चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी
राखू कशी, अंगावरली ?
राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!!
कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील.
सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो.
पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.
गेले दोनतीन दिवस,स्टिल्ट पार्किंग मधे पक्षांची जोडपी फायटर जेट सारखी घिरट्या घालताना दिसत होती.त्यांची उडण्याची गती अक्षरश: जेट विमानासारखी,प्रचि घेता येत नव्हते.बादवे,बाहेर जाताना कॅमेरा नेहमी जवळ असतो.असे म्हणतात,
मौत और शौच बता के नही आती...
तसेच,पक्षी,सुंदर ललना आणी विचित्र घटना सुद्धा कधी अचानक दृष्टीस पडतील याचा नेम नाही.एखादा सुंदर पक्षी समोर आल्यानंतर टिपता आला नाही तर रूखरूख लागते.नंतर वाईट वाटू नये म्हणून तयारीत असलेलं बरं.
असो,मी एका मिनीटात एकशेवीस स्टेप्स चालतो.चालताना पक्षांच्या अथक येरझारा बघून कुतुहल जागृत झाले व कारण शोधावे म्हणून एका खांबाआड दडून निरीक्षण करू लागलो.
निरीक्षणातून असे लक्षात आले की पक्षांची जोडपी रस्त्यावरील डबक्याच्या आवतीभवती चोचीने काहीतरी टिपून स्टिल्ट पार्किंग मधे एका विशिष्ट जागी घेवून येत होते.वाटले दाणे,किडे टिपत असतील. डांबरी रस्त्यावर फक्त पाण्याचे डबके,बारीक खडी व चिखलचं होता. कॅमेरा सरसावला,धडाधड दहा बारा प्रचि घेतल्या. बघतो तर काय?पक्षी चोचीत चिखल भरून घेत होते.कुठला पक्षी असावा याचा शोध घेता कळाले हा तर "धूसर खड पाकोळी,"डस्की क्रेग मार्टिन "आहे. बाकी गुगलून इतर माहीती घेतली.निसर्गात बघावे ते नवलच...
स्टिल्ट पार्किंगच्या आढ्यावर,एका ठिकाणी चिखलाचे गोळे बनवून एकावर एक थापायला त्यांनी सुरवात केली होती.पक्षी घरटे बनवत होते.लहानपणी माझ्या मित्रांच्या माऊल्या शेतात ज्वारीच्या ताटांची चूड बनवून उलट्या शंकूच्या आकाराच्या झोपड्या बनवून त्यावर शेणगोळ्यांनी झाकून टाकत.तोडणी झाली की त्यात कांदे, बटाटे, धान्य साठवले जायचे. इतरवेळी आम्हीं मित्र तीथे खेळायचो.खळे राखण करत गप्पा मारत रात्र जागवायचो.उन्हाळ्यात बाहेर किती गरम असले तरी झोपडीत मस्त थंडगार,जणू वातानुकूलित खोली.
असो,घरटे,अर्ध्या कप आकाराचे,चिखलात लाळमिश्रीत गोळ्यापासून केलेले बांधकाम,वाळल्यावर रंग चाॅकलेटी होतो जणू चाॅकलेटी जेमने (Skittles) बनवलाय.हे बालगीत आठवले ,"असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला". घरट्याचे बाधकाम पुर्ण करायला एक ते तीन आठवडे लागतात.पाऊस चिखलाची उपलब्धता प्रास्तावित घरट्याची जागा यावर बाधंकामाचा वेग आवलंबून असतो. हल्ली डांबरीकरण,सिमेंटीकरण यामुळेच मानवी वसाहतीत चिखल मिळण्याची मारामार.एका हंगामातील घरटे पुन्हा पुन्हा वापरतात. आतमधून पंख किंवा कोरडे गवत यांसारख्या मऊ पदार्थांचे अस्तर चिकटवतात जेणे करून नवजात अर्भकांना आरामदायक वाटावे. त्रास होऊ नये. घरटे एकदम आढ्याला टेकून,खोपच्यात व चिखल वाळल्यानंतर इतके साॅल्लिड टणक बनते की शिकारी घरट्याजवळ पोहचायची संभावना कमी आणी पोहोचले तरी भगदाड पाडणे कठीण असते.
बांधकाम पूर्ण झाले की पक्षीण दोन ते चार अंडे देईल.तीचा साथीदार खाण्यापिण्याची व्यवस्था करेल.बघू ही पाचा उत्तराची कहाणी कुठवर सुफळसंपुर्ण होते.......
रस्त्यावर खड्डे,खड्ड्यात पाणी
डबक्यांची खेळणी,पक्षांची न्हाणी
बाळकांच्या उड्या,माखलेलं अंग
कोणाची फजीती,कोणी चिखलात दंग
इवल्याश्या चोचीत,भरलं चिखलपाणी
खडपाकोळीच घरटं,स्वप्नांची कहाणी
मातृत्वाच सुख आणी भितीची चाहूल
आई बापाच्या डोळ्यात,काळजीचं काहूर
मांजराच्या फेऱ्या,शिकार्यांच सावट
आई बापाची माया भारीच चिवट
पावसाच्या गाण्यात, निसर्गाचं गूढ
नव्याने उगवेल का,आशेचं फूल?
"उद्या जगतील का ही पिल्लं?", मोठ्ठा प्रश्न पण देवाघरचे ज्ञात कुणाला.....
तास दिड तास कसा गेला कळालेच नाही. वाॅक राहून गेलं,भाऊक झालो.निसर्गचक्र आहे हे.पक्षांचा संसार सुखाचा व्हावा.यांची पुढची पिढी बघायला मिळावी अशी प्रार्थना करत उदवाहका कडे प्रस्थान केले.
डोक्यात विचार घोळत होते,ज्याने कुणी या पक्षाचे नाव खडपाकोळी ठेवले तो खुप समजदार प्रज्ञावंत असावा.प्रज्ञावंत आणी समजदार प्रज्ञावंत यात फरक आहे.मिपाखरे सुज्ञ आहेत.ये पब्लिक है.....
इवलीशी चोच त्यात कितीसा चिखल येणार? छोट्याश्या तोंडात लाळ तरी किती असणार? सहा इंच रूंद व सहा इंच उंच "वन रूम नो किचन", बनवण्यास किती चिखलाचे गोळे लागणार? किती दुरवर येरझारा घालाव्या लागणार? सर्वच खडतर...म्हणूनच कदाचित या पक्षाचे नाव खडपाकोळी ठेवले असावे. बहिणाबाईनीं खोप्या मधे खोपा या कवितेत माणसाला सुंदर संदेश दिला आहे.
पाचव्या मजल्यावर उदवाहन पोहोचले,पाय ऊतार झालो. कानावर बुवांचे सुर पडले...
पांडुरंग त्राता,पांडुरंग दाता,अंतिचा नियंता पांडुरंग....
खरयं, पांडुरंग हरी वासुदेव हरी.
अतिशय सुंदर अभिषेकी बुवांनी गायलेला अभंगाचा खाली दुवा दिलाय, जरूर ऐका.
प्रतिक्रिया
3 Jul 2025 - 6:28 pm | राजेंद्र मेहेंदळे
सकाळ सत्कारणी लागली म्हणायची. खडपाकोळी--हे नाव प्रथमच ऐकले, एकदम रफ टफ आहे. व्हिडिओपण बघितला. पण ए आय ऐवजी तुम्ही स्वतः माहिती सांगत जा. ऐकायला मस्त वाटेल.
3 Jul 2025 - 9:35 pm | कर्नलतपस्वी
धन्यवाद, आपल्या मताचा आदर, रादर ॲप्रिसिऐशनच आहे माझ्यासाठी.
सुचना आवडली पण स्वता माहीती सांगायला सुदंर चेहरा,गोड आवाज हवा. माझ्यासारख्या खप्पड, म्हातार्याला कोण बघणार?सैन्यात परेड करून स्वरयंत्रांचा भोंगा झालाय,तो सुद्धा कुणी ऐकणार नाही. त्यापेक्षा ए आय वाली बाई त्यातल्या त्यात बरी...
प्रतिसाद व सुचने बद्दल धन्यवाद.
3 Jul 2025 - 9:58 pm | कंजूस
मजा आली वाचून. आता पुढे काय होते ते बघू.
पूर्वी रस्त्याला ओहोळांवर छोटे छोटे दगडी पूल असतं कमानी वाले. त्यांच्या खाली हे पक्षी घरटी करत. किंवा जुन्या पद्धतीच्या कौलारू घरांना पडवी असे त्यात हे घरटी करत. मी एक असे पाहिले आहे.तो पक्षी खूप वेगात घराकडे येतो पण आपटत नाही. यांच्या पायांना अंगठा नसतो त्यामुळे फांदीवर बसता येत नाही.
4 Jul 2025 - 6:55 am | प्रचेतस
आमच्या इमारतीतही आहे एक जोडी, मातीचं अगदी सुरेख घरटं बांधलंय. बऱ्याच वेळा तिथं वेगाने फेऱ्या मारत बसतात.