संकल्प - मराठी भाषा गौरव दिन

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
27 Feb 2025 - 2:14 pm

साहित्य संमेलनातलं मोदीजींचं आणि संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि एका माहित असलेल्या गोष्टीची पुन्हा जाणीव झाली.

मराठीला सरकारने अभिजात दर्जा दिल्यामुळे सरकार जे काही उपक्रम सुरु करेल त्याचा आर्थिक लाभ काही मराठी मंडळींना नक्कीच होईल. पण मराठीला लाभ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक मराठीसाठी काही करू.

दुसऱ्यांशी संवाद साधायला म्हणुन भाषा हा अगदी प्राथमिक उपयोग झाला. आपल्याला ज्या संस्कृतीचा अभिमान असतो ती आपल्यापर्यंत पोहोचते ती भाषेमुळेच. भाषा आपल्याला माध्यम तर देतेच पण ओळख सुद्धा देते.

मराठीचे मोठमोठे कार्यक्रम होत असले तरी मराठी शाळा, मराठी चित्रपट, मराठी पुस्तकं या सगळ्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं सगळेच नेहमीच म्हणतात.

बऱ्याच जणांना, विशेषतः इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांना, शिकणाऱ्यांना मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजी शब्द वापरून समजवावे लागतात.

i1

हिब्रू पुनरुज्जीवन

तामिळ, मल्याळम इत्यादी लोकांच्या भाषाप्रेमाचं आपल्याला उदाहरण माहितीच असतं. आज एक उदाहरण देतो ज्यु लोकांचं.
अगदी साधारण ७०-८० वर्षांपूर्वी इस्राईल हे राष्ट्र बनलं, जगभर विखुरलेले ज्यू लोक तिथे एकत्र यायला लागले. सर्वांची वापरातली भाषा इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन अशी वेगवेगळी होती.

त्यांनी निश्चय करून तब्बल १८०० वर्ष फक्त धार्मिक पुस्तकात अडकून असलेली हिब्रू भाषा अंगिकारायची ठरवली. त्याचे व्याकरण, शब्दकोश यावर काम करून सर्वांना शिकवली. वापरात आणली. आज ते मेसेजेस आणि चॅटिंगसुद्धा हिब्रूमध्ये करतात. त्यांचा संगणक असो कि मोबाईल त्यावर हिब्रु टायपिंग त्यांनी सुलभ करून ठेवलंय.

आपल्या भाषेवर आणि संस्कृतीवर प्रेम असेल तर सगळं शक्य आहे. आपल्यापुढे आव्हान त्यांच्याइतकं खडतर नक्कीच नाही. आपली भाषा जिवंत आहे, वापरात आहे, फक्त तिचा सामाजिक आयुष्यात प्रभाव कमी होतोय. तो टिकवायचा आहे आणि वाढवायचा आहे.

माझ्या परीने मी मराठीसाठी म्हणुन काही संकल्प करतोय:

१. दर महिन्याला किमान एक मराठी पुस्तक वाचणार

मोबाईल आणि इतर मनोरंजनाच्या पर्यायामुळे माझं पुस्तक वाचन हल्ली फार कमी झालं होतं. तेही मार्गावर येईल आणि नवीन लेखकांची ओळख होईल.
ज्या भाषेत नवीन लिखाण नवीन वाचन होत राहील तर ती अर्थातच बहरत राहील.

२. दर महिन्याला किमान एक मराठी चित्रपट पाहणार

मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात चांगले शो मिळत नाहीत, मुंबई पुण्याच्या पलीकडे पोहचत नाहीत हे तर नेहमीच ऐकतो. पण अशात ऐकलं कि आता नेटफ्लिक्स ऍमेझॉन सारख्या OTT वरही मराठी चित्रपट घेत नाहीत.

चांगले चित्रपट नाहीत - शो नाहीत - शो ला प्रेक्षक नाहीत - प्रेक्षक चांगल्या चित्रपटांच्या प्रतीक्षेत हे वर्तुळ तोडायला सर्वांनाच आपल्या परीने प्रयत्न करावे लागतील.

३. दर महिन्याला किमान एक मराठी ब्लॉग लिहिणार

माझा ब्लॉग आहे पण अगदी अनियमित, सुचेल तेव्हा वाटेल तेव्हा. मोदींनी आपल्या भाषणात सोशल मीडियावर लिखाण करणारे सुद्धा भाषेसाठी योगदान देत असतात असा उल्लेख केला. सर्वांची मजल थेट पुस्तकं लिहिण्या-वाचण्यापर्यंत पोहचत नाही. पण आपापल्या भाषेत छोटामोठा कंटेंट बनवणे हे सुद्धा नवीन प्रकारचं योगदान आहे.
दिसामाजी काहीतरी लिहावे म्हणतात ते निदान मासामाजी तरी करून बघतो.

४. marathigoshti.com वर दर महिन्याला किमान दोन नवीन गोष्टी लिहिणार

या नावाची माझी एक मराठी कथा गोष्टींसाठीची वेबसाईट आहे. इसापनीती, बोधकथा, सणवारांच्या कथा अशा अनेक गोष्टी मी यावर लिहिल्या आहेत. बरेच जण त्यावर वाचत असतात.

वेळेअभावी बरेच दिवस यावर मला काही नवीन लिखाण जमले नव्हते. तेही आता यानिमित्ताने पुन्हा सुरु करतो.

हे सर्व जाहीर करण्याचं कारण

अर्थातच मराठीसाठी आपण सक्रियपणे काय करु शकतो असा सर्वांनी विचार करावा हे सुचवावे म्हणुन.

मराठी भाषेला, मराठी चित्रपट, नाटक, संगीत, पुस्तकांना, मराठी ब्लॉग्सला, जे जे मराठी आहे त्या सर्वांना राजासारखा मान मिळाला तर ती राजभाषा.

सर्व मराठी जणांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.

ता.क. - वरील मजकुर मी माझ्या व्हाट्सऍपवर आणि इतरत्र प्रकाशित केला आहे.
मिसळपाव-वर सक्रिय मराठी प्रेमीच असतात याची पूर्ण कल्पना आहे. :-)

मराठी प्रेमाबद्दलचा मजकुर तुम्हाला वेगळा सांगण्याची गरज नाही, परंतु एक गोल ठरवुन संकल्प करण्याची कल्पना इथल्याही मंडळींसमोर मांडावी म्हणुन, आणि तुमच्याकडे इतर काही कल्पना असल्या तर त्या समोर याव्यात म्हणुन इथेही प्रकाशित करत आहे. चु. भू. द्या. घ्या.

भाषाप्रकटन

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Feb 2025 - 2:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान संकल्प आहे रे आकाशा.आमच्या मते मराठी गुणीजनांनी ईतर भारतिय भाषा(हिंदी सोडुन किमान दोन) शिकण्यावरही जास्त जोर द्यावा. ज्यामुळे बराच फायदा होईल. एखादी दक्षिणेची आणि एखादी पुर्वेची. शब्द भांडार तर वाढेलच शिवाय ईतर भाषांमधील कथा/कादंबर्या,मासिके.. काही वर्षापुर्वी खुद्द पंतप्रधानांनी ह्यावर चांगला सल्ला दिला होता. भारतिय भाषा अनेक येत असतील तर एक मोठे मार्केट उपलब्ध होउ शकते असे ते म्हणाले होते.

आकाश खोत's picture

3 Mar 2025 - 10:05 am | आकाश खोत

धन्यवाद. चांगली कल्पना आहे. पुढे जमलं तर नक्की प्रयत्न करेन. "वंगचित्रे" हे पु. ल. देशपांडेंचं पुस्तक वाचल्यापासुन (त्यांनी बंगाली, मुख्यतः टागोरांचे साहित्य मुळ भाषेत समजावे म्हणुन बंगालमध्ये जाऊन बंगाली शिकली, त्यावर आहे) बंगाली, आणि तामिळ भाषेत सुद्धा फार पूर्वीपासूनचे ग्रंथ आहेत हे वाचल्यापासुन तामिळ या दोन भाषांबद्दल मला स्वतःला कुतूहल आहे. 

Bhakti's picture

27 Feb 2025 - 3:15 pm | Bhakti

छान संकल्प मांडले.
मलापण एक सुचले.
मी तूनळीवर महिन्यातून एकतरी पुस्तक परिचय/कविता/गोष्ट वाचलेली चित्रफित प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन!

धन्यवाद. तुनळीसाठी शुभेच्छा. इथे लिंक द्या, म्हणजे बघता येईल. 

चंद्रकोर ही इंदिरा संत यांची कविता वाचली आहे.खुपच दिवसांनी तूनळीवर काहीतरी अपलोड केले आहे.थोड्या चूका आहे.यापुढे सुधारणा होतीलच :)
तूनळी दुवा-
चंद्रकोर

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2025 - 5:48 pm | श्रीगुरुजी

- गुगल, फेसबुक, ट्विटर, WhatsApp इ. ची भाषा मराठी ठेवा.

- सर्व ठिकाणी मराठीतच संभाषण करा. अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका.

- एटीएम, नेटवरील कोणताही अर्ज भरताना मराठी भाषा निवडा.

- कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2025 - 8:50 pm | अमरेंद्र बाहुबली

अमराठींना मराठी अजिबात येतच नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. कोणत्याही परिस्थितीत हिंदीत बोलू नका. +१

कोणत्याही विक्रेत्याने आपल्या उत्पादनासाठी, कर्जासाठी, विम्यासाठी संपर्क साधल्यास फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरा. +१

श्रीगुरुजी's picture

27 Feb 2025 - 5:50 pm | श्रीगुरुजी

- कोणत्याही mobile app ची भाषा मराठी ठेवा.

- हिंदी पूर्णपणे टाळा. हिंदी विनोद, हिंदी चित्रफिती अजिबात पुढे ढकलू नका.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2025 - 8:50 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

धन्यवाद. चांगल्या सूचना आहेत. 

यातल्या काही मी आधीपासून पाळतो. 

मराठी मंडळी घराबाहेर पडल्यावर मराठी कोणाला समजणार नाही अशी का वागतात समजत नाही. :-D 
दुकानदार, मेकॅनिक, वेटर अशा लोकांशी आपण तरी सुरुवात मराठीत करायला हवी. 

मी पाहतो तर बाहेरून आलेले लोक मराठीच्या वेगवेगळ्या टक्क्यावर असतात.
काही जणांना खरंच अजिबात समजत नाही (नवे असतील तर). त्यांच्याशी हिंदीशिवाय पर्याय नाही. 
काही जणांना मराठी बोलता येत नसलं तरी आपण बोललेलं समजतं, इथे राहून तेवढं तर समजायलाच हवं. ते आपण मराठी बोललो तरी समजुन घेतात आणि सेवा देण्याचा प्रयत्न करतात. 
काही जणांना व्याकरणशुद्ध नाही पण कामापुरतं बोलता येतं आणि ते आपण मराठी बोललो तरच मराठी बोलतात नाही तर त्यांना तर हिंदी सोयीचं असतंच. 

त्यामुळे प्रश्न आपण मराठीला प्राधान्य देण्याचाच आहे. 

श्रीगुरुजी's picture

4 Mar 2025 - 8:05 am | श्रीगुरुजी

मी महाराष्ट्रात कोणाशीही बोलताना मराठीतच प्रारंभ करतो. समोरचा हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये बोलत असेल तरीही अट्टाहासाने मराठीतच बोलत राहतो.

कोणत्याही विक्रीप्रतिनिधीने दूरभाष केला तरी मी मराठीतच बोलतो व समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर सांगतो की मला फक्त मराठी समजते.

प्रसाद गोडबोले's picture

27 Feb 2025 - 7:21 pm | प्रसाद गोडबोले

अरे व्वा.

थोडक्यात आता तुम्हीही शब्दांचा पिसारा फुलवणार तर ! जराजरी अलंकारिक भाषा वापरल्यास 18% GST भरावा लागेल आधीच सांगून ठेवतोय.

आणि हो , खबरदार प्रमाण भाषेचा, व्याकरण शुद्ध लेखनाचा आग्रह धराल तर.

न च्या जागी न अन् ण च्या जागी ण वापराल तर त्यांच्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा.

बाकी पुस्तके दहन करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलाय हे लक्षात राहू द्या.

आता लिहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Feb 2025 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली

मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मैदानात उतरा!

कोण's picture

28 Feb 2025 - 10:48 am | कोण

काय करायला ??

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Feb 2025 - 2:13 pm | अमरेंद्र बाहुबली

मराठीसाठी कायदेशीर मार्गाने लढायला!

सौन्दर्य's picture

2 Mar 2025 - 11:01 am | सौन्दर्य

जर कोणतीही भाषा टिकवायची असेल, तिला पुढे न्यायची असेल तर पुढील पिढीला ती भाषा शिकवणे ह्या शिवाय दुसरा पर्यायच नाही.

मी माझ्या परीने माझ्या नातवाला मराठी बोलायला शिकवतो, तो ज्यावेळी लिहिण्या - वाचण्याच्या वयाचा होईल त्यावेळी त्याला मी मराठी लिपी शिकवणार .

कित्येक वेळा असे होते की एखादा शब्द चुकीच्या स्वरूपात सतत समोर आला तर त्यालाच आपण बरोबर समजायला लागतो. व्हाट्सअप वर पुढे ढकललेले संदेश व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचे असतात, मी त्यांना सुधारून पुढे पाठवतो. माझ्या परीने मराठी भाषेसाठी हे माझे योगदान .

आकाश खोत's picture

3 Mar 2025 - 10:23 am | आकाश खोत

धन्यवाद. छान प्रयत्न.

चौथा कोनाडा's picture

2 Mar 2025 - 12:58 pm | चौथा कोनाडा

सुरेख सुंदए समयोचित लेख !

माध्यमिक शाळेत माध्यम मराठी असल्याने मराठी वाचनाची आवड साहजिकच लागली. महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिश मध्ये सुरु झाल्यावर दडपणच आलं .. पण नंतर सरावाचं झालं.

इंग्लिश पेक्षा मराठी वाचन वाढत गेलं .. मराठी लेखनाचा श्रीगणेशा मिपा पासूनच सुरु झाला (मिपा आणि मिपाकर मंडळींचा मी यासाठी ऋणी आहे.
नुकताच यु ट्यूब चॅनेल सुरु केलाय Av. Bhagyesh यु ट्युब वर Av. Bhagyesh channel असा सर्च केल्यास सापडून जाईल. या द्वारे आवडीचे मराठी साहित्य, कला संस्कृती इ मराठीजना पर्यंत पोहोचवून आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करत आहे.

धन्यवाद !

आकाश खोत's picture

3 Mar 2025 - 10:23 am | आकाश खोत

धन्यवाद. चॅनलसाठी शुभेच्छा.

स्वधर्म's picture

3 Mar 2025 - 8:25 pm | स्वधर्म

शुभेच्छा. मी तर whatsapp संदेशही श्क्यतो मराठीतच लिहितो. बरेच लोक इंग्रजी लिपी वापरून मराठीत लिहितात. ते जाम डोक्यात जाते.