गाणी आणि आठवणी - भाग २

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
27 Jan 2009 - 3:14 pm

'हिरो' ची गाणी जशी मला मी लहानपणी घालविलेल्या निवांत दिवसांची आठवण करून देतात तशी काही गाणी खूप खास अशा ठेवणीतल्या आठवणी जागवतात. ती गाणी आपण आपल्या मनाच्या एका सुगंधी कोपर्‍यात नीट घडी घालून ठेवतो. भरजरी वस्त्रे जशी जुन्या काळी नीट घडी करून ट्रंकेच्या तळाशी ठेवली जात असत त्याप्रमाणे ही भरजरी गाणी आपण जपून ठेवतो; कधीतरीच बाहेर काढण्यासाठी आणि आठवणींची येथेच्छ आतषबाजी अनुभवून झाली की पुन्हा त्या सुगंधी कोपर्‍यात रचून ठेवण्यासाठी. माझ्या वाट्याला अशी भरजरी गाणी अंमळ कमीच आली. आणि जी गाणी मला भरजरी वाटतात ती खरच भरजरी आहेत की १५ दिवस वापरून न धुतलेल्या रुमालासारखी आहेत हे सांगणं जरा अवघड आहे. :-)

मी शाळेत असतांना 'साजन' ची गाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यातलं "देखा हैं पहली बार साजन की आँखों में प्यार..." हे गाणं अजूनही ऐकलं की मनात थोडी कालवाकालव होते. म्हणजे असं विशेष धमाकेदार काही नाही; मला आवडणारी एक मुलगी आमच्या घरापासून साधारण १० मिनिटांच्या अंतरावर राहत असे. मी बर्‍याचदा तिच्या घरावरून जात असे, केवळ ती बाहेर उभी असेल आणि आपल्याला दिसेल या वेड्या आशेपायी मी तिच्या घरावरून चक्कर टाकत असे. हे गाणं तेंव्हा वारंवार ऐकू यायचं. त्यामुळे हे गाणं आणि ती मुलगी हे समीकरण माझ्या मनात घट्ट रुजलेलं आहे. अजूनही हे गाणं ऐकलं की एका पाठोपाठ एक अशी गाणी आठवत जातात आणि सिनेमाची रीळे उलगडावीत तशी आठवणींची सुरेल भेंडोळी उलगडली जातात. लगेच 'सडक' मधलं "हम तेरे बिन कहीं रह नही पातें..." हे गाणं आठवतं आणि ती फटाक्-फटाक अशा चपला वाजवत मोठ्या तोर्‍यात शिकवणीला जातांना दिसते, "मेरा दिल भी कितना पागल हैं..." ऐकलं की ती मैत्रींणींसोबत दोन वेण्या झुलवत शाळेत जातांना दिसते, "आशिकी में हर आशिक हो जाता हैं मजबूर..." हे गाणं (दिल का क्या कसूर) ऐकलं की आत्ताच तिने आपल्याकडे चोरून पाहिले हे मनाला पटवून देण्यासाठी तिच्या नजरेमध्ये शोधलेला चोरटेपणा आठवतो... ही गाणी चांगली वाटतात. ती चांगली असोत किंवा नसोत पण मनावर आठवणींचा शिडकावा करून जातात.

आठवणींचं एक वैशिष्ट्य असतं; उसासा टाकून 'गेले ते दिवस' म्हणायला लावतात या आठवणी. 'कबके बिछडे हुए हम आज...' हे लावारिस मधलं गीत ऐकलं की माझं मन पुन्हा माझ्या गावांत जाऊन बसतं. प्रकाश टॉकीजला सिनेमा सुरू होण्या आधी हे गाणं वाजवायचे. आता प्रकाश टॉकीज मरणासन्न अवस्थेत आहे. एके काळी अमिताभचे सगळे हिट सिनेमे मी या टॉकीजमध्ये पाहिले. जेंव्हा टॉकीजला सरळ टॉकीज म्हणायचे त्या काळातली ही गोष्ट आहे. 'जाने कैसे कब कहाँ...' किंवा 'मुझे नवलक्खा मंगा दे रे...' किंवा 'ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना...' ही गाणी ऐकली की प्रकाश टॉकीजचे ते रम्य दिवस आठवतात. एक काळ्पट पडदा, तट्ट्यांचे कुंपण आणि वाळू एवढेच काय ते असायचे या टॉकीजमध्ये. अंधार पडल्यानंतर सिनेमा सुरू व्हायचा. वाळूवर बसून अनिमिष नेत्रांनी तो पडद्यावरचा थरार अनुभवलाय आम्ही. आता मल्टिप्लेक्सच्या जमान्यात तो सिनेमा कुठेतरी हरवलाय असं वाटतं. आता सिनेमा बघायचा म्हणजे आगाऊ तिकिट आरक्षण करायचे, पार्किंग साठी १० रुपये मोजायचे, तिकिटाचे २०० रुपये मोजायचे, पॉपकॉर्ननामक लाह्यांचे २५ रुपये मोजायचे आणि रुमालाएवढ्या पडद्यावर पेप्सी किंवा कॉफी पीत-पीत पडद्यावर चाललेला खेळ बघायचा असा जमाना आलाय. आराम आला पण आत्मा गेला. आत्माच नाही तर आत्माराम कुठून मिळणार?

सकाळी जळगांव आकाशवाणीवर 'आराधना' हा कार्यक्रम लागायचा. अजूनही लागतो. "अवचिता परिमळू..." किंवा "पांडुरंग कांती..." किंवा कविता कृष्णमूर्तीचे "तुझे नांव ईश्वर अल्ला..." किंवा माणिक वर्मा, रतिलाल भावसार, रामदास कामत, प्रल्हाद शिंदे, पं. भीमसेन जोशी आदी गायकोत्तमांची एकापेक्षा एक सरस गाणी ऐकली की पहाटेची रम्य वेळ आठवते. दर शुक्रवारी मोहम्मद हुसेन आणि अहमद हुसेन या बंधुंचे "खुदा से करता हूं मैं ये, दुआ मदीने में..." हे गाणं लावायचे या कार्यक्रमात. काय सुंदर वाटायचे. असं वाटायचं की खरच खुदा आशीर्वादाचा हात फिरवतोय डोक्यावरून. मी झपाटल्यासारखे हे गाणे तोंडपाठ केले होते. आता ही गावी गेलो की वडील सकाळी रेडिओ लावतात पण दुर्दैवाने काळाच्या ओघात सुटीच्या दिवशी देखील लवकर उठणे ही कल्पना असह्य व्हायला लागली आणि गावी जाऊन देखील हा खजिना लुटायचे राहून जाते.

गझल हा एक आणखी मनाचा पूर्णपणे कब्जा घेणारा प्रकार. शिक्षण (कसेबसे) संपवून जेंव्हा मी नोकरीसाठी वणवण (बोरूबहाद्दर अजून दुसरे काय करणार म्हणा! :-)) सुरू केली तेंव्हा गझल मला कडकडून भेटली. शाळेत भेटलेल्या सुंदर मुलीसारखी नोकरी पण हुलकावण्या देऊ लागली. तेंव्हाच गुलाम अलीच्या गझलांची एक कॅसेट गवसली. "आवारगी...", "हंगामा हैं क्यूं बरपा...", "चुपके चुपके..." या अप्रतिम गझलांचा मी फॅन झालो आणि (काहीच काम नसल्याने) वारंवार ऐकून अगदी मधल्या संगीतासकट मी त्या गझला पाठ करून टाकल्या. "चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकून ही आपलीच तर कहाणी नाही असे वाटून डोळ्याच्या कडा ओलावत असत. त्यातले "मैं इस दुनिया को अक्सर देखकर हैरान होता हूं, न मुझसे बन सका छोटासा घर, दिन्-रात रोता हू, खुदाया तुने कैसे ये जहाँ सारा बना डाला...चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." हे कडवे रात्रीच्या गडद अंधारात चटका लावायचे. नंतर पुढे एकदा नोकरीच्या शोधातच औरंगाबादला जायचा प्रसंग आला. माझ्याकडे एक जुना वॉकमन होता आणि तीच ती गुलाम अलीची कॅसेट होती. "चुपके चुपके..." ऐकून खूप वर्षांपूर्वी त्याच त्या शाळेत आवडणार्‍या मुलीला भेटायला मी औरंगाबादला गेलो होतो आणि तिने मला सेल्समनला झिडकारतात अशा पद्धतीने झिडकारले होते हे आठवले. मी पुन्हा पुन्हा 'चुपके चुपके...' ऐकले. आता कधीही ऐकले की औरंगाबाद आठवते. तिथली नोव्हेंबरची थंडी आठवते आणि नोकरीसाठी एका ठिकाणी जाऊन परत आलो होतो हे आठवते आणि लगेच त्या आधीची औरंगाबाद भेट आठवते. मजा येते, आता हसू येते. पण कुठेतरी "चुपके चुपके..." ती नशा अजूनही देते. परवा कुठेतरी गुलाम अलीचीच "अपनी तसवीर को आँखों से लगाता क्या हैं..." ऐकले आणि पुन्हा मी माझ्या गझलने भारलेल्या दिवसात रममाण झालो. पंकज उधासचं "तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने..." हे गाणं म्हणजे आठवणींची मेजवानीच! मित्रांसोबत केलेल्या अगणित पार्टया आणि त्यात अगणित वेळा मी गायलेले हे (आणि इतर गाणी देखील) गाणे म्हणजे जीवाभावाच्या मिंत्रांसोबत घालविलेल्या खूप सुंदर अशा काळाची उजळणीच जणू. अजूनही हे गाणं ऐकलं की रात्री-अपरात्री ढाब्यावर बसून गाण्यांच्या जमवलेल्या मैफीली आठवतात; कठीण काळात मित्रांनी दिलेली साथ आठवते आणि मन भरून येते.

'भावसरगम' आणि 'आयुष्यावर बोलू काही' हे कार्यक्रम आणि त्यातली सुंदर गाणी म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा ठेवा आहेत. "चांदण्यात फिरतांना..." किंवा "पूर्तता...माझ्या व्यथेची पूर्तता, माझिया मृत्युत व्हावी...पूर्तता..." किंवा "बडे बडे नैन दिये निर्धन को..." किंवा "सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या..." ही गाणी ऐकली की पं. हृदयनाथ मंगेशकरांचा लवचिक आवाज आठवतो; मित्रांसोबत बसून पान चघळत ऐकलेली त्यांची गाणी आठवतात आणि त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाला एक हळूवार कुर्निसात जातो. पुन्हा जायला पाहिजे कार्यक्रमाला असे राहून्-राहून वाटते. संदीप खरे आणि सलील कुळकर्णी या जोडगोळीने अशीच भुरळ घातलेली आहे ७-८ वर्षांपासून. "एकटे जगू, एवढचं ना..." किंवा "चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..." किंवा "नामंजूर..." किंवा "सरीवर सरी..." ऐकलं की मन सुखावतं. मी शिकागोमध्ये काही महिने असतांना बर्‍याचदा ही गाणी ऐकत असे. आता ही गाणी ऐकली की अगदी सुरुवातीला जेंव्हा ऐकली तो काळ तर आठवतोच पण शिकागोमधले एकट्याने घालवलेले दिवसही आठवतात आणि मग माझ्या प्रेमळ घरमालकाला एखादा ईमेल लिहिला जातो. अमृता खानविलकरचं 'गोलमाल' मधलं "ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा..." किंवा 'यंदा कर्तव्य आहे' मधलं "आभास हा..." ऐकलं की शिकागोचे दिवस जिवंत होऊन डोळ्यासमोर उभे राहतात. फार गंमत आहे ही सगळी.

"तुम मिले, दिल खिले, और जीने को क्या चाहिये..." हे 'क्रिमिनल' मधलं एम्.एम. क्रीमचं गाणं ऐकलं की मला फर्ग्युसन कॉलेजचे दिवस आठवतात. "क्या मौसम आया है..." हे 'अनाडी' मधलं गाणं ऐकलं की माझे ११ वी च्या निकालानंतरचे दिवस आठवतात. १२ वी सुरू झाल्यानंतरही मी हा सिनेमा नीलायमला दोनदा (कशासाठी हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? :-))पाहिला होता हे आठवतं आणि मग होस्टेलचे दिवस आठवतात. १९४२ अ लव्ह स्टोरी' ची गाणी ऐकल्यावर मला माझ्या १२वी चे दिवस आठवतात आणि फर्ग्युसनला असणार्‍या कायम फाड्-फाड इंग्रजी बोलणार्‍या असंख्य मुली आठवतात. माझ्याकडे आणि माझ्यासारख्या लहान गावातून, खेड्यातून डायरेक्ट फर्ग्युसनला शिकायला आलेल्या गावंढळ मुलांकडे या मुली तुच्छतेने बघत असत्... नव्हे ढुंकूनही बघत नसत. :-) त्यांच्याशी चुकून बोलायचं काम पडलं (हे कसे टळेल याचा विचार करण्यात आम्ही खूप वेळ घालवत असू) तर कसं बोलायचं याची जुळवाजुळव आठवते. माझा एक हुशार मित्र अगदी छोट्या वस्तीवरून फर्ग्युसनला शिकायला आला होता. आम्ही दोघांनी खूप वेळ एकत्र घालवला होता. त्याने एमबीबीएस पूर्ण केले आणि तो आता अमेरीकेत एमएस करतोय आणि अतिशय उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होतोय. मी शिकागोला असतांना तो मला भेटायला आला आणि मग मनपाच्या पुलाजवळ नदीकाठी बसून गप्पा मारणारे आम्ही लेक मिशिगनच्या काठी मनसोक्त गप्पा मारत बसलो. हे सगळं आठवायला "पहला नशा, पहला खुमाँ..." ची एक छोटीशी लकेरही पुरेशी होते......

असंख्य गाणी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य आठवणी! कधी कधी असं वाटतं की आयुष्य म्हणजे आठवणींचं गाणं! आपण कोठे होतो आणि कोठे आलो याची तुलना करत प्रवास करणं म्हणजे आयुष्य! आठवणीतली गाणी म्हणजे आपले आयुष्यभराचे सोबती. कुठून आपल्या आठवणीतले गाणे ऐकू यावे आणि गतायुष्याचा पट आपल्यासमोर उघडून समोर बसावे आणि म्हणावे "घे टिपून तुझे आवडते क्षण, घे जगून पुन्हा एक रम्य आठवण!"

म्हणून गाण्यांचा संग्रह (आयपॉड, मोबाईल, एमपी३ प्लेयर, काँप्युटर, पेनड्राईव्ह या व अशा उपकरणांवर) या प्रकारावर माझा फारसा विश्वास नाही. माझ्याकडे अजूनही तोच जीर्ण वॉकमन आहे. सगळ्या कॅसेट्स् नी कधीच साथ सोडलेली आहे. वॉकमन अजूनही आहे कपाटात आणि मनाच्या कप्प्यात. सुंदर गाणं असच अवचित कुठूनतरी ऐकू यावं आणि चिंब करून जावं. त्याची खुमारीच काही और, नाही का? (समाप्त)

--समीर

संगीतअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

27 Jan 2009 - 3:25 pm | सहज

समीर दोन्ही लेख आवडले.

मन-हृदय-मेंदु-आठवण या चारही ठिकाणी "कॅच कॅच" खेळल्यासारखे वाटले. ज्यांना वाक्य समजणार नाही त्यांनी ही एका ओळीची कविता आहे समजावे.

समीरसूर's picture

28 Jan 2009 - 9:52 am | समीरसूर

धन्यवाद, सहज!
असेच काहीतरी असावे असा माझादेखील कयास आहे. :-)

--समीर

दिपक's picture

27 Jan 2009 - 3:49 pm | दिपक

सुंदर लेख! ऎकलेल्या बहुतेक गाण्यांशी निगडीत कुठलीतरी आठवण असतेच.

’दिवाना’ चित्रपटातली ’पायलिया...’ , ’कोई ना कोई चाहिये...’ गाणी ऎकली की दुपारी ऑटो रिक्षात बसुन केलेली थट्टा मस्करी आठवते.. ’ऎ काश के हम...’ गाणे ऎकले की ऎन थंडीच्या दिवसात पडद्यावर पाहिलेला ’कभी हा कभी ना’ आठवतो. ’साजन’ मधले ’देखा हे पहली बार’ आणि ’सांवली सलोनी तेरी...’ ऎकले की व्हिडियोकॉनच्या वॉकमन (अजुनही आहे)वर ही गाणी ऎकत केलेला मुंबई-संगमनेर यस्टीचा प्रवास आठवतो.

आठवणींच्या जगात घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद. :)

समीरसूर's picture

28 Jan 2009 - 9:44 am | समीरसूर

'दीवाना' चित्रपट माझ्या अंदाजानुसार १९९२-९३ ला आला होता. आम्ही मित्र आमच्या गावाकडे एका मित्राच्या शेतात भरीत पार्टीला गेलो होतो तेंव्हा या सिनेमाची गाणी खूप वेळा ऐकली होती. ही गाणी ऐकली की त्या पार्टीची आठवण हमखास येते.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला (डिसेंबर २००६) आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. प्रचंड थंडी आणि एमटीडीसीचे ब्रिटीशकालीन रिसॉर्ट! त्यामुळे बराच वेळ आम्ही खोलीतच राहत असू. तेंव्हा 'काबूल एक्सप्रेस' चे "काबूल फिजा, ये है काबूल फिजा..." हे गाणे टीव्हीवर सारखे लागायचे. त्यामुळे हे गाणे ऐकले की ती महाबळेश्वरची सहल आठवते आणि तिथली थिजवणारी थंडी आठवते. "आ आ जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना..." हे गाणे ऐकले की आम्ही मित्रांनी कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत असतांना केलेली गणपतीपुळ्याची सहल आठवते कारण प्रवासात आम्ही हे गाणे खूप वेळा ऐकले होते. "दिलबर, दिलबर..." (सिर्फ तुम), "हम दिल दे चुके सनम...", "लडकी बडी अंजानी हैं..." (कुछ कुछ होता हैं), "अरेरे अरे ये क्या हुआ, मैने न ये जाना..." (दिल तो पागल हैं), "लडकी...शहर की लडकी..." (रक्षक)... ही गाणी ऐकली की कराडच्या प्रभात, रॉयल, राजमहाल या चित्रपटगृहांची आणि फन एन फूड नावाच्या मिनी थिएटरची आठवण आवर्जून येते. कराडला ४ वर्षात आम्ही खूप सिनेमे पाहिले. 'परिंदा' मी रॉयलला सलग तीन दिवस पाहिला कारण त्यातले "प्यार के मोड पे, छोडोगे जो बाहें मेरी..." हे आशा भोसलेंनी गायिलेलं नितांतसुंदर गाणं मला बघायचं, अनुभवायचं आणि लक्षात ठेवायचं होतं. त्यामुळे 'परिंदा' आमच्या कराडच्या दिवसांपेक्षा खूप जुना असला तरी हे गाणे ऐकले की मला कराडचे दिवस आणि कृष्णेच्या जवळ असलेलं रॉयल थिएटर आठवतं. खूप छान थिएटर होतं. अजूनही आहे. पुण्याच्या मंगला टॉकीजच्या मालकांचे ते थिएटर आहे आणि तिथे मंगलाचा फोटो देखील लावलेला आहे. 'जमाई राजा' मधलं "प्यार हुआ हैं मुझे और तुझे, ये मान भी जा तू, नजरे तो मिला तू..." हे लक्ष्मीकांत्-प्यारेलाल यांचं गाणं ऐकलं की मला मंगलामध्ये पहिलेला 'जमाई राजा' आठवतो........यादी खूप मोठी आहे आणि आणखी मोठी होतच जाणार आहे कारण अजून बरीच गाणी ऐकायची आहेत, मनात साठवायची आहेत आणि वेळप्रसंगी आठवून आठवणींची सहल अनुभवायची आहे. :-)

--समीर

किट्टु's picture

27 Jan 2009 - 3:39 pm | किट्टु

समीर,

तुमचे दोन्ही लेख खुप आवडले! खरचं काही गाणी अशी असतात जी एकुन त्याच्याशी जुळलेल्या आठवणी जाग्या होतात. :)

समीरसूर's picture

28 Jan 2009 - 9:46 am | समीरसूर

धन्यवाद, किट्टू!

--समीर

अनंत छंदी's picture

27 Jan 2009 - 4:35 pm | अनंत छंदी

"आवारगी...", "हंगामा हैं क्यूं बरपा...", "चुपके चुपके..." या अप्रतिम गझलांचा मी फॅन झालो आणि (काहीच काम नसल्याने) वारंवार ऐकून अगदी मधल्या संगीतासकट मी त्या गझला पाठ करून टाकल्या. "चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकून ही आपलीच तर कहाणी नाही असे वाटून डोळ्याच्या कडा ओलावत असत. त्यातले "मैं इस दुनिया को अक्सर देखकर हैरान होता हूं, न मुझसे बन सका छोटासा घर, दिन्-रात रोता हू, खुदाया तुने कैसे ये जहाँ सारा बना डाला...चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." हे कडवे रात्रीच्या गडद अंधारात चटका लावायचे.
जियो मेरे यार! गुलाम अली, मेहदी हसन म्हणजे क्या बात है!!

समीरसूर's picture

28 Jan 2009 - 9:50 am | समीरसूर

गुलाम अली म्हणजे गझलचा बादशाह आहे. त्यांच्या गझला ऐकून माझ्या आयुष्यातला एक मोठा कालखंड सुसह्य झाला.
"ये दर्द की तनहाईयां, ये दश्त का वीराँ सफर,
हम लोग तो उकता गये, अपनी सुना, आवारगी!!"
अशी अवस्था झाल्यानंतर ही गझल ऐकणे हा काय अनुभव असतो हे शब्दात सांगणे अवघड आहे. :-) धन्यवाद.

--समीर

दशानन's picture

27 Jan 2009 - 4:45 pm | दशानन

सुंदर !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!!
गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी

समीरसूर's picture

28 Jan 2009 - 9:51 am | समीरसूर

धन्यवाद, जैनाच कार्ट!

--समीर

मैत्र's picture

28 Jan 2009 - 11:05 am | मैत्र

समीर तुमचे दोन्ही लेख छान आहेत!
अजून लिहा... आता एक ठराविक प्रकारची गाणी / गायक / संगीतकार असं घेऊन लिहा...
गुलाम अली पासून सुरु करता येइल.
दिल में इक लहर सी उठ्ठी है अभी...
कोई ताजा हवा चली है अभी..

मिथिला's picture

28 Jan 2009 - 11:43 am | मिथिला

आठवणी जाग्या झाल्या! "मुझे नींद न आये..दिल".."कह दो की तुम हो मेरी वरना..तेझाब"..

विसोबा खेचर's picture

28 Jan 2009 - 12:23 pm | विसोबा खेचर

समीरराव,

दोन्ही भाग सुंदरच..!

कृपया लिहिते रहा...

तात्या.

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:36 pm | समीरसूर

धन्यवाद!

--समीर

सरफरोश मधलं हे गाणं आमचं फेवरेट..

या गाण्याचं पिक्चरायजेशन तर केवळ अप्रतीम. जुने दिवस आठवतात.

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:46 pm | समीरसूर

हा चित्रपट मी ६-७ वेळा टॉकीजवर पाहिला. यातली सर्व गाणी छान होती. मी कराडला असतांना तृतीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालो परंतु एक गोची झाली होती. द्वितीय वर्षाचा एक विषय काही केल्या मला सोडायला तयार नव्हता. खूपच प्रेमात पडला होता बहुधा माझ्या. मी विचार केला की मुली आपल्या प्रेमात पडत नाहीत; हा बापुडा पडला आहे तर कशाला त्याचे दिल दुखवावे? म्हणून मी पण त्याचे खूप लाड केले. नंतर मात्र हा विषय अवघड जागेचे दुखणे होऊन बसला. मग कधी हे पुस्तक, कधी अमक्याच्या नोट्स, कधी गणिते पाठ करून तर कधी थिअरी पाठ करून मी या विषयाशी काडीमोड घेण्याचा प्रयत्न केला. त्याने पण निकराने झुंज दिली आणि शेवटच्या अटेंप्टला ते ही फेरतपासणीमध्ये त्याने माझी पाठ सोडली. तेंव्हा जर त्याने मला रीतसर घटस्फोट दिला नसता तर मात्र मला एक वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा झाली असती. फेरतपासणीचा निकाल लागेपर्यंत काय करायचे म्हणून मी वेळ न दवडता सिनेमे बघण्याचा सपाटा लावला. त्यात सरफरोश खूपदा पाहिला. त्यामुळे यातली गाणी ऐकली की मला माझा तो विषय आठवतो ज्याने माझी झोप उडवली होती. :-)

--समीर

गुलाम अली म्हणजे गझलचा बादशाह आहे.

खरं आहे.

ये आलम शोख का देखा ना जाए
वो बुत है या खुदा देखा ना जाए ।

ये किन नजरोंसे तूने आज देखा
के तेरा देखना देखा ना जाए ।

हमेशा के लिए मुझसे बिछड जा
ये मंझर बारहाँ देखा ना जाए ।

ही त्यांची गजल केवळ अप्रतिम.

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:46 pm | समीरसूर

सुंदर गझल!

--समीर

वाहीदा's picture

29 Jan 2009 - 4:05 pm | वाहीदा

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ ।
रंजिश=enmity

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ ।
मरासिम=agreements/relationships, रस्म-ओ-रह-ए-दुनिया=customs and traditions of the society

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ।
सबब=reason, ख़फ़ा=angry

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ ।
पिन्दार=pride

एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ ।
लज़्ज़त-ए-गिरिया=taste of sadness/tears, महरूम=devoid of, राहत-ए-जाँ=peace of life

अब तक दिल-ए-ख़ुश'फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ ।
दिल-ए-ख़ुश'फ़हम=optimistic heart, शम्में=candles

That's great poetry ! Magnificient expression of melancholy ! And Runa Laila's silken voice just weaves magic…This was also sung by Mehdi Hasan but was immortalized by Runa Laila

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:48 pm | समीरसूर

धन्यवाद ही गझल लिहिल्याबद्दल! सुंदर शायरी आणि अप्रतिम गायकी!

--समीर

दशानन's picture

2 Feb 2009 - 2:54 pm | दशानन

वाह काय गझल आहे !

सुंदर !

मेहंदी हसन ह्यांची "अल्फ़ाज़ कहाँ से लाऊँ मैं,छाले की टपक समझाने को " प्ले करा ! खुप सुंदर आहे गझल !

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

सखाराम_गटणे™'s picture

2 Feb 2009 - 4:23 pm | सखाराम_गटणे™

वाह मार डाला.
आज तो वाहीदा जी ने मा रडाला

शंकरराव's picture

3 Feb 2009 - 5:00 pm | शंकरराव

व्वा गटणे !

बेशक ये जिहाद हि है ईश्क निभाने के लिये
देखो कितने आशिक है तैयार कुर्बान होने के लिये

शंकरगालिब

शंकरराव's picture

2 Feb 2009 - 8:58 pm | शंकरराव

गझल अतिषय आवडली :-)

जमाने की रस्म या पाकइश्क मेरा
बादेसबा ए अलहिदा ...
तुमने तो जितेजी मार डाला

पाकइश्क = pure love बादेसबा = fresh air
शंकरगालिब

संदीप चित्रे's picture

4 Feb 2009 - 12:48 am | संदीप चित्रे

आज खर्‍या अर्थाने कळला.
मनापासून धन्यवाद वाहीदा.

आकाशस्थ's picture

1 Feb 2009 - 2:44 pm | आकाशस्थ

समीर,

दोन्ही लेख खूपच आवडले.

'तू चीज बडी है मस्त मस्त...' ऐकलं की आपण फर्गसन ला १२ वी ला असतानाचे गणपतीचे दिवस मला आठवतात. हे गाणं ज्या गणेश मंडपाच्या लाऊड्स्पीकर वर सुरु असेन तिथे अगदी रस्त्यावर थांबून पूर्ण गाणं ऐकूनच आपण पुढे जात असू.

'बगळ्यांची माळ....' हे गीत मी पूर्वी ऐकलं होतं. या गीताशी माझ्या कुठल्याही आठवणीची नाळ जोडलेली नव्हती. पण आता जेव्हा मी हे गीत ऐकतो, तेव्हा लेक मिशिगन ला त्या झुडूपाखाली तू हेच गीत गातानाचा आठवतो.

सुंदर !!!

आकाश.

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:35 pm | समीरसूर

'तू चीज बडी हैं मस्त मस्त..." ऐकलं की मला देखील आपले बारावीचे फर्गसनचे दिवस आठवतात. आपण पायीच पिंजून काढलेला पुण्याचा गणपतीमय परिसर आठवतो. जिथं हे गाणं सुरू असेल तिथं थांबून ते पूर्ण ऐकून पुढे जाण्याची लगबग आठवते. :-) खरचं खूप मस्त दिवस होते ते. बारावीचा शेवटचा पेपर संपल्यावर मी समोरच्या योगेश्वरीमध्ये चहा पीत असतांना तिथल्या टीव्हीवर रवीना टंडनचे "टीप टीप बरसा पानी, पानी ने आग लगायी..." हे गाणे सुरू होते. अजूनही हे गाणे ऐकले किंवा चिंब भिजलेल्या रवीना टंडनचे जाडजूड पाय त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या स्लॅबवर धपाधप आदळतांना पाहिले की मला योगेश्वरीमधला चहा आठवतो. :-)

समस्त मिपाकर मंडळी,
माझ्या लेखात जो माझ्या अमेरिकास्थित मित्राचा उल्लेख आलेला आहे तो हाच आकाशस्थ! याचे खरे नांव डॉ. आकाश पांढरे. आम्ही दोघांनी खूप चित्रपट सोबत पाहिले आणि खूप धमाल केली. नुकतेच त्याने अमेरिकेत एमएस पूर्ण केले आणि आता पीएचडी साठी त्याने बाह्या सरसावल्या आहेत. :-) आम्ही शिकागोला भेटल्यावर तीन दिवस खूप गाणी ऐकली, गायिली आणि गतस्मृतींना परत एकदा उजाळा दिला.

--समीर

महेंद्र's picture

1 Feb 2009 - 3:55 pm | महेंद्र

राह बनी खुद मंझिल , पिछे रह गई मुश्किल.. हे गाणं मला खुप आवडायचा. तसेच एक मराठी गाणं माझी आजी गुणगुणायची.. हिरव्या साडी ला पिवळी किनार गं.. कडू लिंबाला आला बहार गं... मला वाटतं गदिमांचं गाणं आहे हे. कुणाकडे एम पी ३ मधे असेल तर क्रुपया लिंक पोस्ट कराल कां?
लेख छान आहे. किप इट अप!

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:49 pm | समीरसूर

धन्यवाद, महेंद्र!

--समीर

अनंत छंदी's picture

1 Feb 2009 - 6:00 pm | अनंत छंदी

मेहदी हसनच्या
रंजीश ही, ये धुआं कहासे उठता है, भूली बिसरी चंद उम्मीदे या गझला प्रसिद्ध आहेतच पण त्याची फराजने लिहिलेली शोला था जल बुझा हूं ही गझल म्हणजे केवळ अप्रतिम!

चित्रा's picture

1 Feb 2009 - 7:37 pm | चित्रा

दोन्ही लेख आवडले (आधीच्या लेखात प्रतिक्रिया द्यायची राहिली).

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:50 pm | समीरसूर

धन्यवाद, चित्रा!

--समीर

प्राजु's picture

1 Feb 2009 - 9:15 pm | प्राजु

दोन्ही लेख अप्रतिम जमले आहेत.
तुम्ही सांगितलेली सगळी गाणी अगदी जशीच्या तशी माझ्याही मनाच्या एका कोपर्‍यात आठ्वणींच्या हिंदोळ्यावर झुलु लागल्या.
खरंच, गाणं कानावर पडलं की, आपण ताबडतोब गतकाळात रममाण होतो.
मी अहमदनगर ला गेले होते तेव्हाची आठवण "आपकी ऑखोमे कुछ, महके हुए से राज है" या गाण्याशी निगडीत आहे. ते गाणं लागलं की, मला माझी मैत्रीण लेखा आठवते आणि "आपकी बदमाशीयोंके ये नये अंदाज है" या ओळीवर दोघिंनी एकमेकीकडे "किती छान आहे कल्पना..." अशा नजरेने पाहून एकदम खुदकन आलेले हसू आठवते.
गाणी.... आठवणींच्या अनमोल ठेवा.. फक्त स्वतःसाठीचा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:53 pm | समीरसूर

वा, खुदकन हसू आणि 'बदमाशियाँ'...सहीच काँबिनेशन आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ते गाणं अप्रतिम आहेच. गुलजारसाहेबांनी खरच काही (बहुधा सगळीच) उत्तम गाणी लिहून ठेवली आहेत. इजाजत मधली सगळी गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.

--समीर

यशोधरा's picture

1 Feb 2009 - 10:33 pm | यशोधरा

सुरेख लेख!

रामदास's picture

1 Feb 2009 - 11:55 pm | रामदास

हंगामाच्या नंतर वेस्टन ऑडीओ कॅसेटनी गुलाम अलीसाहेबांच्या चार कॅसेट बनवल्या होत्या.त्यावेळी मी रात्री स्टुडीओ असीस्टंट म्हणून नोकरी करत होतो.रमझानचे दिवस होते. उपास सोडल्यावर रात्री वरळीच्या स्टुडीओत रेकॉर्डींग सुरु व्हायचे. अरेंजर जॉली मुकर्जी आणि अन्नू मलीक .रात्रभर रेकॉर्डींग चालायचं.मध्यंतरात सोनाली जलोटा गजल शिकायला यायची.
त्यावेळी,एकगजल मला फार आवडली होती.
एक पगली मेरा नाम जो ले शरमाए भी घबराए भी
गलीयो गलीयो मुझसे मिलने आये भी गह्बराए भी.
नंतर गुलाम अलींचे बरेच कार्यक्रम मी बघीतले पण ही गजल परत ऐकायला मिळाली नाही.
तुमचा लेख वाचल्यावर परत त्या रेकॉर्डींगच्या रात्री आठवल्या.पण आपल्या आवडत्या गाण्यांबद्दल किती लिहावं ते कमीच.
लेख आवडला.आणखी लिहा. कदाचीत तुमचे लेख वाचता वाचता आणखी काहीतरी आठवेल.

ढ's picture

2 Feb 2009 - 4:27 pm |

रामदासजी,

रात गए घर जानेवाली गुमसुम लडकी राहोंमें
अपनी उल्झी जुल्फोंको सुलझाए भी घबराए भी ।

कौन बिछडकर फिर लौटेगा क्यूं आवारा फिरते हो
रातोंको इक चांद मुझे समझाए भी घबराए भी ।

पगली ह्या अल्बम मधील ही गजल अप्रतिम आहे.

प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी आपण तेथे उपस्थित होता हे भाग्य मला
लाभले असते तर..... असो.

हर किसी को जहाँ नही मिलता....

अनंत छंदी's picture

2 Feb 2009 - 8:22 pm | अनंत छंदी

रामदासभाई
नमस्कार
गुलाम अलींचे रेकॉर्डींग प्रत्यक्ष पाहण्याचा तुम्हाला योग आला भाग्यवान आहात!

trendi.pravin's picture

1 Feb 2009 - 11:59 pm | trendi.pravin

खरच लेख खुप सुन्दर आहे...आठवणी जाग्या झाल्या.. "बाजिगर ,जान तेरे नाम ,फूल और कान्टे यान्ची सुध्दा गाणी मस्त होती..उल्लेख हवा होता...
धन्यवाद

trendi.pravin
****************
style मे रहने का........ always!

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 2:57 pm | समीरसूर

त्यांचा उल्लेख हवा होता. फूल और कांटे माझ्या दहावीच्या परीक्षेनंतर आला होता आणि खूप गाजला होता. म्हशीसारख्या 'रेकणे' या ध्वनीप्रकारात समाविष्ट होऊ शकणार्‍या कुमार सानू नामक गायकाची यातली गाणी खूप लोकप्रिय झाली होती. ती मला आवडायची पण कुमार खूपच नाकात गायचा. "तुमसे मिलने को दिल करता हैं..." ऐकल्यावर अजूनही गुदगुल्या होतात. :-)

--समीर

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2009 - 12:09 am | बिपिन कार्यकर्ते

साला हा धागा इतके दिवस वाचायचा राहूनच गेला होता. आज वाचला. उगाच वाचला असं झालं. जीव कासाविस झाला.

समीर, खूपच सुंदर लिहितोस. प्लीज लिहित रहा असाच.

बिपिन कार्यकर्ते

शशिधर केळकर's picture

2 Feb 2009 - 1:19 am | शशिधर केळकर

हाही लेख सुरेख जमलाय.
मन्ना डे हा एक सॉलिड मोठा ग्रेट असा गायक - जो मला प्रचंड भावतो. त्यांची गाणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आणि खरेतर कालातीत आहेत. आणि अगदी भावनांनी ओथंबलेली. प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारी; आपल्या अनुभवांमधे घेऊन जाणारी आहेत.

समीरसूर's picture

2 Feb 2009 - 3:01 pm | समीरसूर

यशोधरा, अनंत छंदी, ट्रेंडी प्रवीण, बिपिन कार्यकर्ते, शशिधरजी आणि समस्त प्रतिसादक मंडळी,

आपल्या सगळ्यांच्या उत्साह वाढविणार्‍या प्रतिसांदांबद्दल शतशः धन्यवाद!

--समीर

चाणक्य's picture

3 Feb 2009 - 4:51 pm | चाणक्य

अप्रतिम लेख. खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि प्रतिक्रीया वाचताना पण मजा आली.
सुंदर...
पु.ले.वा.ब.आ.