अमर प्रेमवीर शास्त्रज्ञ युगुल - मारी आणि पिअरे क्यूरी

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
28 Apr 2024 - 8:28 pm

प्रेम, शृंगार आणि प्रणय ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य आणि अजोड देणगी आहे. तरल कवीमनाला प्रेमप्रणयशृंगाराची फोडणी घातली तर मेघदूतासारखे सुंदर काव्य जन्माला येते. परंतु तरल कवीमनातल्या प्रतिभेतून केवळ काव्यच जन्माला येते असे नाही. विज्ञानजगतातले अनेक विस्मयकारक शोध हे तरल कवीमनाच्या प्रतिभेतूनच जन्माला आलेले आहेत. वैज्ञानिक हे आपल्यातूनच निर्माण झालेले आहेत. प्रेमप्रणयशृंगार त्यांच्याकडेही असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारी आणि पिअरे क्यूरी हे वैज्ञानिक युगुल.

जन्म १५ मे १८५९ पॅरीस इथे. मृत्यू पॅरीसला १९ एप्रिल १९०६. गुरू गॅब्रिएल लिपमन. भौतिकी हे पिअरेचे कार्यक्षेत्र. किरणोत्सर्गाशी याचे देखील नाव कायमचे जोडले गेले आहे. भौतिकीमधील स्फटीकलेखन ऊर्फ क्रिस्टलोग्राफी, चुंबकत्त्व, स्फटीकवैजिकी ऊर्फ पिएझोएलेक्ट्रीसिटी, आणि किरणोत्सर्ग अशा क्षेत्रात याने संसोधन केलेले आहे. यूरेनियममधून रेडिओ किरणे बाहेर पडतात ही प्रक्रिया प्राध्यापक हेनरी बेक्वेरेलने दाखवून दिली. रेडिओ किरणे उत्सर्जित करण्याच्या या प्रक्रियेला मारी क्यूरीने रेडिओ ऍक्टीव्हिटी - किरणोत्सर्ग असे समर्पक नाव दिले. त्यावर बेक्वेरेल स्वतः, पिअरे क्यूरी आणि त्याची पत्नी मारी क्यूरी यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हेनरी बेक्वेरेल आणि क्यूरी दांपत्य अशा तिघांना मिळून नोबेल पारितोषिक देण्यात आले.

युजीन क्यूरी Eugene Curie आणि सोफी क्लेअर दिपॉयली क्यूरी Sophie-Claire Depouilly Curie या दांपत्याच्या पोटी जन्म. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या वडिलांनी पिअरेला शिक्षण दिले. कुमारवयीन पिअरेने गणित आणि भूमिती या विषयात चमक दाखवली. वयाच्या १६व्या वर्षी पिअरेने गणित विषयातील पदवी संपादन केली. नंतर त्याने वरच्या दर्जाची पदवी मिळवली परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे तो डॉक्टरेट काही मिळवू शकला नाही.

सन १८८० मध्ये पिअरे आणि तीन वर्षांनी त्याच्यापेक्षा मोठा असलेला त्याचा भाऊ जॉक्स Jacques यांनी दाखवून दिले की काही विशिष्ट स्फटीकांवर दाब दिला असता त्या स्फटीकातून वीज निर्माण होते. आजही नानाविध यंत्रात असे वैजिक स्फटीक वापरले हातात. उत्तम उदाहरणे म्हणजे घड्याळ, तराजू, इ.इ. परंतु हा विद्युद्दाब अतिशय सूक्ष्म असल्यामुळे तो मोजणे जवळजवळ अशक्य होते. आव्हान मिळाले की ते यशस्वी रीत्या पार करणे हा हाडाच्या वैज्ञानिकांचा स्थायीभावच. पिअरेने हा सूक्ष्म विद्युद्दाब मोजणारे नवे उपकरणच विकसित केले. या उपकरणाला नाव मिळाले क्यूरी स्केल. पूर्वी संगीत वाजवणार्‍या ग्रामोफोनच्या तबकड्यातील काही फोनोमध्ये स्फटीकवैजिकी - पिएझो-इलेक्ट्रीक संवेदकांचा वापर केला जात असे. नंतर मात्र चुंबकीय - मॅग्नेटीक संवेदक वापरला जात असे. आता तर ध्वनीचे रूपांतर सरळ अंकीय विदामध्ये - डिजीटल डाटा मध्ये केले जाते. आताचे डिजीटल तराजूमधील संवेदक याच स्फटीकवैजिकी तत्त्वावर चालतात. असो. हे उपकरण बनवतांना त्यांनी त्यात त्याने वजने, सूक्ष्मदर्शी मोजयंत्रमापक microscopic meter readers आणि वायुदाब नियंत्रक pneumatic dampeners अशी उपकरणे वापरली. आपल्या कार्याला जोड देण्यासाठी त्यांनी Piezoelectric Quartz Electrometer निर्माण केला.

स्फटीकावर दाब दिला असता वीज निर्माण होते ही सन १८८० मध्ये त्यांनी दाखवून दिलेली पहिली भौतिकी घटना होती. लौकरच सन १८८१ मध्ये त्यांनी याउलट भौतीकी घटना दाखवून दिली. म्हणजे काय तर याच स्फटीकाला वीज दिली तर तो दबला जातो म्हणजेच त्याचा आकार बदलतो.

किरणोत्सर्ग तसेच रेडियम यांच्याबद्दल थोडीफार माहिती शालेय पाठ्यपुस्तकात असल्यामुळे मारी क्यूरीने काय केले हे जनसामान्यांना थोडॆफार ठाऊक आहे. दैनंदिन व्यवहारात फारसा संबंध येत नसल्यामुळे जनसामान्यांना पिअरे क्यूरीच्या कार्याची वा संशोधनाची फारशी माहिती नाही. पीचब्लेंड ढवळायला मारीला मदत करणे एवढेच काम पिअरेने केले, ते ढवळायचे काम मी केले असते तर मलासुद्धा नोबेल मिळाले असते असे माझा एक शहाणा मित्र मला विनोदाने म्हणाला होता. दुसरा एक शहाणा म्हणाला होता की मारी क्यूरी हाच नवलाचा शोध लावण्याकरिता त्याला नोबेल मिळाले.

असो, आता गमतीचा भाग बाजूला ठेवून पिअरेच्या कार्याची थोडी तोंडओळख करून घेऊयात. चुंबकीय क्षेत्रावरील संशोधनाआधी पिअरेने अतिशय संवेदनाशील असा पीळमापक टॉर्शन बॅलन्स बनवला आणि त्यात परिपूर्णता आणली. चुंबकीय सहगुणक magnetic coefficients मोजण्यासाठी हा मापक वापरला जातो. बदलत्या गरजेनुसार या उपकरणाचे विविध प्रकार नंतर या क्षेत्रातील संशोधकांनी वापरले. फेरोमॅग्नेटीझम म्हणजे एखाद्या पदार्थाची कायम चुंबकत्त्व ग्रहण करण्याची क्षमता. पिअरेने फेरोमॅग्नेटीझम, पॅरामेग्नेटीझम आणि दुहेरी चुंबकत्त्व - डायामॅग्नेटीझम हे विषय डॉक्टरेटसाठी निवडले. तापमानाचा पॅरामॅग्नेटीझमवर काय परिणाम होतो यासंबंधीचा एक नियमच पिअरेने शोधून काढला. या नियमाला क्यूरीचा नियम म्हणतात. या नियमातील पदार्थाच्या स्थिरांकाला क्यूरी स्थिरांक म्हणतात. फेरोमॅग्नेटीक पदार्थाच्या गुणधर्मात एका विशिष्ट तापमानाला बदल होतो आणि त्या तापमानापेक्षा जर तापमान वाढले तर तो पदार्थ आपला फेरोमॅग्नेटीक गुणधर्म गमावतो. या तापमानाला क्यूरी तापमान म्हणतात. भूकवचाच्या हालचाली आणि पृथ्वीबाह्य चुंबकीय क्षेत्र अभ्यासतांना क्यूरी तापमान महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान कमी होण्यावरील - हायपोथर्मियावरील उपचार आणि एखाद्या पदार्थातील कॅफीनचे प्रमाण मोजणे यात क्यूरी तापमानाचा उपयोग होतो. क्यूरीचे दुःसंतुलनाचे तत्त्व Curie Dissymmetry Principle तर सुप्रसिद्ध आहे. क्लिष्टतेमुळे ते इथे देत नाही.

पिअरेचा एक मित्र होता कोसेफ विएरूफ्स कोवाल्स्की Jozef Wierusz-Kowalski. याने पिअरे क्यूरीची त्याची विद्यार्थिनी मारिया स्क्लाडोव्स्का हिच्याशी ओळख करून दिली. आपल्या संशोधनात मारियामुळे व्यत्यय येणार नाही असे ध्यानात आल्यामुळे त्याच्या मनातील तिच्याबद्दलचे कौतुक वाढले. मारिया त्याचे प्रेरणास्थानच बनली. त्याचा विवाहाचा प्रस्ताव प्रथम तिने नाकारला परंतु नंतर मात्र २६ जुलै १८९५ मध्ये त्यांनी विवाह केला.

आयरीन जोलिएत क्यूरी आणि ईव्ह क्यूरी अशा दोन कन्यारत्नांना पिअरे आणि मारी यांनी जन्म दिला. नंतर आयरीनने देखील आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून आपला पती जोलिएतच्या साथीने नोबेल पारितोषिक मिळवले.

पोलोनियम आणि रेडियम वेगळे करण्याच्या कामात पियरेने मारीला साथसोबत केली. रेडिओऍक्टीव्हिटी हा शब्दच अगोदर नव्हता. हा शब्दप्रयोग या दोघांनी पहिल्यांदा केला. किरणोत्सर्जनाचा अभ्यास कसा करावा याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. अर्थातच किरणोत्सर्जनाचे मानवी तसेच इतर जीवांच्या शरीराला असलेले धोके तेव्हा ठाऊक नसल्यामुळे त्यासंबंधीच्या दक्षतेचे नियम नंतर बनले. रेडियम कणांतून निघणार्‍या उष्णतेचा स्रोत अचूक ओळखून सगळ्यात अगोदर अणुगर्भीय ऊर्जेचे अस्तित्त्व हे पिअरे आणि त्याचा एक विद्यर्थी अल्बर्ट लबोर्द यांनी शोधून काढले. चुंबकीय क्षेत्राचा वापर करून त्यांनी दाखवून दिले की किरणोत्सर्गी पदार्थातून तीन प्रकारच्या प्रारणांचे उत्सर्जन होते. एका प्रकारचे प्रारण धन विद्युत्भारित, दुसरे ऋण विद्युत्भारित आणि तिसरे कोणताही विद्युत्भार नसलेले. या प्रारणांना अनुक्रमे आल्फा, बीटा आणि गॅमा प्रारणे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच.

पिअरे हा निरीश्वरवादी होता. तरीही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस स्वतः जिवंत असतांना देखील मृतांशी संपर्क साधणार्‍या अंधश्रद्ध टोळक्यांशी त्याचा संपर्क आला. मृतांऐवजी त्यांनी चुकून जित्यांशी संपर्क साधला असावा. पिअरेने त्यांचे प्रयोग पाहिले. परंतु या प्रयोगांची त्याने हेटाळणी मात्र केली नाही. चुंबकीय क्षेत्राशी याचा संबंध असू शकेल का याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने केला. याबद्दल त्याने मारीयाला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेला आहे. परंतु सुदैवाने तो नाद त्याने अर्ध्यावरच सोडला आणि आपले शास्त्रीय संशोधन सुरू ठेवले.

पिअरेच्या डोक्यात नेहमी सत्राशे साठ कल्पना आणि गणिते घोंगावत असत. सन १९०६ साली नेहमीप्रमाणे विचारात हरवलेला पिअरे बेसावधपणे रस्ता पार करतांना घोडागाडीखाली सापडला. त्याच्या डोक्यावरूनच चाक गेले, कवटीला तडा गेला आणि जागच्या जागी वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी पिअरेचा अकस्मात दुःखद मृत्यू झाला. नंतर असेही म्हटले गेले आहे की पिच ब्लेंड ढवळतांना आणि इतर प्रक्रियात पिअरेचे शरीर इतक्या प्रखर किरणोत्सर्गाला एवढे जवळून सामोरे गेले होते की अपघाती मृत्यू झाला नसता तर त्याचा किरणोत्सर्गाच्या शारिरिक दुष्परिणामांमुळे लौकरच मृत्यू झाला असता. काही असले तरी आपल्याला त्याच्या मृत्यूने हळहळायला होते आणि तो अकालीच झाला असे वाटते.

सन १९१० साली भरलेल्या किरणोत्सर्जन परिषदेत किरणोत्सर्जनाची तीव्रता मोजण्याच्या एककाला क्यूरी असे नाव देण्यात आले. त्यानंतर बराच धुरळा उडाला. काहींच्या मते ते मारी क्यूरीचे नाव म्हणून दिले तर काही जण म्हणू लागले की ते पिअरेचे नाव म्हणून दिले. उपद्व्यापी फ्रेंच पापाराझी तेव्हाही सक्रीय होते असे वाटते. मतमतांतरे काहीही असोत, पिअरेच्या मृत्यूपर्यंत पिअरे आणि मारी हे अद्वैतच होते हे पिअरेच्या खालील वाक्यावरून दिसून येते. तेव्हा क्यूरी हे एकक हा दोघांचाच सन्मान आहे. मारीचा असता तर एककाला नाव मारी दिले असते आणि पिअरेचे द्यायचे असते तर एककाला नाव पिअरे दिले असते. क्यूरी द्यायचे काही कारणच नव्हते.

"खरे तर असे काही घडू शकेल अशी आशा करायचे माझे धाडस नाही, परंतु तुझी तुझ्या राष्ट्राबद्दलची स्वप्ने, आपली मानवतेबद्दलची स्वप्ने, आणि आपली विज्ञानविषयक स्वप्ने अशी सर्व स्वप्ने झपाटल्याप्रमाणे साकार करण्यासाठी जर आपण आयुष्य एकमेकांसमवेत घालवले तर ते सारे किती सुंदर असेल" असे सुरेख उद्गार पिअरेने एकदा मारीयाशी बोलतांना काढले होते. किती भव्य, उदात्त दृष्टिकोन. खरेच पिअरेचे विशाल, स्वप्नाळू मन पाहून आपण नतमस्तक होतो. वा! पिअरे वा!!

सर्वात मोठा - फ्रेंच देवत्त्वाच्या जवळ जाणारा मान मात्र त्याला मारीबरोबर जोडीने प्राप्त झाला. मारीचे अणि पिअरेचे अवशेष पॅन्थिऑनमध्ये दफन करण्यात आले. अशा या पिअरे क्यूरीला वंदन करून हा लेख संपवतो.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

29 Apr 2024 - 8:15 am | कुमार१

अभ्यासपूर्ण रंजक लेख आवडला.

पिअरे आणि मारी हे अद्वैतच होते

+११