जिवाचं कोल्हापूर ❤️

chittmanthan.OOO's picture
chittmanthan.OOO in जनातलं, मनातलं
25 Jan 2024 - 4:46 pm

           आपल्या शालेय जीवनात दहावी हा एक महत्वाचा टप्पा असतो . माझ्याही आयुष्यात दहावी आलीच.पण  जरा सुस्तच होती . मी क्लास लावलेला जाधव सरांकड पण अभ्यास मात्र जसा जमेल तसा, काय ताण नाही काही नाही . कोण विचारलं दहावी चा अभ्यास कसा सुरु आहे ? उत्तर ठरलेलं असायचं "एकदम निवांत" मला दहावी नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं . कोण विचारलं डिग्री कुठली करणार हे माहीत नव्हतं. आमच्या वर्गात मात्र ३-४ पोर होती जी म्हणायची मी कोट्याला जाणार आयआयटी ची तयारी करायला. कोण बोलायचं ब्रेन सर्जन होणार. च्यामायला ऐकून भीती वाटायची ओ. एवढ्या कमी वयात एवढी स्पष्टता... कौतुक वाटायचं त्यांचं. दहावी आली तशी गेली . 
           मला काय लई अपेक्षा नव्हत्या पण शाळेन तोंडी परीक्षेला जास्त मार्क दिल्यानं ८७% पडले. सगळ्यांना वाटलं चांगले मार्क आहेत याला विज्ञान शाखेला जुंपायच .झालं कोल्हापूर च्या न्यू कॉलेज मध्ये एडमिशन घेतलं. किल्लेदार कड फिजिक्स, भोजने कडं गणित आणि पाटील कड केमिस्ट्री चा क्लास लावला. सकाळी 7 ला क्लास सुरू व्हायचा . तो क्लास संपून मधल कॉलेज , प्रॅक्टिकल आणि संध्याकाळ चा क्लास करून मी रात्री नऊ ला रूम ला जायचो. विज्ञानाचा जू इतका अवजड की फक्त क्लास करूनच मी दमून जायचो . गणित थोड थोड कळायचं पण फिजिक्स मात्र डोक्यावरून जायचं. सर ज्यावेळी शिकवायला उभे राहायचे  तेव्हा सरांच्या जागी ज्याला दोन शिंग आहेत , लाल मोठे जळजळीत डोळे आणि बाहेर आलेले सुळे आहेत अस भूत जणू मला खाऊनच टाकतेय की काय अस व्हायचं . 
           आयआयटी सोडा पास झालो तरी नशीब अस वाटायला लागलं. २-३ महिने पूर्ण प्रयत्न केले फिजिक्स केमिस्ट्री आणि गणित समजून घेण्याचं पण काय ठराविक लेव्हल च्या पुढं काय कळतं नव्हतं. टेन्शन यायचं पण कोल्हापुरात टेन्शन लई वेळ राहत नाही . इथ लई गोष्टी आहेत ज्या कदाचित तुमच्या करियर ला अश्व लावतील पण खूप सारा आनंद पण देऊन जातील. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरस्वती आणि ऊर्मिला ही दोन थेटर (सिनेमागृह) . हिथ मी अकरावीला असताना बाल्कनी च तिकीट होत २० रूपये.मी  शुक्रवारी नवीन आलेले प्रत्येक सिनेमा बघायला जायचो आणि येताना दूध कट्यावर चक्कर टाकायचो .  डोळ्यासमोर काढलेलं ताज, फेसाळ दूध प्यायचो. दोन मिनिट दहा हत्तींच बळ आल्याचा फील यायचा.
           कोल्हापुरात बाकी पण लई खायचं आहे. इथल्या गल्लोगल्ली मध्ये मिसळी चे वडापाव चे गाडे बघायला मिळतात. मिसळ सोबत साईड पाव मिळावा म्हणुन लोक आग्रही असतात. बिना कटाची मिसळ दिली की हॉटेल वाल्याला दम दिलाच म्हणून समजा .मी अकरावी ला असताना गाड्यावर मिसळ १० रुपयांना मिळायची. मी आठवड्यात २-३ दा तरी मिसळीवर ताव मारत असायचो. एवढं बाहेर च खाणे म्हणजे महिन्याच पैशाचं गणित बिघडणार की . काय करायचं काय करायचं असा विचार डोक्यात यायला लागला . एके दिवशी रूम स्वच्छ करत होतो तेव्हा मला एक मोठी बॅग दिसली. उघडुन बघतोय तर आत्याने  तिच्या मुलाची सीईटी ची पुस्तक दिलेली ती होती . तिच्या मुलाने २०० पैकी १८४ मार्क घेतले. तिला वाटलं ही पुस्तक भाच्याच्या कामाला येतील . आली कामाला पण सीईटी साठी नाही तर मिसळ खाण्यासाठी. बिन खांबी गणेश मंदिराजवळ एक जुने पुस्तक खरेदी करणार दुकान आहे . मी ह्यातलं एक एक पुस्तक नेऊन विकायचो आणि जे ८०-१०० रूपये येतील त्या पैशाची मिसळ, वडापाव खायचो.पोतभर पुस्तक विकून मी वर्षभर जिभेचे चोचले पुरवले.
          आम्ही रूममेट निवांत संध्याकाळी रंकाळा तलाव येथे फिरायला जायचो. . इतका मोठा घेर असणारा, प्रचंड पाणीसाठा कदाचित मुंबई च्या समुद्रनंतर पहिल्यांदाच बघितला होता. तलावाला दगडी बांधकाम केलेलं आहे ज्यावर बसून आम्ही  हिरवळ बघण्याचा आनंद घ्यायचो. संध्याकाळी सूर्य मावळताना  पाण्यात पडलेलं संध्या मठ च प्रतिबिंब मन प्रसन्न करायचं. शालिनी पॅलेस पासून थोड दूर रंकाळा तलावाच्या मागे दाट झाडी आहे. इथ आपण  एखाद्या शहरात आहोत याचा विसर पडतो.
                माझा रूममेट मुकुंद माझा खास दोस्त बनला. आम्ही दोघं सायकल वर बसून राजाभाऊ ची भेल खायला डबल सीट जायचो. मुक्यासोबत मी शनिवारी महालक्ष्मी मंदिरात मारुतीला पण जायचो . तो धार्मिक होता पण मी शनिवारी मिळणाऱ्या मसाला भातासाठी जायचो. प्रसाद खाऊन रविवारी महाद्वार रोड वर चक्कर टाकायचो. खरेदीसाठी उसळलेली गर्दी पाहून या गर्दीत हरवून जावाव अस वाटायचं.
                बारावीला शेवटच्या ५-६ महिन्यात स्वतः अभ्यास केला , लिहून प्रॅक्टिस केली व सत्तर टक्के मार्क मिळवले. मी यावर समाधानी होतो. मी जे जिवाचं कोल्हापूर केल ते केल नसतं तर काय आणि मार्क वाढले नसतेच . त्यामुळे मला मी जे कोल्हापूर अकरावी बारावीच्या वर्षात जगलो त्याचा अजिबात पश्चातप नाही.. उलट आनंदच आहे.
             कोल्हापूर हे शहर इतकं जिवंत आहे की ते तुम्हाला लळा लावत , माया करत. तुम्ही कोल्हापुरात फिरत असता तेव्हा आपल्या माणसाने घट्ट मिठी मारावी इतका आनंद होतो . इथले रस्ते , इथल्या भिंती , इथली माणसं माझी आहेत अस वाटत. इतका आपलेपणा मला फक्त माझ्या कोल्हापूरबद्दलच वाटतो. त्यामुळं कधीतरी वेळ भेटला तर माझ्या कोल्हापूरला या , इथला तांबडा पांढरा रस्सा प्या, मिसळ , वडापाव खा. इथ जस इतर शहरात लिमिटेड  असतं अस काही नसत . तुम्ही जर रस्सा पिणार असाल तर लोक बादली न रस्सा वाढतील. कांद्याचा दर कितीबी वाढू दे जादा कांदा देताना कोण तोंड वाकडं करणार नाही . ५-१० रूपये कमी पडले म्हणून कोण बोंबलनार नाही .कोल्हापूर हे घरच्या सारखं नाही तर घरचं आहे. इथ भेदभाव नाही ,कुणाला फुकट त्रास देणं नाही . इथ रांडच्या ही रांगडी वाटणारी शिवी पण  काकवी सारखी गोड वाटते कारण इथली माणसं ही  बाहेरून पहाडासारखी धिप्पाड पण आतून  लोण्यावाणी मऊ आहेत . म्हणूनच तुम्ही पण जिवाचं कोल्हापूर करा..

आणखी ब्लॉग वाचण्यासाठी @ www.Chittmanthan.com

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

25 Jan 2024 - 4:50 pm | मुक्त विहारि

कोल्हापूर बद्दल, अजून माहिती येवू द्या..

शक्यतो, तुम्हाला आवडलेली खादाडीची ठिकाणे..

उन्मेष दिक्षीत's picture

26 Jan 2024 - 9:41 am | उन्मेष दिक्षीत

आवडलं !

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2024 - 5:56 pm | चौथा कोनाडा

व्वा ... सुंदर लेखन !
जीवाचं कोल्हापुर आवडलं !
येऊ द्या आणखी लेखन !

Trump's picture

26 Jan 2024 - 8:42 pm | Trump

आली कामाला पण सीईटी साठी नाही तर मिसळ खाण्यासाठी. बिन खांबी गणेश मंदिराजवळ एक जुने पुस्तक खरेदी करणार दुकान आहे . मी ह्यातलं एक एक पुस्तक नेऊन विकायचो आणि जे ८०-१०० रूपये येतील त्या पैशाची मिसळ, वडापाव खायचो.पोतभर पुस्तक विकून मी वर्षभर जिभेचे चोचले पुरवले.

काय ते दुर्देव..

chittmanthan.OOO's picture

27 Jan 2024 - 6:53 pm | chittmanthan.OOO

*दुर्दैव

रामचंद्र's picture

26 Jan 2024 - 11:54 pm | रामचंद्र

लक्ष्मी-सरस्वती, बसंत-बहार, उमा, पार्वती, शाहू, पद्मा, रॉयल, अयोध्या अशा टॉकीज माहीत आहेत. ही ऊर्मिला टॉकीज कुठं आहे?

शानबा५१२'s picture

7 Feb 2024 - 3:17 pm | शानबा५१२

लेख अजुन वाचला नाही पण आपली वेबसाईट छान आहे, गुगल ब्लॉगरची कुठली थीम वापरली आहे? प्लिज सांगा. मी रोज ह्या वेबसाईटला भेट देईन. धन्यवाद व शुभेच्छा!