एखादा दिवस

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
5 Mar 2009 - 9:15 pm

(|: एखादा दिवस
एखादा दिवस असा रेंगाळतो, एकेक क्षण युगासारखा
नुसते नगारे वाजवणा-या कोरड्या पोकळ ढगासारखा
सकाळ सरता सरत नाही; विस्कटलेले किरण सांडून
सुस्तावलेला सूर्यही दिसतो उनाड, हट्टी मुलासारखा
कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी
दिवस बिचारा वाट चुकलेल्या, भांबावलेल्या पिलासारखा
संध्याकाळचा तोच पसारा; धूसर, धुरकट रंग उधळून
भरकटलेला वारा फिरतो ओढाळ, नाठाळ गुरासारखा
रात्रही तशीच मरगळलेली; पेंगुळलेल्या मंद चांदण्या
धुक्यात गुरफटलेला चंद्र कोमेजलेल्या फुलासारखा
पुन्हा उद्याची वाट पहाणारा एकेक क्षण युगासारखा
परीकथेतील राजकन्येच्या स्वप्नामधल्या जगासारखा
क्रान्ति

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

5 Mar 2009 - 10:02 pm | प्राजु

जबरदस्त लय आहे कवितेला,
आणि पहिल्या शेरातच मनाची पकड घेते कविता. :) मस्तच..
नाठाळ गुरासारखा, कोमेजलेल्या फुलासारखा, हट्टि मुलासारखा... सगळेच मस्त!!
जियो!! खूप सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

6 Mar 2009 - 11:27 am | राघव

असेच म्हणतो. खूप मस्त!
मुमुक्षु

चन्द्रशेखर गोखले's picture

5 Mar 2009 - 10:36 pm | चन्द्रशेखर गोखले

छानच ! सुंदर प्रतिमा!

पक्या's picture

6 Mar 2009 - 12:03 am | पक्या

छान आहे कविता..वेगळ्या उपमा आवडल्या.

दिपक's picture

6 Mar 2009 - 10:50 am | दिपक

सगळ्या उपमा आवडल्या :)

कसं सुचतं हो ?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2009 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार

कंटाळवाणी दुपार पसरते, कातावलेली नागीण जशी

बर्‍याच दिवसांनी एक छान उपमा वाचायला मिळाली. बाकी कवितेविषयी आमचे ज्ञान अगाध आहे, लोकांनी केलेल्या सुंदर काव्याचे विडंबन करणे ह्या पुढे आमची बुद्धी धावत नाही ;)

स्वगत :- काय पश्या मग लिहितो का आता 'एखादा पेग' ??

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

जृंभणश्वान's picture

6 Mar 2009 - 12:23 pm | जृंभणश्वान

छानच आहे कविता

जागु's picture

6 Mar 2009 - 12:47 pm | जागु

मला पुर्ण कविता खुप आवडली.

बेसनलाडू's picture

6 Mar 2009 - 12:49 pm | बेसनलाडू

आवडली.
(नागोबा)बेसनलाडू