द्रष्टादृश्यदर्शन
________________________
#सनातनी मनुवादी लेखन
अर्थात ज्या सनातन ज्ञानाच्या, आकलनाच्या रक्षणाकरिता , जतन करण्याकरिता वर्णाश्रम धर्माची व्यवस्था भगवंताने घडवली त्या विषयाशी संबंधित.
# स्वान्तःसुखाय
अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे.
________________________
साधारण संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी. सप्तर्षीगडावरुन खाली उतरत होतो . आज कसे कोण जाणे ध्यानाला बसलो ते इतके खोल गेलो कि स्थलकालाचे भानच राहिले नाही. आता मात्र अंधार पडायला लागला होता. काहीही स्पष्ट दिसेनासे झालेले होते. सांजवेळ ही अशी विचित्र वेळ असते की काहीही धड दिसत आहे असेही नाही आणि दिसत नाही असेही नाही. सगंच अंधुक धूसर. त्यात हे पावसाळी वातावरण आणि धुकं ! मार्ग नेहमीचा पायखालचा असला तरी वाटेचे नवीन दगडी बांधकाम चालु असल्याने चालणे बिकट झाला होता. दक्षिणायन सुरु झाल्याने सुर्य मावळुन लवकर अंधार पडायला सुरुवात झालेली होती. त्यात आभाळ भरुन आलेले असल्याने अजुन गडद झाले होते वातावरण. पाऊस बरसुन गेल्याने हवेत आल्हाददायक गारवा होता . अधुनमधुन पावसाच्या मंद सरी बरसुन जात होत्याच. सर्व बाजुला घनदाट जंगल. त्यात एक रातकिड्यांच्या संमोहित करणारा एकासुरातील आवाज आणि आपल्या बुटांचा चिखलात पडुन होणारा आवाज एवडे सोडले तर किर्र्र शांतता. एकटाच संथ गतीने पाऊलवाट उतरत होतो.
पुण्यश्लोक महाराजांच्या जुन्या पडक्या वाड्याला मागे टाकुन पुढच्या जंगलात चालु लागलो . आता इथे चालणे जास्त बिकट होते कारण सर्वत्र दगड खडी सिमेंट वगैरे पसरले होते , त्यातुन तोलसावरत कसाबसा पुढे निघालो. तितक्यात दुरवर पायवाटेच्या कडेला साधारण आठ दहा फूट लांब जनावर दिसलं! लांबसडक आणि किमान माझ्या मनगटा इतके तरी जाड ! भीतिची थंडगार लहर पायाच्या नखापासुन शेंडीच्या टोका पर्यंत सर्रकन गेली , अंगावर रोमांच उभारले. कितीही अध्यात्माचा अभ्यास केला तरी देह आहे तोवर देहाचे विकार राहणारच. आहार निद्रा भय मैथुन हे असणारच आहे .
आजचा दिवस "भयाचा" होता!
ह्या विकारांना "ठीक आहे" असं म्हणुन पुढे जाणं हे खरं गमक आहे वेदान्त कळल्याचे. शांतपणे पुढे चालु लागलो . 'पिवळे गर्द दिसत आहे म्हणजे धामण असेल , धामण म्हणजे काही विषारी नव्हे. ' अशी मनाची समजुत घालत होतो पण 'घोणस असला तर ? राम म्हणायची वेळ आली बहुतेक . ' हा विचार काही केल्या मनातुन हटत नव्हता.
घाबरत घाबरत जेव्हा जवळ पोहचलो तेव्हा लक्षात आलं की अरे हा तर पायवाटेच्या सिमेंट बांधकामासाठी लागणारे पाणी आणण्याच्या पाईपचा तुकडा आहे ! हा बहुतेक निरुपयोगी झाला असावा म्हणुन कामगार इथेच टाकुन गेले होते . बेकार हसु फुटले ! स्वतःचे स्वतःवरच ! आणि मनसोक्त इतके खदखदुन हसलो निमिषमात्र रातकिडे किरकिर करायचे थांबले ! तत्क्षणी ढगांचा कडकडाट होऊन वीज पडावी अन लख्खकन चमकुन जावी तसे काहीसे झाले ! अन माऊलींची अमृतानुभवातील ओवी मनात चमकली !
दोरासर्पाभासा । साचपणें दोरु कां जैसा ।
द्रष्टा दृश्या तैसा । द्रष्टा साचु ॥ ७-२१८ ॥
दोरावर सर्पाचा आभास होतो पण त्यातिथे सत्य हे सर्प नसुन दोरा हेच असते तसेच द्रष्टा आणि दृश्य हा आभास होत असला तरी तिथे सत्य हे द्रष्टा हेच असते !
हां इथे आपल्याला रबरी पाईपवर आभास होत होता आणि इथे खरेच धामण किंवा घोणस असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येण्यायोगी नाही . पण ते असो . मुद्दा असा की आपल्याला जी भीती जाणवली ती मात्र शतप्रतिशत खरी होती ! पण ज्याक्षणी आपल्याला लक्षात आलं की अरे हा सर्प नसुन आपला आभास होता त्याक्षणी निमिषार्धात त्या भीतीची जागा हास्याने घेतली हेही तितकेच सत्य !
माऊली म्हणत आहेत की हा दोरा सर्प आभास हा केवळ उपमा आहे , असेच जे जे म्हणुन आपल्याला दिसत आहे ते ते समस्त दृश्य हा आभास असुन केवल द्रष्टा सत्य आहे ! सगळे म्हणजे हे सगळेच . हा सप्तर्षीगड , हे जंगल , हा पाउस , हा अंधार , सगळेच दृश्य आणि हे पाहणारा मी एक द्रष्टा . ह्यातील मी एक द्रष्टा सत्य आहे बाकी सारे आभास आहे .
आणि संस्कृत मध्ये दृष् पश्य हा केवळ डोळ्यांनी पाहणे ह्या इतक्या मर्यादित अर्थाने वापरला जाणारा धातु नसुन त्याचा अर्थ अनुभव घेणे असा व्यापक आहे . अर्थात ह्या दृश्य द्रष्टा ह्या शब्दांमध्ये - कानांना ऐकु येणारा हा रातकिड्यांच्या किर्र आवाज, झाडांच्या पानांची सळसळ , नाकाला जाणवणारा मातीचा चिखलाचा आणि ह्या गर्द झाडीचा अवर्णनीय सुगंध , त्वचेवर उभारलेले रोमांच अन पावसाच्या सरींच्या गारव्याने उभारलेले अन भीतीने उभारलेले दोन्हीही हे सर्वच आले . हे सर्वच दृश्य, हे मी ह्या द्रष्ट्यावर होत असलेला आभास आहेत. आहे मुळात एक फक्त द्रष्टाच . दृश्य हा आभास आहे .
तैसें अनुभाव्य अनुभाविक । इहीं दोही अनुभूतिक ।
तें गेलिया कैचें एक । एकासिचि ॥ ५-६१॥
ज्याचा ज्याचा म्हणुन आपण अनुभव घेतोय त्यातील हे अनुभाव्य आणि आणि अनुभुती घेणारा मी हे दोन्ही अनुभाविकच आहेत . एकच आहेत !
आतां दृश्यपणें दिसो । कीं द्रष्टा होऊनि असो ।
परी हां वांचूनि अतिसो । नाहीं येथें ॥ ७-२४० ॥
आहे एक द्रष्टाच . आता मग हे दृश्य म्हणुन दिसु दे , अनुभाव्य म्हणुन अनुभवाला येवोदे , आहे केवळ एक द्रष्टाच , एक अनुभाविक जो की मी आहे ! बस. इथे ह्या एका द्रष्ट्याशिवाय दुसरं काही नाहीच .
पुढे जाऊन माऊली चांगदेव पासष्टी मध्ये म्हणतात -
दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्ट घेऊनि असे काई ? ।
आणि दृश्येंविण कांहीं । दृष्ट्रत्व होणें । २३ ॥
म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि द्रष्ट्रत्व होणें ।
पुढती तें गेलिया जाणें । तैसेचि दोन्ही ॥ २४ ॥
की जर मुळात दृश्यच नाही तर मग तिथे पाहणे असे तरी काय असु शकेल ? दृश्यच नसेल तर द्रष्टत्व असे काही संभवतच नाही. जिथं पहायलाच काही नाही तर मग पाहणारा तरी कोण ! त्यामुळे ज्याक्षणी दृश्याचा आभास सरला त्याक्षणी दृष्टत्वाचा , द्रष्टेपणा हा देखील आभासच आहे हे लक्षात येऊन तोही सरलाच ! आता दृश्य नाही अन द्रष्टाही नाही , आता बस "मी" आहे.
समर्थ म्हणाले
ऐसा जो अनुभव जाला । तोही नाशिवंतामध्यें आला ।
अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥ ४ ॥
हेंही न घडे बोलणें । आता पाल्हेरा किती देणें ।
वेदशास्त्रें पुराणें । नासोनि जाती ॥ ५ ॥
हा जो अनुभव झाला त्यातही अनुभाव्य अनुभाविक आणि अनुभवणे ही त्रिपुटी निर्माण होते म्हणुन तेही नाही. किंबहुना तो मी आत्मा आहे ही अनुभुतीही , जी जाणीव ही नाही ! त्याच्या पलिकडे आहे तो "मी" आहे. हेही बोलता येत नाही , किती अन काय उपमा देणार ! ह्या स्थितीचे , ह्या रुपाचे , ह्या वस्तुचे वर्णन करताना वेद शास्रे उपनिषदेही थकुन नासोनि गेली अन शेवटी नेति नेति इतके म्हणुन मौन झाली !
ह्या वस्तुचे वर्णन करायला गेल्यावर उपनिषदे नेति नेति ह्या निंदात्मक , निशेधात्मक निष्कर्षाप्रत येतात , पण ने नेति नेति हेच ह्या वस्तुचे , ह्या द्रष्टाचे स्तोत्र अर्थात स्तुती होऊन जाते ! आणि मग हे निंदा आणि स्तुती दोन्ही नष्ट होऊन केवळ मौन उरते !
म्हणोनि उपनिषदें । दशे येति निंदे ।
निंदाचि विशदें । स्तोत्रें होती ॥ ९-५१ ॥
ना तरी निंदास्तुति । दोन्हीं मौनासाठीं जाती ।
मौनीं मौन आथी । न बोलतां बोली ॥ ९-५२ ॥
तैसें दृश्य करूनियां । द्रष्ट्यातें द्रष्ट्या ।
दाऊनि धाडिलें वाया । दाविलेपणही ॥ ७-२१२ ॥
जें दृश्य द्रष्टाचि आहे । मा दावणें कां साहे ? ।
न दाविजे तरी नोहे । तया तो काई ? ॥ ७-२१३ ॥
आरिसा पां न पाहे । तरी मुखचि वाया जाये ? ।
तेणेंवीण आहे । आपणपें कीं ॥ ७-२१४ ॥
अशारितीने दृश्याने द्रष्ट्याला द्रष्टाकरुन त्याचे द्रष्टत्व आणि स्वतःचे दाविलेपण दोन्हीही नाश करुन टाकले ! कारण मुळात हे दृश्य हा द्रष्टा च आहे तर हे दर्शन , हे दाखवले पण कोठुन आलं ? आणि समजा नाही दाखवलं , नाही दिसलं तरी ते नाहीये असं होते का ! नाहीच ! जसे आरश्यात आपण आपले मुख पाहतो , पण समजा नाही पाहिलं तर आपल्याला मुख च नाही असे होते का ? नाही ना ! तसेच आहे हे !
त्यामुळे कोणाला कळलं तर त्याला कळणे असे काही नाही हेही लक्षात येऊन कळलेपण नाश पावते आणि समजा कोणाला नाही कळलं तरी ते नाही असे होत नाही !
आता काय बोलणार !!
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं ।
ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥
आता ?
आता काय ?
आता काय - 'दृष्टादृश्यदर्शन असं काही नाहीच , आहे फक्त द्रष्टाच ! अरे हे द्रष्टा फार अवघड आहे , काही तरी सोप्पं असयाला हवं , काही तरी सोप्पा शब्द हवा !'
घनगर्द झाडीतुन अंधारातुन 'दृश्य असं काही नाहीच केवळ द्रष्टाच आहे , अरे पण मुळात दृश्यच नाही तर सर्वच द्रष्टा आहे तर मग द्रष्टेपण आणलं कोठुन अन कोण द्रष्टा ! ' ह्या चिंतनात गावात आलो. घरी पोहचलो.
'हे द्रष्टा द्रष्टा फार अवघड आहे राव , काहीतरी सोप्पं असलं पाहिजे ' असा परत विचार करत घराची बेल दाबली .
मनात विचार चालुच होते -
' हे जे जे दृश्य म्हणुन भासत आहे ते ते सर्व द्रष्टा आहे , ह्या सगळ्यावर , हे रस्ते , ही घरं, हे बंगले , ह्या गाड्या , हे रस्त्यातले मांडव , त्यात असलेल्या ह्या गणेश मुर्ती , ही कर्णकर्कश आवाजातील गाणी, अन हा गोंगाट , ह्या सार्या सार्यावर "द्रष्टा" असे लेबल लावायला हवे ' म्हणजे खरे खरे लेबल नाही तर आपल्या मनात , आपल्या बुध्दीत , आपल्या नजरेत आपण लेबल लावायला हवं " दृश्य नव्हे द्रष्टा च"
जनातें जनीं देखतां । द्रष्टेंचि दृश्य तत्वतां ।
कोण्ही नहोनि आइता । सिद्धांत हा ॥ १०-१० ॥
हे द्रष्टा फार अवघड आहे राव , काही तरी सोप्पं लेबल शोधायला हवं !
अजुन दरवाजा उघडला नाही , परत बेल वाजवली , पण बेलवर लेबल लावलं ,अन मनात निमिषमात्र आलेल्या अन तत्काल लोप पावलेल्या उद्विग्नतेवर देखील लेबल लावलं ....
यथावकाश दरवाजा उघडला गेला . मी हातानेच "काये, इतका उशीर ! " असा निर्देश केला अन त्यावर देखील लेबल लावलं !
त्यावर उत्तरादाखल माझ्या समोर अलगद उजव्या हातातील जपमाळ उचलुन दाखवली गेली , अन् एकदम अस्पष्ट मंद स्वरात मला लेबल ऐकु आले -
"श्रीराम जय राम जय जय राम !"
_____________________________________________________________
"श्रीराम जय राम जय जय राम !"
प्रतिक्रिया
16 Sep 2025 - 5:25 pm | सिरुसेरि
सुरेख विवेचन .
28 Sep 2025 - 11:43 am | Prakashputra
# स्वान्तःसुखाय
अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे.
>>
गोडबोले साहेब,
जर तुम्ही स्वान्तःसुखाय लिहिताय, तर इथे का पोस्ट करता ? मी जेंव्हा स्वान्तःसुखाय लिहितो, तेंव्हा फक्त लिहितो, कुठेच टाकत नाही.
स्वतः लिहिलेले दुसऱ्यांनी वाचावे असे वाटणे यात काहीच चुकीचे नाही. समाज असाच पुढे जातो.
28 Sep 2025 - 12:07 pm | यश राज
मस्त विवेचन