माझी डिग्री अर्धवट राहिलीय
मी तळमळतोय,
नेहमी, रोज.
कधी होईल पूर्ण?
का होत नाहीये?
का राहताहेत विषय?
मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय.
डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अॅडमिशन घेतलं.
जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती.
माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो.
इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले.
पण मी डिग्री पूर्ण करतच राहिलो,
पण ती पूर्ण होत नाहीये.
कधी मी पेपरला वेळेत पोहोचत नाहीये,
तर कधी पोहोचूनही मला काही लिहिता येत नाहीये.
लिहूनही पास होत नाहीये.
तर कधी भलतंच काहीतरी आचरट घडतंय —
सगळं जग जणू माझी डिग्री होऊ नये म्हणून तुटून पडलंय.
डिग्री पूर्ण होत नाहीये.
हे असं बऱ्याच वर्षांपासून चाललं आहे.
मी झोपतोय नीट, पण अपूर्ण डिग्रीच्या भयंकर स्वप्नाने उठतोय.
उठल्यावर कळतं —
जग खूप पुढे गेलंय, आपणही खूप पुढे आलोय.
बाजूला बायको आणि मुलगा झोपलेत.
खऱ्या आयुष्यात माझी डिग्री होऊन अनेक वर्षे झाली आहेत.
पण माझ्या त्या स्वप्नांच्या जगात
काहीतरी अपूर्ण राहिलंय
माझी डिग्री!
डिग्री मला मिळेल की
झोपेतच सोबत नेईल...?
प्रतिक्रिया
8 Jul 2025 - 11:38 pm | अमरेंद्र बाहुबली
8 Jul 2025 - 11:52 pm | कानडाऊ योगेशु
मलाही असे स्वप्न पडते नेहेमी. म्हणजे दुसर्याच विषयाची प्रश्नपत्रिका हातात आलीये. अभ्यास पूर्ण झाला नाही आहे. त्यानंतर जाग आल्यावर भानावर यायला १०-१५ सेकंद लागतात त्यानंतर स्वप्नच होते हे समजुन हायसे वाटते.
9 Jul 2025 - 6:02 am | गवि
सेम टू सेम. हल्ली कमी झाले आहे पण चाळीशीपर्यंत खूपच वेळा पडायचे असे परीक्षा आणि पेपरचे स्वप्न. कोणत्याही प्रश्नाची संगती न लागणे, वेळ चालला आहे पण आपलं पेपर सोडवणं सुरु देखील झालेलं नाही, पेपर सोडवत असताना वेगळ्याच काही घटना आणि विघ्ने उत्पन्न होत आहेत इत्यादि.
मास्टर्स (PG) करण्याच्या बाबतीत देखील स्वप्ने पडत असतात. मी इतर काही बाही सर्टिफिकेशन्स आणि कोर्सेस केले असले तरी मूळ डिग्री फक्त बॅचलरची आहे. आपण पुढे शिकून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण करत आहोत, पण अजून काडीमात्र अभ्यास सुरू केलेला नाही. किंवा ऑलरेडी परीक्षा झाली आहे आणि आता त्याचा निकाल लागणार आहे किंवा लागतो आहे असेही असते स्वप्नात.
9 Jul 2025 - 9:24 pm | अमरेंद्र बाहुबली
मला आठवड्यातून दोनदा होते.
9 Jul 2025 - 7:24 am | युयुत्सु
आवडलं!
मला मराठीत नापास झाल्याचे स्वप्न बर्याच वेळेला पडतं. ;)
9 Jul 2025 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद!
9 Jul 2025 - 9:30 am | कंजूस
डिग्री सर्टिफिकेट ही अजून घेतले नाही. तिकडेच पडले आहे युनिव्हर्सिटीच्या ओफिसात.
9 Jul 2025 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली
का?
9 Jul 2025 - 10:54 am | कर्नलतपस्वी
कालच रात्री एका अशाच स्वप्नात तळमळत होतो.
हिन्दी सक्ती बद्दल चाललेल्या गदारोळामुळे,चर्चेमुळे उत्तररात्री स्वप्नात शाळा,शिक्षक व आमचे भजी खाणारे हिन्दीचे शिक्षक आले होते. हिन्दीच्या पेपरात प्रश्न होता ,बटाट्याची भाजी कशी बनवतात यावर हिन्दीत लिहा. तळमळत राहीलो पण उत्तर लिहीता आले नाही.
मराठीत कधी बटाट्याची भाजी लिहीता आली नाही ती हिन्दीत कधी येणार .
बेक्कार झोप नाही आली.
9 Jul 2025 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क
9 Jul 2025 - 11:17 am | विवेकपटाईत
एकदा नौकरी लागल्या नंतर सर्व सर्टिफिकेट एका सुरक्षित जागी घरात बहुतेक कपाटात, पलंगच्या आत ठेऊन दिल्या जाते. पुढे तीस एक वर्ष सर्टिफिकेट कुठे ठेवले आहे. घरात कोणीही लक्षात ठेवत नये. घर बदलले जातात किंवा घराची डागडूजी होताना कचरा फेकताना डिग्री ही गहाळ होते. माझ्या एका मित्राला निवृत झाल्यावर डिग्रीची आठवण आली. घरात ती सापडली नाही. आपण निवृत अधिकारी आहोत सहज डुप्लीकेट मिळून जाईल. त्यांनी युनिवेर्सिटीत फोन केला. उत्तर मिळाले साहेब. 40 वर्ष जुनी कागद शोधणे सौपे नाही. दरवर्षी काही लाखाच्या वर विद्यार्थी इथे स्नातक इत्यादि होतात. तुम्ही स्वत या. एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचार्याला काही दक्षिणा द्या. जुने रिकार्ड शोधण्याचा प्रयत्न करेल. तुमचे नशीब उत्तम असेल तर ते सापडतील. ... तसे चान्स खूप कमी आहे.
आता रिकार्ड डिजिटल ठेवणे सुरू झाले असेल तर 30- 40 वर्षांनंतर ते सापडू शकतील, अशी आशा करू शकतो. बाकी पीएम डिग्री केस मध्ये केजरीवालची माफी सुप्रीम कोर्टाने स्वीकार केली नाही. त्यांच्या वर केस सुरू राहणार.
9 Jul 2025 - 9:26 pm | अमरेंद्र बाहुबली
हो होते असे! माझ्या काकांचा शाळा सोडल्याचा दाखला काढायला एकदा अनेक शाळा पालथ्या घातल्या होत्या!
10 Jul 2025 - 9:13 am | श्वेता व्यास
या लेखाप्रमाणे आणि वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे हा अनुभव मलाही आहे. पडलेली स्वप्नं लक्षात राहत असल्याने त्याचे मनोवैज्ञानिक अर्थ अधून मधून शोधण्याची सवय आहे. एआय म्हणतोय
शिक्षणानंतरही, आयुष्याच्या उत्तरार्धात परीक्षेची स्वप्ने पडणे सामान्य आहे आणि बहुतेकदा सततच्या चिंता किंवा जागृत जीवनात परीक्षेची भावना दर्शवते, शैक्षणिक अपयशाची खरोखरची भीती नसते. ही स्वप्ने सहसा ताणतणाव, अपुरेपणाची भावना किंवा सध्याच्या जीवनातील परिस्थितीत कामगिरी करण्याच्या दबावाचे प्रकटीकरण असतात, जरी त्या परिस्थिती शैक्षणिक नसल्या तरीही.