परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
6 Jun 2024 - 1:15 am

23 may 2024 : ध्यानाचा चौथा दिवस

सकाळी नेहमीप्रमाणे योग आसने ध्यानाचा वर्ग झाला. आता हे सारं अंगवळणी पडत चाललं आहे. ध्यानातील अनुभव इतके वैयक्तिक आणि खोलवरचे आहेत की ते लिहुन ठेवणं मला गरजेचे वाटत नाही. बस्स माऊलींच्या ओव्या , समर्थांचे श्लोक , तुकोबांचे अभंग आठवत राहतात.

आम्हां आम्ही आता वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ।।१।।
फावला एकांत एकविध भाव । हरी आम्हांसवें सर्व भोगी ।।२।।
तुका म्हणे अंगसंग एकें ठायीं । असों जेथें नाहीं दुजे कोणी ।।३।।

आश्रमाकडे निर्देश करणारा एकमेव फलक :
1

दुपारी ज्योतिषशास्त्रावरील व्याख्यानात नवग्रह आणि त्यांचे परिणाम ह्यावर भाष्य झाले. दुपारी आयुर्वेदावरील सेशनमध्ये वात पित्त कफ ह्यावर चिंतन झाले. माझ्या मनात मात्र सकाळाच्या ध्यानाच्या वेळीस आले तेच विचार फिरत होते:

वाणीच्या चार लेव्हल आहेत : वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा.

वैखरी म्हणजे बडबड. जे लोक करत असतात . अखंड. निरर्थक. पण कोणतीही बडबड करायच्या आधी आपण आपल्या मेंदुत विचार करतो, शब्दांची जुळवाजुळव करतो ही झाली मध्यमा वाणी. मध्यमा म्हणजे फक्त विचार. म्हणजे आता समजा उदाहरण द्यायचे झाले तर आपण शांतपणे बसलो तर आपल्याला इथें पक्षांचा किलबिलाट ऐकु येतोय, ही त्यांची वैखरी झाली जी की आपल्याला कळत नाही. पण तेही काहीतरी विचार करत आहेत, घरटे बंधत आहेत, अन्नाचा शोध घेत आहेत , आपल्या प्रियकर प्रेयसीला शृंगारासाठी साद देत आहेत, अर्थात ते विचार करत आहेत, ही झाली मध्यमा .
ह्याच्याही पुढची लेव्हल म्हणजे - पश्यंती . पश्यंति म्हणजे पाहणे. इथे पाहणे हा शब्द समजुन उमगुन घेणे ह्या अर्थाने आहे. म्हणजे जी वणी केवळ पाहत आहे , अनुभवत आहे, अजुन शब्दांनाही उद्गम नाही. म्हणजे कसे की इथे हे प्रचंड वृक्ष आहेत जंगल आहे, ह्यातील झाडे बोलत नाहीत त्यांना वैखरी नाही, ते विचारही करत नाहीत अर्थात त्यांना मध्यमाही नाही, पण ते "पहात" आहेत. त्यांना "कळतं" की सुर्यप्रकाश कोठुन येत आहे, तिकडे त्यांच्या फांद्या वाढतात , पाने पसरतात, जमीनीत पाणी आहे तिकडे मुळे वाढतात. उन्हाळा आला की ती झाडे पानगळ करत आहेत, हिवाळा आला की ह्या झाडांच्या साली भेगाळत आहेत. झाडामध्ये जी चेतना आहे ते बस हे सर्व पहात आहे. ही झाली पश्यंति.
आणि परा म्हणजे त्याच्याही पलीकडे. "मी आहे" बस्स ही जी जाणीव आहे ती परा. तिथे काहीही पहायची गरज नाही , काही विचार करायची गरज नाही, काहीही बोलुन दाखवायची गरज नाही. बस्स "मी आहे" !

ह्याला मी पुर्वी एक सुंदर उपमा दिली होती - आपण आंबे खाताना उत्स्फुर्तपणे म्हणतो - "अहाहा क्या बात है कसला गोड आहे हा आंबा" ही झाली वैखरी. पण हे बोलायच्या आधी आपण आपल्या मनात विचार करतो , शब्द जुळवतो, ही झाली मध्यमा. पण ह्याच्याही आधी जेव्हा आपण आंबा खातोय तेव्हा आपण त्याची गोडी अनुभवत आहे , तिथे अजुन विचारंचाही जन्म झालेला नाही, बस्स निखळ आस्वाद आहे, ही झाली पश्यंति. आणि ह्याच्याही आधी नुसतं आंबा समोर दिसल्यावर आपल्याला माहीत आहे त्याचा गोडवा तिथे अजुन अभिव्यक्ती नाही, विचार नाही , आस्वादही नाही , बस्स "आहे" . ही झाली परा.
माऊली म्हणतात :

कां न सज्जितां विणा । तो नादु जो अबोलपणा । तया तेणेंचि जाणा । होआवें लागे ॥ ५-४१ ॥

वीणा झंकारली नाही तरी त्याचाही आधी नाद आहे , जो अबोल आहे, तो कळायला तुम्हाला जाणकारच व्हावे लागेल !

आपण पश्यंति लेव्हलला राहू शकतो, आणि पराला जाण्याचा प्रयत्न करू.

Can you hear it?
2

Can you see it ?
3

संध्याकाळी स्वामीजींच्या सेशनमध्ये मात्र बेकार conspiracy theories वर चर्चा झाली. जगात कसे सॅटॅनिक कल्ट्स आहेत, ते कल्ट काय काय काम करतात वगैरे. मी आधीच जेफ्री एप्स्टिन विषयी वाचलेले असल्याने मला कल्पना होती की ह्या जगात काहीही होऊ शकते, मला काही जास्त धक्का बसला नाही, पण अन्य अनेक लोकं अंतर्बाह्य हादरुन गेले होते. कित्येकांना तर झोपही लागली नसेल.
संविधानिक सुचना : ज्यांना शांत चित्ताने झोपायचे आहे त्यांनी हा माणूस कोण होता आणि त्याचे मित्र कोण कोण होते , आणि त्यांन्नी काय काय आसुरी कृत्ये केलेली आहेत हे इन्टरनेटवर शोधु नका. हे सारे एक अत्यंत वाईट दु:स्वप्न असल्यासारखे आहे, असे काही प्रत्यक्षात घडू शकते ह्यावर विश्वास बसत नाही आणि शिवाय हे केवळ हिमनगाचे टोक आहे, अजुन कित्ती काय काय चालले आहे ह्या जगात ह्याच्या विचाराने देखील एखादा संवेदनशील माणुस अंतर्बाह्य हादरुन जाईल. सीरीयसली, नका सर्च करु. अज्ञानात खरेच सुख असते.

असो. हे काही मला पटले नाही. आता आहेत जगात वाईट गोष्टी. त्यांच्या मला उल्लेखही करावासा वाटत नाही. ह्या गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्याला काय करणार. तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही हिमालयात राहून ह्या असल्या बाष्कळ गोष्टीत मन गुंतवून ठेवू शकता किंवा अगदी शहरात राहून अलिप्त राहू शकता. तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवे ते!
नंतरच्या दिवसात स्वामीजींनी स्वतःच सांगितले की ते हे असे आजच्या काळातील घडामोडींसंदर्भातील सेशन का घेतात - जगात हे असे आसुरी वृत्तीचे लोकं आहेत, ते त्यांची साधना निरंतर आणि अत्यंत जोमाने करत आहेत. मग जे सात्विक लोकं आहेत त्यांनाही साधना करत रहायला हवेच , तुमच्या साधनेचा प्रकाश हा तुमच्या पुरता मर्यादित न राहता , तुमच्या घरात , तुमच्या आसपास, तुमच्या समाजात पसरणार आहे. जितके जास्त लोकं ध्यानधारणा , साधना करतील तितकाच समाज जास्त सात्विक होत जाईल आणि सत्वगुण वाढला की आपोआप तमोगुण नियंत्रणात राहील.
आणि ध्यान धारणा करायला आधी शरीर सुदृढ हवे म्हणुन आयुर्वेदानुसार जीवनशैली. साधनेसाठी उत्तम दोषमुक्त स्थान हवे म्हणुन वास्तुशास्त्र, साधनेत अन्य प्रापंचिक अडथळे येऊ नयेत म्हणुन ते आधीच जाणुन घेण्यासाठी म्हणुन ज्योतिष. असे हे सर्व कनेक्टेड आहे !

योगासने + ध्यान + आयुर्वेद + वास्तु + ज्योतिष +...... सर्व काही इंटिग्रेटेड !
_______________________________________________________________

२४ में २०२४: ध्यानाचा ४था दिवस.

आज सकाळचे ध्यान निवांत झाले. माझा एकूणच असा अनुभव आहे की संध्याकाळचे ध्यान जास्त रिलॅक्सिंग असते.
दुपारी वास्तू आणि आयुर्वेदच सेशन झालं.
आज संध्याकाळचे ध्यान अफलातून झालं. आज पहिल्यांदा मी जागृत स्वप्न सुषुप्ती अन् तुर्या अवस्थेमधील स्थित्यंतर पाहिलं. अहाहा. मजा आली.

बाकी संध्याकाळचे conspiracy theories सेशन मात्र नेहमी प्रमाणे बोरिंग. स्वामीजी इन जनरल जगात असलेल्या फूड पॉईझनिंग विषयी बोलले. प्लॅस्टिक्स, मारक्रोप्लास्टिक्स, अर्सेनिक , मर्क्युरी पॉईझनिंग , हझार्डस ऑफ मायक्रोव्हेव्ह.
नंतर ओघाओघाने फार्मासुटिकल्स इंडस्ट्री , त्यातील करप्शन , लॉबियिंग वगैरे वगैरे विषय आले . त्यातील एक गोष्ट मात्र अत्यंत रोचक वाटली, आणि नंतर मी ही वेरिफाय पण केली -
mRNA-1273 Vaccine Patent Landscape (For NIH-Moderna Vaccine) अर्थात मोडर्नाने कोव्हिडच्या एम. आरेने वॅक्स्सिन चे पेंटंट हे १२ जुन २०१९ अर्थात कोव्हिडचा सो कॉल्ड ऑट ब्रेक होण्याच्या जस्ट ६ महिने आधी काढलेले आहे !!!!
Patent/Published Application : US 10,703,789 Filing Date: June 12, 2019

आणि कोव्हिडच्या टेस्ट चे प्रोव्हिजनल पेटंट तर चक्क २०१५ मध्ये फाईल करण्यात आलेले आहे !

_______________________________________________________________
25 May 2024 : ध्यानाचा ६ वा दिवस

आज सकाळी ध्यान करताना मजेशीर अनुभव आला, ध्यानाच्या deep अवस्थेत असताना, एक मुलगी अचानक बेंबीच्या देठापासुन किंचाळली - जय गुरुदेव.
मलातरी - it's right over there ऐकू आले. =)))) पण खूप खराब वाटलं. बिचकलो बेकार.
पण नंतर लगेच लक्षात आलं की हे स्ट्रेस पॉकेट्स रीलीझ होत आहेत , चला किमान कोणीतरी मन लाऊन ध्यान करत आहे !!

ध्यानानंतर एक रम्य संध्याकाळ :
5

बाकी नंतर आज दुपारी गुरुजींनी छोटीशी परिक्षा घेतली, गुरुदेवांचा एक व्हिडीओ दाखवुन त्यावर आधारित काही प्रश्न ही विचारले. मला आले बऱ्यापैकी उत्तर देता : त्याचा सारांश खालील प्रमाणे.

What Maharshi said is essentially the theory of creation from Vaidik perspective. It's so different than Abrahamic perspective or modern science perspective of big bang.

The consciousness is Nirgun - Niraakar, omnipresent, ever-existent.
We don't believe in परिणामवाद , i.e. transformation of things, we believe in विवर्तवाद, the consciousness doesn't transform, the different things that we see is our illusion, Maya.
Maharshi gave example of the flower - it appears red with green leaves but if you go deeper, the basic rasaas are colorless, odorless.
It's सर्प रज्जू न्याय. We see rope and get afraid that it's a snake. But the moment we understand the reality that it's a rope, the illusion disappears. It is still there, only our perspective has changed.
That's how , आधिभौतिक सत्ता is created from अध्यात्मिक... And in between what happens is - आधीदैविक सत्ता. So if we want to make changes in आधिभौतिक, we need to work on empowering आधीदैविक. And how do we do that, by studying Vedas. Once आधीदैविक is sorted and our consciousness becomes pure and clear, the Vedas will "appear" to us. Vedas are not in books which you can read. Vedas are Shruti, you will hear them .

स्वामीजी म्हणाले - You explained it the best. आणि नंतर गालातल्या गालात हसत म्हणाले - It took me 20 years to understand this and you got it in just 7 days' shivir !
त्यांच्या हसण्यात "कळणं " ही एक गोष्ट आहे , "अनुभवणं " ही दुसरी गोष्ट आहे आणि "त्या अनुसार जगणं" ही त्याहुन वेगळीच तिसरी गोष्ट आहे असा काहीसा मतितार्थ होता असे मला वाटले.
पण किमान पहिली लेव्हल तरी टच करु शकलो ह्या विचाराने मी भरुन पावलो.

:)
_______________________________________________________________
26 May 2024

अशा रितीने काल सहा दिवसांचे शिबिर संपूर्ण झाले.

आपण काय शिकलो ?
ध्यानाचे महत्व ! पतंजलीचा अष्टांग योग हा अष्ट अंग योग आहे , त्यातील आठ ही अंगे आहेत , स्टेपस नाहीत , तस्मात ते एकानंतर एक असे करायचे नसुन सर्व एकत्रच सुरु करायचे आहे. होय होय. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. सर्व एकत्र . आणि जसे बाळ सर्वच आंगाने समान रितीने विकसीत होत जाते तसे तसे आपला योग विकसीत होत जाईल !
हे सर्व करत असताना सात्विक आयुर्वेदानुसार जीवनशैली , नित्य साधना हवीच . शिवाय नियंत्रणाबाहेरील प्रतिकुल गोष्टींवर उपाय म्हणुन आपण वास्तु आणि ज्योतिषाचा आधार घेऊ !
पण
मनाशी हे ठाम असु दे की -
A true vedanti will not push anything away. People try to push away what they perceive as bad and want only what is perceived as good. But for a true vedanti, there is no duality, bad and good, so he will not do that.
A true vedanti can not push anything away, because, good, bad ugly, is all Brahman, how it can be pushed away!
The only thing true vedanti can do is to see his own detachment with bad things on materialistic levels but on a spiritual level he still has constant realization, it's still Brahman.
So embrace the good things, and be detached with bad things ,but always remember, they are equal.

ही साधना आहे, हळु हळु जमेल. चरैवति चरैवति !
चालत रहा , चालत रहा :
ch

आता बस ध्यानाचा अवस्थेत खोल खोल उतरत जा. वैखरी , मध्यमा , पश्यंति, परा.... बस्स आता अजुन काय बोलणार . शब्दातीत ... भावातीत .... केवळ मौन अशी अवस्था आणि अनुभव अनुभाव्य आणि अनुभाविक ही त्रुपुटीही नाही अशी अवस्था !

झाला देवोचि भक्तु । ठावोचि झाला पंथु ।
होऊनि ठेला एकांतु । विश्वचि हें ॥ ९-३५ ॥

:)

पांडुरंग पांडुरंग !

इति श्रीकृष्णार्पणमस्तु !
_______________________________________________________________
संपुर्ण.

कर्ता करविता श्रीराम समर्थ ||
_______________________________________________________________

धर्मअनुभव

प्रतिक्रिया

स्वतःचे अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
फोटोतला पक्षी आवडला. ओडिओ रेकॉर्ड केला आहे का?

प्रसाद गोडबोले's picture

6 Jun 2024 - 10:16 am | प्रसाद गोडबोले

ओडिओ रेकॉर्ड केला आहे का?

नाही. अगदी फोटो काढतानाही मी माझा वैखरी मध्यमा पश्यंति ह्या चिंतनात गढुन गेलेलो होतो , त्यामुळे व्हिडीओ ऑडियो काढायचे लक्षातच आले नाही :(
बहुतेक Himalayan woodpecker (Dendrocopos himalayensis) असावा. कसली सुंदर ढोली केली होती त्याने त्या झाडाच्या बुंध्यात !

या रंगाचा पक्षी (हिरवा,तपकिरी,काळा रंगाचा)सलीम अलीच्या पुस्तकात शोधला. सापडत नाही.

कर्नलतपस्वी's picture

6 Jun 2024 - 1:31 pm | कर्नलतपस्वी

Great Barbet, पहाडी तांबट(मराठी),कटूरगा स्थानिक भाषेत संबोधला जाणारा पॅसेरियन कुळातील पक्षी हिमालयात सापडतो. दिसायला खुपच सुंदर आहे.

प्रसाद गोडबोले's picture

6 Jun 2024 - 4:09 pm | प्रसाद गोडबोले

करेक्ट.

Great Barbet, पहाडी तांबट(मराठी) हाच होता !!.

https://cdn.download.ams.birds.cornell.edu/api/v1/asset/158864101/320

कर्नलतपस्वी's picture

6 Jun 2024 - 7:56 pm | कर्नलतपस्वी

पक्षी निरीक्षणाच्या चेकलिस्ट पाठवतो.

पक्षीदर्शन, मला तर ताणतणाव दुर करण्यास आणी मन:शाती साठी मदत करतात.

आज ते दोन फोटो लेखात दिसत नाहीत.

कंजूस's picture

10 Jun 2024 - 12:03 pm | कंजूस

कोणते पुस्तक पाहता? Inskip and inskip?
Salim ali च्या पुस्तकात चित्र बरोबर नाही.

कर्नलतपस्वी's picture

10 Jun 2024 - 6:16 pm | कर्नलतपस्वी

मी मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर वापरतो.

Designed for anyone interested in identifying birds, Merlin is a machine learning-powered bird ID tool created by the Cornell Lab of Ornithology. As a global bird guide, it can help you identify birds anywhere in the world.

मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर
म्हणजे कंपूटरमध्ये घ्यावं लागणार. मोबाईलमध्ये app नसणार.

Greemet, inskip पुस्तकात यांचं चित्र चांगलं दिलं आहे.

कर्नलतपस्वी's picture

10 Jun 2024 - 8:39 pm | कर्नलतपस्वी

मर्लिन एक मोबाईल ॲप आहे. दररोज पक्षीदर्शन करताना याचा उपयोग होतो.

विवीध पक्षांचे आवाज वातावरणातून संकलित करून त्या पक्षांचे विस्तृत वर्णन दिले आहे.पक्षांचे वर्णन आणी आवाज दोन्ही एकत्र माहीती मिळते.
एक चांगले फिल्ड गाईड आहे.

या मुळेच मला शंभर सव्वाशे पक्षी ओळखण्यात मदत मिळाली. यांच्या बद्दल मी आत्मविश्वासाने बोलू शकतो.

गुगल प्ले स्टोअर मधून ङाउनलोड करता येईल.

वापरून बघा. आवडेल.

कंजूस's picture

12 Jun 2024 - 5:09 am | कंजूस

धन्यवाद कर्नलतपस्वी.

मर्लिन app टॅबमध्ये घेतले. मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात फोटो.
चांगले आहे. ओफ लाईन चालते. पक्ष्यांचे आवाज हे खास वैशिष्ट्य आहे.

Bhakti's picture

6 Jun 2024 - 6:44 am | Bhakti

अज्ञानातून विज्ञानाकडे,
सुखदुखातून आनंदाकडे,
असत्यातून सत्याकडे,
आणि अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानात प्रवेश करण्याचा शास्त्रोक्त, आणि तर्कशुद्ध राजमार्ग हा फक्त आपल्या भारतात, आणि फक्त भारतीय अध्यात्मशास्त्रात, आणि संत साहित्यात.

हे ग्रंथ प्रत्यक्ष स्वताच्या डोळ्यांनी याच जन्मात वाचल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभव हा कधीही येणार नाही, नाही, आणि नाही.
-फडके एस.एम.एन

एका सुंदर अनुभव घनाचा आनंद मिळाला, प्रगो अभिनंदन!
आता त्या वर्षा मध्ये सतत सुख अनुभवत राहा.

प्रसाद गोडबोले's picture

6 Jun 2024 - 10:33 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद भक्ती ! तुमचे प्रतिसाद खुप प्रेरणादायी होते. रादर मिपाकर , आणि फेसबुकवरील काही मित्रांच्या प्रतिसादांमुळेच लेखपुर्ण करु शकलो, नआही तर नेहमी प्रमाणे - "आपल्याला काय गरज आहे काहीही कोणालाही सांगायची ? आपलं आपण स्वान्तःसुखाय उपभोगत बसु. " असा विचार फार मनात घोळत होता.

बाकी , कालच , परत येऊन एक आठवडा पुर्ण झाला . इथे शहरात परत आले की - घरदार, प्रपंच , पोरंबाळं , ऑफिस, ट्रॅफिक , पैसा, पॉलिटिक्स , आरबट चरबट खाणे, अवेळी जागरण , व्यायामचा आळस, मिसळपाव, मिपावरील स्कोअर सेटलिंग , एकांगी संपादन, वगैरे वगैरे जाणवले .
पण एक गोष्ट लक्षात आली - तुम्ही जर सर्वकाही नीट लक्षपुर्वक करत असाल , ध्यानपुर्वक करत असाल , तर सर्वच ध्यान आहे. तुम्हाला ध्यानाच्या अवस्थेतुन कोणीही खाली खेचु शकत नाही एक तुमचे चंचल मन सोडले तर. भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे !

तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी !
पांडुरंग पांडुरंग.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ।।
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालीविसी भार सवे माझा ।।
बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केली देवा ।।
अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।।
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।।

आता आनंदाने "खेळत" आहे . बस :)

https://www.youtube.com/watch?v=BGzw9LRUclM

Bhakti's picture

6 Jun 2024 - 7:27 pm | Bhakti

_/\_

भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे !

अगदी बरोबर !आपण शेवटी माणूस' आहोत.स्वत:ला आधी प्रेम देणं आलंच.

तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी

!
त्या गतीला मार्गक्रमण सुरूच आहे :)
पांडुरंग पांडुरंग.

अतिशय सुंदर लेखमाला. आवडली.

शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद यातील फरक वेळ मिळेल तेव्हा सांगावा ही आग्रहाची पण नम्र विनंती

प्रसाद गोडबोले's picture

7 Jun 2024 - 11:27 am | प्रसाद गोडबोले

शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद

माझ्या आकलनानुसार -
श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात ते एकदम प्युअर उपनिषदांचे शब्दशः तात्पर्य आहे - ब्रह्मं सत्य जगन्मिथ्या . केवळ अविनाशी ब्रह्म सत्य आहे, त्या व्यतिरिक्त जे जे काही विनाशी असे आहे ते ते सर्व माया आहे. माया म्हणजेच या मा सा माया. जी कधी झालीच नाही ती म्हणजे माया. अर्थात विनाशी असे जे जे म्हणुन तुम्हाला भासत आहे , ते नाहीयेच .

माऊली थोड्या फरकाने हेच म्हणतात की केवळ ब्रह्मच सत्य आहे, माया असे काही नाहीच , मग आसस्पास जे काही दिसत आहे , भासत आहे ते सारे काय आहे ? जर माया असे काहीच नाही तर त्याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो की ते ही ब्रह्मच आहे ! त्यालाच माऊली चिद्विलास असे म्हणतात.

मला दोन्ही गोष्टी कळायला कठीण वाटल्या तेव्हा समजुन घ्यायला समर्थ रामदास स्वामींच्या आत्मारामामधील संवाद खुप जास्त उपयुक्त ठरला.
समर्थ म्हणतात : आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ॥ रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥

समर्थ शिष्य कल्याण समर्थांना हाच प्रश्न विचारतात : सकळ माया ऎसेंहि म्हणतां । आणि जालीच नाही ऎसेंहि सांगतां ॥ तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥

त्यावर समर्थ उत्तर देतात : अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ॥ तितुके तुंवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥

थोडक्यात काय तर मनाला जे जे अनुभता येत आहे ते ते सारे नाशिवंत आहे , मायिक आहे , मुळात मनच मायिक आहे. तुम्हाला आचार्यांसारखे "मिथ्या" असे म्हणुन एका झटक्यात त्याग करता आला तर उत्तमच ! (मुळात त्याग करणे म्हणजे नक्की काय ? कशाचा त्याग करणार अन कोण करणार !! )
नाही आला , तर माऊली म्हणातात तसे हा सारा ब्रह्माचा चिद्विलास आहे, माया असे काही नाहीच जे जे काही तुम्हाला दिसत आहे अनुभवाला येत आहे ते सर्वच ब्रह्म आहे ही नजर विकसीत होऊ द्या . (कसली नजर अन कसलं काय ? काय बघणार अन बघणारा तरी कोण ?)

असो, ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत हे मी(?) स्वानुभवावरुन(?) सांगु शकतो(?) . मला जेव्हा माऊली काय म्हणात आहेत हे लक्षात आले होते तेव्हा त्यांच्चाच अभंग आठवलेला -

योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥
देखिला देखिला माये देवाचा देवो । फीटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥
अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां तयासि । बाप रखुमादेवी-वरीं खूण बाणली कैसी ॥३॥

https://www.youtube.com/watch?v=1qQlC7bJV9k

प्रसाद गोडबोले's picture

7 Jun 2024 - 11:52 am | प्रसाद गोडबोले

अवांतर :
मध्यंतरी एक खुप गोष्ट ऐकलीली, ती आठवली ह्या निमित्ताने.
आपण जाणतोच की शुध्द द्वैतवादाचे प्रणेते मध्वाचार्य , विशिष्ठाद्वैतवादाचे प्रणेते रामानुजाचर्य आणि शुध्द अद्वैतवेदांताचे प्रणेते शंकराचार्य आहेत.
एकदा त्यांचे शिष्य समुद्रकिनारी फिरायला जातात.

तेव्हा मध्वाचार्यांचा शिष्य म्हणतो - अहाहा कित्ती सुंदर . हे पहा समुद्र आहे , लाटा आहेत , प्रत्येक लाट वेगळी आहे, लाट म्हणजे समुद्र नव्हे अन समुद्र म्हणजे लाट नव्हे, समुद्र अफाट आहे , अनंत आहे आणि लाटा कधीच समुद्र होऊ शकत नाहीत.

त्यावर रामानुजाचार्यांचा शिष्य म्हणतो - लाटा ह्या समुद्रातच उमटालेल्या आहेत , प्रत्येक लाटेत समुद्राचाच अंश आहे, पण लाट कधीही समुद्र होऊ शकत नाही.

त्यावर शंकराचार्यांचा शिष्य म्हणतो - कसल्या लाटा अन कसला समुद्र ? लाटा , समुद्र दोन्हीही मिथ्या आहे, मला तर फक्त पाणीच दिसत आहे !!

------------------
तिथे जर माऊलींचा शिष्य असता तर तो म्हणाला असता - लाटाही आहेत , समुद्रही आहे , पण मुळात सगळं पाणीच आहे ! एक पाणीच लाटा आणि समुद्र अशी भिन्न भिन्न रुपे घेऊन नटलेले आहे. लाटा समुद्र हा पाण्याचा चिद्विलास आहे !

आणि तिथे जर समर्थांचा शिष्य असता तर म्हणाला असता - लाटा आहेत हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, समुद्र आहे हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणी पाणी आहे हेही तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणि मनाला जे जे अनुभवाला येत आहे ते ते सगळं नाशिवंत आहे . (आणि हा अनुभवही तुमच्या त्याच नाशिवंत मनाला येत आहे.) असा हा सगळा मायेचा खेळ आहे !

अहिरावण's picture

7 Jun 2024 - 1:07 pm | अहिरावण

:)

जय गुरुदेव !!

कर्नलतपस्वी's picture

6 Jun 2024 - 1:46 pm | कर्नलतपस्वी

सर्व भाग वाचले.
ध्यान,धारणा वगैरे सारख्या जटिल गोष्टी लक्षात येत नाहीत पण निसर्गाच्या सान्निध्यात रहायला जरूर आवडते. तीथे भौतिक गरजा विसरून येणारी अनुभूती एक सुखद अनुभव असतो.
आपले अनुभव कथन आवडले.

वामन देशमुख's picture

6 Jun 2024 - 3:45 pm | वामन देशमुख

लेखमालिका व त्यातील विचार आवडले. हिंदू धर्मपरंपरेतील अध्यात्म-अनुभव हा सर्वसमावेशक असतो. तो तुम्हाला लाभला याचा आनंद वाटला.

काही काळानंतर (चार-सहा महिन्यानंतर?) या अनुभवामुळे तुमच्या विचार-आचार-प्रकटन यांत काही काही बदल घडून येणे अपेक्षित असेल तर ते बदल घडून आले का वगैरे लिहावे ही विनंती.

चित्रगुप्त's picture

7 Jun 2024 - 1:34 pm | चित्रगुप्त

लेखमालिका उत्तम झाली. दोन आठवडे नेहमीच्या धबडग्यापासून दूर, निसर्ग-एकांतात निवांत जाऊन रहाणे हेच मुळात दुर्मिळ होऊन बसलेले आहे. तो अनुभव तुम्हाला घेता आला हे विशेष.
(माझ्यापुरते बोलायचे तर अनेक वर्षे अध्यात्मिक, तात्विक इ.इ. वाचन, चर्चा, विविध कँप वगैरेत जाणे वगैरे सगळे करून झाल्यावर आता त्या सर्वातून मुक्त होऊन फक्त अगदी जिव्हाळ्याचे विषय - चित्रकला, आरोग्य, संगीत, नातवंडे - यातच रमलेलो आहे. )
विविध विषयांवर, अनुभवांवर जरूर लिहीत रहा.

विअर्ड विक्स's picture

10 Jun 2024 - 11:50 am | विअर्ड विक्स

५ हि लेख वाचले . चांगली लेखमाला आहे . ज्याप्रमाणे एखाद्या सहलीस पुढचे दहा पंधरा दिवस वेगळ्या आनंदात जातात त्याप्रमाणे शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक.
अध्यात्मात रस आहे पण व्यवहारी जीवनात आध्यात्म पालन करण्याइतपत योग्यता अंगी नसल्याने लेख वाचून जिज्ञासा शमवण्याचामाझा माफक प्रयत्न असतो .

प्रसाद गोडबोले's picture

10 Jun 2024 - 9:22 pm | प्रसाद गोडबोले

शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक.

सध्या राम दास्स ह्यांची प्रवचने ऐकत आहे, त्यामुळे कार्य , कारण, परिणाम ही विचारपध्दतीच संपुष्टात आलेली आहे :)

झकासराव's picture

11 Jun 2024 - 9:39 am | झकासराव

लेखमाला आवडली
अनुभवकथन उत्तम।केलेत
फक्त फोटो दिसले नाहीत ह्या लेखात.