प्रवास
मन भिजवून गेल्या कोवळ्या स्मृतींच्या लाटा
अजूनही चालते मी पूर्वसंचिताच्या वाटा
रित्या आयुष्यासारखी वठलेली झाडे कुठे,
कुठे पळसफुलांनी सजलेल्या रानवाटा
कधी चालता चालता अडखळती पाउले,
कधी मन ठेचाळते, सलतो उरात काटा
किती वळणे घेऊन जाऊ किती मी दुरून?
तुझ्या घराकडे जाती ओळखीच्या सा-या वाटा
वेड्या मना, अविचारी, उतावीळ होऊ नको,
तुझ्या क्षणिक मोहाचा उगा होईल बोभाटा
नाही ठाव किना-याचा, असा प्रवास हा माझा,
शीड फाटलेली नाव आणि भरतीच्या लाटा
क्रान्ति
प्रतिक्रिया
7 Mar 2009 - 12:05 am | प्राजु
क्रांन्ती,
नाही ठाव किना-याचा, असा प्रवास हा माझा,
शीड फाटलेली नाव आणि भरतीच्या लाटा
मस्त. तुझ्या कल्पना अफाट असतात गं. अप्रतिम!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Mar 2009 - 12:33 am | बेसनलाडू
शीड फाटलेली नाव आणि भरतीच्या लाटा
वावा! छान!
(नावाडी)बेसनलाडू