शुक्राची चांदणी

चक्कर_बंडा's picture
चक्कर_बंडा in जनातलं, मनातलं
11 Oct 2023 - 2:53 pm

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी बाहेर शेतात झोपणं म्हणजे एक पर्वणीचं असायची. उत्तर-दक्षिण उभी पसरलेली शेतं आणि दक्षिण टोकाला, उत्तरेकडे तोंड करून असलेली घरांची वस्ती, घरांसमोर, वस्तीतील वापराचा पुर्व-पश्चिम जाणारा कच्चा माती-फुफाट्याचा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे ज्याच्या त्याच्या वाटणीची शेतं. या शेतांच्या कडेने सोडलेल्या व साफ केलेल्या जागेत एखाद्या जुनाट पटकुरानं झाकलेली अंथरूण-पांघरुणे दिवसभर उन्हात धूळ खात पडून असत.

दिवस मावळून अंधार पडल्यावर चार-दोन घटका भरतात न भरतात तोवर वस्तीवरची झाडून सगळी म्हातारी-कोतारी, पोरं-टोरं, मध्यमवयीन पुरुष सगळेच जेवणं उरकून अंथरूण घालून झोपायला मोकळी झालेली दिसत. आपापल्या वाटणीच्या शेतांनी प्रत्येकाचे बिछाने खालीचं जमिनीवर माती फुफाट्यात घातलेले असत. त्यापासून अगदीच दहा-पंधरा फुटांवर ढेकळानी भरलेली नांगरून ठेवलेली आणि दिवसभर तापलेली काळीभोर वावरं अंधारात गरम सुस्कारे सोडत पडून असत.

आताशा हायकिंग-ट्रेकिंगच्या दिवसात, जेव्हा कधी उघड्यावर वा कुठे एखाद्या गुहेत वा किल्ल्याच्या बुरुजा-तटात झोपायची वेळ येते तेव्हा मी प्रचंड सावध व जागसुद असतो. सरपटणारे प्राणी, विंचु काटे, गोम वा तत्सम प्राण्यांशी शक्यतो गाठ पडू नये याची तजवीज करायच्या प्रयत्नात असतो. मागे, मेळघाटात मुक्कामी असताना माझ्या पलंगाला लागून असलेल्या खिडकीच्या जाळीला पडलेलं भोक पाहिल्यावर मी माझा पलंगच खिडकीपासून दूर हलवला होता.

पण लहानपणी असं अगदी उघड्यावर, शेतात झोपताना या प्राण्यांची भीती कधी मनाला शिवलीचं नाही. तसं पाहता आम्ही झोपेत असताना हे करुशेकी वर्गीय प्राणी कितीतरी वेळा अगदी शेजारून सरपटत निघून गेले असतील, कधी आमच्या उशा-पायथ्याला थांबून थोडा वेळ आरामही केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्या वयात मात्र, त्यांच्याबद्दलच्या भीतीचा विचार दुरदूरपर्यंत मनाला शिवत नसे.

अजून एक गोष्ट म्हणजे त्यावेळी ग्रामीण भागात अंधार पडल्यावर सापांविषयी बोलू नये असा संकेत होता. कुणी चुकून विषय काढलाचं तर आज किडुक महाराज हमखास भेटीला येण्याची शक्यता आहे असं मानलं जाई त्यामुळे सहसा याबद्दल बोललं जातंच नसे.

असो, दिवसभर उन्हातान्हात हुंदडून झाल्यावर रात्री
अंथरुणावर उताणं पडून उन्हाळ्याच्या दिवसांमधील चांदण्यांनी फुलून गेलेलं आकाश एकटक पाहत असतांनाचं कधी डोळा लागत असे ते समजत देखील नसे पण जोराची लघवी लागल्यामुळे मध्यरात्री हमखास जाग येई, किती वाजले ते समजायची काही सोय नसे. पण मध्यरात्र आणि भुतं हे समीकरण मनात पक्क असल्याने उठायची हिम्मत ही नसे, त्यात दुष्काळात तेरावा महिना या न्यायाने दिवसभरातील उचापतींमुळे उन्हाळी लागलेली असे. लघवी केल्यानंतर होणारी जळजळ सहन होत नसल्याने लघवी करणे टाळण्याकडेच कल असे.

याचा परीणाम असा होत असे की मध्यरात्री जाग आल्यावर अगदी पहाटेचं तांबडं फुटेपर्यंत तळमळत रात्र काढावी लागे, भल्या पहाटे कुणीतरी उठे मग त्यांच्या चाहुलीने धीर एकवटून पटकून उठून विधी उरकून परत अंथरुणात घुसणे व मग पार उन्हं चटका देईपर्यंत अंथरूण सोडण्याची इच्छा होत नसे.

असंच एकदा अंथरुणात तळमळत या कुशीवरून त्या कुशीवर होत असताना, पुर्वेकडच्या आभाळात, अगदी क्षितिजावर, पार खाली पडल्यासारखा एक भला मोठा तेजस्वी तारा दिसला. आकार जणू काही चंद्राएव्हढा वाटावा असा होता. प्रचंड तेजाने लक्ष वेधून घेत थोडा वेळ तो चमकत राहिला व अचानक गायब झाला , त्यानंतर घटकाभरातचं तांबडं फुटलं. सकाळी घरात या चमत्कारिक चांदणी बद्दल विचारलं आणि ओळख झाली ती या शुक्राच्या चांदणीची.

शुक्राच्या चांदणीने मला भुरळ पाडली त्याचं पहिलं-वहिलं प्रामाणिक कारण म्हणजे ती पहाटे म्हणजे भुतांचा प्रहर उलटून गेल्यावर उगवते याचाच अर्थ असा की ती दिसली म्हणजे मी न घाबरता लघवीला उठायला मोकळा. त्यामुळे या दिवसानंतर मध्यरात्री जाग आल्यावर मी शुक्राच्या चांदणीची आतुरतेने वाट पाहायला लागलो. अंथरुणातून फक्त चेहऱ्याचा भाग बाहेर काढुन मी पूर्वेच्या क्षितिजाकडे पाहत राही. हळूहळू मिणमिणती शुक्राची चांदणी क्षितिजावर डोकावू लागे. पहाटेच्या नीलप्रकाशात तिच्या अनुपम सौंदर्याचा प्रत्यय येई. अंधारात पुर्ण तेजाने चमकणारी चांदणी, तांबडं फुटता-फुटता विरून जाईपर्यंत मी एकटक तिच्याकडे पाहत राही. काहीवेळा तर अगदी उजाडलं असताना ही ती क्षितिजावर पुर्ण भरात चमकत राही. अगदी खरंच ! शुक्राइतकी तेजस्वी प्रकाशाने चमकणारी दुसरी कोणती चांदणी नसावी.

नंतरच्या दिवसांत संधी मिळेल तेव्हा शुक्राची चांदणी न्याहाळण्याचं वेडंच लागलं. कुठं डोंगरावर, किल्ल्यावर मुक्कामाला असताना खास शुक्राच्या चांदणीच्या भेटीसाठी आवर्जून गजर लावू लागलो. डोंगरावरील स्वच्छ वातावरणात, निळ्या-जांभळ्या आभाळात शुक्राच्या चांदणीचं अलौकिक रूप पाहताना जवळ-जवळ समाधीचं लागते. मोकळ्या माळरानातुन अंधारात असीम तेजाने चमकत तांबड्या ब्रम्हप्रकाशाच्या पार्श्वभुमीवर विरत जाणाऱ्या तिला पाहणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव असतो.

आताशा इथल्या काय आणि गावाकडील काय दोन्ही घरातून क्षितिज दिसणं दुरापास्त झालंय. शुक्राच्या चांदणीची भेट ही त्यामुळे दुर्मिळ झालीय. तशी ती अशी कधीतरीचं भेटते ते ही मी जंगल-माळरानं तुडवत असताना वा उंच डोंगरावर एखादया तटा-बुरुजाच्या अंगा-खांद्यावर बसलेला असतानाचं.... आज ही ती दिसली की आता तांबडं फुटणार या जाणिवेने सर्वप्रथम सुरक्षिततेची, निश्चिंततेची अनुभूती देते व त्यानंतर तिच्या अलौकिक सौंदर्याच्या शीतल छायेत डोळे तृप्त होत राहतात.

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

11 Oct 2023 - 5:30 pm | सौंदाळा

मस्तच
शुक्राच्या चांदणीचा एखादा फोटो मात्र पाहिजे होता

कंजूस's picture

11 Oct 2023 - 6:22 pm | कंजूस

खरंच.

आता चांदणी दिसली तरी ठळक नसते. चमचमणारे आकाश विसरायचं.

कंजूस's picture

11 Oct 2023 - 6:49 pm | कंजूस

मागच्या एप्रिलचा फोटो (मोबाईलवर)

कर्नलतपस्वी's picture

11 Oct 2023 - 6:53 pm | कर्नलतपस्वी

लहानपणी खळं लागले की खळ्यात झोपायला जायचो. घरात संख्येत वाढ झाली की आमचा नंबर आंगणात झोपण्या साठी लागायचा.

बाकी शुक्र तारा साहित्यिक लोकांनी भरपूर वापरला. कुणाच्या खिन्न मनास दिलासा तर कुणाला वेळेचे भान याच शुक्राने दिले.

अगदी विल्यम शेक्सपियर सुद्धा याच्या मोहातून सुटला नाही.काही उदाहरणे वानगीदाखल.

मस्त लेख आहे.भुतं व शुक्र याचें नाते आम्हींपण ऐकले आहे.

आपले लेख छानच असतात.

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी....पाडगावकर

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी
ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळया वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी-भा रा तांबे

अडवू नका मज सोडा आता,
पुरं झालं ना धनी
उगवली शुक्राची चांदणी-श्रीरंग गोडबोले

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ-कुसुमाग्रज

Venus and Adonis-William Shekespears

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Oct 2023 - 10:59 am | राजेंद्र मेहेंदळे

आणि त्यावर हा मस्त प्रतिसाद.
रच्याकने एक शंका-- ये बाहेरी अंडे फोडुनी?? भा.रा.तांबेंसारख्या सिद्धहस्त कवीने असा नॉन-फोनेटिक शब्द कसा काय योजला असेल बुवा?

कर्नलतपस्वी's picture

12 Oct 2023 - 1:19 pm | कर्नलतपस्वी

रच्याकने एक शंका-- ये बाहेरी अंडे फोडुनी?? भा.रा.तांबेंसारख्या सिद्धहस्त कवीने असा नॉन-फोनेटिक शब्द कसा काय योजला असेल बुवा?

मलाही थोडा अटपटासा वाटला. म्हणून गाणे ऐकले. १९६७ मधे स्वरबद्ध केलीली कवीता, राजकवी तांबे यानी आपल्या उतारवयात लिहीली आहे. स्व. लता मंगेशकर यांचा स्वर व पं. हृदयनाथ याचे संगीत.

कवितेचे एखादे कडवे घेऊन त्याचे रसग्रहण किंवा शब्द रचना याचे विश्लेषण करणे म्हणजे कवी आणी कवीता दोघांवरही अन्याय ठरेल.

पैलतीर समोर दिसत असताना मन आणी त्याची अवस्था. कवीला, मृत्यू समोर दिसत असताना खिन्न, उदास मन नैराश्याच्या कोषात वेढलेले दिसत असावे. नैराश्यावर नियंत्रण ठेवून त्या कोषातून बाहेर येण्यासाठी कवी त्याची समजूत घालत असावा असे पुढच्या कडव्यातून समजून येते.

फुल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल गळे, बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

(खुपच सटिक शब्दरचना)

पं हृदयनाथ यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासू संगीतकाराने शब्दांमधे कुठलाही बदल न करता स्वरबद्ध केले यातच सर्व आले. म्या पामराने यावर काय बोलावे.

कविता शब्दांच्या पलीकडे जावून बघण्याचा एक प्रयत्न.

चक्कर_बंडा's picture

12 Oct 2023 - 11:21 am | चक्कर_बंडा

शुक्र मोठमोठया साहित्यिकांना प्रिय आहे हे खरंच ! छान उजळणी झाली या प्रतिसादाच्या माध्यमातुन....

नंतरच्या दिवसांत संधी मिळेल तेव्हा शुक्राची चांदणी न्याहाळण्याचं वेडंच लागलं. ..अगदी चतुर्थीला तर सुंदर दिसते.

चौथा कोनाडा's picture

11 Oct 2023 - 10:45 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख !

चक्कर_बंडा's picture

12 Oct 2023 - 11:23 am | चक्कर_बंडा

सर्वच सुंदर प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार !

श्वेता व्यास's picture

12 Oct 2023 - 2:22 pm | श्वेता व्यास

लेख आवडला.
लहानपणी आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री पाहिलेल्या तारांगणांच्या आठवणी जाग्या झाल्या.

राघव's picture

12 Oct 2023 - 7:27 pm | राघव

खूप छान लेखन! आवडले. :-)

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Oct 2023 - 9:23 pm | अमरेंद्र बाहुबली

शुक्राची चांदणी पहावी लागेल. ऐकलं होतं पण कधी पाहीली नव्हती.

जुइ's picture

12 Oct 2023 - 10:27 pm | जुइ

अनेकदा शुक्राची चांदणी पाहिली आहे! लेख आवडला.