श्री गणेशोत्सव - काही ऐतिहासिक कविता - भाग ३

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
25 Sep 2023 - 1:45 am

हे सारं अघळपघळ आहे. कोठेही विचारांचा लीनीयर फ्लो नाही , एकसंधता नाही . असण्याची गरजही नाही. हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे.
_________________________________________________________

श्री गणेशोत्सवाचे दिवस . एकदम प्रसन्न वातावरण . ऑफिसातही थोडा निवांत वेळ . त्यामुळे मग दुपारी असे काहीही तरी स्वर्गीय वाचावयास मिळते . ऐतिहासिक कविता पाहता पाहता मोरोपंतांच्या १०८ रामायणांचा उल्लेख वाचायला मिळाला. अर्काईव्ह.ऑर्ग वर जरा शोधाशोध केली तेंव्हा मोरोपंतांच्या अफाट काव्याचा विस्तार दिसला ! दिसेल ते ते नजरेखालुन घातले . अवाक झालो. काय लिहिणार ह्यावर . किती लिहिणार ! नीट समजुन उमजुन वाचायलाच वर्ष जाईल ! अरविंद कोल्हटकर ह्यांनी आधीच मोरोपंतांच्या लेखनावर एक छोटासा धागा मिपावर लिहिला होता त्याची ही लिंक : मोरोपंतांची १०८ रामायणे https://www.misalpav.com/node/41297

मग म्हणलं , किमान नाममात्र म्हणुन केकावलीतील काही मोजक्या आर्यांवर लिहावे .
मग ह्या काही आर्या एकदम नजरेत भरल्या ,पण ह्यावरही अजुन काय लिहावे . युट्युबवर अत्यंत रसाळ वाणीत कल्याणी केसकर मॅडम ह्यांन्नी निरुपण आधीच करुन ठेवले आहे :

भाग १ : https://www.youtube.com/watch?v=tmA03BsaBHA
भाग २ : https://www.youtube.com/watch?v=B6Fmb4iGkjs

पटुत्व सकलेंद्रियी, मनुजता, सुवंशी जनी,द्विजत्वहि दिले भले, बहु अलभ्य जे की जनी; ।
यशःश्रवणकिर्तनी रुचि दिली; तरी हा 'वरा' म्हणे 'अधिक द्याच की,' अखिल याचकी हावरा ॥१२॥

असे न म्हणशील तू वरद वत्सल, श्रीकरा !परंतु मज भासले म्हणुनि जोडितो मी करा; ।
दिले बहु बरे खरे, परि गमे कृपा व्यंग ती. अलंकृतिमती सती मनि झुरे, न जो संगती ॥१३॥

कराल पुरती दया, तरि असो दिले पावले; परंतु हरि ! एकदा त्वरित दाखवा पावले; ।
प्रसाद करणे मनी जरि नसेल, हे आवरा; जया बहु तयास द्या, मज कशास ? मी हावरा ॥१४॥

निरुपण ऐकलं , अंतर्मुख झालो. किती खरं आणि किती सहज लिहुन ठेवलं आहे हे -

हे ईश्वरा तु मला काय काय नाही दिलंस ! सकल इंद्रिये धडधाकट आहे , सुदृढ आहेत, त्यातही कोण्या प्राण्याचा जन्म नाही , मानवाचा जन्म दिला आहेस. त्यातही चांगल्या सुवंशात द्विजकुलात जन्म दिला आहेस जे की किती अलभ्य आहे. नुसते इतकेच नाही तर श्रवण किर्तनात रुची दिली आहेस , तरी मी आपला अजुनही हा वर द्या असे मागतोच आहे , आता तु म्हणशील की सर्व याचकांत हाच सर्वात हावरा आहे. किंवा कदाचित म्हणणार ही नाहीस कारण तु तर श्रीकर आहेस भक्त वत्सल आहेस , भक्तांना वर द्यायला उतावळाच आहेस. म्हणुनच मी हात होडुन तुमच्यापुढे उभा आहे अन म्हणतोय की हे सर्व दिले तरी ही कृपा अव्यंग नाही, ह्यात एक एक व्यंग मात्र अजुन राहिले आहे. आणि त्यामुळे माझी अवस्था सर्व अलंकार आणि साज शृंगार उपलब्ध्द असुनही पती जवळ नसल्यावर एखाद्या पतिव्रतेची व्हावी तशी माझी अवस्था आहे. तुम्ही हे सारं दिलंय ते पावले पण ही दया पुर्ण करा आणि एकदा तुमच्या चरणकमलांचे दर्शन द्या . आणि जर ही कृपा करायचीच नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे, हे आवरा सारं , ज्याला हे जास्त वाटतं त्याला द्या हे भौतिक यश. मी तर तुमच्या दर्शनासाठी हावरा आहे.

जणुकाही आपण हे स्वत:च स्वतःबद्दल लिहिले आहे असे वाटले . अहाहा. मन एकदम प्रसन्न झाले. दोन क्षण डोळे मिटुन निश्चल, शांत बसलो चिंतन करत -

आता हे सारं सगळ्यांनाच कसे समजेल? समजुन घेण्यासाठी केवढी जास्त मुलभुत अर्हता आहे. खरं तर मलाही हे आर्या वृत्त प्रचंड अवघड वाटतं गायला , त्यामुळं काहीही लक्षात रहात नाही. त्यातही हे मुळ आर्या नसुन गीती वृत्त आहे असे लगेच अभ्यासु लोकं सांगतील , आर्या अजुन जास्त अवघड वाटते मला वाचायला अन लक्षात ठेवायला. आपण आपली साधी माणसं अनुष्टुभ आणि भुजंगप्रयात वाली. अगदीच आनंदकंद, शार्दुलविक्रीडीत , मालीनी , शिखरिणी वगैरे कानाला गोड वाटते पण लक्षात ठेवायला म्हणजे अनुष्टुभच ! म्हणता म्हणता रामरक्षा कधी पाठ होते ते कळतही नाही . तेच भगवद्गीतेच्या बाबतीत . पण आर्या मलातरी अवघड वाटली.

आणि नुसते व्याकरण कळुन काय होणार? त्यातील अर्थ कळायला तो अंतर्भाव असायला हवा . जो माणुस मुळातच निरीश्वरवादी आहे त्याला एखाद्या भक्ताची ही अवस्था कशी कळणार ! भक्त म्हणजे जो विभक्त नाही तो भक्त. जो जोडला गेलेला आहे तो भक्त. आधी हे जोडलं जाणं सगुणाशी होणार आहे , त्यासाठी आधी सगुणावर श्रध्दा हवी. अन नंतर लक्षात येईल की सगुण निर्गुण असा भेदच नाही तेव्हांची जी परमोच्च अवस्था आहे ती आपली नित्यस्थिती आहे . आता समाजाचा एक मोठ्ठा घटक भक्त हा शब्द एखादी शिवी असल्यासारखा वापरत आहे त्यांना कसे कळावे भक्ताच्या मनाची अवस्था. निर्गुण तर फार दूरची बात , सगुणही कळणे अशक्य आहे . ज्ञानेश्वर माऊलींचा अत्यंत सुंदर अभंग आहे :

तुझिये निढळीं कोटि चंद्र प्रकाशे ॥ कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥
हालकारे कृष्णा डोलकारे ॥ घडिये घडिये गुज बोलकारे ॥ध्रु०॥
उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो ॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥२॥

आता काही लोकोत्तर समाजसुधारक ह्या कृष्णालाच लंपट , व्यभिचारी , लबाड अन कपटी म्हणत असतील तर त्यांच्या विचार मानणार्‍यांना कसे ह्या अभंगातील आनंद कळेल ! हा अभंग माणुस भक्तीरसाचा गोडवा चाखलेला भाविकच असायला हवा ना. उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो हे ऐकताना डोळ्यासमोर विठोबाची मुर्ती आली त्याला कळला हा अभंग ! तेथे पाहिजे जातीचे ! येर्‍आ गबाळ्याचे काम नोहें !

अजुन उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे - आपल्या सावरकरांची अजरामर कविता - ने मजसी ने परत मातृभुमीला . तात्याराव म्हणतात -

भू मातेच्या चरण तला तुज धूता मी नित्य पाहिला होता

आता जे भारताला भारतमाता मानायलाच तयार नाहीत , ज्यांच्यासाठी भारत म्हणजे बस्स जमीनीचा एक तुकडा आहे , फक्त एक उपभोग्य जमीन आहे , त्यांन्ना कशी कळेल ही उपमा ! इथें लोकं भारताला भारत म्हणायला तयार नाहीत , इंडियाच म्हणलं पाहिजे असा हट्ट आहे लोकांचा , भारत म्हणलं की पित्त खवळतय. त्यांना कसं कळेल ह्या गीतातील विरह !
"शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी किंव्वा या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा, त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीते" हे हे आपण स्वतः अनुभवलं आहे म्हणुन आपल्याला कळु शकतं , सर्वांनाच कसे कळावे ! तुमचा जन्मच जर सावरकरांना माफीवीर म्हणणार्‍या घरात झाला असेल , तुमचे संस्कारच जर सावरकरांना संडासवीर म्हणायचे असले असतील तर त्याला तुम्ही तरी काय करणार.

माझा एक मिपाकरच मित्र मला म्हणालेला - तुमच्या ते अमेरिकन कंस्टीट्युशन मध्ये म्हणलं आहे ना की ऑल ह्युमन बिईंग्स आर ईक्वल वगैरे , ते ठार खोटं आहे , असं असुच शकत नाही . झाडाची दोन पानं सारखी नसतात , दोन माणसं कशी समान असतील ? मी म्हणालो - पीपल आर बोर्न इक्वल बट दे आर रेज्ड वेरी डिफरंटली. त्यावर त्याने एक स्पष्ट पण वादग्रस्त विधान केलेले - ह्या . हे ही साफ खोटं . जर आई वडीलच भिन्न असतील तर पोरं का सारखी असतील . कोणीही सारखं नाही , समान नाही .
समाजात हे वर खाली रहाणारच , कारण ते समाजात आहे असं नाहीये , हा सार्वत्रिक अनादि नैसर्गिक नियम आहे . आणि तु तुझ्या पुर्वजन्म कर्माने एखाद्या विशिष्ठ घरात , विशिष्ठ आई वडीलांच्या पोटी जन्माला आलास तर त्यात तुझे काही कर्तृत्व नाही , अन दोषही नाही. तुला हे संस्कृत आवडेल , ज्ञानेश्वरी आवडेल , चापेकरांचे श्लोक आवडतील, मोरोपंतांच्या आर्या आवडतील , दुसर्‍याला नाही आवडणार , त्याला अन्य कोणाच्या कविता वगैरे वगैरे आवडेल , कारण ते त्याचे पुर्वजन्माचे संचित आहे. आता ज्याला गंधच नाही ह्या कवितांचा त्याला ते कसे कळेल , आणि जर कळले नाही अन त्याने ह्या साहित्याचा वंध्यामत्सर केला तर त्यात त्याचा तरी काय दोष.
जो तो बस्स ज्याला त्याला पुर्वजन्माने , प्रारब्ध्द सुकृत आणि संचिताने आंदण मिळालेला पॅटर्न फॉल्लो करतोय बस्स. (ह्याला फिलॉसॉफी मध्ये थ्रोननेस https://en.wikipedia.org/wiki/Thrownness असे म्हणतात पण त्याविषयी नंतर कधी तरी .)

त्यामुळे हे कविता बिवितावर विवेचन करणे हे वंध्यामैथुन करण्यासारखे आहे. त्यातुन काही क्षणिक आनंद असा सोडला तर दीर्घकालीन उपलब्धी असे काही नाही. कारण ज्याला कविता उमगणार आहे त्याला ती उमगणारच आहे , आणि ज्याला नाही कळणार त्याला कितीही डोकं आपटले तरीही नाहीच कळणार . ज्यांना मोरोपंत कळणार आहेत त्यांना ते कळणारच आहेत , आपण जास्तीत जास्त त्यांच्या लेखनाच्या लिन्क्स शेयर करु शकतो समविचारी लोकांपर्यंत हे पोहचावे म्हणुन .
बाकी लिहिता लिहिता आपले वाचन होते , आपला अभ्यास होतो, आपल्या आपल्या पुर्वजांची , त्यांच्या अविश्वसनीय लेखनाची ओळख होते, आणि त्यांच्यापुढे आपण किती लहान आहोत ह्या भावनेने आपण नतमस्तक होतो बस हाच काय तो आपला महत्वाचा आनंद.

अन मग पुर्वी लिहिलेले एक वाक्य मनात परत एकदा डोकावुन गेले :

हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे.

डोळे उघडले . म्हणलं लेखाचा शेवट करताना मोरोपंतांचीच एखादी केका लिहावी अजुन . आणि मनात जे विचार आलेलेले त्याला साजेशीच अशी ही अगदी चपखल केका नजरेस पडली - बस्स, ह्या उपर अजुन काही मागणे नाही :


न निश्चय कधी ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; न चित्त भजनी चळो मति सदुक्तमार्गी वळो; ।
स्वतत्त्व ह्रदया कळो; दुरभिमान सारा गळो; पुन्हा न मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो ॥११९॥

|| श्री कृष्णार्पणमस्तु ||

______________________________________________

१. संदर्भ : केकावली विकिसोर्स : https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...
२. अतिषय सुश्राव्य आवाजातील एकेका केका गायन केलेले हे युटुब शॉर्ट व्हिडीओज चे चॅनल : https://www.youtube.com/@madhurasathwanitlyakavita/shorts
३. मोरोपंतांचे विपुल साहित्य : अर्काईव्ह.ऑर्ग https://archive.org/search?query=creator%3A%22Moropant.%22

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 Sep 2023 - 9:05 am | प्रचेतस

सुरेख लिहिलंत प्रगोसर.
मयुरपंडितांचा जन्म पन्हाळ्यावर झाला. पन्हाळगड सोडल्यानंतर ते बारामतीस राहावयांस गेले.

रेवडीकर हरिदासांच्या किर्तनास त्यांना जागा मिळेना तेव्हा त्यांनी रचलेली आर्या ही त्यांची पहिली आर्या म्हणून प्रसिद्ध झाली.

नित्य तुम्ही प्रभुपाशी पेढेबरफी नवा खवा खावा |
तरि म्यां एके दिवशीं रेवडिचा स्वाद कां न चाखावां ||

अर्धवटराव's picture

25 Sep 2023 - 9:38 am | अर्धवटराव

.

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2023 - 11:09 am | कर्नलतपस्वी

आवांतर...

बारा "मती", किती सार्थ नाव आहे हे तीथे जन्मलेल्या,वाढलेल्या विवीध प्रसिद्ध व्यक्ती पाहिल्यावर कळते.

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2023 - 11:11 am | कर्नलतपस्वी

यांच्या साहित्यावर प्रतिसाद देणारा मी अल्पमती.

चित्रगुप्त's picture

25 Sep 2023 - 11:57 pm | चित्रगुप्त

हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे.

-- हे खूप महत्वाचे.

हे आर्या वृत्त प्रचंड अवघड वाटतं गायला , त्यामुळं काहीही लक्षात रहात नाही.

सकृतदर्शनी काव्याच्या लांबच लांब ओळी, त्यातली संस्कृतप्रचुरता इत्यादि बघून जीव दडपतो खरा, परंतु "सुसंगति सदा" च्या चालीवर तुकड्या-तुकड्यात म्हणत/वाचत गेले तर सोपे वाटते. उदाहरणार्थः

कराल पुरती दया, तरि असो दिले पावले; परंतु हरि ! एकदा त्वरित दाखवा पावले ।
प्रसाद करणे मनी जरि नसेल, हे आवरा; जया बहु तयास द्या, मज कशास ? मी हावरा ॥१४॥
हे असे म्हणायचे:

कराल पुरती (सुसंगति सदा)
दया, तरि असो (घडो सुजन वा-)
दिले पावले (क्य-कानी पडो)
परंतु हरि ए- (कलंक मतिचा)
कदा त्वरित दा- (झडो विषय सर-)
खवा पावले. (-वथा नावडो)

प्रसाद करणे
मनी जरि नसे-
ल, हे आवरा
जया बहु तया-
स द्या, मज कशा-
स मी हावरा .
-- अशा रितीने म्हणण्यात मोठीच मौज येते, आणि पाठ ही सहज होते. मोरोपंतांची कवने शंभर-दीडशे वर्षे अनेकांना तोंडपाठ असण्याचे हेही एक कारण असावे.

... आता काही लोकोत्तर समाजसुधारक ह्या कृष्णालाच लंपट , व्यभिचारी , लबाड अन कपटी म्हणत असतील तर त्यांच्या विचार मानणार्‍यांना कसे ह्या अभंगातील आनंद कळेल ...
... जे भारताला भारतमाता मानायलाच तयार नाहीत , ज्यांच्यासाठी भारत म्हणजे बस्स जमीनीचा एक तुकडा आहे , फक्त एक उपभोग्य जमीन आहे , त्यांना कशी कळेल ही उपमा ...

--- अगदी खरे.

ज्यांना मोरोपंत कळणार आहेत त्यांना ते कळणारच आहेत , आपण जास्तीत जास्त त्यांच्या लेखनाच्या लिन्क्स शेयर करु शकतो समविचारी लोकांपर्यंत हे पोहचावे म्हणुन .
-- बाकी लिहिता लिहिता आपले वाचन होते , आपला अभ्यास होतो, आपल्या आपल्या पुर्वजांची , त्यांच्या अविश्वसनीय लेखनाची ओळख होते, आणि त्यांच्यापुढे आपण किती लहान आहोत ह्या भावनेने आपण नतमस्तक होतो बस हाच काय तो आपला महत्वाचा आनंद.

-- हेच महत्वाचे आहे आणि ज्यांना ज्यांना हे करता येण्यासारखे आहे, त्यांनी अवश्य करत राहिले पाहिजे.

शेवटी, " पुन्हा न मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो" यातला 'मेळो' हा शब्द वाचून बुचकळ्यात पडलो. एकतर 'मेळो' चा काही अर्थ लागत नव्हता आणि मात्रांमधे पण ते बसत नव्हते. त्याऐवजी "पुन्हा न मन हे मळो" असे असले पाहिजे असे वाटले. जालावर शोध घेता विकीवर 'मेळो'च दिसले. मग आणखी शोध घेता जुने मिपाकर आनंद घारे यांच्या या ब्लॉगवर ते 'मळो' असल्याचे बघून खातरी पटली. असो.
या अत्यंत सुंदर लेखाबद्दल आणि त्यातील मौल्यवान दुव्यांबद्दल अनेक आभार.

चौथा कोनाडा's picture

26 Sep 2023 - 5:48 pm | चौथा कोनाडा

सुंदर रसा़ळ, प्रासादिक लेखन !