लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग २)

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
2 Apr 2009 - 12:29 am

लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग १)

स्थळ ः सिंधुदुर्गातील कुडाळमधील एक छोटेखानी घर.
वेळ ः दुपारी चारची.
पात्रे ः अस्मादिक व मातुःश्री.
-----------
पार्श्‍वभूमी ः
कोकणातील व्यवस्थित घर, मुलगी साधीसुधी, आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष वगैरे. त्यामुळे मातुःश्रींच्या एकदम सर्वाधिक प्राधान्यातली. "नाकारण्याचा प्रश्‍नच नाही!' या गटातली. त्यामुळे भेटून "पारखण्यासाठी' स्वतः मातुःश्री हजर. पण मुलगी मुंबईला काही कामासाठी गेलेली. आम्ही गोव्याहून मावशीकडून थेट कुडाळात दुपारी दाखल. आमची संभाव्य सहधर्मचारिणी संध्याकाळी उशिरापर्यंत येणार, अशी अटकळ. आत्ता येईल, मग येईल, करत संध्याकाळकडे काटा सरकलेला.
मुलीच्या आई-वडिलांशी चर्चा करून, घर-बिर बघून मातुःश्री भलत्याच खूश. आता मुलगी ही रूढ अर्थाने "मुलगी' असली, झालीच पसंती, असं एकूण वातावरण. पण रत्नागिरीला रात्रीपर्यंत पोचायचं असल्याने मातुःश्रींची चुळबूळ. मग शेवटी कंटाळून, नाइलाजानं संध्याकाळच्या गाडीनं रत्नागिरीकडे रवाना. एकट्या मुलग्यावर मुलीची "पारख' करण्याची अवघड जबाबदारी सोपविण्याचा धोका पत्करून. ("धोका' अशासाठी, की धडाधड मुली नाकारण्यात पटाईत असलेला आपला "दिवटा' ही मुलगीसुद्धा कुठल्यातरी "फालतू' कारणासाठी नाकारेल, अशी शंका!)

घटना आणि घडामोडी ः मातुःश्री निघून गेल्यानंतर संभाव्य सासुरवाडीत बिच्चारा उपवर मुलगा एकटाच. मग त्याची सरबराई करण्यासाठी संभाव्य सासू-सासऱ्यांची धावपळ. शेवटी एकदा त्या बहुप्रतीक्षित मुलीचं संध्याकाळी उशिरा आगमन. एवढा वेळ ताटकळून, जिच्यासाठी वाट पाहिली, तिच्याशी भरपूर बोलण्याची अपेक्षा.
प्राथमिक औपचारिक बोलण्यानंतर चर्चेचा भर मुंबई-कोकण प्रवासातली गर्दी, रिझर्वेशन मिळण्यातल्या अडचणी, कोकणातल्या समस्या, उकाड्याचा त्रास, घुसखोरांची मुजोरी, रेल्वे स्टेशनवरच्या असुविधा इत्यादी इत्यादी. अस्मादिकांकडून मुलीला बोलण्याची, चर्चेची मोकळीक जाहीर केलेली असतानाही, तिचा भर सामाजिक समस्यांवरच.
आपला होऊ घातलेला हा नवरा पुण्यात कुठे काशी घालतो, कुठेकुठे तडमडतो, फावल्या वेळेत कुठे उकिरडे फुंकतो, कुठे शेण खायला जातो की नाही...कश्‍शाकश्‍शाची म्हणून उत्सुकता नाही पठ्ठीला! पुण्यात, कुटुंबीयांपासून लांब, होस्टेलवर एकट्या राहणाऱ्या या आपल्या संभाव्य नवरदेवामध्ये मवाली, टपोरी, दारूड्या, व्यसनी, लबाड, फसवा तरुण लपलेला नाही ना, याविषयीही (तो कोणत्याही प्रश्‍नांची उत्तरे द्यायला तयार असतानाही) जाणून घेण्याची उत्सुकता नाही.
हताश होऊन मग त्याचाही मग प्राथमिक गप्पांनंतर "कटण्या'कडे भर. "नंतर कळवतो' वगैरे औपचारिक संकेतांचीही गरज नाही. सगळे "शब्दावाचून कळले सारे'च्या पातळीवरचे. रात्रीची बस पकडून मग थेट पुणे.
मातुःश्रींशी संवाद झाल्यावर "केलास ना घात!'चाच सूर. मग विसंवाद, रुसवे-फुगवे, समजूत वगैरे. काही दिवसांनी उपवर वधूच्या पित्याशी संवाद. "काय निर्णय' वगैरे. "एका भेटीत निर्णय नाही सांगता येणार,' असा अस्मादिकांचा आग्रह. त्यावर पलीकडून "तुमच्याकडून होकार असेल, तर पुढे जाऊ' अशी निर्वाणीची भाषा. ही एक गंमतच हं! म्हणजे, "होकार' आधीच ठरवून, मग एकमेकांच्या आवडीनिवडी, सूर जुळतात की नाही, वगैरे अंदाज घ्यायचा. म्हणजे निवडणुकीचा निकाल आधीच ठरवून मग प्रचारात कुठले मुद्दे मांडायचे, हे ठरवण्यासारखंच! अखेर "नाही'वर शिक्कामोर्तब.
एकूणात काय, आणखी एक निष्फळ प्रयत्न! कुडाळची अर्ध्या दिवसाची उडत-उडत सफर, एवढंच काय ते हाती!

(क्रमश:) (घ्या लेको!!)

मुक्तकअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अनामिक's picture

2 Apr 2009 - 1:30 am | अनामिक

आपला होऊ घातलेला हा नवरा पुण्यात कुठे काशी घालतो, कुठेकुठे तडमडतो, फावल्या वेळेत कुठे उकिरडे फुंकतो, कुठे शेण खायला जातो की नाही...कश्‍शाकश्‍शाची म्हणून उत्सुकता नाही पठ्ठीला! पुण्यात, कुटुंबीयांपासून लांब, होस्टेलवर एकट्या राहणाऱ्या या आपल्या संभाव्य नवरदेवामध्ये मवाली, टपोरी, दारूड्या, व्यसनी, लबाड, फसवा तरुण लपलेला नाही ना, याविषयीही (तो कोणत्याही प्रश्‍नांची उत्तरे द्यायला तयार असतानाही) जाणून घेण्याची उत्सुकता नाही.

=)) =)) =))

भारी लिहिलंस रे अभिजित दा!

-अनामिक

संदीप चित्रे's picture

2 Apr 2009 - 6:36 pm | संदीप चित्रे

आणि थोडा मोठा लेख लिही रे .... (असेही म्हणतो !!) ;)

प्राजु's picture

2 Apr 2009 - 7:15 pm | प्राजु

मोठा लिहि लेख..
तुझ्या टोलेबाजीच्या शैलीमध्ये इतके छोटे लेख ... !!! समिकरण जमत नाही. मोठा लिहिलास म्हणजे जास्ती मजा येईल. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

2 Apr 2009 - 3:27 am | शितल

गप्पा मस्त. :)
पुढे काय :?

रेवती's picture

2 Apr 2009 - 3:34 am | रेवती

लग्न जमेपर्यंत असे बरेच अनुभव आले असतील तर ते एकेका भागात टाकणार आहात का?
असल्यास आम्ही वाचू. हा भाग चांगला झालाय पण,
मातुःश्री निघून गेल्यानंतर संभाव्य सासुरवाडीत बिच्चारा उपवर मुलगा एकटाच. मग त्याची सरबराई करण्यासाठी संभाव्य सासू-सासऱ्यांची धावपळ.
म्हणजे नक्की कशी धावपळ? त्याचं थोडं वर्णन आलं असतं तर रंगत वाढली असती असे वाटते.
रेवती

भाग्यश्री's picture

2 Apr 2009 - 3:54 am | भाग्यश्री

ते होकार असेल तरच पुढे जाऊ हे सगळ्यात विनोदी विधान असते !! :)

हा प्रसंग भारीच!! अनामिकने कोट केलेला पॅरा फार आवडला!!

भडकमकर मास्तर's picture

2 Apr 2009 - 6:16 am | भडकमकर मास्तर

हीहीही...
मस्त झाले आहे हे लेखन...

होकार असला तर पुढे जाऊ हेही छान...
( शेवट सुखांत होईल अशी आशा होती)...असो...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नरेश_'s picture

2 Apr 2009 - 9:56 am | नरेश_

म्हणजे १०-१२ भागांची मेजवानी मिळणार बहुतेक.
अवांतर : क्रमशः लिहायला विसरलात का?

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2009 - 10:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मजा आली वाचायला! पण पुढचा भाग फारच उशीरा टाकलात. शिवाय रेवतीताई म्हणते त्याच्याशीही सहमत, अजून फुलवता आल्या असत्या 'गप्पा'!

"तुमच्याकडून होकार असेल, तर पुढे जाऊ"
एवढा गैरसमज झाला तुझ्याबद्दल! ;-)

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

आपला अभिजित's picture

2 Apr 2009 - 10:03 am | आपला अभिजित

१०-१२ भागांपर्यंत नाही छळणार! पण लिहेन काही भाग. काही आठवणी धूसर झाल्यायंत आता. पण लिहायचे खूप आहे. जमेल तसे बघू.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

`सकारात्मक' शेवट एकाच (दंत)कथेचा झाला. ती अजूनही सोबत आहे! आणि अवघे आयुष्य व्यापून (वेटोळून?) राहिली आहे. तिच्याबद्दल बहुधा, (जगलो-वाचलो, तर) अंतिम भागात!!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Apr 2009 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे अभिदा एकदम भारी लिहिलय बॉ !

एकदा आम्ही छत्तीसगढला असताना आमच्या घरच्यांनी पुण्यात असेच काहिसे परक्रम करुन एक मुलगी वगैरे पाहिली. मुलगी पाहुन आल्यावर आम्हाला फोनवर सांगितले. ( नशीब आमच्या दोघांची लग्न पत्रीकाच मला पाठवली नाही एकदम)
आम्ही :- काय करते ग ती भवानी ?
राजमाता :- काँप्युटर क्षेत्रातच आहे. काय काम करते ते माहित नाही.
आम्ही :- माझा इ-मेल आयडी द्या तिला किंवा तिचा मला समस करायला सांगा माझ्या मोबाईलवर.

दुसर्‍या दिवशी पोरीने तिचा इ-मेल आयडी आणी त्याचा पासवर्ड दोन्ही समस नी पाठवले मला ~X(

निशब्द
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अमोल खरे's picture

2 Apr 2009 - 4:29 pm | अमोल खरे

>>>दुसर्‍या दिवशी पोरीने तिचा इ-मेल आयडी आणी त्याचा पासवर्ड दोन्ही समस नी पाठवले मला

वाईट हसलो मी. अती होती ती यार.............=))

संदीप चित्रे's picture

2 Apr 2009 - 6:38 pm | संदीप चित्रे

>> दुसर्‍या दिवशी पोरीने तिचा इ-मेल आयडी आणी त्याचा पासवर्ड दोन्ही समस नी पाठवले मला
हा माणूस तर आपला नवरा होणारच आहे मग पासवर्ड द्यायला काय हरकत आहे !!! असा विचार केला असेल तिने ;)
(पण मग शेवटी लग्न तिच्याशी केलं की नाही? !!)

प्राजु's picture

2 Apr 2009 - 7:18 pm | प्राजु

शेवटी लग्न केलंस की नाही..तिच्याशी??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

2 Apr 2009 - 7:43 pm | परिकथेतील राजकुमार

अजुन एकटा जीव सदाशीवच आहे हो !
धसकाच घेतलाय मी सध्या. नशीब मी पत्ता नाही मागवला नाहीतर ती स्वतःच आली असती.

धसकलेला
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

2 Apr 2009 - 7:48 pm | लिखाळ

अभिजीत,
लेख मस्त आहे.. अजून पुढचे भाग वाचायला आवडतील :)

परा,
लै भारी अनुभव .. ह ह पु वा.
-- लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Apr 2009 - 8:11 pm | प्रकाश घाटपांडे

मुलाला सुपारीच्या खांडाच व्यसन नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.