलपे जा और उसके पास "चंपक" करके एक बच्चोकी किताब मिलती है वो लेके आ. तेरेको छुट्टे दो रुपये मिल जायेगे मेरी किताब भी आ जायेगी. त्याने एकवेळ नोटेकडे पाहीले...

क्षणभर रेंगाळला. पण लगेच त्याने ती नोट घेतली आणि म्हणाला ,"यही रुकना साब मै अब्बी आया!"

तो जोरात बुकस्टॊल कडे पळाला. आणि मी त्या जागेवरुन हाललो.तिथुन लांब जावुन व्ही.टी.च्या तिकीट बुकिंग हॉलपाशी एका खांबाआड जावुन उभा राहीलो. तो थोड्याच वेळात तसाच धावत परत आला. मला त्या जागेवर न पाहुन गोंधळला. दोघातीघांना काही तरी खुणा करुन विचारत होता. शेवटी मी सापडत नाही म्हटल्यावर त्याने ते पुस्तक आपल्या पिशवीत टाकलं, हातातल्या चिल्लरपैकी बहुदा दोन रुपये स्वत:च्या खिशात टाकले. बाकीच्या सगळ्या नोटा तिथेच बसलेल्या आंधळ्या भिकार्‍याच्या हातावर टेकवल्या. कपाळावरचा घाम पुसला...आणि..

"ए बुट पालीस....दो रुपीया...दो रुपीया.......!"

मला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या कंजुसपणाची लाज वाटली.

विशाल

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

6 Apr 2009 - 4:23 pm | आनंदयात्री

मस्त ... छान ओघावते आहे लिखाण. प्रसंगात गुंतवलेल्या लहान उपकथा ही छान !
:)

फक्तः

मला लगेच बोरीबंदरचे ते तथाकथीत अधिकृत पॉलीशवाले आठवले. त्यांच्या समोरच्या ठोकळ्यावर पाय ठेवले की फटदिशी पहिला प्रश्न येतो," छुट्टा है ना, बाद में झिगझिग नै मंगताय !" त्या पार्श्वभुमीवर हा सुखद वगैरे म्हणता येइल असाच धक्का होता.

खरेतर मी कधीच बाहेर पॊलीश करत नाही. तेवढीच बचत. असा कोणी मागेच लागला तर मी त्यालाच वर निर्लज्जपणे म्हणतो," फोकटमे करेंगा क्या? तो बिचारा (मनातल्या मनात का होईना) शिव्या देत निघुन जातो.

या दोन वाक्यात विरोधाभास जाणवला.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2009 - 5:43 pm | प्रकाश घाटपांडे

या दोन वाक्यात विरोधाभास जाणवला

हेच विशालच्या लेखनाचे वैशिष्ट्य जाणवले. प्रत्येक व्यक्तीत असा विरोधाभास जे दोन मनांच द्वंद्व असत त्याला सामावुन घेत प्रसंग पुढे सरकतो. तसे घडले नाही तर गर्तेत अडकत जाण्याचे भय!

मला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या कंजुसपणाची लाज वाटली.

इथे त्याला सामावुन घेतलय.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुधीर कांदळकर's picture

6 Apr 2009 - 4:56 pm | सुधीर कांदळकर

ओघवती शैली. मजा आली. पण फार वर्षांपूर्वींची असावी. आतां गेलीं आठ वर्षें पांच रुपये आहे. मुलगा अगदीं डोळ्यांसमोर उभा राहिला. स्लमडॉगपेक्षां कैक पटीनें सरस कथानक.

सुधीर कांदळकर.

अल्पना's picture

6 Apr 2009 - 5:20 pm | अल्पना

कथानक खुपच छान आहे. डोळ्यासमोर सर्व चित्र उभे राहते.

शेवटी मी सापडत नाही म्हटल्यावर त्याने ते पुस्तक आपल्या पिशवीत टाकलं, हातातल्या चिल्लरपैकी बहुदा दोन रुपये स्वत:च्या खिशात टाकले. बाकीच्या सगळ्या नोटा तिथेच बसलेल्या आंधळ्या भिकार्‍याच्या हातावर टेकवल्या. कपाळावरचा घाम पुसला...आणि..

"ए बुट पालीस....दो रुपीया...दो रुपीया.......!"

मला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या कंजुसपणाची लाज वाटली.

ह्या ओळी प्रामाणिक पणा दखवतात. B)

नरेश_'s picture

6 Apr 2009 - 5:24 pm | नरेश_

विकुभौ किती सुंदर लिहीता आपण.
स्वतःबद्दल इतके तटस्थपणे लिहीणे खरच कौतुकास्पदच !

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

प्राजु's picture

6 Apr 2009 - 9:22 pm | प्राजु

नेहमीप्रमाणेच दर्जेदार!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

6 Apr 2009 - 9:28 pm | चतुरंग

तुमचे सूक्ष्म निरीक्षण आणि प्रामाणिक कथन आवडले. :)

चतुरंग

पक्या's picture

6 Apr 2009 - 10:06 pm | पक्या

मस्त कथा. आवडली. आपली लेखनाची शैली छान आहे.

अश्विनीका's picture

6 Apr 2009 - 11:51 pm | अश्विनीका

सुंदर लिहीले आहे . आवडली कथा.

सुनील's picture

7 Apr 2009 - 10:40 am | सुनील

छान लिहिले आहे. आवडले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

7 Apr 2009 - 10:44 am | दशानन

>>तुमचे सूक्ष्म निरीक्षण आणि प्रामाणिक कथन आवडले.

हेच म्हणतो.

सुंदर.

प्राची's picture

7 Apr 2009 - 11:09 am | प्राची

शेवटी मी सापडत नाही म्हटल्यावर त्याने ते पुस्तक आपल्या पिशवीत टाकलं, हातातल्या चिल्लरपैकी बहुदा दोन रुपये स्वत:च्या खिशात टाकले. बाकीच्या सगळ्या नोटा तिथेच बसलेल्या आंधळ्या भिकार्‍याच्या हातावर टेकवल्या.
प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणा टिकवून ठेवणे,ही खरच अवघड गोष्ट आहे.त्या मुलाच्या प्रामाणिकपणाला सलाम!

सुमीत's picture

10 Apr 2009 - 4:34 pm | सुमीत

खूप चतुरस्त्र लिहित आहेस, नेहमी वेग वेगळे पण मनाला भिडनारे विषय. असाच लिहित रहा.

भडकमकर मास्तर's picture

10 Apr 2009 - 4:55 pm | भडकमकर मास्तर

उत्तम वर्णन..
शेवट आवडला...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अवलिया's picture

10 Apr 2009 - 6:29 pm | अवलिया

मस्त :)

--अवलिया