दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?
वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?
वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, रेखीव वाट विसरलो
चुकलो का मी?
विस्मरणाची गडद सावली
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
चुकलो का मी?
प्रतिक्रिया
24 May 2025 - 9:41 pm | मारवा
वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
काय सुंदर कल्पना आहे
तुमच्या निवडक कवितांचा एक तरी संग्रह प्रकाशित व्हायला हवा असे मनापासून वाटते.
इतक्या पावसाळी छत्र्या सारख्या कविता सर्वत्र उगवत असताना तुमच्या अनोख्या सुंदर कविता आनंद देऊन जातात.
25 May 2025 - 3:13 am | सोत्रि
तंतोतंत, अगदी हेच म्हणतो!!
- (अनन्त्_यात्री याच्या कवितांचा पंखा) सोकाजी
25 May 2025 - 7:59 am | मिसळपाव
दोघाना +१.
काहीतरी सुरेख कल्पना असते याच्या कवितांमधे. कधीमधी डोक्यावरून जातात. पण पुढच्या कवितेची उत्सुकता असते. हे असलं काही आमच्या डोचक्यात कधीच का येत नाही हो म्हणतो मी! असो. दुसर्या कोणाच्या येतंय आणि ते वाचायला मिळतंय हेही नसे थोडके. अ. यात्रीसायबा, तुझ्या या अशा सुरेख रचनांबद्दल थ्यांकू हां.
ता. क. प्राची-अश्विनी कुठे गायबल्येय कोण जाणे. ती पण असं काही अनवट लिहून जाते. मुक्तछंदात असतं.
24 May 2025 - 11:44 pm | श्वेता२४
प्रत्येक कडव्यात विरोधाभासाची सुंदर गुंफण केली आहे....कविता आवडली....