भरण्या घडा रिक्त जो सांडलेला
खेळण्या उगा डाव हा मांडलेला
रडण्या कुठे काळ तो थांबलेला
भिडण्या उभा ठाकला पांगलेला
जगाने जरी हारला मानलेला
समर्पूण सारे जगा जाणलेला
प्रसंगात ओढून तो ताणलेला
सुटे बाण लक्ष्याकडे ठाणलेला
दिवा तेवता जागला लाविलेला
उभी रात्र सांभाळतो वाहिलेला
स्वतः साक्ष अंधार तो राहिलेला
असा सूर्य नारायणा पाहिलेला
ललाटात आभाळही फाटलेला
एकांतात सारे उरी दाटलेला
जमा संपलेलाच तो वाटलेला
तयातून साम्राज्यही थाटलेला
प्रतिक्रिया
4 Dec 2024 - 5:36 am | निनाद
नवकाव्याच्या मुक्तछंद वादळात
वृत्तबद्ध काव्याची मशाल पेटवल्याबद्दल अनेक धन्यवाद!
छान आहे!
4 Dec 2024 - 11:40 am | रोहन जगताप
आपल्या प्रशस्तीपर शब्दांनी कविता लेखनाचे समाधान द्विगुणित झाले. अगदी मनःपूर्वक आभार!