परत एकदा हिमालयाच्या कुशीत - २

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
30 May 2024 - 1:14 am

२० मे २०२४ - ध्यानाचा पाहिला दिवस

काल इतका दमलो होतो त्यामुळे गाढ झोप लागली. पण इथे अतिषय कडक नियम असल्याने सकाळी सात वाजता ध्यानाला उपस्थित राहणे गरजेचे होते. त्यात मला यायला काल उशीर झाल्याने स्वामीजींनी ध्यानविषयक रीतसर मार्गदर्शन केलेले नव्हते. त्यांनी मला आधी त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावले होते. ह्या सगळ्या विचारात खडबडुन पहाटे पहाटे जाग आली. हवेत नितांत सुंदर गारवा होता. अजुन सुर्योदय झाला नव्हता पण पुर्वेला ताम्बंड फुटलं होतं . इतक्या पहाटे उठण्याचा योग कैक वर्षांनंतर आला होता.

1

ताबडतोब सारी शौच स्नानादि आन्हिके आटोपुन उगवत्या सुर्याचे दर्शन घेतले

2

त्वरित स्वामीजींच्या ऑफिस मध्ये गेलो. स्वामीजी शुचिर्भुत होऊन पांढरे शुभ्र धोतर नेसुन पुजेच्या गडबडीत होते. सर्वात प्रथम नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे स्वामीजी फॉरेनर होते. गोरापान वर्ण. निळेशार डोळे . साधारण ५ - ११ उंची असावी. शिडशिडीत शरीरयष्टी. लांबसडक पांढरे केस अन छातीच्या खालपर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी. त्यांना पाहुन साक्षात जीझस ख्राईस्टच समोर आहेत काय असा भास झाला . मला बाहेरील हॉल मध्ये
"यहां बैठो मे बुलाऊंगा तब अंदर आना"
असे स्पष्ट हिंदित म्हणाले. एक फिरंगी गोरा माणुस इतके अस्खलित हिंदी बोलतोय हा मला एक धक्काच होता . पण नंतर कळलं की ही तर फक्त सुरुवात होती.

स्वामीजीं आत गेले अन आवाज दिला. मी स्वामीजींच्या मागे जाऊन बसलो. समोर नीटनेटकेपणाने सजवलेले देवाघर. गुरुपरंपरेचा प्रवाह दर्शवणारा फोटो. समोर शिवलिंग. एक मारुतीचा फोटो. शंख घंटा शुप दीप अगदी सगळे साग्रसंगीत. अन स्वामीजींनी सुरुवात केली :

"ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ॥"

आता मात्र मी अंतर्बाह्य झंकारुन निघालो. माणुस सुस्पष्ट ठाम आअवाजात चक्क संस्कृत श्लोक म्हणत होता !
पुढे स्वामीजी म्हणाले -

"श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम्। नमामि भगवत्पाद शंकरं लोक शंकरं।।"

shankaracharya

असे म्हणुन स्वामीजींनी गुरुपरंपरेतील - हस्तामलक, तोटकाचार्य, मंडनमिश्र आणि पद्मपादांच्या समवेत बसलेल्या श्रीमदाद्यशंकराचार्यांना अत्यंत विनम्र भावाने नमन केले.
आता मात्र माझी खात्रीच पटली की I am in a right place.
पुढे स्वामीजींनी रीतसर पंचोपचार पुजा केली. नंतर मागे बसलेल्या आम्हाला एकेक करुन गुरुमंत्र दिला. त्यातही त्यांनी आवर्जुन सांगितले की मी तुम्हाला फक्त मंत्र देत आहे , मी तुमचा गुरु नाही, आपल्या सर्वांचे गुरु "हे" आहेत. आपण आता गुरुबंधु आहोत . ( गुरुंचा नमोल्लेख करण्याची माझी अजुन पात्रता नाही, अजुन तेवढी साधना नाही. शिवाय प्रत्यक्ष दर्शन नाही तोवर आपला भाव हाच आपला आपला गुरु. ) स्वामीजी म्हणाले - हा मंत्र अन इतर मंत्रांमध्ये फरक इतकाच आहे की ह्या मंत्राला काहीही अर्थ नाही. इतर मंत्रांना अर्थ असतात, त्यामुळे मन अर्थात रमुन जाते. आपल्याला त्याच्याही परे जायचे आहे , तर अर्थाच्या परे जाणारा मंत्र हवा. बस इतकेच. पुढे स्वामीजींनी रीतसर ध्यानविधी शिकवला. आणि आमच्याकडुन वदवुन घेतले की आम्ही कोणालाही हा विधी सांगणार नाही कारण तो गुरुपरंपरेनेच आला पाहिजे. तसेही अर्थहीन मंत्राचा जप करुन काय साधणार ? इथे साधनापेक्षा त्यामागील तत्वज्ञान जास्त महत्वाचे आहे.

नंतर लगेच योगासनांच्या क्लासला गेलो. तिथे जवळपास अर्धा एक तास योगा आणि ध्यान केले.
त्यानंतर दिवस खूप जास्त हेक्टिक होता. सर्वप्रथम आयुर्वेद नंतर ज्योतिष ह्यावर लेक्चर्स झाले. स्वामीजींनी त्यांच्या गुरुंचे काही व्हिडीओ दाखवले- त्यात चार उपवेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्यांची माहीती होती. पुढे त्यांनी चार उपवेद - आयुर्वेद, धनुर्वेद , गंधर्ववेद आणि स्थापत्यवेद ह्या विषयी मीहेती दिली. हे सारे आधी अभ्यासले असल्याने मला त्यामानाने सोप्पे वाटत होते पण पुढे स्वामीजींनी सांगितलेली गोष्ट माझ्यासाठी नवीन होती:

उपवेदांचा उद्देश म्हणजे दोष निर्मूलन करून तुम्हाला वेदांसाठी तयार करणे.

पुढे स्वामीजींनी विद्या आणि प्रज्ञा ह्यातील फरक सकाळी सांगितला होता. विद्या म्हणजे तुम्ही जे काहे पुस्तकातुन किंवा अनत्र ठिकाणुन शिकता ते. प्रज्ञा म्हणजे जे तुम्हाला अंतर्स्फुर्तीने उमगते ते ! मला तत्काळ - वेद अपुरूषेया आहेत म्हणजे नक्की काय ह्याचे उत्तम स्पष्टीकरण मिळाले. मजा म्हणजे स्वामीजी जेव्हा म्हणाले की

"वेद ही शिकायची गोष्ट नसून ऐकायची गोष्ट आहे, वेद हे श्रुती आहेत , जेव्हा तुम्ही उपवेदांच्या साहाय्याने दोषमुक्त व्हाल तेव्हा ज्ञान स्वत:च आपोआप तुमच्या मनात प्रकट होईल तुम्हाला ऐकू येईल. जसे रामानुजन अगदी थोडेफार गणित शिकला होता शालेय पुस्तकातुन मात्र त्याला पुढील गणीतीय सिध्दांत त्याच्या मनातुन उमगले तसे काहीसे".

अन नेमके तेव्हाच कोणीतरी विद्यार्थी पाठशाळेत वेदपठण करत होता ते ऐकू आले मला. अहाहा :)

नंतर नाष्टा केला. मी तसा द्विभुक्त प्राणी असल्याने मला नाष्ट्याचे फार काही कौतुक नाही, पण इथे मात्र नाष्टा खरेच भारी होता :

3

पोटभर नाष्टा केला. दुपारच्या जेवणला बसल्यावर लक्षात आलं , की हा वैदिक आष्रम असल्याने इथे कांदा लसुण अंडी मांस वगैरे संपुर्ण वर्ज आहे. तेव्हा सकाळी तुडुंब नाष्टा केल्याचे समाधान लाभले. पुढील काही दिवस हीच माझी दिनचर्या बनुन गेले होते.
एकदम सनातनी वैदिक आश्रमात एकदम जैन जेवण . जेवणातही - शुध्द गहु पुर्ण निशिध्द . गहु रागी बाजरी आणि अन्य कोणतेतरी अशे चार प्रकार बनवुन रोटी बनवली जायची . भाज्या देखील सर्व निवडुन निवडुन नावडत्या. भेंडी. पडवळ. तोंडली . दुधी भोपळा. ( हर हर . हे लिहित असताना नुसत्या आठवणीनेही मन गहिवरुन आले.) तपश्चर्या म्हणातात ते हेच असावे बहुतेक . नुसता मनःस्ताप. तो पुढे फॉरवर्ड करायला नको म्हणुन एकदाही जेवणाचा फोटो काढला नाही.

4

बाकी हा आश्रम हिमालयाच्या उतारावर वसलेला आहे अन् त्यात आमची रूम सर्वात उंचावर आहे.अन काल मोजले तेव्हा ध्यान शिक्षण हॉल ते आमची रूम तब्बल १६६ पायऱ्या आहेत. आणि ध्यान , जेवण , अभ्यास ह्या निमित्ताने किमान ५-६ वेळ वर खाली करावे लागते. केवळ आणि केवळ ह्याच मुळे इतकी कडकडुन भुक लागायची अन जेवण खाल्ले जायचे. अन्यथा सर्वथा अशक्य होते ते.

संध्याकाळी परत ध्यानाचे सेशन झाले. हे संध्याकाळच ध्यानाचा जरा सेशन विचित्र होता. सर्वप्रथम योगासने झाल्यानंतर जेव्हा ध्यानाला बसलो तेव्हा मन खोल खोल चित्तात उतरले. अन् आधीच ज्यावर चिंतन करून झाले आहे तेच ते विचार मनात प्रकटले. आई, बाबा, मावशीची आठवण आली. आपण योग्य तर वागलो ना, वागतो आहोत ना ह्या विचाराने मन हळवं झालं. नंतर बायका, पोरांचा विचार मनात डोकावला. मध्येच करियर मधील प्रोग्रेस आणि is it really worth it, असा विचारही डोकावून गेला. ध्यानातुन उठल्यावर बायकोला फोन केला, मुलांशी बोललो तेव्हा , मन शांत झालं. बायकोने आश्वस्त केलं. तु जमेल तितके केले आहेस, लोकांच्या ध्यानी मनींही नव्हते इतके जास्त. आजही करत आहेत . हळवं काय व्ह्यायचं ? उलट तुझे आजोबा असते तर त्यांनी तुझी पाठच थोपाटली असती. तुला अजुन काही साध्य करायचे असे काहीही नाहीये. लोकांना कळत नाही ही बात अलहिदा, आजोबा असते तर त्यांना नक्की कळलं असतं पण त्याहे पेक्षा महत्वाचं आहे - तुझं तुला कळलं पाहिजे. त्याचसाठी गेला आहेस ना हिमालयात !

ओशोचे वाक्य मनात डोकावून गेले -

"... enlightened is nothing but the realization that there is nothing to achieve, there is nowhere to go, you are already perfect and you are already complete. "

पण बाकी काहीही म्हणा, हे उत्तम आहे, ध्यानाचा दुसर्‍या प्रयत्नातच मन इतके खोल उतरत असेल तर अजून पुढे चित्तत् खोल काय आहे हे दिसेल , ह्या उत्सुकतेने मी शहारुन गेलो. (त्याविषयी काहीही लिहिणे मी जाणीवपुर्वक टाळत आहे. )

रात्री झोपायच्या आधी रुम मधुन एक फोटो काढला. अन नंतर रातकिड्यांच्या किर आवाजात ध्यान लाऊन शांत झोपी गेलो...

5
-
क्रमशः

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

30 May 2024 - 3:53 am | चित्रगुप्त

हा भाग वाचला. उत्तमच आहे. नंतर पुन्हा वाचून काही प्रश्न असले तर ते लिहीन.
सध्या पहिला प्रश्न म्हणजे फळांबरोबर वाटीत काय आहे ? सांजा किंवा गुळासारखे वाटते आहे.

प्रसाद गोडबोले's picture

30 May 2024 - 8:40 am | प्रसाद गोडबोले

होय.
सांजा किंव्वा ज्याला आम्ही गुळाचा शिरा म्हणतो तो होता. आश्रमात साखर पुर्ण निशिध्द होती.

कंजूस's picture

30 May 2024 - 8:17 am | कंजूस

हा आश्रम आवडला.
अशा ठिकाणी कोणत्याही मंत्राची गरज नाही. जेवणाचे आणि नाश्त्याचे म्हणाल तर काहीच अडचण नाही. हेच खातो. पायऱ्यांची ही अडचण नाही सवय आहे. आणि शुद्ध हवा. कोणताही गुरू नको. गरजच नाही. मुक्त मोकाट राहायचे. भटकायचे.

किल्लेदार's picture

30 May 2024 - 8:26 am | किल्लेदार

आवडले...

खरेतर वैदिक आश्रम असल्याने कोवळ्या बोकडाच्या बोन मॅरोचा सुर्वा २४ तास मिळायला हवा.
शिवाय ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे प्रसंगी एखाद्या घोड्याचेही बार्बेक्यू मिळायला हवे. त्यातही पुरोहितांना पुढच्या-उजव्या मांडीचे मांस तर हक्काने मिळायला हवे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2024 - 10:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरेतर वैदिक आश्रम असल्याने कोवळ्या बोकडाच्या बोन मॅरोचा सुर्वा २४ तास मिळायला हवा.

हे राम. असं नसतं हो. मन शुद्ध, सात्विक राहण्यासाठी सकाळी
फ़ार साखर नसलेला काजु-शिरा. इडली-मेदूवडाही चालेल मला.

दुपारी, बोकड्याचं खुराचं मटण विथ सूपही चालेल.
दुपारी, आराम. लोळण्याचा कंटाळा आलाकी
सायंकाळी सहा-सात किमी निसर्ग
सानिध्यात इव्हीनींग वॉक होईल.

सायंकाळी चार मित्र टेबल गप्पा मैफ़िल अहाहा.
कमी आवाजात गजल, शायरी, कवितेच्या आवडत्या ओळी.

-दिलीप बिरुटे
(आनंद आश्रमातला आनंदी) :)

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2024 - 9:53 am | प्रसाद गोडबोले

@व्यवस्थापन ,

हा प्रतिसाद पहा. ह्यातील एका तरी वाक्याचा मुळ हिमालयातील भटकंती बाबत असलेल्या लेखनाशी काडीमात्र तरी संबंध आहे का ? केवळ विषयांतर करणे , धागा भरकटवणे हाच उद्देश आहे. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. तुम्ही ह्याचावर कारवाई करत नाही.
पुढील प्रतिसादात माझ्यावर वैयक्तिक टीका करतात, तेही साळासुदपणे काळजी करत असल्याचा आव आणुन . तुम्ही त्यावर देखील कारवाई करत नाही.

असे असेल तर इथे कोणी प्रांजळपणे काहीही लिहिणे हेच मुर्खपणाचे ठरते. मी माझ्या लेखांमध्ये राजकारण , भाजप - काँग्रेस वगैरे काहीही तिळमात्र उद्देश नसताना , ते इथे येऊन विषयांतर करतात , मला काळजी घ्या वगैरे उपरोधिक टोमणे मारतात. ते व्यवस्थापन जाणीवपुर्वक दुर्लक्षित करते. वाह !

निंदकांचे वा दुर्जनांचे घर असावे शेजारी.

प्रसाद गोडबोले's picture

2 Jun 2024 - 9:19 pm | प्रसाद गोडबोले

अगदी अगदी .

मी आजही जमेल तितके तुकोबांचे प्रमाणे आचरण करायला शिकत आहे , किमान तसा प्रयत्न करत आहे.

मला माहीत होते की काही लोकं माझ्या लेखनावर येऊन मुद्दामुन विषयांतर करणार , माझी त्याला ना नव्हती, आजही नाही. मी माझ्या पुरती गट.क्र.१ आणि गट क्र.२ अशी जी विभागणी केली आहे ती मला अत्यंत शांततादायक ठरलेली आहे :)

व्यवस्थापकांनी आधी केवळ माझ्या प्रत्युत्तराचे संपादन केले , हे असे एकांगी संपादन पाहुन मात्र मी वैतागलो . मी लगेच त्यांच्या निदर्शनास आणुन दिले की त्यांनी विनाकारण आणि सरळ सरळ माझ्यावर वैयक्तिक टिप्पण्णी केलेले आहे म्हणुन मी प्रतुत्तर दिले. तेव्हा मग व्यवस्थापनाने त्यांच्याही प्रतिसाद संपादित केला.

असो. स्वभावाला औषध नाही !

जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३||

अहिरावण's picture

3 Jun 2024 - 10:18 am | अहिरावण

:)

४ था भाग टाका !

प्रसाद गोडबोले's picture

30 May 2024 - 11:44 am | प्रसाद गोडबोले

सामिष आहार

सामिष आहाराबद्दल मी किमान २-३ दा विचारणा केली त्यांचासोबत. त्यांचा म्हणजे तेथील आयुर्वेदाचार्य आणि खुद्द स्वामीजी सोबत. अन त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे -
कोणत्याही प्रकारचे फार्म प्रोडुस्ड , व्यावसायिक तत्वावर बनवलेले मांस खाण्यायोग्य नाही. चिकन मटन तयार करताना त्या प्राण्याला किती अन काय कसली इंजेक्शन्स दिली असतील ह्याची आपल्याला कल्पनाच नसते. कोंबड्यांना जास्त अंडी देण्याकरिता इंजेक्शन देतात. शेळ्या मेंढ्यांना वजन वाढीसाठी खुराक. त्यामुळे आपण अंडी , चिकन मटन खाताना आपल्या पोटात अक्षरशः विष ढकलत आहोत. इतकेच काय तर दुध बनवण्याकरिता गायींना इस्ट्रोजेन हे हार्मोन दिले जाते हे आता सर्वज्ञात आहे, त्याव्यतिरिक्त अजुन काय इंजेक्श्नन देत असतील ह्याची आपल्याला कल्पनाही नाही. त्यामुळे ते दुधही धोकादायकच आहे. त्या दुधामुळे लहान मुलं मुली लवकर वयात येणे हे परिणाम आधीच निदर्शनास आलेले आहेत.

ह्या उपर राहिले मासे आणि प्रॉन्स वगैरे. नदीतील अन समुद्री मास्यांच्या बाबतीत मर्क्युरी आणि अर्सेनिक पॉईझनिंगचे प्रमाण अफाट आहे. शिवाय मायक्रोप्लॅस्टिक्स ही आहेत . तसेच कृत्रिम तलावात वाढवलेल्या माशांच्या बाबतीत तोच प्रकार आहे. तस्मात सर्व अवघड झालेले आहे.

मांसाहार करायचा असल्यास स्वतः शिकार करुन जंगली प्राणीचे मांस खाणे हे उत्तम . त्यातही काळवीट सर्वोत्तम. मात्र वन संरक्षण नियमांच्यामुळे आता हे शक्य नाही.
त्यामुळे मांसाहार टाळणे हेच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे, पण त्यातल्या त्यात कमी दोषयुक्त म्हणुन मासे , तेही फक्त फ्रेश मासे चालतील, अन्य मांसाहार हा आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने टाळलाच पाहिजे.

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं |

शरीर हेच खरे धर्माचे साधन आहे. तेच जर निरोगी नसेल तर ध्यान धारणा जमणे अशक्य आहे, समाधीची तर शक्यताच मावळुन जाते.

आता इतके सविस्तर आणि तर्कपूर्ण उत्तर मिळाल्यामुळे माझ्यासारखा चवीने खाणारा , सामिष आहाराचा कट्टर समर्थक देखील निरुत्तर झाला :|

अवांतर : कृष्णमृग अर्थात काळवीट खाण्यास सर्वोत्तम असे स्वामीजींनी म्हणाल्यावर राजस्थानातुन आलेल्या ३ साधकांचे चेहरे असे पडले की ते पाहुन मौज वाटली =))))

एकदम बरोबर माहिती सांगितली स्वामीजींनी!
सध्या सर्व प्रदूषण ग्रासित झाले आहे.
किंवा स्वतः बोकड वाढवावा, ओरग्यानिक खाऊ पिऊ घालावा,मग तो भक्षण करावा.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

31 May 2024 - 1:06 pm | हणमंतअण्णा शंकर...

आलं आणि तत्सम दोन तीन जिन्नस घेऊन शिजवलेले मांस (आम्ही घरचेच मटण खातो, कोंबड्या आणि बोकडे) बरेच हलके, लघु, सात्विक वृत्तीचे असते असा माझा अनुभव आहे.

Bhakti's picture

30 May 2024 - 8:57 am | Bhakti

पुढे स्वामीजींनी विद्या आणि प्रज्ञा ह्यातील फरक सकाळी सांगितला होता. विद्या म्हणजे तुम्ही जे काहे पुस्तकातुन किंवा अनत्र ठिकाणुन शिकता ते. प्रज्ञा म्हणजे जे तुम्हाला अंतर्स्फुर्तीने उमगते ते !

पूर्णपणे सहमत

ध्यानाचा दुसर्‍या प्रयत्नातच मन इतके खोल उतरत असेल तर अजून पुढे चित्तत् खोल काय आहे हे दिसेल , ह्या उत्सुकतेने मी शहारुन गेलो. (त्याविषयी काहीही लिहिणे मी जाणीवपुर्वक टाळत आहे. )

@प्रगो
पण दोन लेख वाचता ,ही नवी जीवनशैली मिळाली आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करताच.

प्रचेतस's picture

30 May 2024 - 9:15 am | प्रचेतस

हा पण भाग मस्त. मला वाटतं तुम्ही कोणत्या आश्रमात होतात ते मला कळले आहे.
बाकी वैदिक आश्रमात एकदम सात्विक जेवण :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2024 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन वाचलं.

संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

30 May 2024 - 11:28 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद सर !

आपल्यासारखे हितचिंतक आहेत हे फार सुखद फीलींग आहे !

बाकी निवडणुकांच्या निकानंतर भेटुयातच !

संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन

नठ्यारा's picture

31 May 2024 - 10:02 pm | नठ्यारा

अवांतर :

गोरा जीझस ख्राईस्ट वाचून अंमळ हसू आलं. मिडल ईस्टातला प्यालेस्टीनातला इसम आंग्लशख्स गौरवर्णी असणं निव्वळ अशक्य. निदान २००० वर्षांपूर्वी तरी अशक्य म्हणायला पाहिजे. येशू माझ्या मते काळा व बुटका असावा. अर्थात, तो काळा की गोरा हा जीवनमरणाचा प्रश्न नव्हे.

-नाठाळ नठ्या

भागो's picture

1 Jun 2024 - 9:10 am | भागो

रंगात काय आहे? -----------इति "मी."
रंगावर जाऊ नका.
जीझस ख्राईस्ट इज जीझस ख्राईस्ट इज जीझस ख्राईस्ट!

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2024 - 6:07 pm | चौथा कोनाडा

रोचक वर्णन... भारी वाटलं वाचताना.
फोटो दिसत नाहीत त्यामुळं भ्रमनिरास झाला.
वातावरण मिस झाल्यासारखे वाटले !

धागा संपादित करून परत फोटो डकवा,