शून्य प्रहर... भाग १

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
25 Jan 2009 - 10:50 pm

चार जिने चढून येताना साळवेला दम लागला होता.साळवेच्या सोबत मेल नर्स परमार होता. अडतीस नंबरला ताप असल्याचा मेमो पाठवून दोन तासानी परमार उगवला होता.साळवेला उशीर आवडायचा नाही.परमार बरोबर शिफ्टमध्ये काम करणं साळवेला आवडायचं नाही. दारू पिउन कामावर येणं ,येता जाता उचलेगीरी करणं .परमारची तक्रार करूनही फायदा नव्हता.अशा अनेक तक्रारी परमारविरुध्द ताटकळत होत्या.सगळे डॉक्टर त्याच्याच बाजूनी असणार.मेंटल हॉस्पीटच्या काळ्या करड्या जगात परमारसारखा रीसोर्सफुल माणूस हाताशी असणं गरजेचं होतं.रीटायरमेंटला दोन तीन महीने बाकी असताना तक्रार करणं म्हणजे इन्क्वायरी होईस्तो इथेच थांबायला लागलं असतं.साळवेनी गळ्यातली माळ एकदा चाचपून पाहीली.
अडतीस नंबरचं दार बंद होतं, म्हणजे असायलाच हवं. काचेच्या छोट्या झरोक्यातून दोघांनी आळीपाळीनी डोकावून बघीतलं.खोलीत पिवळट फिका उजेड पसरला होता.पेशंट लाकडी खुर्चीवर बसला होता.जागा होता. हात मुडपून छातीवर ठेवले होते.पायाची जुडी करून पाय वर घेतले होते.
"नवो छे के.? "परमारनी विचारलं.
"नाय.पन त्याचे सगेवाले येत नाय म्हनून तुला माहीत नाय."साळवेनी उत्तर दिलं.
परमार मोठ्यानी हसला. "साला.. डोक्रा ..तुला काय भेटत नाय काय..."
दार उघडून दोघंही आत गेले.खुर्चीत बसलेल्या पेशंटनी त्यांच्या कडे पाह्यलं आणि तोंडावर एक वेडगळ हसू फुटलं.
"एला हेंडकफ नाय का. ?"परमारनी विचारलं.
"नाय. डसायल हाय.रोज धा वाजता झोपतो. आज झोपला नाही म्हणून बगला तर अंगात जाळ.मंग मेमो पाटवला."
परमारनी एक पाउल पुढे टाकल्यावर पेशंट आक्रसला.
परमार सावध झाला.
साळवेनी हळूच आवाज दिला."डॉक्टर आलेत हां..हुटा जागेशी आता.."
पेशंटनी जागचं हलायचा प्रयत्न केला.पण जागचा हलेना.
आता दोघंही पुढे आले.त्याच्या खाकेत हात घालून उभं करतानाच कळलं की ताप फार वाढला आहे.
त्याच्या बेडवर त्याला आडवं करून परमारनी थर्मामीटर लावलं.साडेचार ताप.
"साळवे भाऊ , ताप जास्त हाय. एमोला (मेडीकल ऑफीसरला) मेमो लिवा."परमार म्हणाला.
"आता या टायमाला ते थोडं येणार."साळवे म्हणाला.
पेशंटच्या हाताची चाळवाचाळव सुरु झाली होती. डोळे मात्र छताकडे .
"आज काय बा ताप आला.दवा आधीची हाय की नाय" परमारनी आणखी चौकशी केली.
"नाय वो.जरा पण त्रास न्हाई. चार वर्स झाली. अमेरीकेतून आला हाय."असं म्हणत साळवेनी बाहेरून खोलीतला मोठा दिवा लावला.
अचानक उजेड झाल्यावर पेशंट कळवळला. डोळे मिटून पडून राहीला.
"साळवे हे बगीतलं का. ?"त्याचंही लक्ष गेलं आणि साळवे चुकचुकला.
पेशंटच्या हाताची बोटं रक्ताळली होती. काही बोटं नीळी काळी पडली होती. सुजली होती. दिवसभर नखं चावून चोखून जखमा झाल्या होत्या.अंगठ्याजवळ थोडीशी स्कीन सोलून अजूनही रक्त येत होतं.शर्टावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग सुकून काळे पडले होते.
परमारनी हातात हात घेण्याचा प्रयत्न केला. पेशंट अचानक ऍक्टीव्ह झाला. हात हिसकून परत शांत पडून राहीला.
"साळवे तू बघ .ट्राय मार. हाताला धोवायला लागेल." साळवेनी मान डोलावली .
ताप या जखमांमुळेच आला असावा.अठ्ठावीस वर्षानंतर पण साळवेचं मन निगरगट्ट झालं नव्हतं.त्यानी करुणेनी पेशंटच्या कपाळावर हात ठेवला.
"बाबू रे, डोक्टर हायेत. हात पघू दे. " पेशंटची नजर आता साळवेकडे वळली.परत एक वेडगळ हसू पसरलं.लहान मुलानी हात पसरावे तसे हात पुढे आले.बोटावर सूज वाढली होती.हात पुढे करताना साळवेच्या हाताला हात लागला.पेशंटच्या डोळ्यातून पाणी पाझरायला सुरुवात झाली.परमारनी खिशातून स्प्रेची बाटली काढली. बोटांवर फवारा मारला. हात हलला नाही. पण डोळ्यातून पाणी जास्तच वहायला लागलं.
परमारनी मान नकारार्थी डोलावली."हेला गरम पाण्यानी धोवलं तर बरं. मंग आपण नाईसची गोली देवू.सकाळी एमोचा राउंड व्हील तेवा दाखवा.पन हा पेशंट कसा बगला नाय मी."परमारची उत्सुकता वाढत होती.
"डसायल हाय. मी बोल्लो ना तुमाला.असा बी आज पैल्या टाईम पघतोय.पन आता काय कराचा...." साळवेला काळजी वाटत होती.
"तुमी थांबा हिते.मी गरम पानी आनी ड्रेसींग ट्रे घेउन येतो..मंग मी आलो की तुमे स्टोरशी नवा कपडा आना."असं म्हणत परमार वळून चालायला लागला.
"लवकर यावा."साळवेनी सांगीतलं .पण तोपर्यंत परमार बाहेर गेला होता.
"काय केला बाला ह्या तुमी ."साळवेनी पेशंटचा हात परत हातात घेतला.
पेशंट साधारण तिशीचा तरुण होता.गोरापान असावा एकेकाळी. आता काळवंडला होता.डोळे मोठ्ठे गायीसारखे .डोळ्याखाली काजळी साचली होती.दात सुरेख नाजूक होते.पुरुषाला शोभणार नाहीत असे गुलाबी ओठ होते.डोक्यावर लांब मऊ केस होते. चार पाच ठिकाणी टक्कल पडलं होतं. इलेक्ट्रोडच्या जुन्या खुणा होत्या. आता त्याचं अंग तापानी थरथरायला लागलं होतं.हात परत जुडी करून छातीवर गेले होते.
साळवेच्या डोळ्यात पाणी आलं .
"कसा भोग रे देवा "असं म्हणत तो भिंतीजवळ उभा राहीला.
"मी ऍव्हे मारीया गाणार आहे ."तरुणाच्या तोंडून पहीलं वाक्य आलं.
"गावा हा गावा."
"पण बाहेर स्नो आहे का?" त्यानी विचारलं .
साळवेला काही कळल नाही .पण त्याला उत्तर काय द्यायचं माहीती होतं .
"उद्या सकाल्ला देऊ हा स्नो आपन."आता त्या तरुणाचं अंग जास्तच कापायला लागलं .
साळवेच्या मनात भिती भरून आली.
"मी आबाला फोन करील हा उद्या. ते आणतील हा."
बाहेरच्या व्हरांड्यात चालण्याचा आवाज आला. परमार आला होता.
एका हातात ट्रे आणि दुसर्‍या हातात गरम पाण्याची बादली होती.खाली ठेवून साळवेला म्हणाला "तुमी घमेला धरा."परमार कामात तरबेज होता. त्यानी हलकेच पेशंटच्या हातावर पाणी ओतायला सुरुवात केली.डेटॉलचा वास पसरायला लागला.
"डॅड,डेटॉल लावायचे. सॉकर खेळल्यावर ."अचानक तो तरुण म्हणाला.
परमारनी हातावर थोडं पॅराक्साईड टाकलं.
"याला थंड पान्यानी स्पंज करावा लागेल.ताप कमी व्हील."साळवेनी म्हटलं.
"पण अटली मेनत केम ? याचा सगेवाला काय देतो का तुला ."परमारनी विचारलं.
सा़ळवेनी मान डोलावली."दिवाळी भेटते.डीन साहेबाकडे."परमारला एव्हढच समजतं हे त्याला माहीती होतं.
बेटाडायीनचा बोळा फिरवल्यावर पेशंट थोडासा कण्हला.
"त्याला हे नाईसची आनी ही एक गोली द्या."
साळवेनी हातात पाण्याचा पेला धरला.
परमारनी पाठी हात घालून त्याला बसतं केलं.
त्यानी पटकन गोळ्या गिळल्या.
"आ बायडी जेवा नरम छे. "परमार म्हणाला.साळवेनी मान डोलावली पण त्याला परमारच्या डोळ्यातली उत्तेजना दिसली नाही,
"मी पानी आनतो.
हां पानी बी आना आनी स्टोरशी कपडा पन आना."
परमारला अचानक आठवण आली.ट्रेमधून एक चपटी बाटली काढून त्यानी फटाफट चार घुटके मारले.
साळवेनी रागानी बघीतल्यावर जोरात हसून म्हणाला" डोक्रा जा ना. कपडा ला."
साळवे घमेल्यात थंड पाणी घेउन आला.
"आईस केप आनली असती तर बरा झाला असता.जा .तुमी वार्डातून आईस केप आनी स्टोरशी कपडा आना."परमार म्हणाला.
साळवेनी तोंड फिरवून दारुचा दर्प टाळला.परत एकदा परमारच्या आवाजातली उत्सुकता साळवेच्या कानाआड झाली.
खोलीतला मोठा दिवा बंद करत साळवे वॉर्डकडे जायला निघाला. परमारनी एकदा पेशंटला न्याहाळलं.
"चिकणो छे."असा मनात विचार येईतो त्याला मागे चाहूल लागली.साळवे परत आला होता.
"आता तू जा ना भाई."
"हां जातु मी पन काई तरी इसारलू ... आता आठवेना पघा..".
परमारनी एकदा रोखून बघीतलं आणि म्हणाला "डोक्रा ..जाना भाई जल्दी.."
गळ्यातली माळ चाचपत साळवे चालायला लागला.त्याची पाठ वळल्यावर परमारनी भिंतीला टेकून चपट्या बाटलीतून चार घोट मारले.मनाशी विचार केला .म्हातारा वॉर्डात जाईल..मग स्टोरमध्ये..
स्टोरवाला झोपला असेल तर त्याला उठवून कपडे आणेपर्यंत विस मिनीटं नक्की..म्हातार्‍याच्या चालीनी अर्धा तास पण लागेल..मनाशी काहीतरी विचार करत त्यानी ड्रेसींग ट्रेवरचा नॅपकीन घमेल्यात बुडवला. एकदा पेशंटकडे बघीतलं.त्याचा चेहेर्‍यावर काळ्या केसांची झुलुपं पसरली होती.परत एकदा चिकणो छे असं म्हणत त्यानी त्याच्या गालावर हात फिरवला.ओठावरून बोट फिरवलं .पेशंट गाढ झोपला होता.त्याच्या शर्टाची बटनं मोकळी करत परमारनी हाक मारली."ए भायला..हुट हवे.."स्पाँज टॉवेल त्याच्या उघड्या छातीवर फिरवत परमार गुणगुणायला लागला..
एक मिनीट विचार करून दार बंद केलं.
दोन्ही हातानी त्याच्या पोटावर गुदगुल्या करत त्यानी पोराच्या चेहेर्‍याकडे बघीतलं.
झोपेत पोरगा हसला..परमारला आता राहवेना..पेशंटचा एक पाय दुसर्‍या पायावर अडकवला हलका धक्का देत त्याला कुशीवर केलं.
दरवाजा उघडून बाहेर नजर टाकली.शुकशुकाट.
अंगावरचे कपडे फेकत भुकेल्या कुत्र्यासारखा पेशंटजवळ पोहचला.हातावर थुंकून त्यानी हातावर हात चोळले.पुन्हा एकदा हातावर थुंकला.
पायजम्याच्या इलास्टीकमधून हात सरकवत परमारच्या पाशवी वासना उधाणायला लागल्या.
पेशंट उसळून बसला..
"नो डॅनी प्लीज डोण्ट..."
परमार काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता....
हातात कपडे घेउन येणार्‍या साळवेच्या कानावर एक अभद्र किंकाळी आली आणि काळीज फाटल्यासारखं धडधडायला लागलं.इमर्जन्सी बेलचं बटन दाबत त्यानी जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली.रात्रीच्या अंधारात सगळ्या पेशंटच्या वेगवेगळ्या आक्रोशानी हॉस्पीटल भरून गेलं.वॉचमन धावत धावत आपापल्या वॉर्डची गेटं बंद करायला लागले.सिक्युरीटीवाल्यांनी फोकस लाईट चालू केले.आवारातल्या कुत्र्यांनी एकाच वेळी भुंकायला सुरुवात केली.
दुसर्‍या मजल्यावर साळवे पोहचला तेव्हा बराच उशीर झाला होता.परमार फरशीवर गडबडा लोळत होता.त्याचा चेहेरा रक्तबंबाळ झाला होता.छाती पोटावर कुत्र्यानी लचके तोडल्यासारखे चावे होते.
रक्त भरलेल्या तोंडानी पेशंट अंगाची वळकटी करून खाटेखाली थरथरत लपला होता.
साळवेला यायला बराच उशीर झाला होता.

**************************************************************

त्या छोट्याशा केबीनच्या मानानी आत बरीच माणसं गोळा झाली होती.डीन रणखांबे आपला चश्मा पुसत डोळ्याला लावून कुठे बघावं असा विचार करून काढत होते. परत एकदा उगाचच पुसत होते. पोलीस निरीक्षक सुधीर झेंडे आणि हवालदार आपापसात कुजबुजत होते .हवालदाराच्या हातातला वायरलेसचा हँडसेट मधूनच अचानक जिवंत व्हायचा.खरखरीतून एक आवाज यायचा आणि मग शांतता. सगळी माणसं त्यांच्याकडे बघायची.शेवटी हवा तो मेसेज आल्यावर झेंडे साहेबांनी घसा खाकरत सुरुवात केली.
"का ओ ,काय करायचं आता सांगा .तो शुध्दीवर आलाय. बोलायला काय नाई पन डॉक्टरानी सांगीतलं की डेंजर काय नाही."
"आमची तक्रार लिहून घ्या आणि कायद्यानी कार्यवाही करा."आबांनी कणखर आवाजात सांगीतलं.
"आमी कुठं नाय म्हणतोय पण डीन साहेबांचं आयकाल की नाई काही" झेंडेनी डीन साहेबांकडे बघत म्हटलं .
"माझं म्हणणं एकदा तरी कन्सीडर करा .तुमच्या नातवाला काही धक्का पोचणार नाही याची हमी मी देतो" डीन साहेबांनी एकदा प्रयत्न करून पाहीला.
सकाळी अडीच वाजल्यापासून ते तक्रार कशी टाळता येईल ह्याचाच विचार करत होते.("सालं एक तर प्रमोशन उशीरा मिळालं.आता क्रीम पोस्टींग भेटलं तर ही नस्ती हजामत.त्या परमारच्या आयला...साला वसूली बरी करायचा पण हे चाळे कुणी सांगीतले नव्हते." नाहीतर आधीच काहीतरी करता आलं असतं.)
"साहेब माझी विनंती एकच आहे .तक्रारीची नोंद करा."आजोबांनी एकसुरी आवाजात सांगीतलं.
"नाही मी काय म्हणतो आम्ही खातेनिहाय चौकशी करू ना.आताच सस्पेन्शच्या ऑर्डर काढतो मी ."डीननी एक पत्ता टाकून बघीतला.
"मग आपण पंचनामा केला आहे तो कशाला "आश्विन म्हणाला.
"ए बिल्डर तू मध्ये बोलायचा नाही हां.तू गप बसून रहा"झेंडेसाहेबानी आवाज चढवला.
" खातेनिहाय चौकशी ही तुमची सोय आहे .मला माझ्या नातवाचं हित बघायचं आहे.मी पुन्हा एकदा सांगतोय माझी तक्रार नोंदवा"आजोबा एकही इंच हलायला तयार नव्हते.
"आजोबा, तुमचा नातू सुरक्षीत आहे.मी हमी देतोय ना."डीन कळवळले.
"सुरक्षीत? आजोबांच्या कपाळावरची शीर तडतडा उडायला लागली. "त्याच्यावर आज बलात्कार झाला आणि तुम्ही म्हणताय की तो सुरक्षीत आहे."
"तसं नाहीये.माझ्या एमोनी रीपोर्टात लिहीलं आहे की ..."डीन एक नवा मुद्दा मांडत
"माझ्या दृष्टीनी अटेंप्टेड रेप डज नॉट लेसन द सीव्हीरीटी" कायद्याची काय कलमं आहेत मला विचार नाही करायचा.माझा नातू ठार वेडा आहे हे मला माहीती आहे.त्याला दोन्हीतला फरक कळणारा नाही म्हणून माझी जबाबदारी कमी होत नाही.आज वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ,दोन्ही डोळ्यानी आंधळा माणूस तुमच्याकडे एकच मागणी करतो आहे की माझी तक्रार नोंदवून घ्या आणि मी बघतोय की तुम्ही पण डोळ्यावर पट्टी बांधून गुन्ह्याकडे दुर्कक्ष करायला मला कसं भाग पाडता ये ईल हे बघताय.उलटपक्षी एक सज्ञाणवयीन पण मानसीक अपंगाचा एकुलता एक पालक म्हणून माझी जबाबदारी वाढत जाते.नको त्या मुद्द्याच्या जाळ्यात फसणारा मी नव्हे. माझी तक्रार नोंदवून घ्या आणि माझा नातू सुरक्षीत राहील याची लेखी हमी द्या"आजोबांनी एका दमात वाक्य संपवलं.
आता डीन चिडले."बघा आजोबा आतापर्यंत मी बोललो नव्हतो पण गेले सहा वर्षं..."
"मी गेल्या सहा वर्षाचंच बोलत नाही आहे.आज रात्री जे झालं तेव्हढंच आपण बोलू या"आणि "सहा वर्षं काय दहा जरी असली तरी कायद्यानी दिलेली जबाबदारी आहे.त्याचा ताबा कोर्टानी तुमच्याकडे दिला आहे हे तुम्ही विसरू नका"आजोबांच्या बोलण्यापुढे डीनना काही सुचेना.
"मी विधानपरीषदेचा एक्स मेंबर आहे.राज्यातल्या तुरुंगसुधारणेच्या समीतीचा अध्यक्ष होतो.मला कायदा समजतो" "मला आता नविन काहीही समजावू नका.पुढची कार्यवाही करा.मला ताबडतोब नातवाची पण भेट घ्यायची आहे .आतापर्यंत तो शुद्धीवर आला असेल ."आजोबांच्या डोळ्यात पाणी भरून आलं.
डीननी हात लांबवून बेल वाजवली.
दरवाजा उघडून एक माणूस आत आला."जा रे बाबा ,एमोला बोलाव ताबडतोब. आणि यांचा पेशंट शुद्धीवर आला का?"
"यांचा पेशंट...? त्याला तर सिव्हीलला पाठवला एमोनी.."डीननी कपाळाला हात लावला.त्यांचा छुपा हुकुम उघडा पडला होता.
आजोबा ताडकन उठून उभे राहीले.सिव्हीलला ...? का बरं ..तुम्ही हे कसं करू शकता? आतापर्यंत सांभाळून ठेवलेला तोल आता जायला लागला होता.
आश्वीननी आजोबांचा हात धरला."आबा , मी आता वर फोन लावतो...
"ए बिल्डर तू गप "झेंडे ओरडले.
दरवाजावर ठोठावल्याचा जोरात आवाज आला.डीन जवळजवळ ओरडलेच.आता या ना ..असं म्हणता म्हणता त्यांचा चेहेरा पडला.आधी एक बुटकासा माणूस आणि त्याला ढकलत एक जाडगेलासा काळा माणूस आत आला.
"हे डॉक्टर बर्गे.."डीननी बुटक्या माणसाकडे बोट दाखवत ओळख करून दिली.
तुम्ही पाठवलं तरी कसं सिव्हीलला ..माझ्या नातवाला ..आजोबांनी आपला आवाज ताणत विचारलं.
"मी हितला एमो आहे हो..मला सांगू नका तुमचा अधिकार..मला पेशंटची कंडीशन खराब वाटली मी पाठवला त्याला सिव्हीलला."आजोबांकडे पहात त्यानी उत्तर दिलं.
बर्‍याच वेळानी डीनला सुटल्यासारखं वाटलं.आता सगळा फोकस बर्गेंवरती गेला.
"हे बघा सगळेच ट्रॉमा आम्ही हिते हॅंडल नाही करू शकत्.".बर्गे बोलतच राहीला असता पण जाडगेलासा माणूस आता हातवारे करत बोलायला लागला होता.
"डीन साहेब एव्हडा राडा होतो आणि तुम्ही आमाला बोलावू शकत नाय का ?"
हे कोण बोलतायत..आजोबांना काही कळेनासं झालं होतं..
"मी युनीयनचा शेक्रेटरी आहे साहेबराव जगदाळे आणि बंधू सुरेंद्र परमार आमचे जुने मेंबर आनी सदस्य आहेत.त्यांच्यावर अन्याव झाला तर सगले बंधू कामगार ताबडतोब संपावर जातील."
"डीन साहेब आमाला योग्य तो न्याय मिलालाच पायजे" बोलता बोलता दरवाज्याजवळ गर्दी वाढत चालली होती याची खात्री झाल्यावर त्याचा आवाज वाढत चालला होता.
"मी आताच टीव्ही वाल्याला बोलावतो.."
आता झेंडेंचा तोल गेला .रात्री अडीच वाजेपासून चाललेला गोंधळ आता हाताबाहेर जाणार याबद्दल त्यांची खात्री पटायला लागली. त्यांनी कॉलर धरून लिडरला बाजूला बसवलं .
"आय झवाड्या ...बोलतच राशील की ऐकशील पैले..?"
पुढची पाच मिनीटं ऐकण्यात गेल्यावर साहेबरावाचा आवाज कमी झाला पण तो काही गप्प बसेना.
"आमची तक्रार तुम्ही लिहून घ्या साहेब "त्याचं पालूपद चालू राह्यलं.
"ठिक आहे मी लिहून घेतो पण एकदा लिहीली की पाठी घेणार नाही."झेंडेनी कायदा दाखवला.
"चालेल पन आधी आम्ही आमच्या सदस्याशी बोलतो... आम्हाला परवानगी द्या .."असं म्हटल्यावर बर्गे पटकन म्हणाला "जा मग सिव्हीलला..आनी भेटा त्याला...
आजोबांचा धीर सुटला ."आश्विन , लाव फोन तू होमसेक्रेटरीना ...मी बोलतो.."
क्षणभर केबीनमध्ये शांतता पसरली.
"साहेब ,माझं ऐका.तुम्ही पेशंटला काही घरी घेऊन जाउ शकणार नाही.त्याला इथेच ठेवावं लागेल.माझं ऐका तक्रार करण्यापूर्वी एकदा तुमच्या नातवाला तर बघून घ्या..तो सुखरुप असला तर काही प्रश्नच नाही."सगळा धीर एकवटून बर्गेंनी विनंती केली.
आजोबा ताडकन उठले .ठिक आहे .आश्विन चल आपण जाउ या सिव्हील हॉस्पीटलला....आश्विननी आजोबांच्या हातात काठी दिली."सकाळ झाली का आता ? "
"हो आजोबा , साडेआठ वाजतायंत .आपण पाच तास इथेच आहोत."
आजोबा रडायला लागले. "आंधळ्याला काय कळतो दिवस आणि रात्र रे..आश्विन चल जाउन परत येउ या."
आजोबा आणि आश्विन बाहेर पडल्यावर झेंडे साहेब बर्गेंकडे वळले."मादरचोद.. एव्हढा वेळ का लावला रे...मी आधीच सांगत होतो ना पाठव सिव्हीलला म्हणून...नसती झेंगट साली.
आतातरी पोचला का तो सिव्हीलला.."
"आत्त्ता कुठे? हे जातील त्यानंतर पोहचवतो तिथे. एंब्युलन्स उभी करून आहे बाहेरच मैदानात.त्या पोराला सीडेट करून ठेवलाय आतमधी.आठ तासाची निश्चींती आहे.
आणि माझं ऐका त्या पोराला काही झालं नाहीये.ट्रॉमा म्हणावा तर तो आधीच शिझोफ्रेनीक आहे.आतापर्यंत कॅटाटोनीक होता आता कदाचीत प्यारानॉईड होईल. अशा इमर्जन्सीत कमीतकमी तीन तास तरी वेळ भेटायला पायजे ना तयारी करायला .आता तो आंधळा आणि बिल्डर जाउन येतील तोपर्यंत आपण पण फिल्डींग लावू शकतो ना काय म्हणता"बर्गे हसत हसत म्हणाला.
"नसत्या भानगडी ह्या झाल्यात बॉ.सोडोमीची केस फार भारी पडेल हां बर्गे आपल्याला.तरी बरं तसं काय झालं नाही .त्या पोरानी जीव नाही घेतला हे नशीब नाहीतर घरीच जायला लागलं असतं बघा."
डीन म्हणत होते."बाकी बर्गे तुमच्या हुशारीनी तयारीला थोडा वेळ मिळतो आहे.तुम्ही चहापाणी करून परत या .मग कामाला लागू या."
"च्यायला ,तुम्हाला चिंता फार. एक सॉडोमीची केस आन तुमच्या जीवाला घोर .पोलीस होऊन बघा, रोज साहेब लोक कशी मारतात.दुखलं तरी बोंब मारता येत नाही."झेंडे पटकन बोलता बोलता थांबला."तो वॉर्डबॉय कुठाय ? त्याला सांभाळा हां तुम्ही.तो आय विटनेस आहे बघा."
आतापर्यंत साळवेला सगळेजण विसरलेच होते.
साळवे बाकावर आडवा झाला होता.
"ह्याला ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवा.नाहीतर त्याला कोऍक्युज्ड करा.नाहीतरी रजेवरून आल्यावर रिटायर होणारा आहे."
बर्गे पुढे झाला.त्यानी साळवेला हाक मारली."बुवा तुझ्या ड्युटीत गोंधळ झाला आणि तू झोप."
बोलता बोलता बर्गेनी साळवेच्या पाठीवर थाप मारली.साळवेचं अंग थंड पडलं होतं.
तिघंजण चरकले.साळवेची हृदयक्रिया बंद पडून बराच वेळ झाला होता.

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

अवलिया's picture

25 Jan 2009 - 10:57 pm | अवलिया

जबरदस्त शुन्य प्रहर !!!

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

घाटावरचे भट's picture

26 Jan 2009 - 12:13 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो.

रामदास's picture

25 Jan 2009 - 10:55 pm | रामदास

काहीतरी गोंधळ आहे.नीलकांत यांना फोन केला आहे.

रामदास's picture

25 Jan 2009 - 10:59 pm | रामदास

धन्यवाद.

प्रदीप's picture

26 Jan 2009 - 9:08 am | प्रदीप

ह्या कथेची सद्य परिस्थिती नक्की काय आहे? रामदास ह्यांनी 'काहीतरी गोंधळ झाला आहे, नीलकांतला फोन केला आहे', असे लिहीले आहे. त्यावर नीलांतने 'धन्यवाद' एव्हढेच जाहीर उत्तर दिलेले आहे. म्हणून ही विचारणा करत आहे. आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे का?

रामदास's picture

26 Jan 2009 - 9:49 am | रामदास

प्रकाशित झाली नव्हती.म्हणून नीलकांत यांची मदत घेतली होती.
आता आहे त्या स्थितीत ही कथा (भाग १) जशी लेखकाला अभिप्रेत होती, तशी दिसत आहे.

प्राजु's picture

26 Jan 2009 - 12:51 am | प्राजु

काय लेखन आहे तुमचं रामदास!! शब्दच नाहीत. खिळून रहायला होतं..
लवकर लिहा पुढचा भाग.
काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

26 Jan 2009 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

प्राजु ताईंच्या 'काही मेडीकल टर्म्स आहेत त्यांचे अर्थ जर कंसात मराठीत लिहिलेत तर खूप बरं होईल.' या प्रतिक्रीयेचा जरुर विचार व्हावा.
मस्त्त पकड घेतलिये लिखाणाने. पुढिल भागासाठीची उत्सुकता वाढली आहे.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

धनंजय's picture

26 Jan 2009 - 7:02 am | धनंजय

ग्रिपिंग

नंदन's picture

26 Jan 2009 - 8:31 am | नंदन

असेच म्हणतो. पकड घेणारे लेखन, पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jan 2009 - 9:02 am | llपुण्याचे पेशवेll

>>असेच म्हणतो. पकड घेणारे लेखन, पुढच्या भागांची वाट पाह
असेच म्हणतो

पुण्याचे पेशवे
Since 1984

घाटावरचे भट's picture

26 Jan 2009 - 12:19 pm | घाटावरचे भट

आणि अजून अपूर्ण असलेल्या बाकीच्या कथांच्या पुढच्या भागांचीही वाट पाहातो. ;)

मुक्तसुनीत's picture

26 Jan 2009 - 9:59 am | मुक्तसुनीत

उत्तम लिखाण. अधिक प्रतिक्रिया पुढील (सर्व) भाग संपल्यावर !

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2009 - 10:21 am | प्रभाकर पेठकर

कथानक जबरदस्त अणि मनाची पकड घेणारे आहे.
पुढील भागाची उत्कंठेने वाट पाहात आहे.
अभिनंदन.

दशानन's picture

26 Jan 2009 - 10:28 am | दशानन

जबरदस्त !

व अत्यंत वेगवान कथानक !!

जाम आवडलं !

पुढील भागाची वाट पाहत आहे !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 12:38 pm | विसोबा खेचर

रामदासशेठ,

जियो..!

उत्तम लेखन, लै भारी बॉस!

तात्या.

केशवसुमार's picture

27 Jan 2009 - 8:19 pm | केशवसुमार

रामदास शेठ,
उत्तम लेख..
(वाचक्)केशवसुमार
खरतर इथे प्रतिसाद देणार नव्हतो.. सगळे भाग एका दमात वाचून मग मोठ्ठांदा 'जबरा' असे म्हणनार होतो..
पण तुम्ही फार वेळ घेतलात पुढचा भाग टाकायला..टेंपो जातोना भै..
पण जरा भरभर पुढचे भाग टाकाना राव..कायला टेंपोचा इस्कोट करून र्‍हायलासा..
(टेंपो..)केसु.

साती's picture

26 Jan 2009 - 3:04 pm | साती

वेगवान मांडणी. वेगळे कथानक.
आवडले. भाग १ म्हण्णजे अजून पुढे आहे का?
साती

भडकमकर मास्तर's picture

26 Jan 2009 - 3:54 pm | भडकमकर मास्तर

पुन्हा एक नवीन भारी सिनेमा....
उत्कंठावर्धक ....
साळवेचा बकरा होणार असे वाटेपर्यंत त्याचा स्वर्गवासच झाला.??..

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

26 Jan 2009 - 9:55 pm | चतुरंग

क्षणाक्षणाला उत्कंठेचा ताप सरसरत वाढवणारी 'रामदासी' कथा!
(पुढली प्रतिक्रिया शेवटच्या भागातच देऊ शकेन!)

चतुरंग

मदनबाण's picture

26 Jan 2009 - 10:16 pm | मदनबाण

च्यामारी साळवे खपला !!!
भाग २ ची वाट पाहतोय्...लवकर येऊदे.

मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

पिवळा डांबिस's picture

26 Jan 2009 - 11:35 pm | पिवळा डांबिस

काय जबराट लिहिलंय!!!
पाठीवर कुणीतरी चराचरा किसणी फिरवून सगळी पाठ खरचटावी तसं फिलींग आलं.....
जियो, हॅटस ऑफ!!!

विनायक प्रभू's picture

27 Jan 2009 - 5:24 pm | विनायक प्रभू

रोज खरचटला जातो एवढ भारी बोल्तो हा बाबा.

सुमीत भातखंडे's picture

27 Jan 2009 - 2:08 pm | सुमीत भातखंडे

सॉल्लीडच लिहीलय.
सलाम.

लिखाळ's picture

27 Jan 2009 - 8:51 pm | लिखाळ

जोरदार.. नेहमीप्रमाणेच.. पुढचा भाग लिहा लवकर...

"नवो छे के.? "परमारनी विचारलं.
"नाय.पन त्याचे सगेवाले येत नाय म्हनून तुला माहीत नाय."साळवेनी उत्तर दिलं.

ह्म्म्म !!

-- लिखाळ.

NAKSHATRA's picture

27 Jan 2021 - 7:42 pm | NAKSHATRA

जबरदस्त !

व अत्यंत वेगवान कथानक !!

जाम आवडलं !

याचे उर्वरीत भाग कसे वाचता येतील, त्यांची लिंक कुठे मिळेल.