चंद्र पाहिलेला माणूस

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
18 Oct 2024 - 1:18 am

रात्रीचे साधारण ९-१० वाजले असावेत.मी नानांच्या सोबत टेरेसवर वर शांतपणे उभा होतो. नुकतेच शारदीय नवरात्र संपुन गेले होते त्यामुळे हवेत आता जाणवण्याइतपत गारवा होता. आज कोजागिरी पौर्णिमा असल्याने रात्री उशीरा टेरेसवर सगळ्या घरच्यांच्यासोबत दुग्धपानाचा कार्यक्रम होता, नेहमीप्रमाणेच! टेरेसच्या एका कोपर्‍यातील भागात एका मोठ्ठ्या कढईत खुप सारं दुध उकळत ठेउन मगाशीच आज्जी खाली गेलेली होती. त्या स्टो चा शांत आवाज रातकिड्यांच्या आणि दूरवर असलेल्या पिपळपानांच्या सळसळीत बेमालुमपणे मिसळुन एक वेगळाच माहोल तयार करत होतो. अधुन मधुन मध्येच कोणत्या तरी पक्षांचे बहुतेक घुबड किंवा टिटवी असावी त्यांचे आवाज एकदम ह्या सार्‍या "शांततेत" सुंदर भर घालत होते. आकाशात मात्र अजुनही ढगांच्या मागे चंद्राची लपाछपी चालु होती. दूरवर चंद्राच्या चांदण्यात अजिंक्यतार्‍याची बाह्याकृती उजळुन निघालेली दिसत होती. नाना त्यांची जुनी मोठ्ठी शाल अंगाभोवती लपेटुन संथ लयीत टेरेसवर शतपावली करत होते अन त्यांच्या अतिषय शांत गहिर्‍या आवाजात अमृतानुभव म्हणत होते . मी मात्र एकटक चंद्राचा लपंडाव न्याहळत शांतपणे तो क्षण उपभोगत ते तल्लीन होऊन ऐकत होतो.

नाना चालता चालता थांबले अन माझ्याकडे पहात हसुन म्हणाले :

नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे । हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ॥

मी माझ्या तंद्रीतुन बाहेर पडत म्हणालो - "म्हणजे ? "

नाना म्हणाले : अरे सूर्य पाहिलेला माणूस ना तू ! तुला माहीती आहे की !
हे बघ "हा चंद्र नेहमीचाच आहे, मात्र पौर्णिमेला तो विशेष दिसतो" हे असं मी आता कशाला बोलेन, कारण मी सूर्यदृष्टी अर्थात सूर्याच्या नजरेने पाहणारा आहे. जो सुर्याच्या भूमिकेवरुन पाहात आहे त्याला काय अमावस्या अन काय काय पौर्णिमा !

There is nothing special because everything is special.

मी आता बस तल्लीन होऊन ऐकत होतो . नाना एकदा बोलायला लागले की ऐकत रहावेसे वाटायचे . अन अचानक मध्ये च कधी तरी "व्हॉला" क्षण कधी यायचा कळायंच नाही.

अरे , काय पौर्णिमा आणि काय अमावस्या, it's all perfect !
चंद्रकला हे सामान्य नाम झालं आणि प्रतिपदा, द्वितीया, अमावस्या, पौर्णिमा वगैरे वगैरे ही विशेष नामे झाली आणि चंद्राच्या बाबतीत दोन्ही ही सत्य आहेत. आणि असत्यही !

चंद्र म्हणजे चंद्रकला सामान्य आणि चंद्र म्हणजे कोणतीतरी विशेष कला, दोन्ही सत्य आहे . किंवा दोन्ही अपूर्ण सत्य अर्थात असत्य आहे. चंद्र आपल्या जागी इतका परिपूर्ण आहे तिथे चंद्रकला असं काही नाहीच , तो बास आपल्या परिपूर्णताचां आनंद घेत आपल्या जागीं स्थिर बसलाय. त्याला तुम्ही सामान्य म्हणता की विशेष कशानेच फरक पडत नाही .

That is nothing special meaning सर्वकाही सामान्य आहे.

काय पौर्णिमा अन् काय अमावस्या ? काय चतुर्थी अन् काय एकादशी ? , सर्वच भासमान आहे , खोट्या आहेत , त्यामुळे सामान्य आहेत.

विशेष नामाने निर्देशित करत असलेल्या ह्या कला म्हणजे ही चंद्राने घेतलेले अवगुंठन आहे, प्रत्येक कला हे चंद्राच्या शुद्ध पूर्ण स्वरूपावर रुपावर नसलेले वस्त्र आहे. मग ती साधी साडी असो की भरजरी पैठणी शालू असो, साधं धोतर असो की अगदी जरी काठाचं नवंकोरं कद असो की पितांबर , प्रत्येकच "विशेष" आहे.

Everything is special. सर्वकाही विशेष आहे.

आणि हेच दुसर्‍या बाजुने पहायला गेलं तर, जर सगंळंच स्पेशल असेल तर त्याचाच अर्थ होतो की काहीच स्पेशल नाही ! कळतंय का पंत ?

शुक्लपक्षींच्या सोळा । दिवसा वाढती कळा ।परि चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं ॥ ५-८ ॥

नाना शांतपणे बोलत होते मी तल्लीन होऊन ऐकत होतो . आजी परत टेरेसवर आली, अन स्टो वर उकळत्या दुधाकडे लक्ष ठेवत आमचा संवाद ऐकु लागली !

"म्हणजे नाना तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चंद्र त्याच्या जागी परिपुर्णच आहे, त्याच्या ह्या कला वगैरे आपला , लोकांचा भास आहे. अमावस्या, चतुर्थी, एकादशी पौर्णिमा हे काही चंद्राचे मुळ रुप नाही , नुसते भास आहेत . चंद्राचे मुळ स्वरुप ह्या भासांच्या पलीकड्चे आहे ! " मी म्हणालो.

"बरोबर पंत. पण त्यामुळे ह्या कलांना कमीपण येत नाहीत , उलट प्रत्येक कलेत चंद्र किती वैविध्याने नटलेला आहे हे दिसत असल्याने प्रत्येक कला ही विशेष आहे , स्पेशल आहे. आणि जर सगळ्याच चंद्रकला विशेष आहेत तर ह्याच्याच अर्थ असा होतो की कोणतीच विशेष नाही !
आता ह्या भिन्न भिन्न चंद्रकला सत्य आहेत पण ते काही चंद्राचे मुळ स्वरुप निदर्शनास आणुन देत नाहीत म्हणुन असत्यही आहेत ! म्हणजे विशेष नाम हे सत्य ही आहे आणि असत्यही !

मी म्हणालो - "पण नाना , नुसतं चंद्रकला आहेत हे म्हणणे अर्थात सामान्य नाम ते तर निखळ सत्य आहे ना! "

नाना हसत म्हणाले - "अहो पंत, चंद्राला कला वगैरे काहीच नाही. नाहीच . तो तुमचा भास आहे , चंद्र आपल्या जागी परिपुर्णच आहे , मग हे असं चंद्रकला असे सामान्य नाम वापरुन चंद्रकला आहेत असं म्हणणे हे तर धाधांत असत्य झालं नाही का !

मी अवाक होऊन ऐकत होतो. "पण नाना , मग हे चंद्राचं मुळ स्वरुप लक्षात येणार तरी कसं ? "

"अवसेचिये दिवसीं । सतराविये अंशीं । स्वयें जैसें शशी । रिगणें होय ॥ ७-१५३ ॥"

"पंत चिंतन करा , मनन करा, आपोआप कळेल . मला सांगा - अमावस्या संपते आणि प्रतिपदा सुरु होते तेव्हा नक्की काय होतं ? "

हा प्रश्न माझ्यासाठी बाऊन्सर होता. मी ऐकत राहिलो , नाना बोलत राहिले :

"कारण चंद्राला कलाच नाहीत , ह्या कला वगैरे भास आहेत ते आपल्यासाठी . चंद्र तर आहे तसाच आहे. तो अव्यक्तातुन व्यक्त रुपात येतो अन परत हळु हळु अव्यक्तात जातो , आणि हा सारा व्यक्त अव्यक्त वगैरे आपला भास आहे , चंद्राचा नाही.
आणि जी अवस्था चंद्राची आहे तीच तुझीही आहे !
जसा चंद्र तसाच तुही.
तत्वमसि.
तुला विशेष नावं आहे - गिरिजा , पंत वगैरे वगैरे . सामान्य नामे तर खुप आहेत तीही अगदी विशेषणांसह . लहान मुलगा, संध्या करणारा , सूर्य पाहिलेला माणूस !
तुझ्या लक्षात येतंय का की ही सर्व विशेष नामे अन सामान्य नामेही चंद्रकला आणि त्यांच्या भिन्न भिन्न नावांसारखी आहेत - सत्यही अन् असत्यही .

एवं विशेष सामान्य | दोन्ही नातळें चैतन्य | ते भोगिजे अनन्य | तेणेची सदा ||

मग आता मला तू "शुध्द सत्य" काय आहे ते सांग ! कोण आहेस तू ? "

मी अवाक झालो.
मला काही बोलताच येईना.
कारण काय बोलणार ?
गिरिजा ?
गिरिजाप्रसाद ?
पंत ?
काय बोलु ? सगळीच विशेष नावं ! सत्यही अन असत्यही.
निखळ सत्य काय ?
सन्ध्येत शिकलेले ब्रह्मैवाहमस्मि आठवलं ...
पण असं म्हणावं तर त्यातले "ब्रह्म" हेही सामान्य नामच झालं, म्हणजे ते ही असत्य झालं ना . काय बोलू काय बोलू? कसं सांगू सत्य?
बरं सत्चिदानंद म्हणावं तर सत् काय चित् काय आणि आनंद काय ? हेही सामान्य नामे झाली, केवल निर्देशात्मक. सत्य नव्हे.

तैसा सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि द्रष्ट्या द्रष्टा । तिन्हीं पदें लागतीं वाटा । मौनाचिया ॥
जें जें बोलिजे तें तें नव्हे । होय तें तंव न बोलवे । साउलीवरी न मववे । मवितें जैसें ॥

गिरिजा काय की सत्चिदानंद काय, तू जे जे काही , जे काही निर्देशात्मक असे बोलशील ते ते एक तर सामान्य नाम असेल चंद्रकला सारखे किंवा विशेष नाव असेल प्रतिपदा द्वितीया पौर्णिमा सारखे . दोन्ही अपुर्ण . दोन्ही असत्य. कोणत्या तरी काही तरी विशेष नामांनी निर्देशित केला जाणारा मी मी आहे असं मानंणं हे म्हणजे अज्ञान झालं , अन मी म्हणजे सत्चिदानंद ब्रह्म आहे असे असं म्हणणं हे ज्ञान झालं तरी तेही काहीतरी सामान्य नामच आहे ना , म्हणजे मग तेही अज्ञानच नव्हे का !

बस्स्स "मी" आहे.

पण "हे " कसं सांगु ?

कसं सांगु "हे" ?

अरे कळतंय का कुणाला ?

कसं सांगू ?

कोणीतरी आहे इथे जाणणारे ?

कोणती तरी आहे का इथे जागे ?

कोणी आहे का जागे ?

कः जागरि ?

को जागरी ??

को जागरी ???

-----------------------

आज्जीने गरमागरम दुधाचा पेला नानांच्या अन माझ्या हातात दिला, हाताला त्या गरमागरम पेल्याच्या हलक्याश्या चटक्याने मला तंद्रीतुन बाहेर काढले . पण अजुनही मला काही केल्या शब्द फुटतच नव्हते . आज्जी फक्त हसत माझ्याकडे पहात होती . जणु काही तिला कळत होते मला काय बोलायचं आहे ते ! ती अचानक शांत आवाजात म्हणाली -

" किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ "

नानांच्याकडे पाहिलं तर त्यांच्याही चेहर्‍यावर तसेच हसु होते. नाना दुधाच्या पेल्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाकडे निर्देश करत मला म्हणालें
- "कळलं का पंत ? नित्य चांदु होये । परी पुनवे आनु आहे । हें कां मी म्हणों लाहें । सूर्यदृष्टी ॥"

मी काही बोललोच नाही. बस मौन राहिलो.

"म्हणोनि ज्ञानदेवो म्हणे । अनुभवामृतें येणें । सणु भोगिजे सणें । विश्वाचेनि ॥"

॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥
____________________________________________________________

संस्कृतीअनुभव