श्रीदुर्गानवरात्रीउत्सव - क्षत्रिय उपासना

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
23 Oct 2023 - 1:31 am

सर्व भाविकांना दुर्गा नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वत्र अगदी धामधुम चालु आहे. देवींचे मंडप, तिथली गर्दी, गरबा वगैरे नेहमीचाच गोंगाट.
आपले भोडला , घागरी फुंकणे, गोंधळ वगैरे मराठी प्रकार काळाच्या ओघात हळुहळु विस्मरणात चालले आहेत. कालाय तस्मै नमः ||

मुळात खरेतर हा सण शक्तीउपासनेचा. शक्तीचा, बलाचा, ताकतीचा उत्सव. पण ते सारंच लोप पावत चालले आहे किंबहुना कधीच लोप पावले आहे. आता काय तर नऊ दिवस संगीबेरंगी कपडे घालुन मिरवणे अन पुरुषांन्नी फ्रॉक सदृष झ्यंकीप्यँकी कपडे घालुन उच्छृंखल गाण्यावर नाचणे असे काहीसे स्वरुप आले ह्या सणाला. अन त्यातही बोलायची काही सोय राहिली नाही. इथेही धार्मिक दहशतवादाने पाय पसरले आहेत, स्पष्ट , तार्किक , तात्विक काहीही बोलण्याची सोय ठेवलेली नाही. १०-१२ वर्षांपुर्वी एक वेगळा विचार , पुर्ण तार्किक विचार फेसबुकवर मांडलेला आणि त्यावर जाहलेला गहजब आठवुन आजही काहीही लिहायची प्रेरणाच नष्ट होते.

त्यामुळे आपण कोणालाही काहीही पटवून द्यायला जाऊ नये हे उत्तम ! हे सारं स्वांन्तःसुखाय आहे . आपण बरं , आपला नॉस्टॅल्जिया बरा, आपला मनातील सनातन धर्म बरा !
__________________________________________________________

माझा एक मित्र म्हणतो तसे - आपण फक्त नावाला हिंदु उरलोय बाकी आपण मेटा-ख्रिश्चन च झालो आहोत. मोजके काही अफवाद वगळता कोणालाच मुळ सनातन संस्कृतीची जाणीव उरलेली नाही. आपल्या पोरांना हॅलोवीन माहीत असेल पण सर्वपित्रिअमावस्या माहीत नाही. त्यांन्ना विंटर सोलेस माहीत असेल पण उत्तरायण माहीत नाही. धर्मसिंधु , निर्णयसिंधु वगैरे नाहे तर ऐकुनही माहीत नसतील .
आता आपल्याला माहीत आहे तर आपण किमान थोडं फार तरी लिहित रहायला हवं, कोणाला काही पटवुन द्यायचे म्हणुन नाही तर आपल्याच सारख्या समविचारी लोकांच्या माहीतीसाठी लिहायला काय हरकत आहे . नाही कां !
जगदंबेने प्रेरणा दिली तर लिहालच , आणि नाही दिली तर एक शब्दही लिहु शकणार नाहीस.
__________________________________________________________

धर्मसिंधु आणि निर्णयसिंधुमध्ये सर्वांनीच देवीची उपासना कशाप्रकारे करावी ह्यावर सविस्तर विधीनिषेध सांगितले आहेत, त्यातही विशेष करुन कोणी कोणी कोठे काय उपासना , कशाप्रकारे उपासना करावी ह्यावर सविस्तर मार्गदर्शन आहे.

स्थाने स्थाने ब्राह्मणै: | पुरे पुरे क्षत्रियै नृपै: | गृहे गृहे वैश्यै: | ग्रामे ग्रामे शुद्रै: | वने वने म्लेच्छै:||

देवीस्थानात अर्थात मंदिरात ब्राह्मणांनी उपासना करावी , क्षत्रियांनी, राजांनी नगरांमध्ये शहरांमध्ये, वैश्यांनी आपापल्या घरात , शुद्रांनी गावात आणि म्लेच्छांनी वनामध्ये उपासना करावी. इथे म्लेच्छ ह्या शब्दाचा अर्थ यवन, ग्रीक किंवा शांततेचे पाईक असा नसुन आर्यधर्म प्रणित वर्णाश्रम बाहेर असलेले परंतु तरीही ही परंपरा मानणारे अर्थात वनवासी , किरात वगैरे लोकं असे अपेक्षित आहे.

सात्विकी राजसी पूजा तामसी चेति सा त्रिधा |
सात्विकी जपयज्ञाद्यैर्नैवेद्यैश्च निरामिषै: |
राजसी बलिदानेन नैवेद्यै: सामिषै:स्तथा |
सुरामांसाद्युपाहारैर्जप्यज्ञैविना तु या विना मंत्रैस्तामस्ति स्यात्किरातानां तु संमतेति ||
तत्र सात्विक्यां ब्राह्मणस्यैवाधिकारः राजस्यां क्षत्रियादिरेति |
किरातानामिती म्लेच्छांद्युपलक्षणं साम्यात् ||

पुजेचे तीन प्रकार : सात्विक, राजसी आणि तामसी. सात्विक म्हणजे जप यज्ञ वगैरे करुन निरामिष नैवेद्याने केलेली पुजा. राजसी म्हणजे बलिदानाने सामिष नैवेद्याने केलेली पुजा, तामसी म्हणजे कोणत्याही मंत्रांशिवाय दारु मांस वगैरे नैवेद्यांनी केलेली पुजा .
त्यातील सात्विक पुजेचा अधिकार ब्राह्मणांना आहे, राजसी पुजेचा अधिकार क्षत्रियांना वैश्यांना आणि शुद्रांना . किरातांना तामसी पुजेचा .

आता आपण पाहात आहोतच की केवळ सात्विक उपासनाच बहुतांश स्वरुपात उरलेली आहे, त्याविषयी लिहायची गरज नाही, तामसी पुजा देशातील काही भागात अजुनही होते मात्र त्याविषयी येथे जास्त लिहिणे उचित नाही. राजसी उपासनेचा, क्षत्रियांच्यासोबतच क्षात्रधर्माप्रमाणेच जवळपास संपुर्णपणे लोप झालेला आहे.

खरेतर क्षत्रियच खर्‍याअर्थाने वैदिक धर्मशार्दुल होते. महाभारतात तर वारंवार हेच दिसुन येतें की क्षत्रियच खर्‍या अर्थाने धर्म 'धारण' करत होते. पण पुढे अहिंसादिक मतांचा प्रादुर्भाव झाला, केवल ज्ञानकांडाचा जयघोष झाला अन कर्मकांड लुप्त होत गेली, काही आतातायी राजांनी पोर्तुगीज इन्क्विसिशन प्रमाणेच एका धर्माला डोक्यावर उचलुन घेतले अन बाकीच्यांचा जवळपास नाश केला ,तेथुनच क्षात्रतेज लुप्त होत गेले , आणि ज्याप्रमाणे इम्युनिटी कमकुवत झालेली व्यक्ती अधिकच आजारांना बळी पडते आणि अजुनच कमकुवत होते तसेच काहीसे क्षात्रधर्माचे अन पर्यायाने सनातन वैदिक हिंदु धर्माचे झाले. ओर्क्स आणि ओर्कहाय्स च्या भारतातील आगमनानंतर असा हा आधीच कमकुवत झालेला धर्म टिकला हेच एक महान आश्चर्य आहे.
हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या काही अफवादात्मक लोकांनी क्षात्र वृती जिवंत ठेवली. नाहीतर नंदांन्तं क्षत्रियकुलं ही उक्ती बर्‍याच अंशी सत्यच झालेली होती.

तर ह्या क्षात्रधर्मात , राजसी उपासनेचे , शक्तीपुजेची, नवरात्रीमधील कर्मकांडांचे स्वरुप कसे होते ह्यावर निर्णयसिंधु मध्ये अजुन सविस्तर माहीती मिळते.

राजसी उपासनेत बलिदानाला विशेष महत्व होते. त्या विषयीचे संकेत असे :

अथ बलिदानम्
तत्राश्व मेष छाग महिष स्वमांसानामुत्तरोत्तर प्राशस्त्यं फलविशेष्श्चान्यतोवसेयइतिदिक ||

बलिदानाविषयी घोडा मेंढा बकरा महिष अर्थातून रेडा आणि स्वशरीरामांस अर्थात स्वतःच्या शरीरातील मांस हे पूर्वापार उत्तरोत्तर प्रशस्त मानण्यात आलेले आहे आणि त्यांची विशेष फलही सांगितलेली आहेत
पशुबलीदानास समर्थ असेल त्याने अष्टमीचे दिवशी द्रोणपुष्प बिल्व आम्रजाई चंपक या पुष्पांनी देवीची पूजा करून सर्व लक्षणांनी युक्त गंधपुष्पांनी युक्त पाच वर्षाचा वर वर्णन केलेल्यांपैकी पशु " काली काली" या मंत्राचा जपविधी करत खडगाने मारावा. त्या पशूचे रक्त व मांस घेऊन पूतना चरकी विदारी पापराक्षसी यांना द्यावे. रक्त व मांस राक्षसांना द्यावे.
त्या पशुच्या पुढे राजाने स्नान करावे आणि पिठाची शत्रूची मूर्ती करून खड्गाने ती तोडून स्कंद व विशाख(?) यास द्यावी.
क्षत्रियांस शक्य नसल्यास त्यांनी कुष्मांडाचा अर्थात कोहळ्याचा बळी द्यावा. ब्राह्मणाने नेहमीच कुष्मांडाचा बलिदान करावे.
कुष्मांड(कोहळा) इक्षुदंड अर्थात ऊस, सारस पक्षाचे मांस हे बलिसामान असून तृप्ती विषयी छाग अर्थात बोकड समान आहे.
( ब्राह्मणांनी मात्र फक्त कोहळा अथवा श्रीफळ यांचेच बलिदान करावे त्यातही छेद करूच नये नुसतेच "बलि दिला" असे मंत्र म्हणावेत असे काही ग्रंथात म्हणले आहे.)

मंत्रः
पशुस्त्वं बलिरुपेण मम भाग्यादुपस्थितः ||
प्रणमामि ततः सर्वरुपिणं बलिरुपिणं ||
चंडिका प्रतिदानेन दातुरापद्विनाशनं ||
चामुंडा बलिरुपाय बले तुभ्यं नमोस्तुते ||
यज्ञार्थे बलयः सृष्टा: स्वयमेव स्वयंभुवा ||
अतस्त्वां घातयाम्यद्य तस्माद्यज्ञे वधोsवधः ||

ऐं र्हीं श्री या मंत्राने तो बली मत्स्वरुप आर्थात माझे स्वतःचेच रुप आहे असे चिंतन करुन त्याच्या मस्तकावर पुष्प ठेवावे , देवलोकाचा साधक, तू चंडिकेची जिव्हा आहेस असे ध्यान करुन र्‍हीं र्‍हीं खड्ग ह्या मंत्राने खड्गाचे पुजन करावे आणि ॐ हुं फट ह्या मंत्राने खड्गाने बलीचे छेदन करावे.

राजाने त्यादिवशी अष्टमीस दुर्गेचे द्रोण पुष्पांनी पूजन करावे त्यानंतर शत्रूंच्या वधाकरिता खड्गाला नमस्कार करून आपला विजय राज्य व सुभिक्ष यांची इच्छा राजाने करावी हृदयामध्ये कल्याणकारक देवीचे स्मरण करत तिला वारंवार नमस्कार करून अष्टमीस रात्री जागरण करावे नाच, गाणे याही करून मोठा उत्सव करावा. याप्रमाणे आनंदात रात्र घालून प्रभातकाळी अरुणोदयीं देवीच्या अग्रभागी शंभर 100 , पन्नास 50, पंचवीस 25 किंवा आपल्या इच्छेप्रमाणे महिष व मेंढे मारावेत.
त्यांच्या रक्तमासांनी आणि मद्य, आसव यांनी पूर्ण भरलेल्या कुंभांनी परमेश्वरी देवीला तृप्त करावे. ते मद्य व मांस कापालिकांना व दासदासींना द्यावे. त्यानंतर नवमीचे दिवशी राजाने स्वतः देवीला रथावर बसून वाद्यघोष करत नगरात फिरवावे.

तसेच अष्टमीच्या दिवशी राजाने राज चिन्हांचे अर्थात छत्र चामर वगैरेंचे पुजन करावे. ह्या विषयी विष्णुधर्मोत्तर पुराणात सविस्तर मंत्र सांगितले आहेत. ह्या मध्ये छत्र , चामर, घोडा , ध्वज , पताका , हत्ती , खड्ग, छुरिका अर्थात सुरी (?), कट्यार , धनुष्य , ढाल , कनकदंड अर्थात राजदण्ड, दुदुंभि , शंख आणि संइहासन ह्यांचे सविस्तर मंत्र दिलेले आहेत .

खड्ग मंत्र :
असिर्विशसनः खड्गस्तीक्ष्णधारो दुरासदः | श्रीगर्भो विजयश्चैव धर्मधारस्थथैवच |
एतानि एव नामानि स्वयमुक्तानि वेधसा | नक्षत्रं कृत्तिका ते तु गुरुर्देवो महेश्वरः |
रोहिण्यश्च शरीरं ते दैवतं च जनार्दनः | पिता पितामहो देवस्त्वं मां पालय सर्वदा |
नीलजीमूतसंकाशस्तीक्ष्णदंष्ट्र कृशोदरः | भावशुध्दो मर्षणश्च अतितेजास्थथैवच |
इयं येन धृता क्षोणी हतःश्च महिषासुरः | तीक्ष्णधाराय शुध्दाय तस्मै खड्गाय ते नमः ||

ज्याच्या आवाहनाने पापाचा नाश होतो , ते हे खड्गा तु तीक्ष्ण असह्य आहेस , श्रीगर्भ आहेस , साक्षात विजय आहेस , धर्माचा आधार आहेस . ही नावे खुद्द ब्रह्मदेवाने वर्णिलेली आहेत. हे खड्गा तुझे नक्षत्र कृत्तिका आहे अणि गुरु महेश्वर आहेत, रोहिणी शरीर आहे (?) आणि दैवत जनार्दन अर्थात श्री विष्णु आहेत, पिता ब्रह्मदेव आहेत, अशा खड्गा तु माझे पालन कर. (चुभुदेघे)

बाकीचे श्लोक ट्रान्स-लिटरल वर उपलब्ध्द आहेत.
लिंक : https://www.transliteral.org/pages/z90121224058/view

_________________________________________________________

अशी ही शक्ती उपासनेची परंपरा. काही मोजके अफवाद वगळता जवळपास समस्त भारतात ही राजसी क्षत्रिय उपासना लोप पावलेली आहे. नामशेष झालेली आहे. केवळ ब्राह्मणी पध्दतीची उपासना काय ती एकमेव तग धरुन कशी बशी उरली आहे . ही क्षात्रपरंपरा क्षात्रवृत्ती जर टिकली असती तर आज आपला भारत कसा असता ह्या विचाराने कसेसेच होते. क्षत्रियांचे केवळ एकच कर्म होते - ते म्हणजे युध्द. गीतेतही शेती , गोपालन ही वैश्याची कर्मे सांगितलेली आहेत , क्षत्रियांची नाही. समाजातील एक डेडिकेटेड गट केवळ देशाच्या सीमा रक्षण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी व्रतस्थ असेल तर तो कसला खुंखार जयिष्णु समाज असेल ह्या विचाराने शहारा येतो.
अमेरिकेत अँड्र्यु जॅकसन म्हणालेला - मॅनिफेस्ट डेस्टिनी - आपल्या १३ कॉलीनीज केवळ पुर्व किनार्‍यापुरत्या मर्यादित राहु शकत नाहीत, त्यामुळे मिसिसिप्पीपर्यंत आणि त्याच्याही पलीकडेही जाणे ही आपली इच्छा किंव्वा गरज नसुन नियती आहे, आणि हा हा म्हणता त्यांनी जवळपास सर्वच्या सर्व उत्तरामेरिका खंड बळकावला. तेच स्पॅनिश लोकांनी साऊथ अमेरिकेत केले.

तसेच कदाचित आपल्या येथे कोणीतरी क्षात्रवीर म्हणाला असता की पश्चिमेला हिंदुकुश अन उत्तरेला हिमालय ह्या आमच्या नैसर्गिक सीमा आहेत , धिस इज नॉन निगोशियेबल . आणि कदाचित ह्या राष्ट्राच्या सीमा वेगळ्या असत्या वगैरे वगैरे ...

असो. जगदंबेची तशी इच्छा नसावी. आपण काय बोलणार !

ह्या भौतिक जगात देह धारण करुन वावरणारे आपण केवळ त्या जगदंबेच्या हातातील कठपुतळी आहोत. ती नाचवेल तसे नाचु !
आणि अध्यात्मिक दृष्टीने पहायला गेलोत तर सर्वच शिव शिव आहे, शक्ती नाहीच . आणि शक्ती नाहीत तर मग शिव आहे असे म्हणणे , असे जाणुन घेणे वगैरे हे सारेच शक्ती असल्याने ते काहीच नाही. काय बोलणार ? बस विनम्रपणे हात जोडुन नमन करत इतकेच म्हणु की -

परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे । हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥

जगदंब जगदंब __/\__

इत्यलम्_________________________________________

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ?

बाकी अमुकांनी अमुक करावे, तमुकांनी तमुक करावे ह्यामगे काय करणीमिमांसा आहे का ? ह्याचा काही उपयोग आहे का उगीच ?

प्रसाद गोडबोले's picture

26 Oct 2023 - 2:37 pm | प्रसाद गोडबोले

ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ?

होय, त्यावर एक छोटेखानी लेख लिहायचा आहे पण मला सौरोन सारुमान ची प्रचंड भीती वाटते. आपल्या इथे गोब्लिंस नाहीत पण ऑर्कस आणि ऑर्काहायस आहेत, त्यांचे काही सांगता येत नाही.

तिता's picture

25 Oct 2023 - 8:55 am | तिता

Sorry, I am unable to type in Marathi. But can’t resist to comment.

These Sanskrit shlokas does not mean that it’s Sanatan Dharm. Insisting on such rituals has actually made masses to go away from religion. In fact, Dharm is very different than religion. Do we really care about Manushya Dharm, Raj Dharm ….. ?

Incidentally, there were some interesting thoughts expressed in Nastik Parishad a few days back. Many clips on lectures and discussions are on YouTube. Worth hearing for a different way of thinking.

प्रसाद गोडबोले's picture

26 Oct 2023 - 3:36 pm | प्रसाद गोडबोले

बरं.

तुम्हाला प्रतिसाद कळाला? मला मराठीत भाषांतर करुन सांगाल का ते महानुभाव काय म्हणत आहेत ते?

मुक्त विहारि's picture

25 Oct 2023 - 11:36 am | मुक्त विहारि

धुरळा पेटणार...

वैयक्तीक सांगायचे तर, हिंदू धर्माला एका साच्यात बांधता येत नाही.

सध्याच्या परिस्थितीत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे, पूजा करत आहे ना? मग झालं...

लहानपणी दस-याला देवदर्शनाला जाऊन येऊन आजुबाजुच्या घरात वडीलधा-यांना सोने (आपट्याची पाने) देऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची पद्धत इमाने इतबारे पार पडली जायची. प्रत्येक घरी गेल्यावर कुठे साखरफुटाणे, साधे फुटाणे, शिरा, लाडू, साखर, गुलाबजाम, किंवा आणि जे काही असेल ते हातावर ठेवले जायचे आणि लगेच तोंडात टाकून खाऊन टाकायची लाडीक तंबी त्या घरातील वत्सल मायाळू काकू, मावशी, आत्याकडून मिळायची. इलाज नसायचा. तोंड गोड होत होत इतके गोड व्हायचे की चवच कळायची नाही. कधी कधी कडू पण पडायचे. नक्की चव न कळल्यामुळे काहीच कळायचे नाही.

त्या त्या काकू आत्या मावश्या यांची जिव्हाळ्याबद्दल तक्रार नव्हती आणि नाही पण जरा आमचा विचार करा हो असे मन आक्रंदून सांगायचे. पण ऐकतो कोण? त्यांना हटकण्याची हिंंमत तेव्हाही नव्हती, आजही नाही. त्यांच्यातल्या काही आज तंबी द्यायला पण नाहीत. असो.

काही नाही, हा लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!

प्रसाद गोडबोले's picture

26 Oct 2023 - 2:31 pm | प्रसाद गोडबोले

लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!

हे आवडले. :)

The more you become personal, the more you become universal.

अर्धवटराव's picture

26 Oct 2023 - 4:58 am | अर्धवटराव

वर्षभर शक्तीची उपासना करणे, वापर करणे, आणि काही प्रसंगी / निमित्ताने त्या शक्तीला व्यक्ती स्वरूपात आपल्या आयुष्यात आणणे ही संकल्पना उत्तम आहे.

हे सर्व कर्मकांड केवळ प्रतिकात्मक झालं , आणि त्यात परत उच्चनीचतेचि तुलनात्मक भानगड उपजली की सगळं मुसळ केरात गेलंच म्हणून समजा.

श्वेता व्यास's picture

26 Oct 2023 - 11:55 am | श्वेता व्यास

बरीच नवीन माहिती समजली, धन्यवाद!