कोहम्: मानवी लैंगिकतेचा गोंधळ

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
16 Aug 2024 - 2:35 pm

LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात? त्यांचं शरीर, भावना आणि लैंगिकता ह्यामागे काही वेगळं विज्ञान आहे का? असेल तर काय आणि नसेल तरी नेमकं काय? ह्या संकल्पना माणूस नावाच्या प्राण्यातच आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न काही घटनांमुळे वारंवार चर्चेला येत असतात. LGBTQ ही आद्याक्षरे नेमकी काय दर्शवतात? मुळात ह्या संकल्पनेविषयी विषयी सुद्धा मतमतांतरे आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ आपापल्या क्षेत्रानुसार त्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यात प्रामुख्याने आहेत शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, मनोवैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ आणि कायदेतज्ञ! ह्यावरून तुमच्या लक्षात आलं असेलच की ह्या प्रश्नाचा आवाका किती मोठा आणि क्लिष्ट आहे.

सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की लैंगिकता म्हणजे काय? मानव हा एक प्राणी असून त्यामध्ये लैंगिक पद्धतीचं प्रजनन होतं. स्त्री आणि पुरुष लैंगिक संबंधातून पुढची पिढी जन्माला घालतात. आपल्या पेशीत एकूण ४६ गुणसूत्रे असतात किंवा त्यांच्या २३ जोड्या. ह्यापैकी एक जोडी ठरवते की आपण स्त्री असणार आहोत की पुरुष! स्त्रियांमध्ये ही जोडी असते XX अशी तर पुरुषांमध्ये ती असते XY अशी. ही प्राथमिक माहिती आपल्या सर्वांना असते. जगातल्या बहुतांश स्त्री पुरुषांच्या बाबतीत हे जीवशास्त्र अगदी ह्याच शिस्तीमध्ये काम करत असतं आणि त्यामुळेच ते सामान्य असं आयुष्य जगू शकतात. म्हणजे काय?

तर स्त्री म्हणून जन्माला आलेला जीव जैविकदृष्ट्या स्त्री म्हणूनच जगतो. स्त्रीचे जननेंद्रिय, पुरुषांप्रती आकर्षण, स्त्री सुलभ लैंगिक भावना, इत्यादी. हीच गोष्ट पुरुषांच्या बाबतीत पण होते म्हणजे पुरुषांचे जननेंद्रिय, स्त्रियांप्रती आकर्षण, वगैरे! जन्माच्या वेळी स्त्री असणारी आयुष्यभर स्वतःला स्त्री म्हणूनच बघते आणि पुरुष स्वतःला पुरुषच समजतो. गंमत म्हणजे ह्यात काळ पांढरं असं काही नसतं कारण निसर्गानेच तसं ते केलेलं नाही. म्हणजे मातृत्व जरी स्त्रीकडे असलं तरी पुरुषांमध्ये सुद्धा वात्सल्य असतं. पुरुषांप्रमाणेच स्त्रिया सुद्धा कणखर असतात. कारण स्त्रियांचे हार्मोन्स अल्प प्रमाणात पुरुषांमध्ये आणि पुरुषांचे म्हणून ओळखले जाणारे हार्मोन्स स्त्रियांमध्ये असतात. एखाद्या देखण्या अभिनेत्याच्या प्रेमात पुरुष सुद्धा असतात आणि सुंदर अभिनेत्री ही कित्येक स्त्रियांची आदर्श असते आणि त्यांना त्यांचं आकर्षण सुद्धा असतं. असं असलं तरी बहुतांश लोकांमध्ये लैंगिक ओळख ही मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या बदलत नाही. ही झाली लैंगिकतेची एक सामान्य परिभाषा! एका जनुकीय शिस्तीने चढउतार होत बहुतेकांची लैंगिकता आयुष्यभर चालू राहते.

आता येऊ ह्या समुदायाकडे! इथे मात्र काहीच सामान्य नाही आणि विविध पातळीवर बरेच गोंधळ आहेत. सर्वात आधी बघू समलैंगिकता. ह्यात जनुकीय दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या व्यक्ती ही पूर्ण स्त्री किंवा पुरुष असते पण हे त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. म्हणजे स्त्री स्त्रीकडे आणि पुरुष पुरुषांकडे. हे असं का होतं?

समलैंगिकता मानवाला अनेक वर्षांपासून माहिती आहे. जगभरात त्याविषयी उलट सुलट मतप्रवाह आहेत पण बहुतांशी कल ह्याला अनैसर्गिक मानण्याकडेच आहे. अगदी 50 वर्षांपूर्वी पर्यंत ह्याला मानसिक विकृती असेच समजण्यात येत होते. पण ह्यामागे काही विज्ञान आहे का ह्याचा शोध घेण्यासाठी एक मोठी study करण्यात आली. किती मोठी तर ह्यात चार लाख ऐंशी हजार स्वयंसेवकांचा अभ्यास करण्यात आला, आणि मुख्य भाग होता त्यांचा लैंगिक कल काय आहे त्याचा? ह्यात असं आढळलं की साधारण 5% इतक्या लोकांचे आयुष्यात कधी ना कधी समलैंगिक संबंध झाले होते. विशेष म्हणजे ह्यात जनुकीय भाग हा अत्यल्प होता. म्हणजे समलैंगिकता ही केवळ जनुकीय नाही असा मुख्य निष्कर्ष ह्या प्रकल्पातून काढण्यात आला. पण असं असलं तरी जनुकांचा सहभाग ह्यात असतो हे मात्र निश्चित होतं. ह्याचाच जोडीला इतर घटक जसे की सामाजिक, मानसिक आणि आयुष्यात येणारे अनुभव हे अत्यंत महत्वाचे असतात. ह्या अभ्यासातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली पण अजूनही पूर्णपणे हा प्रकार आपण समजू शकलो नाहीत.

प्रत्यक्ष जीवनात समलैंगिक लोकांचं आयुष्य हे प्रचंड उलथापालथ असणारं असतं. सगळ्यात आधी तर त्यांना स्वतःलाच आहे तसं स्वीकारणं कठीण जातं, काहीजण सावरतात पण बरेच जण सावरू शकत नाहीत. त्यामुळे ही एक सामाजिक समस्या सुद्धा आहे. हे झालं L आणि G च्या बाबतीत!

ह्यानंतर येतात B म्हणजे bisexual. ह्या लोकांना लैंगिक दृष्ट्या स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचंही आकर्षण असतं. हा प्रकार सुद्धा अजूनही पूर्णपणे समजलेला नाही म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या!

नंतर येतात Transgender. हा सगळ्यात क्लिष्ट प्रकार आहे. ह्यात मानसिक दृष्ट्या गोंधळ दिसून येतो म्हणजे शरीर हे स्त्रीचं असेल तर व्यक्तीला ती पुरुष आहे असं वाटत असतं आणि पुरुष असेल तर आपण मुळात स्त्री आहोत असं वाटत असतं. ह्यातून बऱ्याच समस्या निर्माण होतात. ह्या प्रकाराचा अभ्यास थोडा वेगळ्या प्रकारे करण्यात आला आणि काही आश्चर्यकारक निरीक्षणं समोर आली. स्त्री आणि पुरुष ह्यांच्या मेंदूत काही फरक आहेत. काही भागात हे फरक ठळक म्हणता येतील असे असतात. म्हणजे ते बघून ही व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे सांगता येतं इतके ठळक. Transgender लोकांमध्ये जेव्हा हे भाग अभ्यासण्यात आले तेव्हा काही जणांच्या बाबतीत असं आढळलं की ते स्वतःला जे समजतात त्यासारखाच मेंदुंचा भाग आहे. थोडक्यात शरीर पुरुषाचं आहे पण मेंदूचा जो भाग पुरुषांप्रमाणेच असायला हवा तो मात्र स्त्री प्रमाणे आहे आणि ह्याउलट! काही जणांच्या बाबतीत हे भाग कुठलाही विशिष्ट भाग दर्शवत नव्हते तर ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी होते.

हे असं का असा स्वाभाविक प्रश्न होता. अभ्यासाअंती असं आढळलं की ह्याच मूळ आपण जेव्हा गर्भात असतो तिथपर्यंत जातो आणि ह्यात हार्मोन्स म्हणजेच संप्रेरके अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. शारीरिकदृष्ट्या जडणघडणीच्या दृष्टीने गर्भावस्थेत पहिले ३ महिने महत्वाचे असतात ज्यात सगळे लैंगिक अवयव निश्चित होतात पण त्यांना पूरक असणारे मेंदूचे भाग हे त्यानंतर घडतात आणि ह्यात जर संप्रेरक हे शारिरीक जडणघडणीच्या उलट निर्माण झाले तर व्यक्ती Transgender होते असा एक निष्कर्ष ह्यातून काढता येतो. ह्या अवस्थेमुळे ती व्यक्ती प्रचंड ताण सहन करते. काही जण आपली लैंगिक ओळख आपल्या शरीराला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे शब्दशः  स्वतःचं शरीर बदलवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना विरुद्ध लिंगात असणारी संप्रेरके बाहेरून घ्यावी लागतात. काही शस्त्रक्रिया सुद्धा कराव्या लागतात पण पूर्ण यश येणे हे शक्य नसतं. त्यामुळे त्यांची अवस्था अजूनच बिकट होते.

आता येऊ Q कडे. इथे तर सर्वोच्च गोंधळाची अवस्था असते. इंग्रजीत ह्यांना म्हणतात queer किंवा questioning. ह्यात व्यक्तीला आपली लैंगिक ओळख निश्चित करता येत नाही. आपले निसर्गदत्त शरीर कुठलंही असलं तरी आपण स्त्री आहोत की पुरुष हे त्यांना निश्चित करता येत नाही. त्यामुळे ह्यांना येणारा मानसिक ताण सर्वोच्च असतो.

गेल्या काही वर्षात ह्यात अजून काही प्रकारांची भर पडली आहे. म्हणजे काही नवे प्रकार समोर आले आहेत. जसं की प्रवाही लैंगिकता (Gender Fluidity). ह्यात त्या व्यक्तीची लैंगिक ओळख बदलत राहते. काही दिवस ती व्यक्ती स्वतः ला स्त्री तर काही दिवस पुरुष समजते. ह्या प्रकारांवर अभ्यास सुरू आहे. याबरोबर काही व्यक्ती ह्या asexual ह्या प्रकारात येतात. त्यांच्यामध्ये लैंगिक आकर्षण हा प्रकारच अस्तित्वात नसतो.

हे काही महत्वाचे प्रकार आपण पाहिले पण जवळपास ३० विविध प्रकारच्या लैंगिकता आतापर्यंत आढळल्या आहेत. मानवी लैंगिकतेचा हा प्रवास थक्क करणारा आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. ह्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत आणि हे प्रश्न हाताळताना कित्येक देशात कायद्याचा किस पडतो आहे. सध्या सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुद्धा ह्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वैज्ञानिक पातळीवर ह्याचा अगदी सखोल असा अभ्यास सुरू असला तरी बरेचसे प्रश्न हे अनुत्तरित आहेत. विज्ञान त्यांची उत्तरे भविष्यात नक्की घेऊन येईल ह्यात शंका नाही.

मुक्तकमाहिती

प्रतिक्रिया

मार्गी's picture

16 Aug 2024 - 5:27 pm | मार्गी

अभ्यासपूर्ण लेख!! तुमचे आणखी लेख येऊ द्या.

- तुमचा गाववाला.

धन्यवाद. माझे इतर लेख माझ्या ब्लोग वर वाचता येतील. koolamol.wordpress.com इथे.

कर्नलतपस्वी's picture

16 Aug 2024 - 5:37 pm | कर्नलतपस्वी

अतीशय तोल सांभाळत विषय हाताळला आहे.

आणखीन स्पष्टीकरण असेल तर पुढील लेखात येवू द्यात.

नक्की विचार करेन मी ह्या विषयावर आणखी काय लिहिता येईल ह्याचा, धन्यवाद!

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2024 - 11:52 am | अमरेंद्र बाहुबली

माहितीपूर्ण लेख. आणखी लिहा.

मनस्विता's picture

25 Aug 2024 - 9:06 pm | मनस्विता

अजून तपशील देता आले तर बघा. मानवामध्ये समलैंगिकता मानसिक आहे असे बरेच जण मानत असताना, असंही वाचनात आले आहे की प्राण्यांमध्येदेखील ती पाहण्यात आली आहे.
तसेच transgender ही बरीच व्यापक संज्ञा आहे. त्यात काही genetics चा पण भाग आहे ना?