तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
9 Feb 2024 - 6:26 am

Taljai1

गेल्या काही वर्षांमध्ये बहुसंख्य जनता ही आरोग्याबद्दल जागरूक झाली आहे. योगासने, विविध खेळ, व्यायामशाळा आणि इतर माध्यमांद्वारे आरोग्य आणि स्वास्थ्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. योग्य पोषण, व्यायाम, शारीरिक हालचाल (NEAT exercise) आणि पुरेशी विश्रांती ह्या द्वारे तंदुरुस्ती मिळवण्याचे आणि रोगांना दूर ठेवण्याचे अनेकांचे ध्येय आहे. मात्र सर्वत्र मिळणारे आणि सहज उपलब्ध असणारे चविष्ट परंतु अस्वच्छ परिस्थितीत तयार केले जाणारे व निम्न पोषणमूल्ये असणारे स्ट्रीट / फास्टफूड, मिठाया, तळलेल्या आणि चीझ, बटरचा अतिरिक्त मारा असलेल्या खाद्यपदार्थांमुळे भारतीयांचे आरोग्य धोक्यात आहे.

आरोग्यपूर्ण जीवनासाठी व्यायामप्रकार निवडताना "चालणे" हा अतिशय सोपा, बिनखर्चाचा, बहुसंख्याकांना सहज करता येणारा व्यायाम आहे. मानव "चालणे" ही क्रिया लाखो वर्षें करत आलेला आहे. सजगतेने चालून वजन कमी करण्याचे आणि स्वास्थ्य लाभाचे उद्दिष्ट ठेवून लोकं बागांमध्ये, शहरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील टेकड्यांवर चालायला जात आहेत. स्थानिक प्रशासन देखील अशा ठिकाणी वॉकिंग ट्रेल्स्, जॉगिंग ट्रॅक्स्, ओपन जिम् वगैरे सुविधा उपलब्ध करून सामान्य जनतेला व्यायाम करण्यास प्रवृत्त करत आहे.

ह्या वेळेच्या भारत भेटीमध्ये पुण्यातील तळजाई टेकडीला आणि जवळच्या बागेला सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी भेट देण्याचा योग आला. पूर्वी पुण्याबाहेर असणाऱ्या परंतु आता शहराचा सर्व बाजूंनी विस्तार झाल्यामुळे जणू मध्यवर्ती ठिकाण झालेल्या निसर्गरम्य आणि विविध वनस्पतींनी नटलेल्या तळजाई टेकडीवर चालण्यासाठी अतिशय उत्तम सोय करण्यात आली आहे. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या पुण्याच्या आजूबाजूच्या टेकड्यांपैकी तळजाई ही एक महत्वाची टेकडी आहे. मुळात टेकडीवर असलेल्या वनक्षेत्राचे वन खात्याने जाणीवपूर्वक संवर्धन करून विविध स्थानिक फळ आणि फुलझाडे लावली आहेत. सर्व बाजुंनी बंदिस्त आणि राखीव क्षेत्र असल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागात घनदाट जंगल तयार झाले आहे. ही टेकडी जैवविविधतेने समृद्ध आहे आणि जागोजागी पाण्याची कृत्रिम तळी तयार केल्याने अनेक पक्ष्यांचे आवडीचे स्थान आहे. पक्षीनिरीक्षक आणि पक्षीतज्ञांमध्ये लोकप्रिय आहे. वनस्पतीशास्त्र अभ्यासकांचे देखील आवडीचे ठिकाण आहे.

Taljai2

कमी अधिक लांबीचे वॉकिंग ट्रेल्स असल्याने लोकं आपापल्या क्षमते प्रमाणे चालणे, धावणे करतात. योगसाधना, समूहाने व्यायाम, ध्यानधारणे साठी खास जागा आणि खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. अगदी ठळकपणे लक्षात आलेली एक आनंदाची बाब म्हणजे इतरत्र सर्वत्र दिसणारा प्लास्टिकचा कचरा टेकडीवर चालताना क्वचितच अपवादाने दिसून आला. त्याबद्दल जागरूक नागरिकांचे, वेळोवेळी साफसफाई करणाऱ्या स्वयंसेवकांचे आणि प्रशासनाचे अभिनंदन. गर्दीच्या वेळी अरुंद पायवाटेवर नागरिक प्रसंगी बाजूला थांबून एकमेकांना जागा करून देत असल्याचे पाहण्यात आले. अशीच शिस्त वाहन चालकांनी वाहन चालवताना पाळली तर पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात कमी होईल असा विश्वास वाटतो.

Taljai6

चालण्याच्या वाटेवर जेथे फाटे फुटतात तेथे टेकडीवरील पायवाटेचे नकाशे लावले, ट्रेलच्या लांबीबद्दल आणि मुख्य प्रवेशद्वारापर्यंत लागणाऱ्या सर्वसाधारण वेळेबद्दल माहिती दिली तर नवीन चालायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होईल. ठराविक अंतरावर पिण्याच्या पाण्याच्या वॉटर फाऊंटनची सोय केली तर नागरिकांना पाण्याची बाटली जवळ बाळगण्याची गरज भासणार नाही. टेकडीवर संरक्षित क्षेत्रात स्वयंचलित वाहनांना बंदी आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र टेकडीवर भटकी कुत्री मोठ्या प्रमाणावर दिसून आली. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न बघता त्यावर वेळीच उपाय योजना करण्यात यावी.

टेकडीवर चालताना "चरैवेति चरैवेति..." ह्या मंत्राचे अनुकरण करणारे पुणेकर मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आल्यावर मात्र "चरत रहा, चरत रहा..." हा मंत्र जपतात की काय न कळे! तेथे जणू जत्रा भरलेली असते. भजी, सामोसा, थालीपीठ, डोसा अश्या खाद्यपदार्थापासून ते विविध प्रकारचे ज्यूसेस् आणि सुप्स्, स्प्राउटची भेळ असे तुलनेने पौष्टिक असलेले पदार्थ देखील उपलब्ध असतात आणि पुणेकरांच्या त्यावर उड्या पडतात. कोणतीही विशिष्ट "वेळ" नसणारा परंतु वेळेला "हवाच" असणारा अमृततुल्य चहा असंख्य प्रकारात उपलब्ध असतो. पुणेकर त्याचा चवीने आस्वाद घेताना दिसतात. चालून जेव्हढ्या कॅलरी खर्च झाल्या असतील त्यापेक्षा तेथील खाद्यपदार्थ खाऊन जास्त कॅलरींची भर घालणाऱ्या पुणेकरांपैकी कोणी टेकडीवर चालायला सुरुवात केल्यावर वजन वाढल्याची तक्रार केली तर आश्चर्य वाटायला नको. पुणेकरांचा वजन कमी करण्याचा प्रवास यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.

Taljai3

Taljai4

विविध भाज्या आणि फळे विक्रीला उपलब्ध असल्याने आरोग्याबद्दल जागरूक असलेल्या सद्गृहिणी त्याचा लाभ घेतात त्याबरोबरीने गृहकृत्यदक्ष आणि भार्याज्ञाधारक सद्गृहस्थ देखील खरेदी करताना दिसतात.

Taljai5

बाजूला असंख्य स्वयंचलित दुचाकी अगदी शिस्तीत उभ्या केलेल्या दिसतात. मुख्य रस्त्यावर चारचाकी देखील असतात परंतु सायकल मात्र एक देखील दिसून आली नाही ही खेदाची बाब आहे. स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी ऐवजी जेव्हा पार्किंग लॉटमध्ये सायकलींची गर्दी होईल तेव्हा प्रदूषणाची पातळी कमी होऊन खऱ्या अर्थाने पुणेकरांना आरोग्याचा लाभ होईल.

Taljai7

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शहराच्या आजूबाजूच्या गावांतील 'डोंगरमाथा, डोंगरउतार' क्षेत्रातील १:५ ग्रेडिएन्ट असलेल्या किंवा समुद्रसपाटीपासून १९०० फूटांपेक्षा अधिक उंचीवरील (1900' AMSL) सर्व जागांवर नियोजनाप्रमाणे जैवविविधता उद्याने (Bio Diversity Parks) करण्याचे काम तातडीने हाती घेतल्यास पुण्याच्या वन वैभवात भर पडून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि पुणेकरांची "जीवन गुणवत्ता" (Quality of Life) उंचावेल ह्यात तिळमात्र शंका नाही.

भवतु सब्ब वॉकर्स फिट् !

समाजविचार

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

9 Feb 2024 - 8:15 am | गोरगावलेकर

वन उद्यान मस्तच

कंजूस's picture

9 Feb 2024 - 10:09 am | कंजूस

छानच.

पायांनी रस्ते तुडवून शहरांमध्ये आरोग्य सुधारण्याची शक्यता नाही. ट्राफिकचे विषारी वायूच दिवसेंदिवस हवेत साठत आहेत. लोकांना भेटण्यासाठी मात्र जागा चांगली आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Feb 2024 - 11:10 am | राजेंद्र मेहेंदळे

तळजाई टेकडी मस्त आहे फेरफटका मारायला. तसेच वेताळ टेकडी, महात्मा टेकडी आणि परमहंस नगर (म्हातोबा) टेकडी सुद्धा.

मात्र अजुन १०-१५ वर्षांनी पुण्यात टेकड्या आणि बागा राहतील का असा प्रश्न पडतो. बिल्डर आणि नगरसेवक लॉबीचा डोळा कधीपासुन यावर आहेच, कागदावर रेषा बदलल्या की सी आर झेड, ब्ल्यु लाईन, रेड लाईन सगळे झक मारत जाते. पैशानी सगळे मॅनेज होते.

याशिवाय मोनो,मेट्रो, प्रस्तावित बालभारती रस्ता असे एक ना दोन विकास प्रकल्प टेकड्यांच्या मुळावर उठताहेत. भरीस भर म्हणुन रातोरात आगी लावुन झाडे जाळण्याचे प्रकार आहेतच. एकीकडे मशीन लावुन खणायचे, दुसरीकडे बंगले उठवायचे, तिसरीकडे झोपड्या बांधायच्या असे सर्रास चालु आहे.

आता म्हणे थोरात उद्यानात मोनोरेल आणणार. स्थानिकांचा विरोध असुनही. बागेत रणगाडे,विमाने, डायनोसोर, सभा घेणे, गणपती विसर्जन सगळे काही चालते. काय राव? घ्या की जरा २ दिवस अ‍ॅडजस्ट करुन म्हटले की झाले.

टर्मीनेटर's picture

9 Feb 2024 - 10:40 pm | टर्मीनेटर

फिटनेस जत्रा आवडली 😀

भजी, सामोसा, थालीपीठ, डोसा अश्या खाद्यपदार्थापासून ते विविध प्रकारचे ज्यूसेस् आणि सुप्स्, स्प्राउटची भेळ असे तुलनेने पौष्टिक असलेले पदार्थ देखील उपलब्ध असतात आणि पुणेकरांच्या त्यावर उड्या पडतात.

हे परवडले….भल्या पहाटे घरून निघताना चहाही न पिता तिन-चार कि.मी. जॅागींगचे वर्तुळ पूर्ण करून मूळ स्थानी परतल्यावर पानवाल्याकडून सिगरेट घेउन पेटवणारे ‘महानुभव’ही पाहिले आहेत 😂

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2024 - 6:21 pm | चौथा कोनाडा

छान धागा, छान माहिती, छान प्रचि.
तळजाई टेकडी झकास आहे, ८-१० वेळा जाण्याचे योग आले आहेत.
रहता राहिलं जत्रेचं , आता जनताच एवढी आहे की जिथं तिथं जत्राच तयार होणार.
रस्त्यांवर चालणारी सायकल हे चित्र लवकरच कालबाहय होईल असं दिसतंय... आमच्या कडं बरेच सायकल पट्टे (ट्रॅक) आहेत, पण सायकलस्वार क्वचितच दिसतात.

कंजूस's picture

10 Feb 2024 - 9:18 pm | कंजूस

अजून दहा वर्षे थांबा.

इ व्यायाम करणारी पिढी येईल. म्हणजे टेकड्यांनी नकोत आणि जत्राही नसेल.

रामचंद्र's picture

13 Feb 2024 - 1:16 am | रामचंद्र

तळजाई पठाराजवळच्याच ठुबे बंगल्यासंदर्भात कुणाचे काही अनुभव आहेत काय?

कर्नलतपस्वी's picture

13 Feb 2024 - 5:41 am | कर्नलतपस्वी

शिवाजीनगर ला एच डी एफ सी बॅक शेजारीच एक ठुबे पार्क नावाचा मोठ्ठा बंगला आहे. बहुगतेक कुणी सरदार असावेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2024 - 12:07 pm | अमरेंद्र बाहुबली

इथं इस्तृत चर्चा आहे.
https://www.maayboli.com/node/79712

चामुंडराय's picture

18 Feb 2024 - 9:42 am | चामुंडराय

गोरगावलेकर - हो, खरंच छान आहे तळजाई वन उद्यान.
कंजूस - वाहतुकीचे प्रदूषण उद्यानाच्या आतमध्ये जाणवले नाही परंतु वाहने आणि वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे, हे खरे आहे.
राजेंद्र मेहेंदळे - तळजाई टेकडीसाठी जागरूक नागरिकांचा दबाव गट आहे आणि ही मंडळी बिल्डर्स व इतरांवर लक्ष ठेवून आहेत असे कळले आहे. इतर टेकड्यांवर जाता आले नाही परंतु पुढच्या वेळेस नक्कीच जाईन.
टर्मीनेटर - अगदी पहिल्यांदा तर इथे व्यायाम कमी आणि खादाडी जास्त आहे व जत्राच भरली आहे असे वाटले.
चौथा कोनाडा - आजकाल उमम वर्गामध्ये गिअर असलेल्या हाय एन्डच्या सायकली घेण्याचे प्रमाण वाढत आहे असे दिसते, हा एक आशेचा किरण आहे.