अपहरण - भाग ८

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
10 Mar 2024 - 7:10 pm

भाग ७ - https://www.misalpav.com/node/51987

बिजली किनाऱ्याजवळ चालली होती. कर्नल पाहत उभे होते. त्यांनी आपल्या मुलाला बाहेर जाऊ दिलं नाही. दोघे एकमेकांशेजारी उभे राहून संतप्त जमाव न्याहाळत होते. कोस्ट गार्डचे सैनिक सज्ज होते. बिजली कधी धक्क्याला लागते याची वाट पाहत होते. ती पन्नास फुटांवर येताच कोस्ट गार्डच्या प्रमुखाने मोठ्याने गर्जना केली, "थांबा!"

कॅप्टन ख्रिश्चनने ताबडतोब आज्ञा पाळली. त्या अंतरावरून कॅप्टन आणि खलाशांना बंदरातले रहिवासी स्पष्ट दिसत होते. प्रत्येकजण हातात दगड घेऊन सज्ज होता. कोणत्याही क्षणी दगडफेक सुरु झाली असती. सर्वांचे चेहरे तिरस्काराने ताणलेले होते. समुद्री चाच्यांचा तिरस्कार ही तर ब्रिटिश परंपरा.
"अर्ध्या तासाच्या आत मागे फिरा. हा किनारा सोडून निघून जा!" कोस्ट गार्डच्या प्रमुखाने पुन्हा गर्जना केली, "तुमच्यापैकी कोणीही किनाऱ्यावर पाऊल ठेवताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश मी दिलेले आहेत. ब्रिटिश किनाऱ्यावर चाच्यांना थारा नाही. जा, मागे फिरा!"

"जा. मागे फिरा. निघून जा!" सर्व कंठांतून एकच प्रतिध्वनी भेदरलेल्या खलाशांच्या दिशेने घोंघावत आला. जहाजात कर्नलच्या कानांवर या आरोळ्या पडल्या, आणि त्यांचा अर्थ त्यांना नीट समजला. पण या देखण्या जहाजाचं नुसतं दर्शन जरी झालं, तरी चीनपासून सॅन फ्रान्सिस्को पर्यंतच्या प्रत्येक बंदरात तिरस्काराचं आणि असंतोषाचं असंच प्रात्यक्षिक बघायला मिळेल, याची कल्पना ना कर्नलना आली, ना त्यांच्या खलाशांना.

कर्नलनी घाईघाईने हुकूम दिला, "नांगर उचला." दहा मिनिटांत, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या खलाशांसहित बिजलीने मोर्चा वळवला. कर्नलचा चेहरा पांढराफटक पडला होता. हात थरथर कापत होते. डोळ्यांसमोर अंधारी आली होती. अशा अवस्थेत त्यांनी बिजलीला त्या असंतुष्ट बंदरातून बाहेर काढलं.

तासाभरात पेनझान्सची बातमी जगभर पसरली. या सर्वात छोट्या ब्रिटिश बंदरापासून फ्रान्स किनारपट्टीपर्यंत सर्वत्र जल्लोष झाला. कर्नल ऑडमिंटन आपल्या केबिनमध्ये एकटेच बसले होते. त्यांना आतापर्यंत वाटणारं समाधान नाहीसं झालं होतं. आपल्या मागावर येणाऱ्या कळपातला पहिला शिकारी कुत्रा पाहून सावज ठरलेल्या कोल्ह्याला वाटावी तशी भीती त्यांना वाटू लागली होती.

"आता पुढे कुठे जायचं?" कॅप्टन ख्रिश्चनने दारावर हलकेच थाप मारली, आणि हळूच दार उघडून हुकुमाची वाट पाहू लागला. कॅप्टन ख्रिश्चनचा स्वभाव अगदी सावध होता. त्यामुळे संपूर्ण जहाजावर त्याला एकट्यालाच परिस्थितीचं गांभीर्य पूर्णपणे समजलं होतं.

कर्नल ऑडमिंटननी संतापाने वळून पाहिलं, आणि ते कॅप्टनच्या अंगावर खेकसले, "जा, नरकात जा बघू !"

"येस सर." कॅप्टनने आदराने उत्तर दिलं, "पण तिथे अन्नपदार्थ मिळत नाहीत."

मध्यरात्र उलटून गेली होती. ब्रेस्ट च्या बंदरात काहीतरी आपटल्याचा आवाज आला. मागोमाग पाण्याची खळखळ, साखळीचा आवाज. म्हणजे नांगर पडला. आणखी एक जहाज बंदरात आलं. जहाजाच्या दोन्ही बाजूंचे दिवे पट्कन मालवले गेले. पाण्यावर हिंदकळणाऱ्या त्या जहाजाच्या पुढल्या टोकावर एक पांढरा दिवा दिसत होता. अशा अपरात्री कोणी कुतूहलाने पाहत असलंच, तर हे जहाज रात्री इथेच मुक्काम करणार, हे त्यांना समजलं असतं. आजूबाजूच्या जहाजांवरून रात्रीच्या दोन वाजता पहारा बदलायची इशारत म्हणून घंटा किणकिणल्या. पण या नव्या पाहुण्या जहाजाने त्यांच्यामागून आपल्या घंटांचा प्रतिध्वनी उमटवून काळाला वंदन केलं नाही.

रात्रीच्या काळोखात बारीक नजरेने पाहणाऱ्याला बंदराच्या डाव्या उजव्या बाजूला शंभरेक फुटांच्या आत अनेक जहाजं दिसली असती. फ्रान्सच्या भूमध्यसागरी तुकडीतली ही जहाजं काल इथे दाखल झाली होती, आणि उद्या शेर्बर्गला रवाना होणार होती. रात्रीपर्यंत फेऱ्या मारणाऱ्या लॉंचने सगळे उमदे नौसैनिक जहाजांवर पोहोचवले होते. शूर सैनिकांच्या या तुकडीत आता शांतता नांदत होती.

नुकतंच बंदराला लागलेलं हे नवं जहाज स्तब्ध होतं. त्याच्या पोर्ट होल्सना आतून लावलेल्या रेशमी पडद्यांमधून हलकेच प्रकाश उजळताना दिसत होता. कर्नल ऑडमिंटन आपल्या मुलाच्या बिछान्याजवळचे पडदे ओढून घेत होते. त्यांची नजर मुलावर खिळली होती. त्यांच्या नजरेत अनेक परस्परविरोधी भावना उमटत होत्या. मुलाची झोप अस्वस्थ वाटत होती. कर्नलची चाहूल लागताच तो चुळबुळ करू लागला. स्वतःशी काही पुटपुटू लागला. त्याची झोपमोड होईल या भीतीने कर्नल आपलं दुःख आवरत हलकेच आपल्या केबिनमध्ये परतले. तिथे पोहोचताच त्यांनी ब्रँडीचा मोठा ग्लास भरून घेतला, आणि रागारागाने येरझारे घालू लागले.

दरवेळी समुद्राच्या लाटांबरोबर जहाजाची लाकडं करकरली, की कर्नलची भेदरलेली नजर दाराकडे वळत होती. त्यांचा चेहरा पार बदलून गेला होता. आता ते चतुर, सराईत आणि यशस्वी गुन्हेगार नसून फरार व्यक्ती होते. संशय आणि अविश्वास भरल्या मनाने ते बदला घ्यायला तयार झाले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ त्या गॅटलिंग मशीनगन्स असल्या असत्या, तर त्यांनी पेनझान्सच्या रहिवाशांना चांगला धडा शिकवला असता. मला, या कर्नलला धमक्या देतात, शिव्या देतात म्हणजे काय? आज प्रथमच त्यांचं मन स्वतःच्या ब्रिटिश संस्कृतीविषयी बंड करून उठलं. ब्रिटन आणि ब्रिटिश यांच्याविषयी जोरदार तिरस्कार दाटून आला.

पण फ्रान्सची गोष्ट निराळी. इथे सहिष्णुता आहे. कर्नलना इथे सुरक्षित वाटू लागलं. नेपोलियनच्या एका इशाऱ्याबरोबर राष्ट्रप्रेमाने धुंद होऊन प्राणांची आहुती देणारा देश आहे हा. मग इथे खुल्या मनाचे लोक असणारच. कर्नलना ठाऊक होतं, की अगदी फ्रान्सचे राष्ट्रपती येणार नाहीत आपल्या स्वागताला, पण निदान लोक आदर आणि निरागस कुतूहल दाखवतील. त्यामुळे त्यांचा मान सुखावला असता, आणि ब्रिटनमध्ये मिळालेल्या वाईट वागणुकीची आठवण पुसली गेली असती. त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू सद्भाव दिसू लागला. काही वाईट कृत्यामुळे तिरस्कृत होऊन वाळीत पडलेल्या व्यक्तीचा भेदरलेला, धुमसणारा चेहरा पुसला जाऊन आता तिथे आशेचा किरण दिसू लागला होता. कैदेची मुदत संपत आलेल्या कैद्याचा भाव दिसू लागला होता.

फ्रेंच लोकांबद्दलच्या कल्पनांनी कर्नल सुखावले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटलं. इतर देशांबद्दल तिरस्कार उफाळून येऊन त्यांनी एक जोरदार चुटकी वाजवली.हलकेच कानोसा घेत त्यांनी सावधपणे आपली गुप्त तिजोरी तपासून पाहिली, आणि मग ते झोपी गेले. त्यांना खडबडून जाग आली, तेव्हा वरच्या डेकवरून जोरदार आवाज येत होते. आपल्याला काही मिनिटं डुलकी लागली असेल असं त्यांना वाटलं, पण प्रत्यक्षात काही तास उलटून गेले होते. वर कोणीतरी खाडखाड बूट आपटत चालत असावं. त्या आवाजात नांगराच्या दोराचं चाक फिरल्याचा आवाज मिसळला होता.कर्नल झोपेच्या ग्लानीतून जागे होईपर्यंत केबिनच्या दारावर कोणीतरी अधीरपणे थापा मारू लागलं. कर्नलनी दार उघडलं. कॅप्टन ख्रिश्चन तीरासारखा आत घुसला. नेहमीच्या त्याच्या शांत चेहऱ्याला भीतीने झाकोळून टाकलं होतं.

"मेलो! मेलो!" इंग्लिश आणि डॅनिशची सरमिसळ करत तो किंचाळला, "दहा मिनिटांत ते आपलं जहाज उडवणार आहेत." पुढे त्याला बोलता येईना. त्याचे दात नुसतेच कडकड वाजू लागले. भीतीने त्याचं अंग ताठरलं. अशक्य घाई करून कर्नलनी कपडे चढवले आणि ताबडतोब डेकवर पोहोचले. डोक्यावर टोपी चढवायला वेळ नव्हता. त्यामुळे उगवत्या सूर्याच्या तांबड्या किरणांनी त्यांचं मस्तक उजळलं. त्यांचा देखणा चेहरा आता खलनायकी दिसू लागला होता. एका जोरदार आरोळीने त्यांचं स्वागत झालं. अमेरिकन नौदलापेक्षा बलाढ्य युद्धनौकांच्या वेढ्यात आपण उभे असलेले पाहून कर्नलचं अवसान गळालं. ते थरथर कापू लागले. पहाटे तांबडं फुटत असताना त्या महाकाय युद्धनौकेच्या पहारेकऱ्याने हे आगंतुक जहाज ओळखलं होतं, आणि आपल्या वरिष्ठांना एक संशयास्पद जहाज दिसल्याची वर्दी दिली होती. अमेरिकेशी मित्रत्वाचे संबंध, त्यामुळे फ्रेंच सरकारने त्वरेने या नतद्रष्ट कर्नल आणि त्यांच्या जहाजाबद्दल पत्रकं वाटली होती. "हे जहाज फरार आहे, नजर ठेवा." असा हुकूम नौदलाच्या या तुकडीला कालच मिळाला होता. या गुन्हेगाराला जीवे मारायचं नव्हतं, तर फ्रान्सपासून दूर पळवून लावायचं होतं. गरज पडली, तर टॉर्पेडो वापरायला परवानगी होती.

ऍडमिरलनी भराभर हुकूम सोडले, आणि ते तसेच उत्साहाने पाळले गेले. बिजलीच्या चहूबाजूंनी लॉंचेसचा ताफा गोळा झाला.
"शिडं नाहीत! वाफ नाही! हेच ते जहाज!" असे उद्गार सगळीकडून निघू लागले. शिव्यांचा भडिमार होऊ लागला.
"अहॉय कॅप्टन !" एक अधिकारी ओरडला. कॅप्टन ख्रिश्चनने उत्तर दिलं नाही. तो फक्त खुनशी नजरेने पाहत राहिला.
"मी ओळखलंय तुम्हाला. फक्त दहा मिनिटं देतो. ताबडतोब इथून निघून जा. परत कधी फ्रान्सच्या किनाऱ्यावर दिसलात, तर भस्सकन समुदात बुडवून टाकू."

एवढ्यात कर्नल डेकवर पोहोचले. शंभरेक फ्रेंच सैनिक या नराधमापासून हाकेच्या अंतरावर होते. त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते. शिव्यांची लाखोली वाहत होते.कर्नलच्या कानांवर हे गरळ पडल्यावर थोबाडीत मारल्यासारखी त्यांची अवस्था झाली. ते गांगरले. त्यांच्या दिशेने कार्बाईन रायफली रोखल्या गेल्या. पण अधिकाऱ्यांनी लगेच हुकूम सोडून शस्त्रं खाली ठेवायला सांगितली.

एवढ्या वेळात कॅप्टन ख्रिश्चनने नांगर उचलला होता. हे काम विजेवर होत असलं, तरी खलाशी गडबडीने काम करू लागले. कर्नलचे हे गुन्ह्यातले साथीदार आपल्या मालकाप्रमाणेच हादरून गेले होते. या अनपेक्षित भयंकर छळवादी वागणुकीचा अर्थ काय? हे असं कुठवर चालणार? याची सुरुवात तरी झाली कुठून? हा प्रक्षोभ ब्रिटनमध्ये उसळला, आणि खाडी पार करून फ्रान्समध्ये आला? की हा फतवा सगळ्या जगानेच काढला आहे?

कर्नलचा अभिमान नाहीसा झाला. अहंकार गळून गेला. एखादा देशद्रोही स्वतःचा देश त्यागून दुसऱ्या देशात जाऊन राहू शकतो. त्याच्या वाट्याला स्वकीयांचा तिरस्कार येत असेल, पण निदान तो आश्रय मिळवतो. कर्नल ऑडमिंटन आणि त्यांच्या खलाशांना कोणत्याच देशात आश्रय नव्हता. सर्व मानवजात एकदिलाने त्यांच्या विरोधात उभी राहिली होती. पूर्वीचं आयुष्य तीन हजार लीग मागे राहिलं होतं.

त्यांनी अस्थिरपणे सुकाणू हातात घेतलं, आणि ते अपशकुनी जहाज पुढे सरकू लागलं. तेवढ्यात नौदलाच्या एका जहाजाच्या कडेला ते घासलं गेलं. लाँचमधला एक माणूस उभा राहिला. शेवटची एक जोरकस शिवी हासडून त्याने हातातला कागद चोळामोळा करून कर्नलच्या दिशेने भिरकावला. तो बरोब्बर कर्नलच्या चेहऱ्यावर आपटला. कागद आपटून इजा होण्यासारखी नव्हती, पण या कृत्यामागचा तिरस्कार कर्नलना एखाद्या बंदुकीची गोळी लागल्यासारखा झोंबला.

चहूकडून शिव्यांचा भडिमार, शिट्ट्यांचा कल्लोळ अशा निरोपाच्या वातावरणात बिजली जलदीने बंदराबाहेर पडली. डेकवरचे खलाशी एकीकडे फ्रान्सच्या किनाऱ्याला मुठी वळून दाखवत होते, तर दुसरीकडे कर्नलकडे संतापाने पाहत होते.

कर्नल डेकवरून खाली गेले. त्यांचा चेहरा सिल्व्हर पॉप्लरच्या पानांसारखा पांढरा पडला होता. वादळात सापडलेल्या वृक्षाच्या पानांसारखे त्यांचे हात थरथर कापत होते. अभावितपणे त्यांचे पाय खाली जाणाऱ्या जिन्याकडे वळले. मगाशी टाकलेला तो कागदाचा बोळा तिथे पडला होता, तो त्यांनी उचलला. तो होता अमेरिकेचा जाहीरनामा. त्यांना आश्रय न देण्याबद्दल सर्व देशांना पाठवलेला जाहीरनामा.

यानंतर दोन तास उलटून गेले. कर्नल आणि कॅप्टन समोरासमोर बसून हलक्या आवाजात बोलत होते. दोघांच्या मध्ये असलेल्या टेबलावर तो जाहीरनामा पडला होता."आता पोट कसं भरायचं, कर्नल? अन्नपाणी कुठून आणणार?" कॅप्टन हळूच म्हणाला; "आता पुन्हा जहाजाचं रूप बदलणं सोपं नाही. कसलीच आशा उरली नाही. शरणागती नाही तर उपासमार, दोनच मार्ग आहेत आपल्याजवळ."कर्नलनी क्षीणपणे मान हलवली.
"आपली वीस माणसं तीन दिवस जेवतील इतकंच अन्न शिल्लक आहे. आणि वीज? फक्त तीन हजार नॉट्स जाण्यापुरती. ताशी दहा नॉट्सपुढे जाऊच शकत नाही आपण. दोन आठवड्यात बिजलीचं डबडं होईल डबडं.खलाशांना कळतंय सगळं. प्रश्नांवर प्रश्न येताहेत रोज."जरावेळ थांबून कॅप्टन म्हणाला, "कर्नल, हा कागद खलाशांच्या हातात पडला नाही हे नशीब समजा. नाहीतर रात्रीच्या आत मुडदा पडला असता तुमचा."
कर्नलचा चेहरा पूर्वीपेक्षाही अधिक पांढरा पडला. पण ते काहीच बोलले नाहीत. ते पूर्णपणे खचले होते, हे एखाद्या शेंबड्या पोरानेदेखील ओळखलं असतं. ते स्वतःच्याच जाळ्यात फसले होते. "पाणी गळ्याशी आलं आहे. बोला,काय करायचं ते." कॅप्टन पुन्हा बोलू लागला. कर्नलनी निराशेने डोकं हलवलं.
"मी सांगतो. आपली माणसं आणि सोनं एका लाँचमध्ये घेऊ. बिजली इथेच ठेवू, आणि किनाऱ्यावर धडकू. असं केलं तर कदाचित निसटता येईल."
कर्नलचं डोकं जोरजोरात नकारार्थी हललं. प्राण गेले तरी ते बिजली मागे सोडणार नव्हते.
"नाही म्हणतोस xxx? तर मग चाललो आम्ही. माझे खलाशी तुझं जहाज चालवणार नाहीत. असं उपाशीतापाशी तुझ्याबरोबर समुद्रावर भरकटायला वेड नाही लागलं आम्हाला. चल, टाक आमचा पगार आणि लाँच दे माझ्याकडे xxxxx! "
"कर्नल, जाऊ द्या त्यांना." रुपर्ट आपल्या खोलीतून बाहेर आला आणि कर्नलकडे आर्जवी नजरेने पाहू लागला. कर्नलनी दुखावल्या नजरेने आपल्या मुलाकडे पाहिलं. मग पुन्हा कॅप्टनकडे पाहून मानेनेच संमती दिली.
"बराय. किनारा इथून दहा मैलांवर आहे. लाँचने सहज गाठू आम्ही. चल रे ए xxx, लाखभर डॉलर्सचं सोनं टाक पाहू पट्कन. उरलेलं ठेव तुला आणि तुझ्या मुलाला. थोडं टाक तुझ्या त्या चमच्या नोकरांसमोर. ए, अरे xxxxx, चल, चल आण, सोनं आण लवकर. वेळ नाही आम्हाला."

कर्नल यांत्रिकपणे आतल्या खोलीत गेले, आणि आपली गुप्त तिजोरी उघडून सोन्याचं जडशीळ पुडकं आणून कॅप्टनसमोरच्या मेजावर खळ्ळकन टाकलं.

लुटीतलं सोनं, म्हणजे सरकारी टांकसाळीतली कोरी करकरीत नाणी, पोर्टहोलमधून येणाऱ्या प्रकाशात चकाकत होती. कॅप्टनने पुडकं बांधून घेतलं, आणि उठून हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. कॅप्टन कडक असला तरी प्रामाणिक माणूस होता. पण काय करणार, या जाहीरनाम्यामुळे आधी स्वतःचं हित पाहायची वेळ आली होती. कर्नलच्या मुसक्या आवळल्या गेलेल्या पाहून त्याही परिस्थितीत त्याला कर्नलची दया येत होती.

कर्नलच्या तीन विश्वासू नोकरांपैकी एकाला चाक धरायला पाठवलं गेलं. नंतर अर्धा एक तास खाडखाड आवाज येत होते. माणसांचे, सामानाच्या पेट्यांचे, नाणी मोजल्याचे. आणि त्यांच्या वरताण होता एक हुकूम सोडणारा आवाज. शेवटी लाँच दोरापासून मोकळी करून धपकन पाण्यात टाकली गेली. मग धावत्या पायांचे आवाज आले, आणि "चला, लवकर चला" च्या आरोळ्या. मग एकदम सगळं शांत झालं. खलाशांपैकी एकाचा संताप अनावर झाला. "गुडबाय कर्नल.." जाता जाता उपहासाने थुंकून त्याने बिजलीच्या नावावर हातोडीचा घाव घातला,आणि क्षणार्धात ते जहाज पुन्हा एकदा निनावी झालं. बाकीचे खलाशी मागे वळूनही न पाहता सरळ निघून गेले. आता पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

थोड्याच वेळात किनारपट्टीच्या धूसर पडद्यावर लाँचचा ठिपका दूर दूर जाताना दिसू लागला.
"आता कुठे जायचं, बाबा?" रुपर्टने क्षीण आवाजात विचारलं. या कारस्थानाच्या कल्पनेचं बीज मनात रुजल्यापासून प्रथमच कर्नलनी आपल्या मुलाच्या नजरेला नजर भिडवून पाहिलं. दोन्ही चेहरे खंतावले होते. थकलेले, अकाली वय झाल्यासारखे दिसत होते. दोघांचे डोळे खोल गेले होते, नजर थिजली होती.
"घरी जाऊया, बेटा. चल." कर्नल मवाळपणे म्हणाले.
"ओह.. बाबा.. " रूपर्टला रडू आवरेना.
"ये, बेटा, माझ्याविषयी प्रेम शिल्लक उरलं असेल असा माझ्या जवळ ये एकदा. आणि मग जा, मला सोडून निघून जा. तीच लायकी आहे माझी."

(भाषांतर) क्रमश:

कथाभाषांतर