पातेलीभर खिरीची गोष्ट!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
27 Mar 2009 - 5:38 pm

गेल्या आठवड्यात एके दिवशी कधी नव्हे तो संध्याकाळी घरी होतो. काम करूनही कंटाळा आला होता. थोडंसं (कथित) पाककौशल्य दाखविण्याची खुमखुमी आली. शिवाय, मुलीच्या आवडीचा पदार्थ करून तिची मर्जी संपादन करण्याची संधीही होतीच. म्हणून मुदपाकखान्याकडे वळलो.
काय करावं, काही ठरलं नव्हतं. नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! त्यामुळं वेगळा बेत आखला. कधीकाळी आजी रव्याची खीर करायची. तेव्हा मीही शिकलो होतो. बऱ्याच वर्षांत तिच्याकडे (म्हणजे, खिरीकडे) ढुंकून पाहिलं नव्हतं. म्हटलं, करून बघूया आज! मस्त बेत होईल!
(बचकाभर) रवा घेतला आणि खरपूस भाजून काढण्याच्या उद्योगाला लागलो. पण तो भाजता भाजत नव्हता. काही वेळाने मलाच कंटाळा आल्यावर, तो पुरेसा भाजला आहे, असा (गैर)समज करून घेऊन त्यात पाणी ओतलं. मग पुन्हा (त्याला आणि मला!) कंटाळा येईपर्यंत शिजू दिलं. रवा थोडासा जास्त झाला होता. कारण भरपूर पाणी पीत होता. जवळपास तीनदा पाणी घालूनही खिरीसदृश काही तयार होण्याचं नाव नव्हतं. शेवटी कंटाळून साखर घातली. तीही किती घालायची, काही अंदाज नव्हता. अनेक वर्षांचं पाककौशल्य पणाला लावून अंदाजे कितीतरी घातली. आता खीर तयार झाली, अशी पक्की खात्री झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं....
अरे, खीर तर दुधाची करतात! =D>
म्हणजे रवा शिजण्यापुरतं पाणी घालून नंतर त्यात दूध मिसळायचं असतं.
बोंबला! आता आली का पंचाईत? मी आधीच पाणी एवढं घालून ठेवलं होतं, की पातेलंभर खीर तयार झाली होती. मग ते पातेलं बदलून मोठं पातेलं घेतलं आणि त्यात खीर ओतून वर दूध घातलं.
एवढ्या अथक प्रयत्नांनंतर जे काही "द्रावण' तयार झालं होतं, ते मुलीनं(च) घरी आल्यावर (बहुधा, प्रचंड भूक व वडिलांवरील अपार विश्‍वासापोटी) थोडंसं चाखलं. दुसऱ्या दिवसापासून काही तिनं त्या अगम्य पदार्थाचं नावही काढलं नाही. चार दिवस फ्रीज नावाच्या "व्हेंटिलेटर'मध्ये ठेवल्यानंतर ती बिचारी खीर बेटी अल्ला को प्यारी हो गई!

या अनुभवातून एवढंच शिकायला मिळालं, की...
1. जवळपास पंधरा-एक वर्षं आपल्याला स्वयंपाक येतो, असं ऊर बडवून आपण सांगत आहोत, त्याला काही अर्थ नाही. जुन्या चुकांतून आपण काहीच शिकलेलो नाही. :S
2. अनेक वर्षं लक्षात ठेवून, किंवा तारतम्य बाळगून काही नव्या पदार्थाचा प्रयोग करावा, हे आपलं वय राहिलं नाही. #:S
3. सहधर्मचारिणीनं केलेल्या (कशाही) स्वयंपाकाला कुठल्याही प्रकारे नावे ठेवण्याचा आपल्याला अधिकार राहिलेला नाही! 8}
---

मूळ प्रेरणा : कढईभर शिर्‍याची गोष्ट

मुक्तकअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

27 Mar 2009 - 5:48 pm | लिखाळ

अनुभवातून मिळालेली शिकवण चांगली. तुमच्या मुलीलाही वडिलांनी अचानक उठून केलेला पाक-प्रयोग खाण्यासारखा नसतो अशी शिकवण दिलीत :)
अश्या वेळेला जालावरच्या पाकृंचा आधार घेतला असतात तर..
-- लिखाळ.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2009 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तचे रे अभिजितदा नेहमी सारखेच खुसखुशीत लेखन.

दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं!

हे शॉल्लीडच !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शितल's picture

27 Mar 2009 - 5:57 pm | शितल

स्वयंपाक करणे ही देखिल एक कला आहे. ;)

श्रावण मोडक's picture

27 Mar 2009 - 5:57 pm | श्रावण मोडक

नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं!
षटकार!!!
निष्कर्ष फर्मास.

रेवती's picture

27 Mar 2009 - 6:10 pm | रेवती

दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं!
फारच भारी!
किस्सा आवडला. बाकिच्यांनाही शिकता येइल यातून.;)

रेवती

सहज's picture

27 Mar 2009 - 6:27 pm | सहज

पण अश्यावेळी तरी मिपाचा पाकृ विभाग नाही वापरायचा तर कधी रे मित्रा :-)

प्राजु's picture

27 Mar 2009 - 7:23 pm | प्राजु

नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं!

आणि
3. सहधर्मचारिणीनं केलेल्या (कशाही) स्वयंपाकाला कुठल्याही प्रकारे नावे ठेवण्याचा आपल्याला अधिकार राहिलेला नाही!

ही दोन वाक्यं एकदमच आवडून गेली.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

27 Mar 2009 - 7:41 pm | क्रान्ति

प्राजुशी सहमत!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

मिसळपाव's picture

27 Mar 2009 - 8:25 pm | मिसळपाव

:-)).
खिर नाहि तर नाहि, हा किस्सा मात्र मस्त जमलाय!!

स्वाती दिनेश's picture

27 Mar 2009 - 8:41 pm | स्वाती दिनेश

मी खीर खाल्ली तर बुड घागरी...:)
गोष्ट आवडली, मस्त!
स्वाती

शाल्मली's picture

27 Mar 2009 - 8:45 pm | शाल्मली

गोष्ट आवडली, मस्त!
असेच म्हणते.

पुढील प्रयोगास शुभेच्छा! (तुमच्या घरच्यांना ;)) (ह.घ्या)

--शाल्मली.

तुमची कन्या धाडसी आहे!! :D

चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

27 Mar 2009 - 9:39 pm | प्रकाश घाटपांडे

अगोदर शिरा तयार करायचा. नंतर त्यात दुध घालून शिरा पातळ केल्यास खीर तयार होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भाग्यश्री's picture

27 Mar 2009 - 10:17 pm | भाग्यश्री

हेहे मस्तंच !! फोटो का नाही काढलात?! :)

अनामिक's picture

28 Mar 2009 - 2:00 am | अनामिक

मस्तं रे अभिजित दा.... किस्सा आवडला!

-अनामिक

धनंजय's picture

28 Mar 2009 - 2:07 am | धनंजय

खीर बिघडली तरी कथेची पाकृ मस्तच जमली आहे.

आपला अभिजित's picture

28 Mar 2009 - 3:59 pm | आपला अभिजित

बेचव खिरीचा लेख चवदार असल्याची (तोंडफाट) स्तुती केल्याबद्दल धन्यवाद!

आता मला अधिकाधिक पाक्प्रयोग करून त्यावर वेगवेगळ्या धाग्यांच्या चवडी रचायलाही हुरूप येइल!

बाकी, पाकक्रुती बघून बिघून प्रयोग करण्याचा (भोचक) सल्ला झेपला नाही. स्वत:च्या कल्पनाशक्तीवर, प्रतिभेवर आणि पाककौशल्यावर विश्वास ठेवून पदार्थ (बि)घडवण्यात जी मजा आहे, ती कशातच नाही!!

अनंता's picture

28 Mar 2009 - 5:41 pm | अनंता

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)