मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या
सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची.
पण त्या दिवशी मी स्वतः एक कुणगा अट्टाहासाने नांगरायचं असं ठरवलं. आणि व्हायचं तेच झालं. सूर्यास्त होई पर्यंत माझं अंग चोळामोळा झालं. रात्री घरी येऊन कसाबसा दोन घांस गिळून अंथरूणावर पडलो. आणि सूर्योदय केव्हा झाला हे कळलंच नाही.
असं म्हणतात जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा मेंदूत येणारे विचार स्वपनाद्वारे हयदोस घालतात.
त्या दिवशी माझं अगदी तसंच झालं. आदल्या दिवशी मी शेतात घेतलेली अंग मेहनत,नांगरत असताना येणारे, शेताबद्दलचे विचार, प्रचिती,पृथ्वीची घडण, माझ्याकडून नांगरण्याची प्रक्रिया,शरीराकडून मिळणारं सहाय्य ह्या सर्वांची गोळाबेरीज जणू त्या माझ्या स्वप्नात प्रदर्शीत होत होती.
मला ह्या सृष्टीला, ह्या ब्रम्हांडाला पाहून भारी कौतुक वाटतं.
माझ्या मनात असं येतं की,ह्या विश्वाची मांडणी एका मास्टर भौतिकशास्त्रज्ञाने केली असावी.
जसं शेतकरी आपल्या शेतात बियाणे विखुरतो तसं अनंत तारे सृष्टीभोवती विखुरले गेले असावेत..
ताऱ्यांमध्ये त्या भौतिकशास्त्रज्ञाने
आकाशगंगेसारख्या भव्य आकाशगंगांची रचना केली असावी. त्याने आपली आकाशगंगा ग्रहांनी भरून टाकली, आणि प्रत्येक ग्रहाला एक कार्य दिलं आणि ह्या कार्यापैकी एक कार्य आपल्याला माहित असलेल्या ह्या जगाची ओळख दाखवत असावं.
मला असं वाटतं की,हे शिस्तीत दिसणारं ब्रम्हांड, सुरवातीला असलेल्या अराजकतेतून सुव्यवस्थेत निर्माण केलं गेलं असावं.
हे विश्व योगायोगाने निर्माण झालेलं नसावं.
मला असं वाटतं की,ही पृथ्वी एका मास्टर आर्किटेक्टने तयार केली असावी. अथांग महासागरांपासून ते सर्वोच्च शिखरांपर्यंत त्याची योजना केली गेली असावी.
गंगा,ब्रम्हपुत्राच्या नदीच्या वाहत्या पाण्याला आणि निर्जन टेकडीवरील शांत धबधब्याना तो जबाबदार असावा.प्रचंड जंगलं आणि वाळवंटं पाहून मला थक्क व्हायला होतं.
त्या आर्किटेक्टला कोणतंही कार्य फार मोठं वाटलं नसावं.
आणि पृथ्वीवरचा कोणताही कोपरा त्याने रिकामा सोडला नसावा.
हा ऐहिक उत्कृष्ट नमुना निर्माण करायला दैवी हस्तक्षेपाची निर्मिती नसावी.
ती मास्टर आर्किटेक्टची योजना असावी.
ही पृथ्वी नशिबाची निर्मिती नसावी
मला असं वाटतं की, मानवाचं शरीर एका निष्णात वैद्याने बनवलं असावं.
शरीर हे जगातील सर्वात चमत्कारिक आणि गूढ गोष्ट आहे. संपूर्ण यंत्रणा ज्या प्रकारे एकत्रितपणे कार्य करते ते अकल्पनीय आहे आणि तिची निर्मिती अथांग वाटते. आपल्या रक्तवाहिन्या, स्नायूंच्या थरांनी झाकलेल्या, त्वचेच्या थरांनी झाकलेल्या करून आपल्याला दैनंदिन कार्ये सहजतेने करण्यास मदत करतात.
आपण, त्या बुद्धीमान वैद्याच्या अनंत प्रयत्ना नंतरची, उत्पादने आहोत असं समजणं हे त्या बुद्धिमान वैद्याने केलेल्या प्रतिकृतीचं वैभव आहे.हे शरीर अपघाताने बांधलं गेलं नसावं.
असं मला वाटतं.
मला असं वाटलतं की, प्रत्येकाला काही उद्देशाने घडवलं जात असावं.
माझ्या अस्तित्वाचा चमत्कार नशीबाच्या संधीचा होता हे मला पटत नाही.हे फक्त त्या सर्वशक्तिमान वैद्याचं सत्य असावं.
आपलं विश्व,आपली पृथ्वी आणि आपलं शरीर हे सर्व जाणूनबुजून निर्माण केलं असावं असं मला वाटतं.
हे सर्व विचार स्वप्नरूपाने त्या रात्री गाढ झोपेत मला व्यस्त ठेवत होते हे मला दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय होऊन जाग आल्यावर समजलं