पृथ्वीची पहाट!

उमेश कोठीकर's picture
उमेश कोठीकर in जे न देखे रवी...
30 Mar 2009 - 6:00 pm

पहाट झाली! पृथ्वी उठली !
मोहक आळस हसूनी दिला!
पक्ष्यांच्या त्या संगीताने
आसमंतही स्वर झाला!

नादमधुर ती घंटा वाजे!
पदर धुक्याचा दूर झाला
हलके हलके जाई गारवा
सूर्य गुलाबी वर आला!

हसला देव! हसली सृष्टी!
लाजून रवी तो चूर झाला!
ओले पृथ्वीचे लावण्य
बघूनी तेजतरूण झाला!

जाई गारवा! उब आली!
पृथ्वीला किरणांचा शेला
अस्फुट कळीचे चुंबन घेण्या
भ्रमर आवेगे धावत आला!

दाहक स्पर्श! प्रियकराचा
स्वेदबिंदू! ते वसुंधरेला
आच्छादूनी मेघडंबरी
सूर्य सखा तो! खजील झाला!

डोलत फुले! डोलत शेते!
आसमंतही डोलू लागला
सूर्यपृथ्वीचे मिलन होऊनी
दिन सोनेरी जन्मा आला!!

कविता

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

30 Mar 2009 - 7:39 pm | प्राजु

गोड शब्द आणि गोड कविता.

दाहक स्पर्श! प्रियकराचा
स्वेदबिंदू! ते वसुंधरेला
आच्छादूनी मेघडंबरी
सूर्य सखा तो! खजील झाला!

हे मात्र खूपच आवडले.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

1 Apr 2009 - 7:00 pm | क्रान्ति

एक अतिशय रमणीय पहाट!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}