राडा

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
30 Jun 2025 - 9:17 am

राडा
______

स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.

आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती. तिच्या भितीने आणखीही कोणी त्या रिक्षात चढायला धजावत नव्हते.

"रिक्षा स्टॅण्डला लावली आहे ना तुम्ही’..."
"असा धंदा करता काय?.."
"बस्स झाली ही तुमची मुजोरी, आता आणखी सहन नाही करणार.."
"पंचवीस वर्षे झाली मुंबईत आम्हाला.."
"ए, तू आवाज चढवून बोलू नकोस.. हात खाली कर आधी.."

हळूहळू चढत्या आवाजाची काही वाक्ये कानावर पडत होती. नक्की काय प्रकरण आहे. कोणाची चूक आहे, कोण मुजोरी करतेय, काही समजायला मार्ग नव्हता. कोणाला प्रश्न विचारायचा प्रश्नच नव्हता. फक्त कोलाहल वाढत होता. आणि तो कोलाहलरुपी हलाहल आवडीने पचवायला बघ्यांची गर्दी भोवताली वाढत होती. एक लांबची सीट मी देखील माझ्यासाठी बूक केली होती.

मागची ट्रेन आली तसे त्यातील दहा टक्के जनता वेळात वेळ काढून तिथे वळली. आसपासचे रिक्षावालेही जमू लागले.
"ए, तू हात तर लाऊन दाखव मला.."
"ए हरामखोर, बाईला बघून नडतोस का?"
"ईन लोगोंका अभी ज्यादा हो गया है बॉस....."

मूळ वादाशी संबंध नसलेले प्रवासी सुद्धा आता मध्ये पडू लागले होते. बायकांमुळे रामायण महाभारत घडले असे म्हणायची एक पद्धत आहे आपल्याकडे, ईथे खरोखरच एक छोटीमोठी चकमक घडायची चिन्हे दिसू लागली.

वादावादीने दुसरा गिअर टाकला आणि ते पाहून शेजारचा भजीवाला काही काळापुरता भजी तळायचा थांबला. भुर्जीवाल्याने आपली अंडी सांभाळून आत ठेवली. सरबतवाला नुसतेच सरबत घुसळत राहिला. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांनी संभाव्य धक्काबुक्कीच्या भितीने आपला धंदा सावरून घेतला. मिनिटाला दोन भेल बनवणारया भेलवाल्याचेही हात थबकले. ईथे माझेही पाय थांबले. अन कान!, ते तर आधीपासूनच टवकारले होते.

"ए अंगाला हात लावायचे काम नाही भडXXव्या..."
"कॉलर सोड ए भोसXXडीच्या..."

ज्या शब्दांची, ज्या वाक्यांची मन आतुरतेने वाट पाहत होते ते आता कानात पडू लागले होते.

नक्की काय होतेय हे घोळक्यात दिसत नव्हते. पण घोळका आता डावीकडून उजवीकडे आणि पुढे मागे सरकू लागला होता. बहुधा धक्काबुक्कीला वा लाथाबुक्कीला सुरुवात झाली होती. जवळच्या पूलावरून काही मोबाईल कॅमेरे सरसावले गेले. काही साहसी स्वयंछायाचित्रकारांनी गर्दीतच हात वर करून चित्रण सुरू केले. त्यात आपल्या कोणी ओळखीचा दिसतो का हे माझी नजर शोधू लागली. जेणेकरून नंतर ते चित्रण पाहता येईल. मी पुन्हा आजूबाजूला बघ्यांच्या जमावावर एक नजर टाकली. आणि काय पाहिले तर जे कुत्रे उगाचच रोज गर्दीच्या अध्येमध्ये लुडबुडताना दिसायचे, चहापोहेवाल्याच्या आजूबाजूला आशेने घुटमळताना दिसायचे. ते आज मात्र या निर्दयी माणसांच्या भांडणात नाहक आपण तुडवले जाऊ या भितीने पूलाखालच्या कपारीत जाऊन बसले होते.

ईथे एव्हाना भांडणाने टॉप गिअर टाकला होता. लांबच्या स्टॅण्डवरून चारपाच रिक्षावाले धावत आले. आणि त्या गर्दीत मिसळले. त्यांचा आवेश पाहता आता एकदोघांच्या बॅगा हवेत फेकल्या जातील, शर्ट टराटरा फाडून उडवले जातील या आशेने मी श्वास रोखून पाहू लागलो. अचानक झाडांवरचे पक्षीही फडफड करून आडोसा शोधताहेत असे जाणवले, अन ईतक्यात ....

टप ! टप ! टप ....
धो धो धो ...
बघता बघता तो आभाळातून कोसळू लागला. रिक्षांच्या टपावर, स्टेशनच्या छतावर, टपर्‍यांच्या पत्र्यावर आणि कोरड्या पडलेल्या रस्त्यावर त्याचा नाद घुमू लागला. भिजलेल्या पानांच्या सळसळीलाही एक वजन आले. भांडणाची मजा थांबवून मी आडोसा शोधत पळू लागलो. ऑफिसची बस दूरहून येताना दिसली. धावत जाऊन त्यात चढलो. खिडकीशेजारच्या सीटवर आपले बस्तान बसवून एक नजर बाहेर टाकली आणि काय आश्चर्य!

ज्या जागी काही काळापुर्वी घनघोर युद्ध पेटले होते, जणू हाडामासांचा चिखलच जमा होईल असे वाटत होते, तिथे आता माणसांचा लवलेशही नव्हता. नुसता पाण्यामातीचा चिखल रस्त्यावरून वाहत होता आणि त्याला चुकवून दोनचार लोकं ईथेतिथे पळत होती. भजीवाल्याच्या आडोश्याला दहाबारा लोकं जमली होती. आणि त्याने संभाव्य गिर्हाईक लक्षात घेत कढईत भजी सोडली होती. पूलाखाली कुत्र्यांच्या सोबतीला आता काही माणसांनीही आसरा घेतला होता. अवेळी अन अचानक आलेला पाऊस सर्वांची धांदल उडवून गेला होता. एक वणवा पेटायच्या आधीच विझला होता. चोहीकडे फक्त पावसाचेच थैमान चालू होते. निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.

- तुमचा अभिषेक

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

वाह भाई. मजा आली. खूप क्वचित ललित लेखन वाचायला मिळतं आहे. धन्यवाद. अगदी सुंदर.

तुमचा अभिषेक's picture

30 Jun 2025 - 10:55 am | तुमचा अभिषेक

धन्यवाद गवि,
बरेच काळाने उगवलो इथे. जेव्हा होतो आणि तेव्हा जेवढे आपले लिखाण वाचलेले ते फार आवडलेले. त्यामुळे पहिलाच प्रतिसाद आपला बघून छान वाटले :)

शेवटचा परिच्छेद छान आहे.मुंबईत लोकांना इतका वेळ असतो...राडा पाहण्याइतका? ;)

राडा बघायला मिळत असेल तर कोणीही वेळात वेळ काढतोच.

पण मुंबईत, विशेषतः लोकल ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होते तेव्हा माझा अनुभव वेगळा आहे. इथे आसपासचे लोक अत्यंत तत्परतेने दोन्ही पार्ट्यांना आवरतात आणि छोड दे भाई, झगडा नहीं, कोई नहीं, शांती रखो भाई.. चलता है.. असे म्हणून आग विझवायचा प्रयत्न करत असतात. कदाचित खरेच तुडवतुडवी होईल आणि आपण सगळेच भरडले जाऊ अशी भीती असू शकेल. अर्थात हे अनुभव खूप जुने आहेत. हल्लीचे लोकलचे चित्र माहीत नाही.

तुमचा अभिषेक's picture

30 Jun 2025 - 2:15 pm | तुमचा अभिषेक

राडा दिसला की पाय थबकने कुठल्याही शहरात स्वाभाविक असेल. त्यानंतर थांबायचे की नाही आणि किती वेळ हा ज्याचा त्याचा निर्णय. मुंबईत स्पेशली लोकलने जाणाऱ्यांकडे तो वेळ कमी असतो हे खरे आहे. पण दुनियादारी जास्त असते हे सुद्धा तितकेच खरे आहे. म्हणून सुद्धा ते मध्यस्थी करून लवकरात लवकर संपवायला बघतात. वर गवि म्हणतात ते बरोबर आहे आपल्यालाही त्रास होण्याची शक्यता असते. पण ते ट्रेन किंवा प्लॅटफॉर्मवर झालेल्या राड्यांना लागू. वरच्या घटनेतील राडा स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांशी झाला. त्यांची एक वेगळी टीम असते, युनियन असते, त्यांची मुजोरी असते, ज्याला वैतागलेल्या पब्लिकचा एक गट असतो, जो संघटित नसतो म्हणून चालवून घेत असतो, मग कधी अशी संधी मिळाली तर संघटित होतो, अन ते संघटन तात्पुरते असल्याने मग असे वेगळे होत जो तो आपल्या वाटेनेही जातो.

कंजूस's picture

30 Jun 2025 - 3:30 pm | कंजूस

झणझणीत.

विजुभाऊ's picture

30 Jun 2025 - 5:04 pm | विजुभाऊ

झकास लिहीलंय

चौथा कोनाडा's picture

30 Jun 2025 - 5:15 pm | चौथा कोनाडा

झकास शब्दचित्र रंगवलेय ! सगळा प्रसंग डोळ्यापुढे तंतोतंत साकारला....
खरंय ..... निसर्गासमोर कोणाचाच राडा चालत नाही !

आणखी येऊद्यात !

मुंबईत रेल्वेतही राडे होतात. मुख्य उद्देश कुठेतरी भडास काढणे एवढाच असतो.

तुमचा अभिषेक's picture

30 Jun 2025 - 8:34 pm | तुमचा अभिषेक

डोंबिवली फास्ट :)

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2025 - 6:53 pm | रात्रीचे चांदणे

साधाच वाटणारा प्रसंग मस्तपैकी रंगवून लिहिला आहे.

सुक्या's picture

30 Jun 2025 - 10:10 pm | सुक्या

मस्त. साधा प्रसंग परंतु रंगवुन लिहिल्यामुळे शेवट्पर्यंत उत्सुकता राहते ...
लिहिते रहा !!

धर्मराजमुटके's picture

30 Jun 2025 - 10:19 pm | धर्मराजमुटके

आलम हिंदुस्थानात जेसीबी की खुदाई बघण्यासाठी वेळ काढणारी जनता आहे तर राड्याला प्रेक्षक का नाही मिळणार ? गोष्ट आवडली.

तुमचा अभिषेक's picture

1 Jul 2025 - 6:44 pm | तुमचा अभिषेक

हा हा.. नाही, मुंबईत तरी इतका वेळ नसतो. त्याऐवजी माती तुडवत जाणे पसंद करू :)

असंका's picture

30 Jun 2025 - 10:23 pm | असंका

काय सुरेख!

धन्यवाद!!

सौंदाळा's picture

1 Jul 2025 - 10:24 am | सौंदाळा

वेलकम ब्याक
अप्रतिम लेख आणि वर्णन
राडा घाला आता इथे फुल्ल्टू

तुमचा अभिषेक's picture

1 Jul 2025 - 1:59 pm | तुमचा अभिषेक

हो, धन्यवाद आणि जरूर :)

श्वेता व्यास's picture

2 Jul 2025 - 3:39 pm | श्वेता व्यास

प्रसंगचित्रण आवडलं, बाकी राडे दिसले तर फार दुरून पळणाऱ्यातले आम्ही :)

तुमचा अभिषेक's picture

2 Jul 2025 - 10:10 pm | तुमचा अभिषेक

आमच्यावर देखील घरचे संस्कार असेच होते. अन्याय दिसला की लढायचे. पण निसते राडे दिसले की तिथून पळायचे :)

nutanm's picture

3 Jul 2025 - 2:06 am | nutanm

छान ! वर्णन!!