भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे. पुण्याचे पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू ब्रह्मेद्र स्वामी धवडशीकर यांनी या मंदिराला पुनर्रचना करावयाची कल्पना सांगितली.भुलेश्वर मंदिर संकुलात ३ मजले आहेत. पण खालचे २ मजले सर्वांसाठी रहस्यमयपणे बंद आहेत. मंदिराचा फक्त ३ या मजला खुला आहे.
मंदिरातील पिंड ही जमिनाखाली पोकळ स्वरूपाची आहे.एका भव्य नंदी मंडपात उजव्या दिशेला डोके असलेला महाकाय सुंदर नंदी आहे.ही शैली दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये आढळते. नंदीच्या पुतळ्याच्या वरच्या भागावर अष्ट दिक्पाल , नवग्रह अनेक देवता कोरल्या आहेत.
भूलेश्वर मंदिराला पुण्यातले वेरूळ म्हटले जाते.तेही बरोबरच आहे.सर्व भिंती,खांबांवर,छतावर अक्षरशः प्रत्येक इंचावर सुबक मूर्ती कोरल्या आहेत.पण सतत आक्रमणाने असंख्य मूर्ती तोडल्या आहेत,हे पाहून खूप हळहळ होते.
तरीही मंदिराचे सौंदर्य अप्रतिम आहे.या मंदिरात काही अद्भुत शिल्प आहेत.
१.भगवान गणेश, शिव आणि कार्तिकेय यांचे स्त्रीलिंगी शिल्प
हे दुर्मिळ शिल्पांपैकी एक असावे, जिथे नर देवतांना मादी म्हणून चित्रित केले जाते.या गणेशाला विनायकी गणेश म्हणतात. प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये, लिंग-तरलता असामान्य नव्हती. भगवान शिवाची अर्धनारीश्वर संकल्पना असो किंवा महाभारतातील अर्जुनाचे बृहन्नला बनणे असो, लिंग हे अंतिम स्वरूप नव्हते.
२.चामुंडा
या चामुंडा शिल्पातील विंचू, चामुंडाचे शरीर फासळे अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत.
३.रामायणपट
वेरूळप्रमाणे येथेही रामयणपट आहे.यात मध्यभागी राम व लक्ष्मणाची सुबक मूर्ती आहे.यात सीता स्वयंवराचा प्रसंग कोरला आहे.
४.महाभारत युद्ध प्रसंग
यात भीमाचा पराक्रम हत्तींसह युद्ध, भीष्म पराभव ओळखू येतात.शल्य वध सहज ओळखता येत नाहीत.
अर्जुनाने केलेला मत्स्य लक्ष्यभेद आणि द्रौपदी विवाह प्रसंग ओळखता येतो.
५.सुंदरी
अलौकिक सुंदर आभुषणांनी नटलेल्या, आकर्षक सौंदर्यंवतीशिल्प येथे कोरल्या आहेत.परंतू यातील दर्पण सुंदरीचे मुख भाव शिल्प यात नीट राहिले आहे.तरीही इतर वादकांचे वाद्य अतिशय सुबक आहेत.
६.समुद्रमंथन
समुद्र मंथन प्रसंगाखाली जी रत्ने मिळाली तीही इथे कोरलेली दिसतात.
७.मासोळी
शेषशायी विष्णू मंदिरात या मासोळी कोरलेल्या आहेत.अगदी ३ डी आर्ट वाटते.
८.दगडी कोरीव नक्षीदार द्वार
याची नक्षीदार जाळी , अप्रतिम कलाकुसर आहे.
९.मंदिराचा गुबंद कळस आणि मिनार
इतर शिल्पे
प्रतिक्रिया
14 May 2025 - 6:15 pm | कंजूस
छान.
पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते.
.............
इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले.
आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.
14 May 2025 - 11:01 pm | कर्नलतपस्वी
१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे.
पुन्हा एकदा जायला हवे.
15 May 2025 - 7:37 pm | प्रचेतस
चांगलं लिहिलंय.
भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय.
दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात.
बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.
15 May 2025 - 8:42 pm | Bhakti
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते.
मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय
अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले.
चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे.
उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा.
ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती.
अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य
देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली.
तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.
23 May 2025 - 1:56 pm | स्वधर्म
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.
15 May 2025 - 8:23 pm | चौथा कोनाडा
वाह, सुंदर अप्रतिम !!!
दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती.
आता पुन्हा निवांत जायला हवे !
धन्यवाद !
23 May 2025 - 11:30 am | श्वेता२४
या मंदिराबद्दल माहित नव्हते. धन्यवाद.