
ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing !
अरे, नुसता ठोंब्यासारखा काय बसला आहेस, उठ आणि अभ्यासाला लाग बघू किंवा एखादे सांगितलेले परंतु अजून बाकी असलेले काम केले नसेल ते करण्यासाठी लहानपणी नेहमी "ठोंब्या" असा उद्धार होत असे. त्यात अस्मादिक शेंडेफळ असल्याने "नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये" ह्या उक्तीनुसार घरातील सर्वांकडून अगदी हक्काने विविध कामे अंगावर पडत असत. परंतु मी मूळातच आळशी असल्याने (घरातील काही मंडळी त्याला कामचुकारपणा म्हणत हा भाग अलाहिदा) हि कामे मी शिताफीने टाळत असे आणि ठोंब्यासारखा बसून राही. "आराम हराम आहे" ह्या तत्वावर अजिबात विश्वास नसल्याने संधी मिळेल तेव्हा आणि नसली तर संधी शोधून आराम करत असे. मी "आराम हा राम आहे" हे तत्व अंगिकारले असल्याने माझ्या ह्या ठोंब्यासारख्या बसण्याच्या कृतीला "ठोंब्यासन" असे नाव मिळाले होते. शालेय जीवनात इतर योगासने केली नसली तरी हे आसन आवडीने आणि नेहमी, संधी मिळेल तेव्हा केल्याचे आठवते.
महाविद्यालयीन जीवनात विविध सबमिशन्स, प्रोजेक्ट्स, परीक्षा इत्यादींमुळे आणि मुख्यतः तारुण्यसुलभ भावना उच्चतम पातळीवर असल्याने ठोंब्यासन करायला पुरेसा वेळ मिळत नसे तरी देखील जेव्हा शक्य असेल तेव्हा मी ह्या आसनाचा लाभ घेत असे. व्यवसायिक जीवनात प्रवेश केल्यावर मात्र बॉस नावाचा खविस एका बाजूला आणि कुठल्याही कामासाठी आखून दिलेली कालमर्यादा (मराठीत डेड-लाईन) दुसऱ्या बाजूला ह्या कात्रीत अडकल्याने हे आवडीचे आसन करण्यासाठी वेळ मिळेनासा झाला. पुढे प्रापंचिक जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने तर ठोंब्यासनाचा विचार करणे देखील दुरापास्त झाले. नंतर एका कार्यालयीन टीम बिल्डिंग कार्यशाळेत भाग घेतला असताना ताणतणाव कमी करण्यासाठी, मानसिक शांततेसाठी Niksen नावाच्या एका डच संकल्पनेची ओळख झाली आणि अरे, हे तर आपले ठोंब्यासन असे म्हणून मी उडीच मारली. अर्थात ती उडी Niksen ला अनुसरून नव्हती हे खरे.
आजकालच्या यांत्रिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत “आ रा म” हा शब्द जवळजवळ विस्मरणात गेला आहे. नेहमी काहीतरी करत राहण्याची सवय आपल्यावर इतकी बिंबली आहे की काही क्षण शांत बसणे सुद्धा आपल्याला अवघड वाटते आणि सदैव “व्यग्र राहणे” हेच यशाचे परिमाण मानले जाते. एखाद्या दिवशी काहीच काम नसेल तर आपण अस्वस्थ होतो. मोबाईल हातातून सुटत नाही, मन सतत काहीतरी करण्याच्या ताणाखाली असते. आधुनिक जीवनात प्रत्येक व्यक्ती काम, जबाबदाऱ्या, आणि सततच्या विचारांमध्ये अडकलेली असते. आपल्या पैकी बरेच जण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर सक्रिय असतात. मत मांडणे, प्रतिक्रीया देणे, स्टेट्स सतत अपडेट करणे, ट्रोलिंग करणे, हिरीरीने भांडणे, विरोधी मतांचे खंडन करणे, रिल्सचे एन्डलेस स्क्रोलिंग करणे ह्या सर्व उद्योगांमुळे आपल्या मेंदूला शीण होतो, या सगळ्यात मन आणि मेंदू दोन्ही थकून जातात. या सततच्या व्यग्रतेमुळे मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होते. या थकव्याला थोडी विश्रांती देण्यासाठी Niksen उपयोगी पडते. थोडा वेळ काहीही न करता बसल्याने मेंदूतील ताण कमी होतो, सर्जनशीलता वाढते, आणि मन शांत होते. Niksen हा नेदरलँड्स येथील डच भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ आहे — काहीही न करणे. त्याची व्याख्या अशी केली जाते - doing nothing or engaging in purposeless activity to relax and combat stress to recharge and refocus. खरंतर Niksen वाटते तेव्हढे सोपे नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सतत काही ना काही करण्याची सवय असते. एखादा रिकामटेकडा बसलेला दिसला तर त्याला काहीतरी कामाला लावायची आपली प्रवृत्ती असते.
Niksen चा उद्देश म्हणजे कोणत्याही ठराविक कामात गुंतून न राहता, काही क्षण मन आणि शरीर पूर्णपणे निवांत ठेवणे. कोणत्याही उद्देशाशिवाय, काहीही योजना न आखता फक्त निवांत बसणे हेच Niksen होय. यात ध्यानधारणा, झोप किंवा मोबाईलचा वापर यांचा समावेश नसतो. हि वेळ फक्त शांत राहण्याची असते. ‘काहीही न करणे’ ही कल्पनाच आपल्याला विचित्र वाटते खरी परंतु Niksen चा तोच मुख्य उद्देश आहे. Niksen म्हणजे ध्यानसाधना नाही किंवा झोप घेणेही नाही तर स्वतःला काही काळ जगरहाटीपासून मुक्त ठेवणे. एखाद्या खिडकीतून बाहेर पाहत काहीही विचार न करता बसणे, सकाळच्या वेळेस चहा घेताना फक्त त्याचा सुगंध अनुभवणे किंवा उद्यानात बसून वाऱ्याचा स्पर्श जाणवणे ही सर्व Niksen ची उदाहरणे आहेत.
असे म्हणतात कि Niksen मुळे ताणतणाव कमी होतो, झोपेची गुणवत्ता सुधारते, नवीन कल्पना सुचतात, मानसिक शांतता वाढते, स्वतःशी संवाद साधता येतो. थोडक्यात काय तर Niksen म्हणजे जीवनाच्या गडबडीत घेतलेला शांततेचा श्वास. तो आपल्याला आठवण करून देतो की, “कधी कधी काहीही न करणे हेदेखील आवश्यक असते”. आपल्या दैनंदिन जीवनात Niksen चा समावेश कसा करता येईल? प्रत्येक तासामागे आपल्याला एक मिनिट, फक्त एकच मिनिट Niksen साठी बाजूला काढता येईल? मला खात्री वाटते आपल्या बिझी स्केड्युल मधून तेव्हढा वेळ नक्कीच Niksen ला देता येईल.
तुम्ही ठोंब्यासन करता का? करत असल्यास कसे करता? आपले विचार, मत ऐकायला आवडेल.
Set a time to sit and stare out a window. Allow your mind to wander aimlessly, and let yourself simply, “Be”.
टीप : चित्र आंतरजालावरून साभार
प्रतिक्रिया
31 Dec 2025 - 11:39 pm | अभ्या..
मी नॉर्मली डिफॉल्ट ठोंब्यासनातच असतो,
चेंज म्हणून अधून मधून काही कामे करतो.
1 Jan 2026 - 12:27 am | चामुंडराय
1 Jan 2026 - 1:32 am | चामुंडराय
😂
1 Jan 2026 - 6:22 am | कंजूस
पण तो जो हमाकचा फोटो दिला आहे त्यात शरीराला त्रासच फार होतो हा माझा अनुभव आहे. त्यापेक्षा भुईवर आडवे पडलेले बरे. फारतर झाडाखाली म्हणू.
1 Jan 2026 - 11:52 am | युयुत्सु
<सदैव “व्यग्र राहणे” हेच यशाचे परिमाण मानले जाते.> हे अ तिशय घातक तत्त्वज्ञान आहे. ठोंब्यासनामध्ये मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क कार्यरत होते. त्याने सर्जकतेला चालना मिळू शकते.
1 Jan 2026 - 4:07 pm | शाम भागवत
संक्षी यांची आठवण आली. ते नेहमी समोर पाहून ठोंब्यासन करायचे.
😁
1 Jan 2026 - 4:25 pm | कांदा लिंबू
Niksen हे खरंच रोचक प्रकरण आहे.
ठोंब्यासन हे नामकरण आवडले.
1 Jan 2026 - 9:02 pm | टर्मीनेटर
'ठोंब्यासन' हे माझेही अत्यंत आवडते आसन आहे.
शीर्षक वाचून युट्युबवरचा "The amazing Do Nothing Machine at the Museum of Craftsmanship" हा माझा आवडता व्हिडीओ आठवला एकदम!
'Do Nothing Machine' आणि 'Niksen : Art of doing Nothing !' ये दोनो बडी प्यारी चीजे हैं भैया... अर्थात अजाणतेपणी हे आसन कित्येक वर्षांपासुन करत आलो असलो तरी त्याबद्दलची इतकी रोचक माहिती आजच वाचायला मिळाली 👍
1 Jan 2026 - 9:08 pm | Bhakti
Niksen आणि ठोब्यांसन खुपचं महत्वाची आसनं आहे ते सगळ्यांनी ही सिद्धी प्राप्त करत काळ आपल्यापुरता गोठून घेत विचारांचे चक्र सुरळीत करावे :)
बाकी Attention-deficit/hyperactivity disorder (ADHD) लोकांना तर या आसनाची खुप गरज आहे.मान्य आहे हा एक आजार आहे पण ठोब्यांसनाने यात फरक नक्कीच पडेल.
2 Jan 2026 - 12:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
आपण जे नेहमीच करतो (आणि त्याबद्दल नेहमीच शिव्या खातो) त्या कृतीला अशी शास्त्रीय जोड मिळाल्याने अभिमान वाटला वगैरे वगैरे...आता विषय मिघालाच आहे तर अजुन एक विचारायचे होते. पब्लिक फोरम वगैरे संकोच फिंकोच बाजुला ठेवुन-----उत्तम विचार संडासात बसल्या बसल्या सुचतात असा कोणाचा अनुभव आहे काय?
3 Jan 2026 - 11:36 am | सुबोध खरे
संडासात बसल्या बसल्या शीघ्र कवींना शीघ्र काव्य सुचतं असेही एक निरीक्षण आहे
3 Jan 2026 - 11:38 am | सुबोध खरे
उदा.
हॉस्पिटलात हॉस्पिटल, हॉस्पिटल ससून
... रावांचे नाव घेते संडासात बसून