अपहरण - भाग ९ (अंतिम)

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
12 Mar 2024 - 7:02 pm

भाग ८ - https://misalpav.com/node/51997

अमेरिकेने पेटॅगोनियावर अचानक हल्ला केला होता. त्यामागचं कारण मात्र लज्जास्पद होतं. राष्ट्रप्रेमाने चुकीचं टोक गाठल्यामुळे ही परिस्थिती ओढवली होती. त्यातून आणखी शरमेची गोष्ट अशी, की पेटॅगोनियाजवळ अमेरिकेहून जास्त जहाजं होती. नौदलाच्या तळांवर एकच गोंधळ उडाला होता. पोटोमॅक नदीवरच्या तळावर तर खासच. जुन्यापान्या पहाऱ्याच्या नौकांना नवी झिलई देऊन नौदलात भरपूर नवी जहाजं असल्याचा आभास निर्माण केला जात होता. हजारो मैलांवरच्या शत्रूच्या किनाऱ्यावर हल्ला करण्यासाठी बंदुका पाठवल्या जात होत्या. नौदलाधिकारी भराभर आपल्या कचेऱ्यांतल्या तारयंत्रातून गुप्त संदेश पाठवत होते. ब्रिटनने युद्धनौका भाड्याने द्याव्या अशी विनंती करत होते. पण ब्रिटनने नम्रपणे नकार दिला होता. नौदलाला अमर्याद अधिकार देणारा कायदा मंजूर झाला होता.

या गदारोळात अचानक एक अनपेक्षित घटना घडली. त्यामुळे वॉशिंग्टन मधल्या नौदल खात्यातला गोंधळ आणखी वाढला.

सकाळचे नऊ वाजत होते. अनेक युद्धनौका सफरीसाठी तयार होत होत्या. तितक्यात परदेशी बनावटीचं एक जहाज नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना हेलकावत येताना दिसलं. आजूबाजूच्या जहाजांवर लपवलेले टॉर्पेडो जणू अंतर्ज्ञानाने चुकवत ते येत होतं. नौदलाच्या सर्वात मोठ्या जहाजासमोर येताच, अकस्मात एक गिरकी घेऊन ते थांबलं. त्या मोठ्या जहाजावर इशारतीचे ढोल वाजले, आणि सर्व खलाशी सावध होऊन शस्त्रं उचलून तयार झाले. बंदूकधारी सैनिकांना आपापल्या ठाण्यांवर बोलावण्यात आलं. हे नुकतंच आलेलं नवं जहाज शत्रूचं जहाज आहे, आणि इथे नासधूस करून झाल्यावर ते स्वतःही नष्ट व्हायच्या तयारीने आलं आहे, अशी कुजबुज झाली. झेंडा नाही, शीड नाही, नुसतंच जहाज.. म्हणजे जबरदस्त आक्रमणाच्या.. आत्महत्येच्या तयारीने आलेलं दिसतंय.. अमेरिकन नौदल हादरलं. आता आपल्या कोणत्या जहाजावर हल्ला होणार? अधिकारी थंड पडले. शिव्या पुटपुटू लागले. शत्रूचं जबरदस्त धैर्य पाहून गर्भगळित झाले. त्या अनोळखी पण भयंकर जहाजावर फक्त एक मुलगा दिसत होता. त्याने एक रुमाल काढला आणि हलवला. बहुतेक त्याने एखादी कळ दाबली असावी. त्यासरशी जहाजाने नांगर टाकला. हे पाहताच नौदल कॅप्टन आणि बंदूकधारी खलाशी जरासे सावरले. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. एव्हाना हे नवं जहाज आल्याची कुणकुण सर्वांना लागली. किनाऱ्यावर हजारो माणसं गोळा झाली. ती घाबरून कापत होती, पण हे काय गौडबंगाल आहे ते पाहायची उत्सुकता मोठी.

शेवटी कोणाला तरी सुचलं, एखादी होडी घेऊन या जहाजापर्यंत जाऊ, वर जाऊन पाहू. वीसेक माणसं एक लॉन्च घेऊन सावधपणे पुढे सरकू लागली.
"अहॉय! कोणत्या देशाचं जहाज आहे हे?"
"अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी मी एक पत्र आणलं आहे, " उत्तर देताना त्या मुलाचे ओठ थरथर कापत होते.
"कोणाचं जहाज आहे हे? शिडी खाली सोडा रे." लगेच जहाजातून दोन खलाशी बाहेर आले, आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी शिडी खाली सोडली.
"हे अमेरिकेचं जहाज आहे. हे तुम्ही ताब्यात घ्या. कृपा करून मला जाऊ द्या, हे पत्र द्यायचं आहे." मुलाने उत्तर दिलं. लॉन्चवरच्या अधिकाऱ्याला कमालीचं आश्चर्य वाटलं. त्याने झटक्यात जहाजावर उडी मारली. जहाजावर नाव नव्हतं. "नाव काय या जहाजाचं?" त्याने अधीरतेने विचारलं.
"या जहाजाला नाव नाही. पूर्वी होतं, बिजली. पण आता राष्ट्राध्यक्षांनी नवीन नाव ठेवावं." तो मुलगा संथपणे म्हणाला.
"xxxxx! मला आधीच कळायला हवं होतं." अधिकारी किंचाळला. " कुठे आहे तो? आणि तू कोण?"
"ते आलेले नाहीत. या पत्रात सगळं लिहिलं आहे, सर. मी त्यांचा मुलगा."

रूपर्टने दोन्ही हात चाकाच्या अऱ्यांवर ठेवले. तो ताठ मानेने समोर पाहत होता. सोन्याची नाणी घेऊन बिजली पसार होताना तिचा पाठलाग करण्याचा हुकूम सोडणारा अधिकारी आज त्याच्याशी बोलत होता. त्याक्षणी कसले विचार येत असतील त्या पोराच्या मनात? काही क्षणांपूर्वी केलेल्या त्या आदर्शवादी कृतीचा त्याला पश्तात्ताप होत असेल का? नांगर टाकण्याऐवजी तो उचलून, जहाज वाऱ्याच्या वेगाने पळवत इथून दूर न्यावं अशी तीव्र इच्छा त्याला वाटली असेल का? पूर्वीचं स्वातंत्र्य, बेकायदेशीर वागणं आठवून अपराधी वाटत असेल का? की मानहानीने विदीर्ण झालेलं त्याचं हृदय आता जहाज सरकारला देऊन प्रायश्चित्त घेतल्यामुळे सावरलं असेल?

बराच वेळ तो अधिकारी रूपर्टला नुसता पाहत होता. संपूर्ण अमेरिकेला ज्याचा तिरस्कार वाटतो, त्या कुप्रसिद्ध गुन्हेगाराचा हा मुलगा!
"दे, ते पत्र मला दे." सरतेशेवटी तो म्हणाला. त्याचा आवाज मात्र मृदू होता. या तरुण मुलाचा प्रामाणिकपणा आणि देशप्रेम एकवटून आल्याचं लक्षात येऊन त्याला आदर वाटला.
"हे पत्र माझ्या स्वतःच्या हाताने राष्ट्राध्यक्षांना द्यावं, असा आदेश मला मिळाला आहे." रूपर्टने छातीवर हात ठेवून सांगितलं.
"ठीक आहे. मग तू तसंच कर. ते पहा राष्ट्राध्यक्ष तिकडे आहेत."

अधिकाऱ्याने एका मोठ्या जहाजाकडे बोट दाखवलं. "त्या जहाजात आहेत ते. या क्षणी ते तुलाच पाहताहेत. चल, मार उडी."
एकदम रुपर्टचं अवसान गळालं. क्षणभर त्याचं धैर्य नाहीसं झालं. त्याने कशीबशी धडपडत लॉन्चमध्ये उडी मारली. राष्ट्राध्यक्षांच्या भोवती अनेक बघ्यांचा घोळका जमला. जणू त्यांचं सुरक्षा कडंच. "दगाबाज" चहूकडून माणसं एकमेकांच्या कानात कुजबुजू लागली. त्या अधिकाऱ्याला राष्ट्राध्यक्षांकडे पोहोचायला मोकळी वाट मिळेना. "येऊ द्या त्याला." राष्ट्राध्यक्ष अधिकारवाणीने म्हणाले. नौदलाच्या दुर्बिणीतून ते बिजली, रुपर्ट, आणि अधिकारी, सर्वांना न्याहाळत होते. "मी ओळखतो या मुलाला. वाट मोकळी करा. त्याला एकट्याला पुढे येऊ द्या."

मग राष्ट्राध्यक्ष आणि रुपर्ट दोघांना मध्यभागी ठेवून त्यांच्याभोवती कडं तयार झालं. रूपर्टने डोक्यावरची टोपी काढली. त्याच्या हातात ते पत्र होतं, आणि हात थरथर कापत होता. राष्ट्राध्यक्षांनी रूपर्टला काही क्षण शोधक नजरेने न्याहाळलं. "रुपर्ट ऑडमिंटन! काहीएक मोठा हेतू मनात धरून आला आहेस तू. सांग पाहू काय ते."रुपर्ट निःशब्द उभा राहिला. त्याची मान असहायपणे खाली झुकली. नौदलाचा बँड कडाडून वाजावा, तसं त्याचं रक्त धमन्यांतून जोराने उसळ्या मारू लागलं. त्याने ते पत्र राष्ट्राध्यक्षांच्या हातात दिलं. त्यांनी ते घेतलं, आणि उघडून वाचलं. मग त्यांनी जी कृती केली, ती पाहणारं कोणीही ती विसरू शकणार नाही. आपल्या अपहरणकर्त्याच्या मुलाला त्यांनी जवळ घेतलं. डाव्या हाताने त्याच्या डोक्याला आधार दिला. मग दमदार आवाजात ते पत्र वाचू लागले.

"माननीय राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकन नागरिकहो, मी स्वतःला देव समजत होतो. पण मी एक गुन्हेगार आहे हे मला समजलं आहे. लोकांना धडा शिकवण्याची खुमखुमी होती मला. पण प्रत्यक्ष मृत्यू देखील शिकवू शकणार नाही, असा धडा मी शिकलो आहे. माझी मालमत्ता मी तुमच्या स्वाधीन करत आहे. राष्ट्राच्या खजिन्यातून चोरलेलं सोनं या जहाजात एका गुप्त तिजोरीत ठेवलेलं आहे. ते माझा मुलगा तुम्हाला दाखवेल. ती आपल्या राष्ट्राची मालमत्ता आहे. त्यात एक लाख वीस हजार डॉलर्स कमी भरतील. त्या किमतीची भरपाई म्हणून हे जहाज स्वीकारावं. जगातलं हे सर्वात वेगवान जहाज याहून कितीतरी जास्त किमतीचं आहे. जहाजाला कृपया नवीन नाव द्यावं, आणि नजिकच्या युद्धासाठी सेवेत रुजू करून घ्यावं. त्यावर पडलेला लांछनाचा डाग कधीच न पुसता येण्यासारखा आहे. कदाचित युद्धात साथ दिल्याने तो थोडासा फिकट होईल, अशी आशा. माझ्या इमानाचं प्रतिक म्हणून मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करत आहे.

राष्ट्राध्यक्ष महोदय, आज मी देशहीन झालो आहे. जगातल्या कोणत्याच देशाचा मी नागरिक नाही. तुम्हाला मी एक विनंती करतो. तुमच्या अंतःकरणात दयेचा पाझर फुटला, तर कृपा करून मला क्षमा करा. इथल्या मातीवर माझं प्रेम आहे. या मातीवर मला अखेरचा श्वास घेऊ द्यावा ही विनंती. तुम्ही मला क्षमा करायचं ठरवलंत, तर कृपा करून तो निरोप माझ्या मुलाबरोबर शक्यतो लवकर पाठवा. माझं पाप माझ्या मानगुटीवर बसलं आहे. मी फार काळ जगेनसं वाटत नाही.

- ऑडमिंटन"

"हा कोणी साधासुधा इसम नव्हे." राज्यसचिव म्हणाले. त्यांचा आवाज जड झाला होता. "क्षमेचा निरोप ताबडतोब पाठवावा असं मी सुचवतो. झाली एवढी शिक्षा पुरेशी आहे." राष्ट्राध्यक्ष हलकेच हसले आणि नौदल प्रमुखांना म्हणाले, "हे जहाज आपल्या ताब्यात घ्यावं का? मला वाटतं जहाजावरचं सोनं ठेवायला राष्ट्राच्या तिजोरीत जागा सापडेल. कर्नल ऑडमिंटनकडून आलेल्या खंडणीसाठी नौदलात जागा आहे का?"नौदल प्रमुखांचे डोळे लकाकले. "या जहाजावर टॉर्पेडो बसवले, तर आपण सगळ्या जगावर हुकूमत गाजवू शकतो. आधी या बारक्याला नौदलात भरती करून घेतो. इतर कोणाहीपेक्षा याला खडानखडा माहिती असणार या जहाजाची. राष्ट्राध्यक्ष महोदय, आपली परवानगी असेल तर ताबडतोब याचा दाखला करतो." नौदलप्रमुख आदराने झुकून म्हणाले.

"काय रे, येशील का अमेरिकन नौदलात?" राष्ट्राध्यक्ष रूपर्टसमोर वाकून म्हणाले. जणु तो त्यांचाच मुलगा असावा, तसे.
"सर.. पण माझे वडील.." अभिमान, शरम आणि पितृप्रेमाच्या भाराने रूपर्टला रडू फुटलं.
"क्षमेचा निरोप उद्या पाठवून देऊ." राष्ट्राध्यक्ष उदारपणे म्हणाले.
"नाही. आता लगेचच गेलं पाहिजे. मला वाटतं, त्यांना आताच त्याची गरज आहे." रुपर्ट घाबऱ्या आवाजात पुटपुटला. मग भावनातिरेकाने तो खाली कोसळला. कोणीतरी त्याला उचलून बाजूला घेतलं.

दलदल म्हणजे एक अद्भुत प्रकरण. तिची जितकी ओळख होते तितकी ती जास्त आवडू लागते. "बाबा! बाबा!" उंच आवाजातल्या रुपर्टच्या हाका तिथल्या स्तब्ध वातावरणाला चिरून जात होत्या. कोणाला दिसणारही नाही अशा त्या किनाऱ्यावर लपलेलं कॅम्पहाऊस रिकामंच होतं. रुपर्ट आणि नौदल अधिकारी घाईने आणि धसक्याने शोध घेत चालले होते. "झाडीत असतील ते.. या लवकर या.."

भेदरलेल्या रूपर्टपाठोपाठ नौदल अधिकारी झाडीत झेपावले. झाडांच्या उदासवाण्या सावल्यांनी त्यांना घेरून घेतलं. तिथली दमट खारट हवा, नवनवे वास त्यांना जाणवू लागले, खेचून घेऊ लागले. पण त्यांची पावलं रूपर्टच्या मागे वेगाने चालली होती. "या! लवकर या!" रूपर्टची उंच आवाजातली हाक त्यांच्या कानी आली. काही लक्षात येईपर्यंत ते एका मोठ्या झाडाखाली पोहोचले होते. तिथे रुपर्ट गुडघे टेकून बसला होता. झाडाखाली कोणी झोपलं होतं.
"बाबा! बाबा! त्यांनी तुम्हाला क्षमा केली आहे. सारं काही ठीक आहे आता."

पण या विनवण्या अचानक थांबल्या. अधिकारी पुढे झाले. त्यांनी आपला हात रूपर्टच्या मस्तकावर ठेवला. कर्नलचे प्राण त्यांना सोडून गेले आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. कर्नलचे हात त्या झाडाभोवती पसरले होते. त्यांचं अंग झाडाच्या मोठाल्या मुळांवर टेकलं होतं. त्यांनी जणू नुकतंच खोडाचं चुंबन घेतलं असावं असे त्यांचे ओठ दिसत होते. शेवटी त्यांच्या पापाने त्यांना इतकं जखडून टाकलं असावं, की अमेरिकेच्या मातीला हात लावायचीसुद्धा त्यांची हिंमत झाली नाही.

क्षमा मिळण्यापूर्वीच त्यांचा शेवट झाला होता. शेवटपर्यंत त्यांच्या मनानेच त्यांचा छळ करावा, असंच विधिलिखित होतं. ते कधी मरण पावले, हे नेमकं सांगता येत नव्हतं. कारण त्यांच्या भरदार शरीराचा जोम कायम होता. मुंग्या त्यांच्याकडे फिरकल्या नव्हत्या, आणि तो शोकमग्न ओक वृक्ष जणू सांगत होता, की मी त्यांना शेवटपर्यंत माझ्या उबदार मांडीवर जागा दिली. आसरा शोधत ज्या वृक्षापाशी ते परतले होते, त्याच वृक्षाखाली त्यांना पुरण्यात आलं. क्षमेच्या निरोपाचं पत्र त्यांच्या घडी घातलेल्या हातांमध्ये ठेवण्यात आलं.

नौदल अधिकारी दलदलीतून बाहेर पडले. त्यांनी डोक्यावरची टोपी काढून हातात घेतली होती. स्वतःच्या मनातल्या भावना त्यांच्या त्यांनाच उमगत नव्हत्या. रडवेला रुपर्ट त्यांच्यामागून चालत होता. कर्नलच्या थडग्याच्या वर त्याला सळसळ ऐकू आली, आणि ती कसली होती, तेही त्याच्या लक्षात आलं. त्या ओक वृक्षाची निरोपाची सळसळ होती ती.

(भाषांतर) समाप्त.

मूळ कथा - A Republic Without A President And Colonel Odminton By Herbert D. Ward (1891)

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

diggi12's picture

13 Mar 2024 - 2:19 pm | diggi12

सुंदर

श्वेता व्यास's picture

13 Mar 2024 - 4:50 pm | श्वेता व्यास

कथा तर आवडलीच, अनुवाद खूप छान झाला आहे.

टर्मीनेटर's picture

13 Mar 2024 - 5:47 pm | टर्मीनेटर

मस्त! अनुवादित कथा (नेहमीप्रमाणेच) आवडली 👍
प्रत्येक भागागणीक उत्सुकता वाढवत जाणाऱ्या ह्या वेगळ्या कथेचा शेवटही काहितरी वेगळाच असेल असे वाटत होते, पण शेवटी क्राईम नेव्हर पे'ज ह्याच तत्वज्ञानावर आधारीत झालेला पाहुन फार नाही पण थोडासा निराश झालो 😀

पुढील कथेच्या प्रतिक्षेत...

स्मिताके's picture

14 Mar 2024 - 5:37 pm | स्मिताके

diggi12, श्वेता व्यास, टर्मीनेटर - प्रतिसादांबद्दल आभारी आहे. मला ही वेगवान कथा फार आवडली आणि भाषांतर करताना खूपच मजा आली. तुम्हां सर्वांनाही ती आवडल्याचं वाचून आनंद द्विगुणित झाला आहे.

अवांतर - मूळ कथालेखक वृत्तपत्रांमधून लिहीत असत असा उल्लेख विकिपीडियावर आढळला. या कथेतले बातम्यांचे मथळे आणि उत्सुकता वाढवण्याची शैली या लेखनाशी निगडित असावी असं वाटलं.

टर्मीनेटर, तुमच्या कल्पनेतला शेवट कसा होता तेही लिहा.

तुमच्या कल्पनेतला शेवट कसा होता तेही लिहा.

शेवट कसा होइल ह्याविषयी एक कल्पना डोक्यात आली होती, ती टंकण्यासाठी वेळ मिळेल तेव्हा नक्की लिहितो!
(स्वगत : प.पू. पैजारबुवा माझ्यासाठी एका टंकनीकेची व्यवस्था करतो असे म्हणाले होते, त्याचे पुढे काय झाले हे एकदा त्यांना विचारावे म्हणतो 😂 😂 😂)

जोक्स अपार्ट... एका वाक्यात सांगायचे तर, आठवा भाग वाचल्यावर मला वाटलं होतं की उर्वरीत जगाचे दरवाजे बंद झाल्यावर कहितरी शक्कल लढवुन बिजलीला जलसमाधी देउन किंवा अन्य मार्गाने नष्ट करुन कर्नल ऑडमिंटन, रुपर्ट आणि त्यांचे उर्वरीत सहकारी त्यांच्या गुप्त 'कॅम्पहाऊस' वर राहुन पुढचे आयुष्य मजेत घालवतील वगैरे वगैरे...

स्मिताके's picture

14 Mar 2024 - 7:40 pm | स्मिताके

हो, ते शक्य झालं असतं.. म्हणजे टंकनिकेचं माहित नाही, पण कथेचा असाही शेवट होऊ शकला असता. इतके पैसे जवळ असताना गुप्तता सांभाळणं शक्य झालं असतं. लिहाच नक्की.