कोकणातील तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस !

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
4 Jun 2025 - 4:08 pm

साहित्य आणि ललिता यांचे नुकतेच लग्न झालेले. दोघंही आयटी मध्ये बऱ्यापैकी पगारावर होते. पुण्यात साहित्यला त्याच्या आईबाबांनी एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, हां थोडे कर्ज होते त्यावर, पण साहित्य आणि ललिता ते फेडत होते . साहित्यचे आईबाबा वेगळे राहणार होते, त्यामुळे ललिताला घरातील खरे खुरे डस्टबिन कुठे ठेवायचे हा प्रॉब्लेम नव्हता.
साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न होते. कोकणात थोडी शेती आणि कौलारू घर असावे. घराला अंगण असावे. त्यात छान वेगवेगळी फुलझाडे असावीत. पडवीत झोपाळा असावा. वीक एन्ड ला मस्त जाऊन रिलॅक्स व्हायचं आणि सोमवारी परत पुण्यात फ्रेश पणे जॉब ला हजर.

योगायोगाने त्यांना फेसबुकवर एक पोस्ट त्यांना दिसली.

"कोकणातील दापोली जवळ तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस विकणे आहे" म्हणून.

दिलेल्या फोन वर ललिताने संपर्क केला. फार्म हाऊस चे मालक कायमचे युके ला जाणार होते. त्यामुळे त्यांना फार्म हाऊस विकायचे होते. फार्म हाऊस मेंटेन नव्हते पण थोडा खर्च करून छान वीक एन्ड होम होऊ शकले असते.

एका शनिवारी साहित्य आणि ललिता फार्म हाऊस बघून आले. दापोली कितीसे लांब पुण्यातून ? ताम्हिणी उतरला आणि तीन एक तास गाडी चालवली की फार्म हाऊस.
म्हणजे पुण्यातील साहित्य आणि ललिताच्या हडपसर मधल्या घरा पासून पहाटे ५ ला निघाले की १० ला फार्म हाऊस वर. व्यवहार ठरला, कायदे कानून बघून, अजून थोडे कर्ज घेऊन खरेदी पूर्ण झाली. साधारण ३० एक लाख रुपये खर्चून साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न पूर्ण झाले.

फार्म हाऊस मेंटेन नव्हतं. थोडं गवत कापायला लागणार होते. जवळील गावातून दोन गडी माणूस आणून गवत कापून घेतले. "जनावर" घरात येऊ नये म्हणून खिडक्यांना जाळ्या लावून घेतल्या. जवळील गावातील एक माणूस सांगून ठेवला, की जेणेकरून काही लागले तर पुण्यातून त्याला पैसे देऊन फार्म हाऊस ची काही कामे करायला सांगता येतील. पुढच्या ट्रीपला वीक एन्ड साठी लागतील इतकी चहा पाणी आणि जेवणसाठीची भांडी नेली.

आता साहित्य आणि ललिता दार वीक एन्ड ला त्या फार्म हाऊस वर जाऊ लागले. पावसात तर ताम्हिणी घाट आणि दापोली पर्यंत चा रस्ता म्हणजे निसर्ग सौदर्याची शालच. ...

दर वीक एन्ड ला पहाटे निघायचे, फार्म हाऊस ला पोहोचून झाडपूस करायची, कौलातून कुणी जनावर आत शिरले नाहीना ते बघायचे , मग दुपारी थोडी "एन्जॉयमेंट", संध्याकाळ झोपाळ्यावर एक पेग हातात घेऊन भविष्याच्या गप्पा, आणि रात्री झोप.

रविवार सकाळ चा चहा झाला की दुपारचा स्वयंपाक /किंवा दापोलीत, जवळच्या गावात जाऊन जेवण करून चार ला परत पुण्याकडे निघून रात्री ९ - १० पर्यंत पुण्यात.
सुरुवातीस उत्साह वाटला, पण आता कंटाळा येऊ लागला.

थोड्याच दिवसात फार्म हाऊस च्या देखभालीसाठी ठेवलेल्या माणसाकडून फोन आला की विहिरींची मोटोर जळली, इतके पैसे पाठवा, पाठवले. .....
महिन्याभरात दुसरा फोन की माकडांनी कौले फोडली, पैसे पाठवा.. पाठवले....
मग विहिरीतून घरात येणार पाईप फुटला, पैसे पाठवा .... पाठवले.
आता फार्म हाऊस चे स्वप्न ही त्रासदायक वास्तवता होती.

##
जर तुम्ही कोकणात बॉर्न आणि ब्रॉट अप नसाल तर कोकणात राहणे अवघड असते, आणि पुण्यात राहून कोकणातील घर मेंटेन ठेवणे त्याहून अवघड.
##

मधल्याकाळात वीकएंड ला दुपारी केलेली एन्जॉयमेंट फळाला आली आणि ललिताला मातृत्वाची चाहूल लागली. काही कारणांनी गायनॅक ने ललिताला प्रवास बिलकुल टाळायचा असा सल्ला दिला.

आता दर वीक एन्ड ला दापोलीतील फार्म हाऊस वर जाण्याची जबाबदारी साहित्यवर आली कारण फार्म हाऊस ला मालकाचे जाणे येणे आहे , त्याचे लक्ष आहे याची जाणीव इतरांना व्हावी लागते म्हणूनच .... बाकी सेकंड होम ची मजा बरीचशी विरली होती.. पण प्रेग्नंसीत ललिताला आता साहित्यचा सहवास हवा होता. त्याचे दर वीक एन्ड ला दापोलीत जाणे तिला अस्वस्थ करू लागले. पुण्यातील फ्लॅटचे कर्ज , फार्म हाऊस चे कर्ज आता नको वाटायला लागले.

नीट विचार करून साहित्यने आणि ललिताने निर्णय घेतला आणि फेसबुक वर पोस्ट टाकली. ......

"ओनरला त्वरित ऑनसाईट जावे लागत आहे म्हणून कोंकणातील निसर्ग रम्य वातावरणात दापोली जवळ एक तुमच्या स्वप्नात असते तसे फार्म हाऊस विकणे आहे"

कौस्तुभ पोंक्षे...

कथाविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

4 Jun 2025 - 6:49 pm | कर्नलतपस्वी

अंजर्ले येथे एका होम स्टे मधील भूतपूर्व मालक बनाम मॅनेजर ,वरिष्ठ नागरीक यांनी शिळोप्याच्या गप्पा मारताना आपल्या वेदना व्यक्त केल्या.

ही संपत्ती वाडवडिलार्जीत होती. मुलग्ये पुणे मुंबई कडे जाऊन चाकरमानी झाले. परतायला तयार नाही. संपत्ती वृद्धापकाळामुळे ठिकठाक ठेवणे कठीण. मनुष्यबळ नाही. वृद्धापकाळ वाडवडिलार्जीत मातीत जावा व शहरातील खुराड्यात रहायचे नव्हते म्हणून मालकाचे नोकर होणे पसंत केले.

शहरात राहणाऱ्या माणसाने गावी आपले घर असावे म्हणून गुंतवणूक अजिबात करू नये या निर्णयापर्यंत आम्ही १० वर्षांपूर्वीच आलो आहोत.

गावची (कोकणची) माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी

हे वाक्य टाळ्या मिळ्वण्यापुरतेच ठीक आहे.

शहाण्या माणसाने असे अतिरिक्त पैसे कुठेतरी ( बाजारात, म्युच्युअल फंडात किंवा तत्सम गुंतवणुकीत गुंतवावेत) आणि त्याच्या व्याजावर आयुष्यभर कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी पंचतारांकित सोयीचं लाभ घ्यावा. या निष्कर्षाप्रत आम्ही सर्व भाऊ आलेलो आहोत.

आमचे वाडवडिलोपार्जित उत्तम देखभाल केलेले घर कोकणातील श्री क्षेत्र परशुराम येथे असूनहि वर्ष वर्ष तेथे जाणे होत नाही.

परंतु सात चुलत भावांमध्ये कोणीतरी जात येत असल्यामुळे घर उत्तम स्थितीत आहे. ते मध्यवर्ती ठेवून आजूबाजूला सर्वत्र पर्यटन करणे सोयीचे होते.

त्यातून कोकणचा जाण्यायेण्याचा प्रवासखर्च वजा जाता मुंबईत उत्तम हापूस आंबे स्वस्त मिळतात हि वस्तुस्थिती.

एकंदर कोकणात माणसांच्या उपलब्धतेबद्दलची स्थिती चिंताजनकच आहे.

एकंदर माणसांना काम नाही

हि रड असली तरी

वेळेवर कामाला माणसे मिळत नाहीत

आणि मिळणारी माणसे कामाची नाहीत.

हि वस्तुस्थिती आहे.

वस्तुस्थिती आहे तरी स्वप्ने पाहणाऱ्यांची कमतरता नाही. हिंदी सिनेमात पैका मिळवणाऱ्या कलाकार, निर्मात्यांनी आलेला पैसा गुंतवला, त्यांचे विश्वासू गडी कायमचे ठेवलेत. पैसे खर्च करतात. त्यांचे पाहून इतर काही जण हा उद्योग करतात आणि कंटाळतात किंवा फसतात.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jun 2025 - 4:14 pm | प्रकाश घाटपांडे

कंटाळले तरी मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर गार गार वाटतय असे म्हणणारे असतात

प्रत्येक ओळ आणि शब्दाला +१०१

अगदी अगदी मनातले.

उत्तम लेखन.

ओह! दुरून डोंगर साजरे सारखे आहे हे!!

कपिलमुनी's picture

5 Jun 2025 - 11:22 am | कपिलमुनी

रग्गड पैसा आणि वेळ असल्याशिवाय असाल्या भानगडीत पडूच नये .
फार्म हाउस , हिल स्टेशन बंगला , रीसोर्ट मध्ये व्हिला असल्या भानगडीत पडू नये .

सामान्य माणसाला तरूणपणी वेळ मिळत नाही आणी म्हातारपणी तिथे सोयी नसतात..
हवे तेव्हा भाड्याने घेउन राहावे .. अगदि महिनाभर भाड्याने घेतले तरी परवडते आणि हौस पण होते .

कपिलमुनी's picture

5 Jun 2025 - 11:31 am | कपिलमुनी

एका मित्राने मुळशी मध्ये बांधलेल्या घराचे खिडक्या दरवाजे नेले होते .
वॉचमन परवडत नव्हता . मग शेजारच्या वाडीतील एका बाईल स्वछतेला सांगितले , पावसाळ्यात तीची भिंत पडली म्हणून तीच सहकुतुंब राहायला आली .. ते पण ह्याला महिन्याने कळले :)

माझे बालपण तळेगावला गेले तिथे बर्याच मुंबैकरांची सेकंड होम आहेत .. सगळीकडे सेम स्टोरी

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Jun 2025 - 5:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

कथानायकाचे नाव मस्त आहे. आणि शेवटी घेतलेला निर्णय सुद्धा बरोबर आहे. जिथे आपण स्थायिक नाही तिथे घर घेउ नये. उगाच २-३ वर्षे बॅंगलोर किवा हैद्राबादला नोकरी होती म्हणुन तिकडे फ्लॅट घेणारे आणि आता पस्तावणारे खुप पाहिलेत. काहीनी तर नुकसानीत सुद्धा विकुन टाकले आहेत. काही वर्षांपुर्वी असेच नाशिकला घरे/बंगले घ्यायचे फॅड आले होते. अगदी मार्केटिंग म्हणुन विकांताला बिल्डरचे लोक जीपने जायची/यायची सोयही करायचे मुंबईतुन. आता ते चालु आहे की नाही माहीत नाही.

नूतन's picture

6 Jun 2025 - 1:02 pm | नूतन

नेमकी मांडणी. आवडली.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jun 2025 - 3:31 pm | प्रकाश घाटपांडे

फार्म हाऊस की नुसतीच हौस??????? हा मुवि यांचा लेख आठवला. माझ्या सविस्तर प्रतिक्रिया त्यात आहेत. माझ्या वैवाहिक आयुष्याची दिशाच बदलली या प्रकरणाने

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jun 2025 - 3:47 pm | प्रकाश घाटपांडे

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित

शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं.

एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव!

संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे

https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

कंजूस's picture

6 Jun 2025 - 5:59 pm | कंजूस

यावरून आठवलं - गोसेवा करण्याची कुणाला हुक्की येते. एकाचं घर आणि आंगण होतंच तर गाय ठेवावी विचार आला. त्याला सल्ला मिळाला की कुणाकडे आजारी गाय असेल तर त्यांच्याकडे जाऊन सेवा कर आणि अनुभव घे. मग गाय विकत आणून अंगणात बांध. आजारी गायीचं जमलं की मग पुढे काही झालं तुमच्या गायीचं तर डगमगायला होणार नाही.

तसं जिथे घर बांधायचं आहे तिथे कुठे भाड्याने राहून बघा की काय अडचणी येतात आणि मग रुळलात की विचार पक्के होतील किंवा बदलतील किंवा हौस फिटलेली असेल.