हे ताडपत्रीवाल्या,
गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक
हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू,
फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव
हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका,
ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव
हे नगर सेवका,
नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे
हे पालक मंत्र्या,
महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे
हे विदग्ध साहित्यिका,
मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव
हे हायबरनेटिंग कविवर्या,
यंदाच्या पावसाळ्यात दोन तरी कविता पाड:
पहिली: अप्राप्य ओलेती वरची झिम्माड !
दुसरी: वर्षाऋतूतील विरहा_बिरहा वरची फोकनाड !!