महाराष्ट्र माझा

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
13 Nov 2024 - 10:00 am

महाराष्ट्र माझा..'
आहाहा!ज्या दिवसांची या महान राकट कणखर महाराष्ट्र देशातील कमीजास्त अंदाजे नवू कोटी जनता (सगळे लाडके लहान थोर धरुन) आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आता उजाडला च नाही तर चक्क भरदुपार झाली आहे.आता भर दुपार म्हणलं की चटके बसणारच! आणखीही बसतील,पण फिकीर कुणाला अन् कशाला?आता एवढे सगळे छान छान होत आहे,होणार आहे तर अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष या राकट कणखर महाराष्ट्रातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)कशाला देईल?
   सह्याद्री,सातपुडा सारख्या मोठमोठ्या पर्वतांपासून ते जिच्या चारी बाजू पोखरून मुरुम काढण्यासाठी गाव पुढाऱ्यांच्या जेसीबी अहोरात्र सुरू आहेत त्या गावा,गावा लगतच्या छोट्या माळां सारख्या टेकड्यां पर्यंत सारेच मोहरून किंवा शहारुन गेले आहेत.
  गोदा,कृष्णा,कोयना अशा मोठमोठ्या नद्या,ते अनेक गावां जवळून पूर्वी  कधीकाळी खळाळत वाहणाऱ्या (म्हणे) आणि,आता गावा शहरांतली गटारगंगा, मैला ,
कारखान्यांमधले प्रदुषित घाण पाणी,इत्यादी बरेच काही वाहून नेणाऱ्या,केजडी ,खाम,बुडकी अशी नावे धारण करणाऱ्या नद्या,या साऱ्या साऱ्या पण' मोहरुन किंवा शहारून उठल्या '(इथे दुसरे शब्द सापडले नाहीत.असो)
   तात्पर्य या राकट कणखर महाराष्ट्रातील निसर्ग,आणि पंचमहाभूतांची जी रुपे; पर्यावरणाची हानी,ओझोन  इत्यादी,मधुन वाचून शिल्लक आहेत ते सारे पण मोहरुन किंवा शहारून (पून्हा ,भाषा मर्यादा!)गेले आहेत.असो.
 या क्षणी;अनेक शतकांपूर्वी या राकट कणखर महाराष्ट्रात होऊन गेलेले आपले संत महान किती दृष्टे होते याची आठवण होते.त्यांनी लिहिलेल्या ,'अजि सोनियांचा दिनू',(ज्ञानेश्वर?)'याज साठी केला होता अट्टाहास' '(तुकाराम?),' आनंद वन भुवनी'(रामदास?),'धन्य आज दिन'( एकनाथ , तुकाराम,की दोघेही?)वगैरे वगैरे कवनांच्या ओळी
( तेवढ्याच माहिती आहेत)',त्यांनी बहुतेक एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच रचल्या असाव्यात असा अंदाज आहे.असो.
  तर‌ हा सगळा 'आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहिकडे'(पुन्हा एक द्रष्टा!बालकवी?)होण्यास कारणीभूत ठरल्या त्या या कणखर राकट वगैरे महाराष्ट्र देशी इ.स.२०२४ चे नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका!
आता न.को.ज.(स. ला.ल.थो.ध.)पैकी जे वाचू शकतात,म्हणजे वाचन करु शकतात ते;आणि मोबाईल मधून डोके बाहेर काढून जे वाचू इच्छितात,वाचू शकतात,
व जे खरेच वाचतील,अशांपैकी काहीं सामान्य वाचकांना   पडलाच तर असा प्रश्न पडेल की, राजकारणी मंडळी,
नेते,पुढारी व त्यांचे परिवार जन सोडता,या राकट कणखर महाराष्ट्रातील उरलेल्या न.को.ज.(स.ला. ल. थो.ध.)चा  निवडणुकींशी काय संबंध आहे बुवा? न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)मधले जे जे न चुकता मतदान करतात त्या सामान्य लोकांची भुमिका,' उरलो मतदाना पुरता',
अशी ,नेहमीप्रमाणे मतदानाचे दिवशी निमुटपणे,
निवडणूक केंद्रावर रांगेत उभे राहून,मतदान करण्यापुरतीच असते यावर कुणाचेच दुमत नाही.
हे जरी खरे व रास्त असले तरी,निवडणुकीच्या निमित्ताने,  राकट कणखर वगैरे महाराष्ट्रातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)समोर आणि न.को.ज(स.ला.ल.थो.ध.)
साठी,मोफत मनोरंजन महोत्सव,या राकट कणखर वगैरे महाराष्ट्र देशी चालू झालेला आहे,आणि तो ही फुकटात, मनोरंजन करमुक्त,पाहायची व अनुभवायची संधी,येथील तमाम राजकीय पक्ष, त्यांच्या आघाड्या,युत्या,बंडखोर,
तसेच स्वतंत्र झेंडे घेऊन उभे असलेले असंख्य अपक्ष ,
वगैरे मुळे न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)ला मिळाली आहे ते लक्षात घेता,निवडणूकांमधील,न.को.ज.(स.ला.ल.थो.ध)
चे स्वारस्य ध्यानात येईल.
   या निमित्ताने,दूरचित्रवाणीच्या असंख्य वाहिन्यां वरच्या वरचे बातम्यांचे दळण,विचारवंतांच्या(?)चर्चा,(?) दररोज
,ठराविक वेळा ,नियमितपणे वाजणारे  दैनिक भोंगे,वगैरे वगैरे च्या माध्यमातून मनोरंजना सोबत जे ज्ञानभांडार (?)
न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)साठी खुले होत आहे,त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी पुरेशी होणार नाही.
  दूरचित्रवाणीवाहिन्यां वर नियमित वेळा नियमितपणे  व्यक्त होणारे अनेक राजकारणी,राजकीय पक्षांचे प्रवक्ते, दैनिक भोंगे,इत्यादी मंडळी,आपल्या जिव्हा लाघवाने वा जिव्हा कौशल्याने,प्रतिपक्षांवर हल्ले ,प्रतिहल्ले चढवताना जे भाषा सौंदर्य उधळत असतात,त्यातून शिमगा व होळी सारख्या आपल्या लोकप्रिय परंपरागत सणांसाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दभांडारात केवढी भर पडत आहे!
   गेली कित्येक वर्षे असांसदीय,अशिष्ट ,शिवराळ, ग्राम्य म्हणून,अडगळीत वा सांदीकोपऱ्यात पडलेल्या अनेक वाक्प्रचार,आणि शब्दांना आता लोकमान्यता मिळत आहे. प्रौढच नाही तर अगदी लहान मुलांच्या तोंडी ही ते शब्द , वाक्प्रचार रुळू लागले आहेत.'भाषिक क्रांती',म्हणतात ती याहून वेगळी काय असते?मराठी भाषेला अभिजात दर्जा ज्या काळात मिळाला त्याच काळात हे व्हावे हा केवढा योगायोग!
  वर उल्लेख केलेल्या उपलब्धींनीं ही मान खाली घालून जावे वाटेल अशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट या प्रसंगी घडत आहे.या महत्वपूर्ण घटनेची नोंद या राकट कणखर महाराष्ट्र देशीच्या इतिहासात नक्कीच सुवर्ण अक्षरांनी होणार यात गुंजभर ही शंका नाही.('सुवर्ण अक्षर'म्हणून 'गुंज'हे सोने मोजायचे माप वापरले हे सुज्ञ वाचकांना कळले असेल!)
   तर सांप्रत काळी या राकट कणखर वगैरे महाराष्ट्र राज्यात,पुढची पाच वर्षे,'लोकांचे लोकांसाठी लोकांनी' चालवायचे राज्य यावे यासाठी होणाऱ्या निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, हे राज्य 'कांहीं विशिष्ट लोकांचें, 'कांहीं विशिष्ट लोकांसाठी,' 'कांहीं विशिष्ट लोकानीच',चालवायचे आहे व तेच चालवणार आहेत हे इथल्या न.को.ज.स(स.ला.ल.थो.ध.)ला पूर्णपणे मान्य व कबुल आहे.
    आजपर्यंत या 'काही विशिष्ट'लोक'वर्गात ,केवळ शेकड्यातच मोजता येतील एवढेच राजकीय पुढारी आणि त्यापैकी काहींचे एखादे दुसरे युवानेते असलेले सुपुत्र वा सुकन्या वा धर्मपत्नी‌ आणि फारतर एखादा दुसरा जवळचा नातेवाईक,'एवढीच मंडळी असत.आणि ते 'सारे के सारे किंवा त्यांच्या पैकी एखादा ,अर्थातच',जनसेवेचे बांधून कंकण',निवडणूकीच्या आखाड्यात उतरत.या राकट कणखर महाराष्ट्रातील तेव्हा जेवढे कोट असेल तेवढी कोट जनता(सलालथोध)त्यांना ,पुढची पाच वर्षे त्यांनी बिनबोभाट आपआपली गरीबी हटविण्याचा,आणि चल अचल संपत्ती वृध्दीचा कार्यक्रम सुरु ठेवता यावा या शुध्द हेतूने;जात,धर्म,इत्यादी मुळे या कांहीं पैकी 'आपला' असणाऱ्या उमेदवारास आपापले मतदान करत.असे
मत दान केले आणि ते करताना  जमल्यास स्वतःस काही लभ्यांश मिळाला की ते दान सत्पात्री ठरते यावर  श्रध्दा असल्यामुळे तमाम जनता ही खुश आणि निवडून येणाराही खूश!असा सगळा खुशीचा मामला असे.
या वर्षी या आनंदी वातावरणात,या राकट कणखर वगैरे महाराष्ट्र देशीच्या न.को.ज(स.ला.ल.थो.ध.)चा आनंद शतगुणित व्हावा असे वातावरण सर्वत्र पसरण्याचे कारण या 'कांहीं विशिष्ट लोक'जमातीत झालेली बेसुमार वाढ हे आहे!
  विविध मार्गांनी अमाप पैसा मिळवून ,बाळगून असलेले, त्या पैशांचे काय करायचे हे न समजणारे,'काही विशिष्ट लोक' या राकट कणखर वगैरे महाराष्ट्र देशी, हजारो नाही तर लाखांच्या संख्येने वाढले आहेत.आणि ते सगळे च्या सगळे' जनसेवेचे बांधून कंकण',निवडणुकीच्या
आखाड्यात उतरायला सज्ज झाले आहेत ही अभिमानाने ऊर भरभरून यावा अशी गोष्ट आहे.
निवडणूक जिंकून एकदा का आमदारकी आणि जमल्यास मंत्री पद मिळाले की पुढची पाच वर्षे जनतेची सेवाच सेवा करायची,अशी मनीषा असणाऱ्यांचे असे अमाप पिक येणे हे या राकट कणखर वगैरे महाराष्ट्र देशाचे व तेथील न.को.ज. (स.ला.ल.थो.ध.)चे महद्भाग्य!
  केवळ जनसेवेच्या भावनेने  झपाटून गेलेले,हे काही विशिष्ट लोक ;आता,मी एकटाच नाही,तर माझी बायको,
आम्ही दोघेच नाही तर आमची जेवढी आहे,तेवढी संतती ( पक्षी:मुलगे,मुली),झालेच तर भाऊ,पुतणे,भाच्चे,इतर सख्खे नातेवाईक,मित्र या सगळ्या सगळ्यांनी,कुठल्या ना कुठल्यातरी पक्षातर्फे निवडणूक लढवायची संधी मिळवून ;कुठल्या ना कुठल्या ,व कसल्याही मार्गाने, निवडून यायचेच, हीच एक आस पोटी धरुन झपाट्याने कामाला लागले आहेत.एकदा एवढे झाले की मग या राकट कणखर वगैरे महाराष्ट्रातील न.को.ज.चा (स.ला.ल.थो.ध.)भाग्योदय झालाच म्हणून समजा,असा ठाम आणि दुर्दम्य विश्वास बाळगणारी ही जमात,आपला हा महान हेतू पुर्णत्वास नेण्यासाठी, कुठल्याही थराला जाण्यास  तयार आहे.
ध्येयाच्या मार्गावर अग्रेसर होताना,'साधन सुचिता'(कि शुचिता?) वगैरेंच्या बावळट ,जुनाट ,बुरसट कल्पनांची त्यांना तमा नाही.मुळात 'सुचिता'(कि शुचिता ?)ही काय भानगड आहे हेच या नव्या मनुतील नव्या दमाच्या शिपायांच्या गावी नाही.
   पुर्वी यष्टीतून प्रवास करण्यासाठी रिझर्व्हेशन वगैरे थेरं नव्हती.तेव्हा काही चाणाक्ष आणि दांडगे लोक यष्टीच्या खिडक्यांमधून आतल्या शिटांवर रुमाल टोपी,पिशवी असे जे जे असेल ते ते टाकून स्वत:साठी शिटा रीझर्व करायचे.त्याच पध्दतीने उमेदवारीच्या शिटा,स्वतः आणि स्वजनांना ,मिळाव्यात म्हणून,या 'कांहीं विशिष्ट लोक'वर्गीय मंडळींनी; हा पक्ष ,तो पक्ष,ही आघाडी ती युती,अशा सगळ्याच ठिकाणी आपापले पंचे,टोप्या ,टाकून ठेवल्या आहेत! अशी सगळीकडे सगळ्यांसाठी फिल्डिंग लावलेली तर आहेच पण त्यातही काहीच नाही जमले, तर स्वतंत्र बाणा दाखवत 'अपक्ष' 'उभे' राहायचे हा पर्याय आहेच! यष्टीत पण शिट मिळाले नाही तर उभे राहावे लागतेच की!
  एकदा का निवडून आमदार झाले की मग अनेक पर्याय उपलब्ध होतात. खूप 'काही'हाती लागते!जास्तीची हुषारी, चलाखी दाखवली की जमल्यास मंत्रीपद पण मिळते! हे फक्त सगळ्यांना जनसेवेची संधी मिळण्यासाठीच असते!  मग या माध्यमातून ,आपली गरीबी हटवणे,(आता कुठे आहे?)नाही तर श्रीमंती वाढवणे हा उपक्रम पुढे विना विलंब विनासायास,विना व्यत्यय, सुरु राहातो.वाढता वाढता वाढतच जातो.
   काही नतद्रष्ट, स्वतःला विचारवंत, सुशिक्षित समजणारी मंडळी या 'काही विशिष्ट लोकांच्या' जनसेवेच्या या वाढीव उपक्रमाकडे संशयी नजरेने पाहतात व ,यांचा उद्देश, वाममार्गाने मिळवलेल्या पैशातून सत्तेच्या जवळ जाणे व त्यातून आणखी बख्खळ पैसा जमवणे एवढाच आहे असे समज पसरवतात.पण त्यांच्याकडे लक्ष द्यावे एवढी ती विचारवंत, सुशिक्षित वगैरे मंडळी मोठी नसतात.
कर्तत्वाने अन् संख्येने ही!आणि ती मतदान वगैरे करायच्या भानगडीतही पडत नाहीत. त्यामुळे  त्यांच्याकडे हे जनसेवेचे बांधून कंकण' वाले 'कांहीं विशिष्ट लोक ' ढुंकूनही पाहत नाहीत.
  पुर्वी मर्यादित संख्येत असलेल्या या 'काही विशिष्ट लोकांकडून भरपूर व भरपेट जनसेवा होतच असे.त्या काही विशिष्ट लोकां'मधे,कैक पटीने होणारी वाढ लक्षात घेतली,तर त्यांच्याकडून जनसेवा घेता घेता,न.को.ज
(स.ला.ल.थो.ध)ची किती किती तारांबळ होणार आहे!काय काय घेऊ?कुणाकडून घेऊ?अशी वेळ येणार आहे, ह्या नुसत्या विचारांनीच या राकट कणखर महाराष्ट्रातील न.को.ज(स.ला.ल.थो.ध)ला गुदगुल्या होत आहेत.मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत, सागर लहरी उचंबळत आहेत वगैरे वगैरे.
  हे 'काही विशिष्ट लोक,'व,त्यांच्या आपापल्या बायका,
मुले,मुली,त्यांचे आख्खे कुटुंब,सगळे जवळचे नातेवाईक,हे सारे ज्या, ज्या पक्ष,आघाड्या ,युतीतून वा बंडखोरी करून वा स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील,ते सारे निवडून यावेत व त्यांनी,पुढची पाच वर्षे ,या राकट कणखर वगैरे महाराष्ट्रातील न.को.ज.ची
(स.ला.ल.थो.ध) अशीच 'मनसोक्त' सेवा करण्याचा आनंद लुटावा ;हीच या निवडणुकीच्या निमित्ताने ,मागील वर्षानुवर्षे सगळ्या निवडणूकांमधे प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्या ,राकट कणखर वगैरे महाराष्ट्रातील न.को.ज.ची(स.ला.ल.थो.ध.) सदिच्छा!
  या सगळ्यात एक फार मोठी अडचण आहे.ती म्हणजे आमदारांची मर्यादित संख्या.मतदार संघांची संख्या पाहता एवढे सगळे एकदम निवडून येणे शक्य नाही.त्यामुळे हजारो इच्छुक जनसेवकांची संधी हुकणार आहे.तेव्हा जनसेवेची तळमळ असणाऱ्या इच्छुकांची संख्या लक्षात घेता ,या राकट कणखर वगैरे महाराष्ट्र देशी किमान दोन ते तीन हजार मतदार संघ असावेत.नाहीतर आहेत त्या मतदार संघात प्रत्येकी किमान दहा दहा आमदार निवडून देण्याची व्यवस्था व्हायला हवी! आणि हा बदल त्वरित व्हावाया साठी  ताबडतोब घटनादुरुस्ती करण्यात यावी. गरज पडल्यास त्यासाठी ,उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात लोकहित याचिका दाखल करायला हवी.पण अशा याचिकेवर,न्यायालयाचे एकल पीठ ते पूर्ण पीठ,या प्रवासातत्यावर  निकाल लागलाच तर ,तो लागण्यासाठी न्यायालयात होणारा विलंब,लक्षात घेता त्या मार्गाने काही साध्य होण्याची शक्यता अजिबात नाही.शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवर, तथाकथित सराईत व नेहमीचे कलाकार या व्याख्येत मोडतात अशा घटनातज्ञांच्या चर्चा सत्रांची धसकी एवढी आहे की निर्णय नको,पण चर्चा आवरा असे म्हणायची वेळ येवू शकते.
तेव्हा ही मागणी आत्ताचे आत्ता पूर्ण व्हावी यासाठी एकच खात्रीशीर उपाय लक्षात येतो.तो म्हणजे मागणीच्या समर्थनासाठी आंदोलन व आमरण उपोषण! त्यासाठी काही सराईत व अनुभवी ,आमरण उपोषणकर्त्यांची
भेट घेऊन पुढची आंदोलने,आमरण उपोषणे वगैरे सुरू करण्यात यायला हवीत.
  या विचारांवर विचार करून पुढील वाटचालीसाठी,या राकट कणखर वगैरे महाराष्ट्र देशातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)मधील या विषयातील असंख्य तज्ञ लोक नक्कीच पुढे येतील अशी खात्री आहे.

                      नीलकंठ वसंतराव देशमुख.

विनोदलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Nov 2024 - 11:48 am | कंजूस

सहमत.

नीलकंठ देशमुख's picture

16 Nov 2024 - 12:14 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद