केशर : गाथा आणि दंतकथा - २ (इराण)

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
16 Oct 2024 - 12:45 am

1

"The Gift of Zarathustra" ह्या मूळच्या पर्शिअन दंतकथेचे मराठीत केलेले शब्दांकन:

कोणे एके काळी, प्राचीन पर्शियात खोरासान प्रांतातल्या दुर्गम पर्वतरांगामधील एका लहानशा खेडेगावात 'अरश' नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. एका वर्षी निसर्गाने पुकारलेला असहकार आणि कठोर हृदयी सूर्याने आपल्या किरणांची वाढवलेली प्रखरता ह्यांच्या एकत्रित परिणामातुन बिघडलेल्या हवामानामुळे अरश सहित त्याच्या सर्व शेजारी-पाजारी शेतकऱ्यांची पिके करपून त्यांच्या जमिनी उजाड झाल्या होत्या.

आकस्मिकरित्या उद्भवलेल्या अन्नधान्य, भाजीपाला आणि फळांच्या तुटवड्यामुळे आपल्या कुटुंबाची आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांची होणारी उपासमार पाहून अरशला फार दुःख होत असे. ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मेहनती अरशच्या मनात गावाला वेढणाऱ्या सभोवतालच्या पर्वतांवर सापडणाऱ्या औषधी वनस्पती शोधून त्या आसपासच्या गावांतल्या आठवडी बाजारात विकून त्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या गावाची भूक भागवण्याची कल्पना चमकली.

त्या कल्पनेची अंमलबजावणी करत रोज पहाटे लवकर उठून अरश डोंगरावरच्या औषधी वनस्पती धुंडाळू लागला परंतु दिवसभर अथक प्रयत्न करूनही त्याच्या हाती फारसे काही लागत नसल्याने त्याचे कुटुंब आणि शेजारी उपासमारीला सामोरे जातच राहिले आणि त्यातून आलेल्या नैराश्याने अरशला भविष्य अंधःकारमय वाटू लागले होते.

एके रात्री झोपलेल्या अरशला स्वप्नात तेजस्वी झरतुष्ट्राचे दर्शन झालं. आपल्या मृदू-मुलायम आवाजात झरत्रुष्ट्राने त्याला "अरश तुझ्या समस्येवरचा उपाय तुझ्याच आसपाच्या पर्वतरांगेतल्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये दडलेला आहे! तिथे उगवणारी सोनेरी फुलांनी बहरलेली वनस्पती शोधून काढ आणि तिचे कंद गोळा करून ते तुझ्या उजाडलेल्या शेतात लाव, काही दिवसांत तुझ्या शेतात बहरलेल्या त्या वनस्पतीच्या फुलांपासून तुला 'देवतांच्या आवडीचा मसाला' असलेले केशर प्राप्त होईल" असे सांगितले.

सकाळी उठल्यावर स्वप्नात घडलेल्या दृष्टांताची आठवण अरशच्या मनात ताजी होती. त्याने झरतुष्ट्राच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याचे ठरवले आणि नव्या जोमाने ती वनस्पती शोधून काढण्याच्या मोहिमेवर निघाला. अनेक दिवस दऱ्या-खोऱ्यांतून चाललेल्या अरशच्या शोधकार्याला अखेर यश आले. एका निसर्गरम्य खोऱ्यात सोनेरी फुलांनी बहरलेली ती दैवी वनस्पती सापडल्यावर त्याने आवश्यकतेपुरते तिचे कंद गोळा केले.

काही दिवसांच्या आपल्या यशस्वी शोध मोहिमेवरुन स्वगृही परतल्यावर अशरने त्याच्या उजाड शेताची मशागत करून त्यात त्या दैवी वनस्पतीचे कंद लावले. यथावकाश त्याच्या मेहनतीला फळ येऊन त्याच्या शेतात बहरलेल्या फुलांचे लालसर तंतू सूर्यप्रकाशात चमकू लागले आणि आसमंत सुगंधित झाला. आपल्या शेतात पिकलेला केशर पंचक्रोशीत विकून अशरला चांगला धनलाभ होऊ लागला आणि अल्पावधीतच त्याच्या केशराची कीर्ती पर्शियात सर्वदूर पोहोचल्यावर दूरदूरच्या प्रांतांतले व्यापारी हा 'दैवी मसाला' खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागले.

केशरामुळे केवळ अरशच्या कुटुंबातच नाही, तर संपूर्ण गावात समृद्धी आली. अरश आणि झरतुष्ट्राच्या दृष्टांताची कथा सर्वदूर पसरल्यावर संपूर्ण पर्शियामध्ये देवतांचा आशीर्वाद मानला जाऊ लागलेला हा 'दैवी मसाला' संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक बनला. राजेशाही मेजवान्यांमध्ये, पारंपरिक औषध निर्मितीमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर होऊ लागला.

तेव्हापासून केशर पर्शियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीक मानले जाते. त्याचे लालसर चमकदार तंतू लोकांना सर्वात निराशाजनक परीस्थितीतही आशेचा किरण दाखवणाऱ्या झरतुष्ट्राच्या आशीर्वादाचं स्मरण करून देतात.
***

प्राचीन काळातला 'पर्शिया' ते आधुनिक काळातल्या इस्लामिक 'इराण' पर्यंतच्या स्थित्यंतरात त्या देशातले केशराचे महत्त्व हजारो वर्षांपासून अबाधित राहिले आहे. खाद्यपदार्थ, औषधी उपयोग, वस्त्र निर्मिती आणि विणकाम अशा विविध क्षेत्रांत केशराचा वापर तिथे फार पूर्वीपासून होत आला आहे. सुरुवातीपासूनच जगातील सर्वात मोठा केशर उत्पादक देश अशी निर्माण झालेली आपली ओळख अद्याप टिकवून ठेवण्यात, आणि 'लाल सोने' असे बिरुद मिरवणाऱ्या केशराची ऐतिहासिक प्रतिष्ठा आणि आर्थिक महत्त्व कायम राखण्यात यशस्वी ठरलेल्या आजच्या इराण मध्येही 'केशर' हा संस्कृती, अर्थव्यवस्था, आणि दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.

इराणचे केशर उत्पादन आणि व्यापार:

केशराच्या जागतिक पुरवठ्यात ९०% पेक्षा जास्त योगदान असलेला इराण हा जगातील सर्वात मोठा केशर उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. इराण दरवर्षी सुमारे ४०० ते ५०० (हवामानावर अवलंबून असल्याने हा आकडा स्थिर नसतो) टन केशराचे उत्पादन करतो. जवळपास सव्वा लाख हेक्टर इतक्या प्रचंड मोठ्या क्षेत्रफळावर होणाऱ्या केशराच्या शेतीतून सहा लाख इराणी लोकांना रोजगार मिळतो.

इराणच्या २४ प्रांतांमध्ये केशराचे उत्पादन होत असले तरी ईशान्येकडील खोरासान प्रांतातील हवामान केशर लागवडीसाठी अतिशय अनुकूल असल्याने सर्वात जास्त आणि दर्जेदार केशराचे उत्पादन त्या प्रदेशात होते. इराणमध्ये उत्पादित होणाऱ्या केशराला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याच्या दर्जानुसार २००० ते ५००० डॉलर्स प्रति किलोचा भाव मिळत असल्याने कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच देशाच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाही चालना देणारे केशर इराणच्या सर्वात मौल्यवान कृषी उत्पादनांपैकी एक ठरत आले आहे

इराण युरोप, मध्यपूर्व आणि आशियासह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये केशर निर्यात करतो. इराणी केशराच्या प्रमुख आयातदारांमध्ये स्पेन, इटली, फ्रान्स, आणि UAE ह्या देशांचा समावेश आहे.

इराणी खाद्यसंस्कृतीत होणारा केशराचा वापर:

प्राचीन पर्शियामध्ये सुमारे २७०० ते ३००० वर्षांपूर्वीपासून पर्शियन खाद्यसंस्कृतीत केशराचा वापर होत आला आहे. 'आकेमेनिड' साम्राज्याच्या (इ.स.पूर्व ५५०–३३०) काळात केशराच्या अन्नातल्या वापराची पहिली नोंद आढळते. खाद्यपदार्थाला अलौकिक स्वाद, अद्भुत सुगंध आणि सोनेरी रंगछटा प्राप्त करून देण्याच्या आपल्या अंगभूत क्षमतेमुळे केशराने शाही मेजवान्या, धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभांसाठी तयार करण्यात येणाऱ्या भोजनात एक महत्वाचा घटक पदार्थ म्हणून स्थान मिळवले होते.

स्वाद, सुगंध आणि आकर्षक रंगासाठी केशराचा वापर करून तयार केले जाणारे काही निवडक पर्शिअन / इराणी खाद्यपदार्थ आणि पेय.

  • शिरिन पोलो (Shirin Polow) : भाताचा एक गोड पदार्थ, जो संत्र्याचे तुकडे, सुका मेवा वापरून बनवला जातो.
  • झरेश्क पोलो (Zereshk polow) : भाताचा प्रसिद्ध इराणी प्रकार, ज्यात बार्बेरीज, चिकन आणि केशरासोबत अन्य सुगंधी औषधी वनस्पतींचाही समावेश असतो.
  • कोरेष्ट-ए फेसेन्जन (Khoresht-e Fesenjan) : डाळिंब आणि अक्रोड घालून बनवलेली एक चविष्ट आणि पौष्टिक भाजी.
  • नान : विशेष प्रसंगासाठी तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक नानमध्ये त्याचे रुचीमुल्य वाढवण्यासाठी आणि त्याला छानसा सोनेरी रंग येण्यासाठी केशर वापरले जाते.
  • अश रेशते (Ash Reshteh) : विविध डाळी आणि भाज्यांपासून तयार करण्यात येणारे एक नूडल सूप.
  • चेलो कबाब (Chelo Kabab) : केशरी भातासोबत सोबत सर्व्ह केले जाणारे कबाब.
  • मांसाहारी पदार्थ बनवताना मांसाच्या तुकड्यांना मॅरीनेट करण्यासाठी आणि काही सॉसमध्ये
  • शिरिन शिरिन - डेझर्ट म्हणून बनवले जाणारे भाताचे पारंपरिक पुडिंग, शोले झर्द (तांदुळाची खीर), 'बस्तानी सोनाती' (पारंपारिक आइस्क्रीम)
  • फळांच्या, विशेषतः अंजीर किंवा क्विन्स (quince) पासून बनवलेल्या मुरंब्यांमध्ये.
  • चहा (सहसा ग्रीन टी) आणि विविध प्रकारची सरबते.

केशराचे इराणी औषधी उपयोग:

प्राचीन पर्शियामध्ये केशर केवळ स्वयंपाकासाठी नव्हे, तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. केशराने पचनाचे विकार, श्वसनाचे आजार आणि मानसिक समस्यांचे निराकरण करण्यास मदत होते, अशी मान्यता होती. मध्ययुगातील प्राचीन पर्शियन वैद्यकीय ग्रंथात अविसेन्ना (इब्न सिना) यांनी केशरात नैराश्य आणि चिंता दूर करण्याचे सामर्थ्य असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच ताण कमी करण्यास आणि मनःस्थिती सुधारण्यासाठी अरोमाथेरपीमध्येही केशराचा वापर केला जाई.

आधुनिक इराणमध्येही केशराचे औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर मान्य आहेत. सध्याच्या संशोधनात केशराच्या नैराश्य, चिंता आणि हृदयविकारांवर उपचार करण्याच्या संभाव्यतेचा अभ्यास केला जात आहे. इराणमध्ये केशराचे सप्लिमेंट्सही उपलब्ध आहेत, जे मनःस्थिती सुधारण्यासाठी आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठीचा प्रभावी नैसर्गिक उपचार असल्याचा दावा केला जातो.

इराण मधले केशराचे अन्य उपयोग:
कापड रंगवणे आणि विणणे : केशराच्या स्वयंपाक आणि औषधी वापराबरोबरच ऐतिहासिक वस्त्रउद्योगातही त्याचा वापर केला जात असे. केशरापासून मिळालेला रंग अत्यंत चमकदार असायचा आणि तो राजवस्त्रे रंगवण्यासाठी वापरला जात असे. केशराने रंगवलेली वस्त्रे सत्ताधीशांची प्रतिष्ठा दर्शवत असत. राजवस्त्रांप्रमाणेच हा रंग पर्शियन कार्पेट्स रंगवण्यासाठीही वापरला जाई आणि काही विशिष्ट कार्पेट्स विणताना त्यात केशराच्या धाग्यांचा वापर करून त्याला राजेशाही दर्जा प्राप्त करून दिला जात असे.

सौंदर्यप्रसाधने आणि इतर उपयोग : केशराची त्वचेला उजाळा देण्याची क्षमता आणि वार्धक्यरोधी गुणधर्म, त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्सची भरपूर उपलब्धता अशा वैशिष्ट्यांमुळे त्याचा वापर सौंदर्यप्रसाधन निर्मिती उद्योगात देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. काही पारंपारिक विधी आणि विविध समारंभांमध्ये देखील केशराचा वापर केला जात असल्यामुळे त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी असलेले ऐतिहासिक नाते काळजीपूर्वक जपले जात आहे.
***

आधिचा भागः

टीप:

  • लेखातली सर्व चित्रे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित चित्रनिर्मिती सुविधा देणाऱ्या (Bing) Image Creator ह्या वेबसाईटचा वापर करून तयार केली आहेत.
  • 'केशर - गाथा आणि दंतकथा' मालिकेचा हा भाग ८ सप्टेंबर २०२४ रोजी संदर्भसूची (ब्लॉग) आणि मायबोलीवर पुर्वप्रकाशित.
मांडणीआस्वादलेख

प्रतिक्रिया

कंजूस's picture

16 Oct 2024 - 5:41 am | कंजूस

आवडला हा भाग.

चित्रं सुरेख.
विकीपिडिया बंद होणार असं ऐकलं. इकडे या.