मिपा दिवाळी अंक २०२४ - आवाहन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
5 Oct 2024 - 8:21 pm

सर्व मिपाकरांना सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,

श्री गणेश लेखमाला सफल संपूर्ण झाली की मिपाकरांना वेध लागतात ते आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असलेल्या "मिपा दिवाळी अंकाचे".
सदर धाग्याच्या माध्यमातून, मराठी आंतरजालावर सुमारे दीड दशकांहून अधिक काळ विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या आपल्या समृद्ध आणि अभिमानास्पद परंपरेचे पालन करत यंदाच्या, म्हणजे मिपा दिवाळी अंक २०२४ ची घोषणा आणि सर्व मान्यवर लेखक मंडळींना लेखनासाठी विनम्र आवाहन करताना "टीम दिवाळी अंक"च्या सदस्यांचा ऊर आनंदाने आणि उत्साहाने भरून आला आहे.

मिपा दिवाळी अंकाची घोषणा आणि लेखकांना जाहीर आवाहन करणारा धागा प्रकाशित झाला की त्यातला सर्वात जास्त कुतूहलाचा भाग असतो तो म्हणजे दिवाळी अंकाची "थीम".

२०२४ हे वर्ष मराठी भाषिकांसाठी विशेष महत्वाचे ठरवणाऱ्या दोन गोष्टी यंदाच्या दिवाळीपूर्वी घडल्या आहेत तर एक गोष्ट दिवाळीनंतर घडू घातली आहे. ह्यातल्या घडलेल्या पैकी पहिली गोष्ट म्हणजे यंदाच्या गणेश चतुर्थीला मिपाने आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण करून 'प्रौढ' वयात पदार्पण केले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकताच आपल्या प्राणप्रिय मायमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, आणि दिवाळीनंतर घडू घातलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याची "विधानसभा निवडणूक".

वरीलपैकी पहिल्या दोन्ही गोष्टी 'मराठी अभिरुची आणि मराठी अस्मितेच्या' दृष्टीने मिपाकर आणि एकंदरीतच मराठी भाषाप्रेमींसाठी खचितच विशेष अभिमानास्पद आहेत तर "निवडणुका आणि राजकारण" हा तर बहुसंख्य मिपाकरांच्या अत्यंत आवडीचा चर्चा विषय आहे!

तर मंडळी ह्या तीनही महत्वपूर्ण गोष्टी/घटनांची विशेष दखल घेऊन यंदाच्या मिपा दिवाळी अंकासाठी जी "मिश्र थीम" ठरवण्यात आली आहे तिच्या विभागवार लेखन विषयांचे स्वरूप खाली दिल्याप्रमाणे,

  • "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४"
  • गेल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात "न भूतो, न भविष्यती" अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत, ज्यात काही नवीन नैसर्गिक/अनैसर्गिक युत्या आणि आघाड्यांचा जन्म आणि अंत, प्रमुख प्रादेशिक पक्षांचे दुभंग आणि त्यातून निर्माण झालेले कायदेशीर पेच-प्रसंग, पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाविषयीच्या याचिका आणि खटले, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

    वरील घटनांचे सर्वसामान्य मतदार आणि संबंधित पक्षांचे कार्यकर्ते ह्यांच्या मन:स्थितीवर आणि राजकीय दृष्टिकोनावर झालेले सकारात्मक/नकारात्मक परिणाम, तब्बल २८८ विधानसभा मतदारसंघांत होणाऱ्या ह्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या दोन राष्ट्रीय आणि चार मुख्य प्रादेशिक पातळीवरील पक्षांची प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती आणि जनमानसातील त्यांची प्रतिमा, पक्षांतर्गत हेवे-दावे आणि कुरघोड्या, संभाव्य बंडखोरीची शक्यता, मध्यंतरी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल असे अनेक पैलू असल्याने ह्या लेखन विषयाचा आवाका बराच मोठा आहे.

    मिपावर राजकीय घडामोडींवर अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक लेखन करणाऱ्या सिद्धहस्त लेखकांची मांदियाळी सर्वज्ञात आहे. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती, जुने-नवे राजकीय संदर्भ, सामाजिक समीकरणे, जातीय-धार्मिक ध्रुवीकरण, ह्या आधीच्या निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी/आकडेवारी ह्यापैकी एका किंवा अनेक अंगांना स्पर्श करत अभ्यासू लेखकांनी विश्लेषणात्मक लेख, निवडणूक निकालाविषयीचे आपले तर्काधारित अंदाज / भाकिते वर्तवून ह्या लेखन विषयाची शोभा वाढवणे अपेक्षित आहे.

    अर्थात केवळ विश्लेषणात्मक लेख, अंदाज आणि भाकितांपुरती ह्या विषयाची व्याप्ती मर्यादित नसून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सत्य/काल्पनिक कथा, कविता, व्यंगचित्रे, विनोदी किस्से आणि अनुभवाधारित, जसे की एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ह्या नात्याने आपल्याला आलेले बरे-वाईट अनुभव तसेच कॉलेज/विद्यापीठ, ग्राम पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद, विधानसभा/विधानपरिषद/पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघातून आमदारकीची किंवा थेट खासदारकीची अशी कुठलीही निवडणूक पक्षाचा अधिकृत उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढवली असल्यास त्यात मिळालेल्या जय किंवा पराजयाचा किंवा उमेदवारीचा एकंदरीत अनुभव, निवडणूक प्रक्रियेत 'इलेक्शन ड्यूटी' बजावताना आलेले बरे/वाईट/गमतीशीर अनुभव व्यक्त करणाऱ्या लेखनाचेही स्वागतच आहे, फक्त विषय महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित असावा एवढीच माफक अपेक्षा.

  • "मराठी: अभिजात भाषा दर्जा प्राप्तीचे संभाव्य फायदे / सकारात्मक परिणाम"
  • मंडळी, अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जवळपास अडीच हजार वर्षे प्राचीन आणि समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या मायमराठी भाषेला नुकताच 'अभिजात' भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो म्हणजे नक्की काय होते? तो मिळण्यासाठीचे निकष काय असतात? त्याचे भाषेच्या समृध्दीवर काय सकारात्मक परिणाम होऊ शकतात? भाषावृध्दीसाठी त्याचा काही उपयोग होऊ शकतो का? मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले? अनेक वर्षांपासुन सरकार दरबारी ही मागणी कोणी लावून धरली होती? अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारे माहितीपूर्ण लेखन "मराठी: अभिजात भाषा दर्जा प्राप्तीचे संभाव्य फायदे / सकारात्मक परिणाम"ह्या लेखन विषय विभागात अपेक्षित आहे.

  • "मिपा १८+" (चावट/शृंगारिक कथा, कविता आणि लेख)
  • नुकतीच मिपाने आपल्या वयाची १८ वर्षे पुर्ण केली आहेत. वयाने 'प्रौढ' झालेल्या मिपाला त्याबद्दल साजेशी मानवंदना देणे क्रमप्राप्त आहे!
    तर लेखक मंडळी, "मिपा १८+" ह्या लेखन विषय विभागासाठी आपण चावट / शृंगारिक कथा, कविता, लेख आणि आपल्या विद्यार्थीदशेत ऐकलेल्या चावट विनोदांचा संग्रह पाठवू शकता. अर्थात ह्या लेखन विषय विभागासाठी पाठवलेले लेखन बीभत्स किंवा अश्लीलतेकडे झुकणारे नसावे ही एकमेव अट आहे ह्याची नोंद घ्यावी.

दिवाळी अंकाकरिता मिश्र थीम असली तरी थीम बाह्य लेखनाचेही (कथा, कविता, ललितलेखन, विज्ञान-तंत्रज्ञानाधारित लेख, प्रवासवर्णन, पाककृती, भाषांतर आणि व्यंगचित्रे इत्यादी.) प्रतिवर्षी प्रमाणे सहर्ष स्वागतच आहे!

तर सर्व मान्यवर लेखक मंडळींनो, मिपा दिवाळी अंक २०२४ची घोषणा करण्यास झालेल्या काहीश्या विलंबासाठी दिलगिरी व्यक्त करून आपल्यापाशी उपलब्ध असलेल्या कमी वेळात आपल्या सक्षम लेखण्या सरसावून प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाचा दिवाळी अंकही वैविध्यपूर्ण आणि बहारदार करण्यासाठी आपापले योगदान देण्याची आग्रहपूर्वक विनंती ह्या जाहीर आवाहनाच्या माध्यमातून करीत आहोत.

थोडक्यात पण महत्वाचे:

  • लेखन देण्याची अखेरची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे.
  • दिवाळी अंकासाठी कृपया कुठलेही पूर्वप्रकाशित लेखन पाठवू नये.
  • आपले लेखन आपण साहित्य संपादक आयडीवर व्य,नि. द्वारे पाठवू शकता (त्यासाठी येथे क्लिक करा)
  • किंवा sahityasampadak.mipa@gmail.com ह्या आयडीवर ईमेलद्वारेसुद्धा लेखन पाठवू शकता.
  • आपण जर ईमेलद्वारे लेखन पाठवले असेल तर प्रेषक म्हणून आपला "मिपा आयडी" लिहायला कृपया विसरू नका.

लेखक मंडळी, सकस लेखनसाठी आपणा सर्वांना भरघोस शुभेच्छा!

आपल्या दर्जेदार लेखनाच्या प्रतीक्षेत आहोत,
- टीम मिपा दिवाळी अंक

मांडणीमाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Oct 2024 - 6:36 am | प्रचेतस

लैच भारी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2024 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा. अठरा प्लसच्या गोष्टी, कथा, अनुभव वाचायला आवडतील.

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

6 Oct 2024 - 5:03 pm | जव्हेरगंज

"मिपा १८+" (चावट/शृंगारिक कथा, कविता आणि लेख)

क्या बात है !!! खतरनाक . आजपर्यंतचा सगळ्यात डेयरींगबाज विषय ;)