नाईन इलेव्हन - Twin To-Worse: भाग १

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
18 Sep 2023 - 7:18 pm

लहानपणापासूनच आयुष्यात अनेक दुःखदायक प्रसंगांना सामोरे गेलेल्या सोफीया डंकवर्थच्या आयुष्यात सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकाला १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मानाचा समजला जाणारा 'नॅशनल बुक अवॉर्ड' जाहीर झाल्या दिवसानंतर उण्यापुऱ्या दहा महिन्यांनी आज आणखीन एक अभिमानास्पद आणि आनंददायी असा दिवस आला होता.

१९९३ साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर झालेल्या पहिल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत २६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाशित झालेले, तिच्या स्वानुभवांवर आधारित असलेले 'Nine Eleven - Twin To-Worse' हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याला जगभरातील वाचकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याने पुढच्या अवघ्या दोन महिन्यांत त्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती.

अल्पावधीतच वाचकप्रिय ठरलेल्या ह्या 'बेस्ट सेलर' पुस्तकाने मनोरंजन क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले नसते तरच नवल होते!
मे २०२२ च्या पहिल्या आठवड्यात 'नेटफॉक्स' ह्या 'ओव्हर-द-टॉप' स्ट्रीमिंग सेवा पुरवण्यात आघाडीवर असलेल्या कंपनीसाठी वेब सिरीजची निर्मिती करणाऱ्या 'टर्नर ब्रदर्स' ह्या विख्यात निर्मितिगृहाचा प्रतिनिधी जॉन मॅक्लेन ह्याने सोफीयाची भेट घेऊन तिच्या पुस्तकावर वेब सिरीज निर्माण करण्याची त्यांच्या कंपनीची इच्छा असल्याचे तिला सांगुन त्याविषयीचा व्यावहारिक प्रस्ताव तिच्यासमोर मांडला होता.

वास्तविक हा प्रस्ताव सोफियाला ऐकताक्षणीच आवडला होता. लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय अंगवळणी पडली असल्याने तो स्वीकारण्यासाठी तिला कोणाशी चर्चा करण्याची वा कोणाची परवानगी घेण्याची आवश्यकताही नव्हती परंतु फिल्म अडॅप्टेशन राईट्स, आर्थिक गणिते, अटी-शर्ती आणि अन्य कायदेशीर-तांत्रिक मुद्द्यांवर तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी होकार देण्यापुर्वी एक आठवड्याची मुदत तिने मागून घेतली होती.

विहित मुदतीत सोफियाने संबंधित विषयांतील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्यावर आधारित असलेला आपला लिखित प्रस्ताव दुसऱ्या भेटीत जॉन मॅक्लेनच्या हाती सुपूर्द केल्यानंतर तिसऱ्या दिवशी कंपनीला तिचा प्रस्ताव बिनशर्त मंजूर असून त्या अनुषंगाने करारपत्र तयार करण्याचे काम सुरु असल्याचे जॉनने तिला फोन करून कळवले होते. अल्पावधीत ह्या सर्व घडामोडी घडल्याने सोफियाला हे सर्व स्वप्नवत वाटत होते पण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करारपत्रावर दोन्ही पक्षकारांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आणि तिच्या हाती मानधनाचा धनादेश मिळाला तेव्हा हे स्वप्न नसून वास्तव आहे ह्यावर तिचा विश्वास बसला होता.

पुढील तीन महिन्यांत पटकथालेखन आणि कास्टिंगचे काम पूर्ण झाल्यावर गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होऊन सुमारे अकरा महिन्यांत ते पूर्णही झाले होते. पोस्ट प्रोडक्शन सोपस्कार पार पडल्यावर दणक्यात केल्या गेलेल्या प्रदर्शनपूर्व प्रमोशन मुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली, तिच्या पुस्तकावर आधारित असलेली त्याच नावाची बहुप्रतीक्षित "Nine Eleven - Twin To-Worse" हि वेब सिरीज आज संध्याकाळी 'नेटफॉक्स' वर प्रदर्शित होणार होती आणि त्या निमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्याला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहण्यासाठी दुपार पासूनच तिची लगबग सुरु होती.

***

दिनांक : १५ सप्टेंबर २०२३
वेळ : संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटे
स्थळ : मँडरिन ओरिएंटल हॉटेल
सेंट्रल पार्क, मिड टाऊन, न्यू यॉर्क.

संध्याकाळी बरोब्बर सहा वाजून तीस मिनिटांनी सोफीयाने आपला दोन वर्षाच्या मुलगा जॉर्ज आणि आपली वृद्ध आजी मार्था ह्यांच्या समवेत मँडरिन हॉटेलच्या बॉलरूम मध्ये प्रवेश केल्या बरोबर ऑडिओ जॉकीने अचूक टायमिंग साधून 'सिक्स डे वॉर' हे गाणे लावले.

At the starting of the week
At summit talks you'll hear them speak
It's only Monday

Negotiations breaking down
See those leaders start to frown
It's sword and gun day

Tomorrow never comes until it's too late

You could be sitting taking lunch
The news will hit you like a punch
It's only Tuesday

You never thought we'd go to war
After all the things we saw
It's April Fools' day

Tomorrow never comes until it's too late

We'll all go running underground
And we'll be listening for the sound
It's only Wednesday

In your shelter dimly lit
Take some wool and learn to knit
Cause it's a long day

Tomorrow never comes until it's too late

You'll hear a whistling overhead
Are you alive or are you dead?
It's only Thursday

You feel a shaking of the ground
A million candles burn around
Is it your birthday?

Tomorrow never comes until it's too late

Though that shelter is your home
The living space you have outgrown
It's only Friday

As you come out to the light
Can your eyes behold the sight
It must be doomsday

Tomorrow never comes until it's too late

Ain't it funny how men think
They made the bomb, they are extinct
It's only Saturday

आपल्या सर्वाधिक आवडत्या गाण्याच्या पार्शवभूमीवर बॉलरूम मध्ये प्रवेशकर्ती झालेल्या सोफीयाचे सूत्रसंचालकाने आपल्या प्रमुख पाहुणीचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्याचे सांगत तिचे स्वागत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत उपस्थितांनी उस्फूर्तपणे आपल्या खुर्चीतून उठून उभे रहात टाळ्यांचा गजर करून जोरदार स्वागत केले. साश्रूनयनांनी मिळालेल्या ह्या सन्मानाचा स्वीकार करत सोफिया, जॉर्ज आणि मार्था आयोजकांनी त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या मंचासमोरील टेबलवर स्थानापन्न झाले होते.

बसल्या जागेवर डोळे मिटून ती शांतपणे ऐकत असलेल्या त्या गाण्याची शेवटची ओळ जीचे तीन वेळा आवर्तन होते, ती ओळ सुरु होण्या आधीच सोफियाने ऑडिओ जॉकीला गाणे तिथे पॉज करण्याची खूण केली.

पुढे जवळपास तासभर प्रथितयश पॉप गायकांनी कॉकटेल्स आणि स्टार्टर्सचा आस्वाद घेत बसलेल्या उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यानंतर 'नेटफॉक्स' चे मुख्य विपणन अधिकारी राल्फ डाल्टन ह्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात लेखिका सोफिया डंकवर्थ ह्यांची पार्शवभूमी आणि ह्या वेब सिरीजच्या निर्मिती प्रक्रिये विषयी माहिती देत घड्याळाकडे लक्ष ठेवत सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सोफियाला मंचावर आमंत्रित करून वेब सिरीज अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्याची विनंती केली. बरोब्बर आठ वाजता सोफियाने पोडियमवर ठेवलेल्या टचस्क्रीन वरील एक कळ दाबली आणि सूत्रसंचालकाने Nine Eleven - Twin To-Worse हि वेब सिरीज आता नेटफॉक्सच्या जगभरातील प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याची घोषणा करून सोफियाला दोन शब्द बोलण्याची विनंती केली.

माईक हातात घेतल्यावर सुरुवातीला अशा प्रसंगी जे औपचारिक बोलावे लागते ते बोलणे अक्षरशः चार-सहा वाक्यात आवरतं घेत सोफियाने आपले मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. आपल्या छोटेखानी भाषणाच्या शेवटी तिने तिच्या आगमनाच्या वेळी लावण्यात आलेल्या गाण्यासाठी आयोजकांचे मनापासून आभार मानले आणि त्या गाण्याचे तिच्या आयुष्यात असलेले स्थान विषद केले.

"सिक्स डे वॉर हे खूप जुनं गाणं आहे, माझ्या जन्माच्याही कितीतरी वर्षे आधीचं, पण ते माझ्या आई-वडिलांचे अत्यंत आवडते गाणे होते. मी ते अगदी लहान असल्यापासून ऐकत आले आहे. इतरांसाठी हे फक्त एक गाणे असेल पण माझ्यासाठी ते त्यापेक्षा खूप जास्त काही आहे. युद्ध, मग त्याचे स्वरूप कुठलेही असो पण ते अगदी कमी वेळात लोकांच आयुष्य बदलून टाकतं! २६ फेब्रुवारी १९९३ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात माझे वडील मृत्युमुखी पडले, ११ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यात माझी आई मृत्युमुखी पडली आणि २६ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या काबुल विमानतळावरील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात माझा नवरा मृत्युमुखी पडला. ह्या गाण्याचे शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ते तुम्हाला अंतर्मुख करतील. लहानपणापासून म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी ह्या गाण्यातले शब्द नुसते ऐकले नाहीयेत तर ते जगले आहे, अद्याप जगत आहे. ज्यांनी माझे पुस्तक वाचले आहे त्यांना मी काय म्हणत आहे ते चटकन लक्षात येईल आणि ज्यांनी ते वाचलं नाहीये त्यांच्या हि वेब सिरीज पाहिल्यावर ते लक्षात येईल. आजही मी हे गाणे रोज, दिवसातून अनेकवेळा ऐकत असले तरी गेल्या कित्येक वर्षांपासून मी ह्या गाण्याची शेवटची ओळ कधी ऐकत नव्हते कारण 'उद्या' कधी येईल ह्या गोष्टीवरून माझा विश्वासच उडाला होता. पण आधी माझ्या पुस्तकासाठी मिळालेले वाचकांचे प्रेम आणि आज त्या पुस्तकावर निर्माण झालेल्या ह्या वेब सिरीजच्या प्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने मी इथे आले आणि आपण सर्वांनी मला जो आदर, सन्मान आणि प्रेम दिलंत ते पाहिल्यावर मला ती शेवटची ओळ व्यर्थ नसल्याची मनोमन जाणीव झाली आहे आणि हि जाणीव करून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची आजन्म ऋणी राहीन."

इतके बोलून झाल्यावर कंठ दाटून आल्याने पुढे एक शब्दही सोफियाला बोलणे अशक्य झाल्याने तिने माईक सूत्रसंचालकाच्या हाती सोपवला आणि ती मंचावरून खाली उतरली.

सोफियाच्या भाषणानंतर कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले न्यू यॉर्क शहराचे मेयर, पोलीस अधीक्षक वगैरे मान्यवर मंडळी आणि वेब सिरीज मध्ये काम केलेले कलाकार व टीमच्या अन्य सदस्यांना स्मृतिचिन्हे देणे आणि त्यानंतर 'Nine Eleven - Twin To-Worse' चा पहिला एपिसोड बघता बघता डिनर असे दोन कार्यक्रम अजून बाकी होते पण भावनाविवश झालेल्या सोफियाचे मन आता तिथे रमणे शक्य नसल्याने तिने तिथून निघण्याचा निर्णय घेतला आणि आयोजकांना तसा निरोप पाठवला.

तिच्या मनःस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आयोजकांनी तिला पुन्हा रंगमंचावर न बोलावता बसल्या जागेवरच स्मृतिचिन्ह देऊन तिचा योग्य तो सन्मान राखला. सूत्रसंचालकाने आपल्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी आपल्या सर्वांचा निरोप घेत असल्याची उद्घोषणा केली. उद्या ह्या वेब सिरीजचे 'बिंज वॉचिंग' करण्याचा निश्चय करून झोपलेल्या जॉर्जला कडेवर घेऊन सोफीया आणि मार्था बॉलरूम मधून बाहेर जाण्यासाठी निघाल्यावर पुन्हा एकदा उपस्थितांनी उभे राहून सोफियाला निरोप देण्यासाठी टाळ्यांचा गजर केला आणि ऑडिओ जॉकीने मगाशी पॉज केलेल्या गाण्याची शेवटची ओळ सुरु केली...

I think tomorrow's come, I think it's too late

I think tomorrow's come, I think it's too late

I think tomorrow's come, I think it's too late

क्रमश:

आधीचा भाग :
नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना

कथालेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Sep 2023 - 7:32 pm | कुमार१

वाचतोय.
छान चालू आहे लेखमाला......

गवि's picture

18 Sep 2023 - 7:37 pm | गवि

+१

हेच

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Sep 2023 - 8:59 pm | अमरेंद्र बाहुबली

वाचतोय. रच्याकने हा वेबसीरूज मिळत नाहीये नेट वर, काल्पनिक कथाय की कसंय?

टर्मीनेटर's picture

18 Sep 2023 - 9:08 pm | टर्मीनेटर

कुमार१, गवि आणि अबा
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

रच्याकने हा वेबसीरूज मिळत नाहीये नेट वर, काल्पनिक कथाय की कसंय?

हो ती काल्पनिक आहे 😀
कथानक पुढे सरकवण्यासाठी आणि थोडी रंजकता आणण्यासाठी काही काल्पनिक पात्रे आणि घटना/गोष्टींची मदत घेत आहे.

Bhakti's picture

18 Sep 2023 - 10:10 pm | Bhakti

खिळवून टाकणारं लिहिलंय.
वेगळीच शैली!

१९९३ साली टीव्ही घेऊन थोडाच काळ उलटला होता. अचानकच ट्विन टॉवरबद्दल बातम्या येऊ लागल्या. वारंवार तीच तीच दृष्ये दाखवत असूनही दोन तीन दिवस तेच बघत होतो ... हे सगळे आठवले. खरेतर तेंव्हा मी अमेरिकन एम्बसीतच नोकरी करत होतो, परंतु ऑफिसात याबद्दल काय चर्चा होत होती, अमेरिकन स्टाफची काय प्रतिक्रिया होती हे मात्र काही म्हणजे काही आता आठवत नाही.
... हे लिहीताना इतक्या वर्षांनंतर आज अचानक आणखी एक आठवले. माझ्या चित्रांच्या प्रदर्शनासाठी मी सान फ्रान्सिस्कोला जाणार होतो, न्यूयॉर्क मधेही प्रदर्शन करण्याबद्दल बोलणे चालले होते. त्या तारखा नेमक्या ९/११ च्या आसपासच्याच होत्या. जवळजवळ नक्कीच होते, पण का कुणास ठाऊक, या कार्यक्रमाबद्दल मला एक प्रकारची बेचैनी वाटत होती. त्यावेळी बायकोच्या एका मैत्रिणीची (धुळ्यात रहाणारी) आई फरीदाबादला आलेली होती, आणि तिचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास होता. तिला या प्रवासाविषयी विचारले तेंव्हा ती म्हणाली की तिथे जाणे तुम्ही टाळलेले बरे. जिवाला धोका होऊ शकतो. त्यांनी सांगितलेल्या अन्य गोष्टी खर्‍या निघालेल्या असल्याने, आणि माझीही चलबिचल होत असल्याने तो कार्यक्रम रद्द केला, आणि त्यानंतर सुमारे महिनाभराने ९/११ घडून आल्याचे बघून मी थक्कच झालो.
लेखमाला खूपच उत्कंठावर्धक आणि पकड घेणारी आहे. पुढील सगळ्या भागांच्या प्रतिक्षेत.
.

भक्ती आणि चित्रगुप्त
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

"खरेतर तेंव्हा मी अमेरिकन एम्बसीतच नोकरी करत होतो, परंतु ऑफिसात याबद्दल काय चर्चा होत होती, अमेरिकन स्टाफची काय प्रतिक्रिया होती हे मात्र काही म्हणजे काही आता आठवत नाही."

चित्रगुप्तजी त्याविषयी आता काही न आठवणे हे अगदी स्वाभाविक आहे कारण २६ फेब्रुवारी १९९३ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या पहिल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५-१६ दिवसांनी म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या १२ बॉम्बस्फोट मालिकेच्या बातम्यांचा भारतातल्याच नाही तर जगभरातल्या प्रसारमाध्यमांत इतका गवगवा झाला होता कि त्यापुढे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्याची बातमी झाकोळून गेल्याने ती घटना अल्पावधीतच अनेकांच्या विस्मृतीत गेली. हि मालिका लिहिण्यासाठी केलेल्या अवांतर वाचनात अमेरिकेतील कुठल्यातरी वाहिनीने मध्यंतरी केलेल्या सर्व्हे बद्दलची माहिती एका लेखात वाचायला मिळाली. त्या सर्व्हेच्या निष्कर्षात म्हंटले होते कि तिथल्या आजच्या तरुण पिढीला ९/११ च्या घटनेबद्दल संपूर्ण माहिती आहे पण ८० टक्के तरुणाई १९९३ साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या पहिल्या हल्ल्याविषयी अनभिद्न्य आहे!

असो, १९९३ च्या त्या हल्ल्यावर आधारित, ती घटना उलगडून सांगणारा "Path to Paradise: The Untold Story of the World Trade Center Bombing" हा खूप छान चित्रपट १९९७ साली आला होता. (युट्युब वर उपलब्ध आहे)

बाकी तुमचा ९/११ विषयक अनुभवही आवडला! तो निर्णय घेण्यामागे तुमची 'इंट्युशन' प्रभावशाली ठरली कि ज्योतिष हे ठरवणे अवघड असले तरी शेवटी परिणाम तेवढा महत्वाचा 😀
धन्यवाद.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Sep 2023 - 1:04 pm | अमरेंद्र बाहुबली

मलाही १९९३ पाहुन आधी आश्चर्य वाटलं. म्हटलं लिहीताना चूक झाली असावा पण पुढे पुन्हा ऊल्लेख आला ना २००१ च्या घटनेचाहा ऊल्लेख आला. नंतर गूगल वर शोधल्यावर कळालं.

भागो's picture

19 Sep 2023 - 11:27 am | भागो

कस काय कुणास ठाव, पण प्रस्तावना वाचली नव्हती. ती वाचून काढली, आता भाग १ वाचतो. उत्सुकता वाढत आहे.

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2023 - 5:51 pm | कर्नलतपस्वी

आपल्या लेखनात कविता आली बघुन छान वाटले.

बाकी मालीका छान सुरू आहे.

आजच एक नेटफ्लीक्स वर स्पाय ऑप्स मालीका समोर आली आहे. २००१ मधे रिटायरींग सि आय ए वरीष्ठ अधिकारी नॅरेटिव्ह देताना दिसला. पुर्ण मालीका बघितल्यावर कदाचित लिहीन.

भागो आणि कर्नलतपस्वी
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

"लेखनात कविता आली बघुन छान वाटले."

कर्नल साहेब, ह्या गाण्याचा परिचय मला २००६ साली प्रदर्शित झालेला 'फास्ट अँड फ्युरिअस' फ्रेंचाईजचा तिसरा भाग 'टोकियो ड्रिफ्ट' ह्या सिनेमातून झाला. ह्या चित्रपटाच्या ओपनिंग सिन मध्ये ह्या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनचा वापर केला होता. ते गाणे भलतेच आवडले म्हणून डाउनलोड करण्यासाठी शोधाशोध करताना १९७१ साली प्रकाशित झालेल्या 'Colonel Bagshot' ह्या रॉक बँडच्या 'Oh What a Lovely War' अल्बममधील 'Six Day War' हे मूळ गाणे सापडले.

१९६७ साली इस्रायल विरुद्ध इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन ह्या तीन अरब देशांच्या झालेल्या युद्धावर भाष्य करणारे हे गाणे आहे.
५ जून १९६७ ते १० जून १९६७ अशा केवळ सहा दिवस चाललेल्या ह्या युद्धाची परिणीती ह्या तीनही अरब देशांच्या काही भूभागावर कब्जा करून इस्रायलचा आकार तिप्पट होण्यात, हजारो लोकांचा मृत्यू आणि दोन लाख ऐशी हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचे व एक लाखाहून अधिक जॉर्डनवासिंचे विस्थापन होण्यात झाली होती. केवळ सहा दिवसांत लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या ह्या युद्धाची भीषणता, पीडितांच्या वेदना प्रभावीपणे व्यक्त होत असल्याने हे मूळ गाणेही माझ्या आवडीचे झाले होते, त्याचाच ह्या लेखनात उपयोग केला आहे.

आजच एक नेटफ्लीक्स वर स्पाय ऑप्स मालीका समोर आली आहे. २००१ मधे रिटायरींग सि आय ए वरीष्ठ अधिकारी नॅरेटिव्ह देताना दिसला. पुर्ण मालीका बघितल्यावर कदाचित लिहीन.

जरुर लिहा, वाचायला आवडेल!

धन्यवाद.

कर्नलतपस्वी's picture

25 Sep 2023 - 12:10 pm | कर्नलतपस्वी

युद्ध, कविता आणी कवी यांचे नाते खुप जुने आहे.
कुठेतरी सैनिक आपल्या देशासाठी बलिदान देत असतो तर कवी त्याने भावनाविवश होऊन त्कयावर कविता लिहीत असतो. १९७१ मधे ढाक्यात जनरल अरोरा जनरल नियाझी कडून शरणागतीचे पत्र लिहून घेत असताना दुर कराची मधे नसिर तुराबी आपली "वो हमसफ़र था"ही अजरामर गझल लिहीत होता.

अशी अनेक उदाहरणे माझ्या वाचनात आली आहेत. गझल ऐका मस्त आहे.

https://youtu.be/xOWTtcFaT3Q?si=_JGMP_FyFnKGIUaE

टर्मीनेटर's picture

25 Sep 2023 - 12:39 pm | टर्मीनेटर

कुरतुलेन बलौच (Quratulain Balouch) ही माझी आवडती गायीका आहे (तिचा उल्लेख माझ्या मिपा प्रोफाइल मध्ये आणि आधिच्या काही लेख, प्रतिसादांतही वाचायला मिळेल 😀) त्यामुळे तिने कोक स्टुडीओ ह्या कार्यक्रमात गायलेली ही गझल डाउनलोड केलेली असल्याने अनेकदा ऐकली आहे आणि ऐकतो. पण ह्या गझलचा इतिहास किंवा व्युत्पत्ती आज तुमच्या प्रतिसादातुन समजली 👍
धन्यवाद.

प्रचेतस's picture

20 Sep 2023 - 8:27 am | प्रचेतस

जबरदस्त एकदम.
लेखमाला भारीच होणार यात कसलीच शंका नाही.

चांदणे संदीप's picture

20 Sep 2023 - 4:43 pm | चांदणे संदीप

कमाल लिहिलंय. सोफियाच्या डोळ्यातलं पाणी शेवटी माझ्याच डोळ्यात उतरलं.
सॅल्यूट! ___/\___

सं - दी - प

MipaPremiYogesh's picture

21 Sep 2023 - 11:34 am | MipaPremiYogesh

वाह मस्तच सुरु झाली आहे लेखमाला . येउद्यात असेच अप्रतिम लेख

वाचला आणि आवडला. पुढच्या भागाची वाट पहात आहे. येऊ द्या ताडातडी.

प्रचेतस । चांदणे संदीप । MipaPremiYogesh | भागो
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ चांदणे संदीप

"सोफियाच्या डोळ्यातलं पाणी शेवटी माझ्याच डोळ्यात उतरलं."

हाडाचे कवी आहात तुम्ही!
भावनाप्रधान असणे हे कवी मनाचे व्यवच्छेदक लक्षण, त्यामुळे असे होणे स्वाभाविक आहे 🙏

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Sep 2023 - 12:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा भागही वाचला. आता पुन्हा पुढचे मागचे वाचतो संदर्भासाठी. लिहिते रहा.

श्वेता२४'s picture

25 Sep 2023 - 1:17 pm | श्वेता२४

मलाही आधी वाटलं की सत्य घटना आहे. कारण मी आधीचा भाग वाचला नव्हता. आज दोन्ही भाग वाचले. पुढील भागाची उत्कंठा वाढली आहे.

निमी's picture

25 Sep 2023 - 2:37 pm | निमी

फारच मस्त...पुढचा भाग वाचायच्या प्रतीक्षेत आहे.. प्रत्यक्ष त्या जागी आम्ही उपस्थित आहोत असे वाचताना जाणवते इतके छान वर्णन.

विवेकपटाईत's picture

26 Sep 2023 - 2:24 pm | विवेकपटाईत

लेख आणि गाणे दोन्ही आवडले.

जुइ's picture

26 Sep 2023 - 10:43 pm | जुइ

लिखते रहो!
ही घटना घडली त्यानंतर काही महिन्यात भावाला पहिल्या अमेरिका दौरा‍याची बोलावणी आली होती. त्यावर घरात द्विधा मन:स्थिती होती, जावे की न जावे या बाबत.

रंगीला रतन's picture

29 Sep 2023 - 5:52 pm | रंगीला रतन

मस्तच! पुभाप्र.