परतीचा पाऊस...

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जे न देखे रवी...
3 Oct 2024 - 5:26 pm

थोडासा चिडलेला.... अंमळ रुसलेला..

परतीचा पाऊस...

विजांच्या मागून जोरदार गरजला
बरसून दमल्यावर रस्त्यात भेटला
सवयीप्रमाणे थोडावेळ दाटला
मग जाताना कानात पुटपुटला...

कागदाच्या होड्या सोडताना
आताशा भेटत नाहीस ?
पन्हाळीखाली चिंब भिजताना
मुळी दिसतचं नाहीस ?

अनवाणी पायांनी वाहत्या
पागोळ्यांमागे धावत ही नाहीस
की ओंजळीत विरघळणाऱ्या
बर्फ़ाळ गारा वेचित नाहीस

इतका मोठा झालास की पावलांना
गुंजभर चिखल ही लागु देत नाहीस
इतका थोर झालास की कपड्यांवर
थेंबभर ओलसुद्धा सहन करीत नाहीस..

गड्या !! पाऊस असलो ना तरी
काळजातला ओलावा कमीचं पडतो
माझ्या अंतरीचा एक गळका मेघ
नेहमीचं तुझ्या वाटेवर दाटतो..

इतका ही कोरडा होऊ नकोस रे
की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल
इतका ही अलिप्त होऊ नकोस
की जगण्याचे कारणचं खुंटेल..

थोडी का होईना, राहू दे पावलांवर
चिखलमातीची ओलेती नक्षी
इतक्यातचं काढून फेकू नकोस
चिंब भिजलेली अलवार नाती..

स्वप्नांना उमलण्या आभाळी
असू दे एक इंद्रधनुष्यी कोंदण
परतीच्या पावसाला बरसण्याचे
राहू दे एक अजून कारण..

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

Bhakti's picture

3 Oct 2024 - 9:03 pm | Bhakti

खुप सुंदर

इतका ही कोरडा होऊ नकोस रे
की भिजण्याचे प्रयोजनचं संपेल
इतका ही अलिप्त होऊ नकोस
की जगण्याचे कारणचं खुंटेल..

अगदी अगदी!

कर्नलतपस्वी's picture

4 Oct 2024 - 5:50 am | कर्नलतपस्वी

आवडली.

वैभव जोशी यांची कवीता आणी राहून देशपांडे यांचा आवाज याची आठवण झाली.

श्वेता२४'s picture

4 Oct 2024 - 9:37 pm | श्वेता२४

कवितेची रचना व त्यातले भाव मनाला अगदी चिंब करुन गेले...

पाषाणभेद's picture

5 Oct 2024 - 6:02 am | पाषाणभेद

सुंदर रचना

सर्वच प्रतिक्रिया आनंद देणाऱ्या, धन्यवाद...