मनाचा पहिला श्लोक

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
3 Sep 2023 - 6:11 pm

मनाचा पहिला श्लोक

मनाचा पहिला श्लोक कोणीही का समजून घ्यावा?
मनाचा पहिला श्लोक समजून घेणे ही एक आध्यात्मिक गरज नसून एक साधी सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे. आपले जीवन सुरळीतपणे जगण्याकरता आपण आपल्या ब्रह्मांडाचे एक साधे विभाजन करू शकतो. आपला देह, आपले मन किंवा आपला सूक्ष्म देह, आपला भोवताल, आपल्या समजेच्या आणि भोवतालच्या पलीकडचे अशा चार विभागात हे साधे सोपे विभाजन होऊ शकते. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या त्यांच्या ग्रंथामध्ये या चारही बाबींचे सविस्तर विवरण केलेले आहे. परंतु व्यवहारी दृष्ट्या एखाद्याच्या मार्गात किंवा एखाद्याच्या नशिबात दासबोध येणे, त्याने तो वाचणे, समजून घेणे आणि पूर्ण दृष्ट्या आत्मसात करणे याची संभावना प्रचंड कमी आहे. कदाचित म्हणूनच हे जाणून समर्थांनी मनाचे श्लोक नावाचा वेगळा प्रकार निर्मिला असावा. आणि त्यातही प्रचंड किचकट असा पहिलाच श्लोक घुसडला असावा. विचारी मनुष्य या श्लोकाचीच कितीतरी आवर्तने घेत राहतो आणि त्याला पुढच्या श्लोकाकडे वळणे प्रचंड अवघड जाते.

मन एक बिंदू नसून व्यवस्था, सयंत्र, मेकॅनिझम आहे.
सर्वसामान्यपणे प्रत्येक जण असे मानतो किंवा नकळत असाच विचार करतो की मन हा एक बिंदू आहे. बिंदू या शब्दाला प्रत्येक शास्त्रामध्ये एक अवास्तविक अर्थ आहे आणि वास्तविक अर्थ नाही. त्यामुळे बिंदू या संकल्पनेची मर्यादा बाजूला ठेवूया, आणि पहिल्यांदा मन हे बिंदू तरी आहे काय ते पाहूया. मनाची बिंदू स्वरूप कल्पना करणे चुकीचे आहे. मन हे बिंदू नसून एक यंत्र व्यवस्था आहे, एक मेकॅनिझम आहे. मनाच्या संरचनेमध्ये मनुष्याची स्मृती, ज्ञान, अपोहन ही एका रेषेमध्ये ठेवलेली तीन मोठी मोठी सयंत्र आहेत. स्मृती थोडी जाड आहे, ज्ञान त्यापेक्षा तरल आहे, आणि अपोहन त्याहीपेक्षा तरल आहे. तुमचा भारतीय आयुर्वेदावर विश्वास असेल तर त्यांना जोडलेल्या कितीतरी नाड्या आहेत आणि कितीतरी चक्रे आहेत. मानवी मेंदू, मानवी मज्जा रज्जू, मानवी चेतासंस्था यादेखील मनाचा एक छोटासा भाग आहेत. मनामध्ये बाहेरून येणारे बुद्धी किरण आणि बुद्धी रश्मी आहेत. मनामध्ये वती आणि मती नावाची क्षेत्रे निर्माण करण्याची शक्ती आहे. अंततः मनामध्ये आतून बाहेरून कुठूनही उनाडक्या करत घुसणारे तरलातीतरल असे, भौतिक स्वरूप असणारे, भौतिक अस्तित्व असणारे, जागृत, निद्रिस्त, आणि अतिसुक्ष्म ब्रह्मस्वरूप अशा तीन प्रकारचे विचार देखील आहेत. असेही म्हणतात की, समाधीच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये, केवळ चेतासंस्थाच नाही तर अख्खा मानवी देह मनस्वरूप बनलेला असतो. हे मन इतके जाडजूड आहे की मन कुठे आहे हा प्रश्नच अव्यवहारी आहे.

समर्थांनी मनाचेच श्लोक का बनवले आहेत? देहाचे, जगाचे, ब्रम्हांडाचे का नाहीत?
मात्र, एकावेळी, एकाक्षणी, मनाचा एक केंद्रबिंदू आहे किंवा फोकल पॉईंट असतो. मनाचे केंद्र कुठे आहे हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
"आपल्या दृष्टीने", "आपल्या सोयीसाठी", "आपल्या समजूतीसाठी", क्षणभर अखिल ब्रम्हांडाचे केंद्र आपली पृथ्वी मानली, पृथ्वीचे केंद्र आपले स्थान मानले, त्या स्थानाचे केंद्र आपला देह मानला, तर आपल्या त्या देहाचे केंद्र आपले मन आहे. ब्रम्हांड किंवा पृथ्वी, किंवा आपले स्थान, किंवा आपला देह हे काही बिंदू नाहीत, जरी आपण क्षणभर त्यांना बिंदू मानले, तरी त्या त्यांच्या आंतरविश्वामध्ये प्रचंड मोठ्या आणि किचकट व्यवस्था आहेत. तसेच, आपले मन आपण आपल्या देह दृष्ट्या एक केंद्र जरी मानत असलो, तरी ती एक प्रचंड मोठी आणि प्रचंड किचकट व्यवस्था आहे. तिचे घटक कसे आहेत आणि ते कसे काम करतात हे जाणून घेणे वैज्ञानिकांचे काम आहे. परंतु आपल्या प्रत्येकाकडे जे मन आहे ते कसे चालवावे ते मात्र आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे. कार कशी बनवावी हे कार बनवणाऱ्या कंपनीला माहीत असते, ती कशी दुरुस्त करावी हे मेकॅनिकला माहीत असते, परंतु कारचा मालक म्हणून कार कशी चालवावी हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मन कसे बनवावे, ते कसे दुरुस्त राखावे, हा परमात्म्याचा विषय आहे. कृष्णाने भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये हा विषय थोडाफार चर्चिलेला आहे. परंतु ती कार कशी चालवावी हे जसे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तसेच आपले मन कसे चालावे, आपण आपले मन कसे चालवावे, किंवा आपले मन कसे असावे आणि आपण ते कसे राखावे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. कितीही चांगली कार कितीही वाईट प्रकारे जशी चालवली जाऊ शकते, तसे परमात्म्याने बनवलेले कितीही उत्कृष्ट दर्जाचे मन प्रचंड विकृत प्रकारे देखील चालवले जाऊ शकते. असे होऊ नये, म्हणून मनाची गाडी चालवण्याचे धडे रामदासांनी लिहिलेले आहेत. आपल्याला सगळ्या जगाचे काय पडले आहे? आपण आपला विचार आपल्यापासून चालू करावा. तिथून मग सर्व बाकीचे जग समजून घ्यायला चालू करावे. हा साधा विचार रामदासांनी मांडला आहे. म्हणून मनाचे श्लोक लिहिले आहेत आणि बाकीचे नाहीत. आणि त्यातला पहिलाच धडा अत्यंत तात्विक आणि सखोल विचार करायला लावणारा आहे. माझ्या व्यक्तिगत मताप्रमाणे, ज्याला हा पहिला श्लोक कळाला, त्याला पुढचे श्लोक वाचायचे आवश्यकता नसावी.

रामदासांचा सूर: आध्यात्मिक की सामाजिक?
नारायण सूर्याजीपंत ठोसर हे रामदासांचे मूळ नाव आहे. आणि ते आमच्या मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या जांब गावी जन्मलेले आहेत. त्यांनी स्वतःला रामदास हे नाव दिले म्हणा किंवा लोकांनी त्यांना रामदास हे नाव दिले म्हणा. या रामदास शब्दामध्ये दास्यत्व किती आहे? तर एखादी व्यवस्था चालवण्याकरता चालवणारा सर्वमान्य लागतो. जसे भारताचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे सर्व लोक मिळून आपल्या पसंतीने निवडून देतात, परंतु एकदा निवडून दिल्यानंतर त्याचे अधिपत्य सर्वांना मान्य करावे लागते. म्हणून रामदासांना राम हा आपल्या ब्रम्हांडाचा चालक म्हणून मान्य आहे. जसे सर्वांना मान्य आहे तसेच त्यांना देखील तो मान्य आहे. जनी वंद्य ते सर्व भावे करावे असे ते स्वतःच म्हणतात. परंतु त्यांना संपूर्ण दासत्व मान्य नाही. ते स्वतःला समर्थ म्हणतात. समर्थ म्हणजे विचार करायला पूर्णतः स्वतः समर्थ. आणि इथे रामाची भक्ती हे दुय्यम स्थान घेते. त्यांची प्रथम भक्ती हा देश, इथला धर्म, इथला समाज, त्याचा उत्कर्ष ही आहे. हे अगदी स्पष्टपणे त्यांच्या एकूण साहित्यावरून समजून येते. अगदी लहानपणी त्यांना त्यांच्या आईने विचारले होते: " अरे नारायणा, काय करत आहेस?". तेव्हा अर्थाअर्थी काही संबंध नसताना " चिंता करितो विश्वाची" असे उत्तर त्यांनी दिले होते. यावरूनच अगदी लहानपणापासून त्यांची मूळ प्रेरणा काय होती हे समजून यावे.

समर्थांना झालेला बोध, स्वतःच्या मानसिकतेची अभिव्यक्ती, आणि ईश्वराकडे केलेली तक्रार:
दासबोध: रामाचे अधिपथ्य मान्य करून, मला माझा, माझ्या समाजाचा, माझ्या देशाचा, माझ्या संस्कृतीचा, माझ्या धर्माचा, माझ्या सभोवतालच्या राजकारणाचा, माझ्या पृथ्वीचा, माझ्या ईश्वरांचा, माझ्या ब्रह्मांडाचा काय अर्थ उलगडतो आहे हे रामदासांनी दासबोधात सांगितले आहे. त्यात विद्यमान परिस्थिती काय आहे आणि असावी याबाबतचे त्यांचे आग्रही मत अगदी प्रत्येकच महत्त्वाच्या विषयामध्ये त्यांनी आवर्जून मांडले आहे. कोणत्या प्रकारचा भक्त नाही आणि कोणत्या प्रकारचा देव देव नाही हे समर्थ अगदी त्यात ठासून सांगतात. आणि त्यांच्या सांगण्यातला जोर ऐकण्याचे ज्याचे सामर्थ्य आहे त्याला नक्कीच हे कळेल की रामदासांचे दास्यत्व हे आंधळे आणि उगाच अंधभक्तीमय नाही तर त्यामध्ये उलट प्रश्न विचारण्याची एक अफाट ताकद आहे. दासबोधामध्ये समर्थांनी अखिल ब्रम्हांडाचा आराखडा मांडला आहे.
मनाचे श्लोक: प्रत्येक व्यक्तीला दासबोधामध्ये रस असणे किंवा तितका वेळ असणे संभव नाही म्हणून किमान आपल्या मनाचा मागोवा आणि किमान त्यातले अतिशय प्रसिद्ध असे काही श्लोक मार्गदर्शन म्हणून वापरावेत याकरिता मनाचे श्लोक रचण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ, "मना सज्जना" ही पुन्हा पुन्हा अवतरीत होणारी ही शब्दरचना माणसाला आपल्या मनाच्या आपल्या सत्वाच्या आपल्या स्वत्वाच्या मांगल्याची आणि पावित्र्याची वारंवार जाणीव करून देते आणि त्याला सन्मार्गावर राहायची एक आंतरिक प्रेरणा देते.
करुणाष्टके: रामाचे किंवा परमात्म्याचे अधिपत्य मान्य करून डोळ्यासमोर जे दुःख आणि पाप दिसत आहे ते अंधपणे पहात बसणाऱ्यांपैकी समर्थ नाहीत. प्रपंचाच्या, संसाराच्या आणि सामाजिक परिस्थितीच्या प्रत्येक अंगाचा उल्लेख करत, दुःख आणि पाप पहात, येणाऱ्या दिवसेंदिवशी माझा ताप वाढत आहे अशी तक्रार ते करतात. अनुतापे तापलो म्हणजे मागच्या तापाने तो थंड होण्याऐवजी मी पुन्हा अधिकच तापत आहे अशी वाढत्या तीव्रतेची तक्रार श्रीरामाकडे त्यांनी केली आहे. तू निर्माण केलेल्या जगामध्ये खरा आनंद यावा, खरा रस यावा, मोह उत्पन्न व्हावा, माया उत्पन्न व्हावी आणि हे सगळे खऱ्या अर्थाने व्हावे असे काही असताना दिसत नाही असे ते म्हणतात. अनुदिन अनुतापें तापलों रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥ करुणाष्टकाच्या या पहिल्या ओळीत हे सार कळून येते. रामदासांना श्रीरामाला भेटायची फार उत्कट इच्छा झाली आहे आणि ती त्यांनी करुणाष्टका द्वारा सांगितली आहे असे काही लोक सांगतात परंतु त्यात काही फारसा अर्थ नाही. कारण रामदास मूलतः श्रीरामापासून फार वेगळे आणि फार दूर कधीच नाहीत की ज्यांना श्रीरामाला भेटायची उत्कट इच्छा व्हावी. म्हणून करुणाष्टक ही भेटीची इच्छा नसून भेटल्यानंतरची तक्रार आहे. हे जग आदर्श नाही, अगदी तुझ्या अध्यक्षतेखाली देखील आदर्श अवस्थेत अजिबातच नाही हे तुला सांगण्याचे सामर्थ्य माझ्याकडे आहे, इतका मी समर्थ आहे. मला तुझ्याशी भांडायचे नाही, पण वास्तव जरूर मांडावयाचे आहे. मी तुझ्या ब्रम्हांडातल्या सत्ताधारी पक्षाचा मतदाता आणि कार्यकर्ता देखील आहे, कारण मी स्वतःला रघुवीर समजतो, रघुवीर म्हणवतो. परंतु सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याचा देखील आपल्या नेत्यांना काहीतरी सांगण्याचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहेत ते मी बजावत आहे असा त्यांच्या साहित्यातला ईश्वराला संबोधतानाचा एकूण सूर आहे.

साहित्य सार:
दासबोधामध्ये जग काय आहे, मनाच्या श्लोकांमध्ये मी कसे वागावे, हे सगळे सांगून झाल्यावर उरते ते म्हणजे ईश्वराकडे तर करायची तक्रार. ती देखील त्यांनी करून करुणाष्टकांमध्ये करून टाकली आहे.

पहिला श्लोक:
आता आपण जरा या लेखाच्या मूळ विषयाकडे म्हणजे पहिल्या श्लोकाकडे वळू या.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

गुगल सर्चमधील प्राथमिक अर्थः
We bow Ganesha, the Lord of all virtues, in whom takes origin the transcendental truth. We bow Godess Sharada, mother of speech. We begin on the endless way of Rama. सर्वसाधारणपणे असा या श्लोकाचा अर्थ इंटरनेटवर मिळतो. आपण याचा रामदासांना अभिप्रेत असलेला अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू.

आरंभाचे महत्त्व:
आता जरी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, नोकरीमध्ये आणि प्रपंचामध्ये अत्यंत व्यस्त असलो आणि त्यापासून आपल्याला इतर गोष्टींकरता वेळ नसला तरी या प्रत्येक गोष्टीचा आरंभ करताना या प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक अंगाकडे आपण अत्यंत काळजीपूर्वक आणि वेळ देऊन निवांतपणे सखोल विचार केलेला असतो. आत्ता सवड न देणारी नोकरी करण्यापूर्वी तिच्या करता आपण कितीतरी शिक्षण घेतलेले असते, आणि कितीतरी पर्यायांमधून हा पर्याय निवडलेला असतो. एक सजीव म्हणून आपली रचनाच अशी आहे की आपण प्रत्येक गोष्ट मुळापासून जाण्याचा प्रयत्न करतो, शक्य तितक्या खोल जायचा प्रयत्न करतो जेणेकरून भविष्यामध्ये त्या गोष्टीपासून आपल्याला काही धोका होणार नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त सौख्य मिळेल असा विचार त्यामागे असतो. म्हणून रामदासांनी देखील मनामध्ये मुळात येणाऱ्या विचारांबद्दल पहिला श्लोक मांडला आहे.

बोध होण्यास लागण्या-या तीन गोष्टी:
मनामध्ये मुळात येणारे विचार, किंवा मूलभूत बाबतीबाबत येणारे विचार हे नक्की कोणत्या विषयाबद्दल असतात? तर ते स्वतःच्याच आरंभाबद्दल असतात. मीच जेव्हा नव्हतो तेव्हा मी कुठून चालू झालो हा अगदी प्राथमिक विचार आहे. इथे हे समजून घेतले पाहिजे ही एक सजीव म्हणून मनुष्याला कुठल्याही गोष्टीचा बोध होण्याकरता किमान तीन गोष्टी लागतात. काळाचा बोध होण्याकरता त्या क्षणी भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे काय काय आहेत यांचा एकत्र बोध व्हायला हवा. आपण कुठे थांबलो आहेत त्या जागेचा बोध व्हायला तिन्ही दिशा किंवा तिन्ही मीतिंचा (क्ष अक्ष, ज्ञ अक्ष, झ अक्ष) एकत्र बोध झाला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या आरंभाचा किमान काहीतरी बोध होण्याकरता आपल्याला तीन आरंभांचा एकत्र बोध झाला पाहिजे. त्यातला एक म्हणजे आपल्याला माहित असलेला आपल्या स्वतःचा आरंभ म्हणजे आपला जन्म किंवा आपली पहिली स्मृती, दुसरा म्हणजे आपल्या वंशवेलीचा प्रत्यक्ष पाहिलेला किंवा आठवणीतला दुसरा आरंभ, तिसरा म्हणजे आपल्या जगाचा किंवा ब्रम्हांडाचा आपल्या ज्ञानाप्रमाणे किंवा समजूतीप्रमाणे आपण मानलेला तिसरा आरंभ.

मुळारंभ:
रामदासांनी पहिले दोन आरंभ वाचकांवर सोडून दिले आहेत. आणि थेट ह्या तिसऱ्या आरंभाला हात घातला आहे. हा एक आरंभ हा एकच मूळ आरंभ असा मानला आणि त्याचा पूर्ण बोध करून घ्यायचा असेल तर तिथे पुन्हा त्याची किमान तीन अंगे आपल्याला अभ्यासणे आवश्यक ठरते तरच त्याचा काहीतरी बोध होतो. मी मागे म्हटल्याप्रमाणे मन हे प्रत्येक गोष्टीचा मुळापासून किंवा आरंभापासून विचार करते. मग या सगळ्यात खोलच्या आरंभाचा विचार करायला जी तीन अंगे लागतात त्यातले सगळ्यात खोलचे किंवा पहिले अंग कुठले असे म्हणून मन विचार करायला लागते. तिथे रामदासांनी आपल्या पहिल्या श्लोकाची फार चतुरपणे रचना केली आहे. त्यांचे हे कवन मुळाऱंभापासून चालून न होता गणाधीशापासून सुरू होते. (आपल्याकडे एक चुकीची समजूत आहे की प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही रचनेमध्ये किंवा कोणत्याही लेखनामध्ये अगोदर गणेशाला नमस्कार करून मगच सुरुवात करावी. असा समज असलेला भारतीय या ओळीतल्या गणाधीशाच्या उल्लेखाला असाच एक धार्मिक उल्लेख असे समजून पुढे चालू लागतो. आणि चक्क चक्क पहिला श्लोक किंवा त्याच्या पहिल्या दोन ओळी या जवळजवळ जगराहाटीच्या मानून दुर्लक्षित करून बाकीचे मनाचे श्लोक वाचत सुटतो.).

आरंभाच्या आरंभाचा आरंभ:
समजा आपण जर रामदासांच्या पद्धतीने न जाता, आरंभाच्या आरंभाचा आरंभ समजून घ्यायला चालू केले तर आपल्याला ब्रह्मांड पुराण, ब्रह्मपुराण, शिव पुराण, विष्णु पुराण, लिंग पुराण, पद्मपुराण, भागवत पुराण, कपिल पुराण, जैन पुराण, स्कंद पुराण, अथर्वशीर्ष, त्या अनुषंगाने चारी वेद, वेदांगे, उपनिषदे, रामायण, महाभारत, भागवत गीता, तिचा पंधरावा अध्याय, आपल्या स्वतःच्या जागेच्या स्थानिक आख्यायिका, स्थानिक देव, देवी, दैवते यांच्या कथा, आपल्या स्वतःच्या वंशाच्या कथा, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विज्ञानाच्या विविध शाखा, ज्ञानाच्या आणि तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखा आणि त्यांचे अनेक ग्रंथ असा प्रचंड संभ्रमात टाकणारा अभ्यास चालू करायला लागेल. हे सगळे वाचूनही नक्की कुठून सुरुवात करायची हे कळेल याची शाश्वती नाही. म्हणून रामदासांनी निर्गुण हा एक शब्द वापरून हा विषय इथेच ठेवून दिलेला आहे. आणि हे व्यवहार्य देखील आहे. यावरचा सोपा उपाय म्हणजे आपण आहोत त्या अवस्थेतून, आहोत त्या स्थानातून, आहोत त्या काळातून, बाळगून असलेल्या ज्ञानापासून, प्राप्त झालेल्या गुणांपासून साधी सोपी सुरुवात करणे. Bottom-up approach!

गणाधीशाची (आणि तुलाधीशाची) संकल्पना:
वेदब्रह्मामध्ये किंवा अक्षरब्रम्हामध्ये गणाधीश आणि तुलाधीश अशा दोन संकल्पना आहेत. गण म्हणजे विद्यार्थी. पण कोणत्या प्रकारचे विद्यार्थी? तर मोजणी करणारे विद्यार्थी.
गणाधीशाच्या दोन प्रकारच्या गणना ब्रम्हांडाच्या गणितामध्ये अभिप्रेत आहेत:
1. पदार्थांची संख्या मोजणे. उदाहरणार्थ म व न प्रकारची क्ष व ज्ञ इतकी नाणी. एकूण झ इतकी नाणी (Countative measurement: To count the number of objects, Example: m, n number of coins of x & y types respectively, total z coins).
2. पदार्थांचे गुण मोजणे, गुणात्मक मोजणी. उजळपणा किंवा ओरखडे पडलेले नसणे किंवा मूल्य या आधारांवर या प्रत्येक नाण्याला शून्य ते शंभर यापैकी गुण देणे आणि या नाण्यांच्या संचाची एकूण गुणात्मक बेरीज करणे. (Qualitative measurement: To assign a whole number to an object on a scale, say 0-100, based on the quality under consideration. Example: Shine, scatechlessness of the coins, value of the coins).

तुलाधीशाची एक प्रकारची गणना अभिप्रेत आहे:
ज्या गोष्टींची संख्या अभिप्रेत नाही त्यांना एका विशिष्ट एककामध्ये पूर्ण किंवा अर्धवट मापणे. (Quantitative measurement: Whole and partial degrees of measurements).

गणपरंपरा:
सर्वसाधारणपणे आपण भारतीय लोक असे मानतो की गणपती हा महादेवाचा मुलगा आहे. परंतु वास्तवात याला एक वेगळाच अर्थ आहे. माता असणे पिता असणे आणि म्हणून एक वंशपरंपरा असणे आणि त्याशिवाय वंशपरंपरा नसणे ही मानवी विचारांची एक मर्यादा आहे. आपण आपल्या जग पाहतो म्हणून आपल्याला असे वाटते. ब्रह्मांडामध्ये वंशपरंपरांच्या अनेक प्रथा आणि प्रकार आहेत. अथर्वशीर्षामध्ये गणपतीचा स्वयंभू अवतार सांगितला आहे. तर ज्यांना आपण गणेश, श्रीगणेश, गणपती, गजानन, गणाधीश, इत्यादी नावांनी ओळखतो त्यांची एक आपली वेगळी आणि ब्रह्मांडाच्या इतर अनेक वंशपरंपरांच्या हातात हात घालून चालणारी वेगळी परंपरा आहे. हे ब्रम्हांड चालू ठेवायला अनंत गणना क्षणोक्षणी करायला लागतात, तो करण्याचा अधिपती किंवा अधिकारी म्हणजे गणाधीश आणि त्याचा भाऊ तुलाधीश. त्यांची परंपरा म्हणजे गणपरंपरा. आपण जितकी जितकी नावे गणपतीची घेऊ तितक्या तितक्या वेगळ्या संकल्पना आहेत आणि तितके तितके वेगळे देव आहेत. त्यांची कार्यत्वे आणि अधिकार क्षेत्रे वेगळी आहेत. ते नक्की काय प्रकरण आहे याच्यात न पडता त्यातला एक आपण निवडून पुढे चालू असे रामदासांचे म्हणणे आहे.

(अवांतर- तेलंगणा राज्य: इतिहासात निजामाचे राज्य होते याव्यतिरिक्त या तेलंगणा या भागाचा आंध्र प्रदेशापासून वेगळा असा सांस्कृतिक इतिहास अजिबात नाही. आंध्र शब्दाचा अर्थ अक्षर ब्रह्मामध्ये अनेक अंगानी आंधळा, आणि भिन्न भिन्न पद्धतीने भविष्यात देखील आंधळा राहणारा असा होतो. उत्तर भारत हा गणाधीशाचा आणि दक्षिण भारत हा तुलाधीशाचा (मुरुगनचा किंवा कार्तिकचा) असा सर्वसाधारण वाटा देखील राहिलेला आहे. तेलाच्या गणनेचे अधिकचे महत्त्व वाढल्यामुळेच तर तेलंगणा नावाचा वेगळा प्रांत निर्माण झाला नाही ना? कारण हा प्रांत नेमका दोन भावांच्या भावकीच्या सीमेवर होता. एक आध्यात्मिक विनोद म्हणून आपण असा विचार करू शकतो. किंवा वरकरणी बिनबुडाच्या आणि निराधार वाटणाऱ्या घटना कोणत्या ना कोणत्या प्रतलावर जोडलेल्या असतात असेही मानू शकतो.)

सगुणापासून निर्गुणाचा वेध:
तर मनाने आरंभाच्या आरंभाचा विचार करताना (त्यांच्याही आरंभाचा विषय पहिले हाताला घेणे टाळावे आणि) आपल्या भोवतालच्या सर्व गोष्टींची मापे घ्यावी, गणना करावी, त्यांचे गुण मोजावे, त्यांच्यातला गुणात्मक फरक मोजावा, बेरीज करावी आणि मग निर्गुणाच्या दृष्टीने आणि दिशेने विचार करायला चालू करावे असे पहिल्या ओळीत निर्दिष्ट केले आहे. (कृष्णाने याच्या विरुद्ध गीतेच्या पंधराव्या अध्यायामध्ये थेट "उर्ध्व मूलं" अशी सुरुवात केली आहे. म्हणून गीता समजायला क्लिष्ट आहे असे लोकांना वाटते.)

चार वाचा:
मनाच्या व्यवस्थेमध्ये कोणत्याही बाबी बद्दलचा विचार हा मनाच्या शाईच्या रूपाने होत असतो. आपले मन अधांतरी विचार करू शकत नाही. त्याला व्यवस्थित यंत्रे लागतात. या यंत्रांच्या सोबतच बुद्धीरुपी ऊर्जा लागते. केवळ ऊर्जेनेही बुद्धी चालू राहून चालत नाही. या यंत्राला खाद्य देखील लागते. ते खाद्य म्हणजे मनाची शाई. मन शून्यामध्ये, बिना खाद्याचे (without input) काहीही निर्माण करू शकत नाही. मनाची शाई कोणत्या ना कोणत्या प्रकारची आहे, ती नक्की कोणत्या प्रकारची आहे हे मनुष्याला अजून अवगत झालेले नाही. सध्याला त्या शाईचे स्वरूप, तिची निर्मिती, तिचा मनाला होणारा पुरवठा, बुद्धीच्या ऊर्जेची निर्मिती, तिचा मनाला होणारा पुरवठा हे आपण वैज्ञानिक विषय मानून बाजूला ठेवू. मनाला अवगत झालेले पदार्थांचे ज्ञान, आणि म्हणून एखाद्या विषयाचे ज्ञान हे पुढे अपोहणाला पुरवले जाते. तिथे ते ज्ञान किती पक्के आहे, त्या मागचा संदर्भ काय आहे, त्याचा नक्की अर्थ काय काय आहे आणि काय काय नाही, आणि त्याला प्रकट कसे करायचे हे ठरवले जाते. या आणि कोणत्याही वैचारिक ज्ञानाचे अनंत पैलू तत्त्वतः आपण मानू शकतो. त्यातले काही पैलू आपल्याला स्मृतीतच पार्क करून ठेवावे लागतात. मनाची ही शाई केवळ एकाच विषयाच्या एकाच अंगाच्या विचारात देखील मनाच्या संपूर्ण व्यवस्थेवर आणि त्याच्या शरीराशी निगडित सर्व अंगांवर सांडून गेलेली असते. प्रत्येक विषयाची वेगळी शाई असते. म्हणजे किमान तिचा रंग तरी वेगळा असतो. विचार करणे, विचार पूर्ण करणे आणि विचार बाहेरच्या जगात समोर मांडणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.

विचारांचे प्रकटीकरण:
परा, पश्यति, मध्यमा, वैखरी या वाणीच्या वाचतेच्या चार अवस्था भारतीय शास्त्रांमध्ये सांगितल्या आहेत. त्यातली पहिली शाईची अवस्था म्हणजे परा. विचार जेव्हा मनातल्या मनात पूर्ण होतो परंतु त्याला मांडण्याबद्दल कोणतीही कृती होत नाही तेव्हा त्याला पश्यति अवस्था असे म्हणतात. तिला जेव्हा व्यवस्थित शब्दांमध्ये आणि देहबोलीमध्ये मांडले जाते तेव्हा तिला मध्यम असे म्हणतात. आणि आपल्याला कळलेला विचार शेवटी मुखातून बाहेर पडतो आणि दुसऱ्या पर्यंत पोहोचतो त्याला वैखरी असे म्हणतात. एखादा विचार आपण आपल्या मनात करून भागत नाही. त्याला आपल्याला समाजाकडून पुष्टी करून घ्यायला आवडते. जेणेकरून तो उद्या जर राबवावा लागला तर आपल्याला त्रास व्हायला नको. या चारही शाखांपैकी कोणत्याही शाखेमध्ये कुठलाही त्रास असेल तर मनात
अत्यंत व्यवस्थित केलेला विचार देखील बिनकामाचा ठरतो. शरद नावाचा ऋतू निर्गुणतेकडे निर्देश करतो. या ऋतूमध्ये आभाळ निरभ्र राहते आणि चांदणे अगदी लख्ख दिसते. ढगांचा त्रास होत नाही. म्हणून शारदा नावाची देवता जी आपल्या विचाराला कोणतीही मूळ वाच्यता नसताना जगात आणते म्हणून गणाधीशा सोबत (जो विचार करायला मदत करतो) शारदेला देखील स्मरण करावे (जी विचार प्रकट करायला मदत करते) असे रामदासांनी सुचवले आहे.

राघवाचा पंथ:
मनाने नुसते विचार करून भागत नाही. विचारांना कृतीची जोड लागते. कृती आपण चांगली ही करू शकतो आणि वाईटही. आपण वाईट कृती का करू नये असा एक सामाजिक विचार प्रत्येक मनाला पडतो आणि बऱ्याच लोकांच्या बऱ्याच कृतीही त्या मार्गाने बऱ्याच दूरपर्यंत जातात. इथे रामदासांनी या प्रश्नाचे देखील अत्यंत सरल आणि सोपे उत्तर दिले आहे. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. पुरुष म्हणजे प्राण्यांमध्ये मनुष्य. दुसऱ्या कुठल्याही जातीच्या प्राण्याला आपण पुरुष किंवा स्त्री म्हणत नाही. त्यांना आपण मादी किंवा नर असे म्हणतो. पुरुषोत्तम म्हणजे सर्वात उत्तम पुरुष. इथपर्यंत ठीक आहे. हे मर्यादा नावाचे काय प्रकरण आहे? तर प्राणी आणि ईश्वर यांच्या अस्तित्वाचे अधिपती त्यांचे आत्मे आहेत. परंतु मनुष्याच्या अस्तित्वाचा अधिपती त्याचे मन आहे. मुळात मनुष्य हा शब्द मनस् या संस्कृत शब्दापासून बनला आहे. अक्षरब्रह्माच्या तत्त्वांप्रमाणे मनुष्याचा प्रवास म अक्षरा पासून ते न अक्षरा पर्यंत होतो. म म्हणजे मरण, भ म्हणजे (पोट आणि अन्य गरजा) भरणे, ब म्हणजे बुद्धी वापरून, फ म्हणजे फल प्राप्त करणे, प म्हणजे पुढे जाऊन प्रगती करणे, न म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नाहीत त्या आपल्या नाहीत म्हणून आपली मर्यादा ओळखून थांबणे. आणि या प्रवासात जो स् (तो म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर, किंवा ईश्वररूपातले ब्रह्मांड) भेटतो, त्याचा किमान अर्धवट तरी विचार करणे. जो हा मर्यादित प्रवास अत्यंत व्यवस्थित करतो तो प्रत्येक जन्मामध्ये पुन्हा पुन्हा मनुष्य म्हणून जन्मास येतो. जो थोडा इकडे तिकडे जातो तो वरच्या किंवा खालच्या श्रेणीला जातो. श्रीरामांनी आपल्या मनुष्य अवतारातून मनुष्याने आपल्या मर्यादांमध्ये कसे वागावे हे जगाला सांगितले. त्यांच्या काळामध्ये त्यांच्या शत्रूंकडे उपलब्ध असलेल्या शक्तीपेक्षा कोणतीही मोठी शक्ती त्यांनी कधी वापरली नाही. म्हणजे त्यांनी सर्वच अर्थानी सर्व मर्यादा पाळल्या आणि अनंत ब्रम्हांडाच्या अनंत न पेलवणाऱ्या प्रकरणांपासून मनुष्यांना मुक्त केले. शिवाय सुखी, सरळ, पुण्यवान, अधिभौतिक ताप नसणाऱ्या जीवनाची दिशा दाखवली.

अनंतपंथ:
पण तरी हा हा प्रश्न उरतोच की चांगलेच का वागावे? रामाचाच पंथ का धरावा? रावणाचा पंथ धरून, ऐश्वर्य बघून पळ का काढू नये? पुढचा जन्म कोण पाहिला आहे? ऋणम् कृत्वा घृतं पिबेत् म्हणत दुसऱ्यांना का लाटू नये? किंवा एकूणच निष्कारण किंवा सकारण पापी किंवा वाईट का वागू नये? समोर असा कोण उभा आहे म्हणून मी चांगलेच वागावे? मला शक्य तितके वाईट का वागू नये? आणि नेमके त्यात सुख असेल तर निश्चितच का तसे वागू नये?
इथे या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याकरता समर्थ रामदासांनी केवळ एकच सूचक शब्द वापरला आहे तो म्हणजे हा की हा पंथ अनंत आहे मग तो तुझा असो नाहीतर श्रीरामाचा असो. तुझ्या सद्य ज्ञानाप्रमाणे आपले पाप, आपले पापा चरण कोणी पाहत नाही आहे, आणि त्याचा कोणताही हिशोब होणार नाही आहे असा तुझा सध्याचा समज जर असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. मी फक्त हा पंथ अनंत आहे इतकेच म्हणत आहे, या अनंतपंथावर न्यायाच्या काय काय पद्धती आहेत याबद्दल मी काहीही इथे तरी बोलत नाही आहे, पण असं सगळं काही आहे असं तू समजून घे, आणि आपसूक मुकाट नीट वागायला चालू कर असे रामदासांना सामान्य माणसाला सुचवायचे आहे. कोणतीही अस्तित्वात असलेली गोष्ट अनस्तित्वात जाऊ शकत नाही आणि कोणतेही अस्तित्वात नसलेली गोष्ट अस्तित्वात येऊ शकत नाही हा एक सामान्य तार्किक बोध कोणालाही आरामात होऊ शकतो. वैज्ञानिक दृष्ट्या देखील हा विचार तार्किक वाटतो. म्हणून आज तुम्ही जे कोणी आहात, चा कोणत्या रूपात आणि स्वरूपात आहात, आणि ज्या कोणत्या गुणांचे आहात, ते उद्या कोणत्याच रूपात आणि कोणत्याच गुणांमध्ये नसाल असे तुम्ही म्हणू शकत नाही. आणि ब्रम्हांडाची व्यवस्था तुमच्या मागच्या वर्तनावर गप्प बसून असेल आणि तिला न्याय करायची इच्छा नसेल असे देखील मानणे जोखमीचे (risky) आहे. स्मृती जड झाली की मनुष्य किंवा कोणतीही बाब अचेतन जड पदार्थ बनते. असं तुम्हाला बनायचं आहे का? ब्रह्मांडातल्या प्रत्येक जड वस्तूमध्ये ब्रम्हांडाची एक सचेतन स्मृती दडलेली आहे असे वेदब्रह्माचे तात्पर्य सांगते. मनुष्याचे जीवन आदर्श असू शकत नाही म्हणून रामाच्या ही हातून चार चुका झाल्या असतील. परंतु सद्भावनेने त्याचा मार्ग एक चांगला मार्ग म्हणून आपण स्वीकारावा अशी मनोवृत्ती ठेवावी असे रामदासांना सुचवायचे आहे.

मी किती महत्त्वाचा?:
वाचकहो, जगराहाटीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही किती महत्त्वाचे, किती बिनमहत्वाचे, आणि अगदी ब्रम्हांडाच्या व्यवस्थेमध्ये देखील नक्की कोठे आहात याचा तुमच्या विचारांशी आणि वर्तनाशी काहीही संबंध नाही. रामाचा शत्रू रावण हा पहिल्या वर्णाचा म्हणजे ब्राह्मण होता. राम परमात्मा आहेत आणि क्षत्रिय म्हणजे दुसऱ्या वर्णाचे आहेत. रामदास रामाचे दास आहेत, म्हणजे क्षत्रियाचे दास आहेत, आणि वर्णाने ब्राह्मण म्हणजे पहिल्या वर्णाचे आहेत. फक्त तीनच लोकांमध्ये इतका घोळ आहे. त्यामुळे असला घोळ बाजूला ठेवून आपण आपल्या मनाचे विचार मनाच्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे विशुद्ध ठेवावेत आणि रामदासांनी म्हटल्याप्रमाणे आणि जगातही वंद्य असल्याकारणाने शक्यतो श्रीरामासारखे आचरण ठेवावे तर हा मनाचा पहिला श्लोक वाचून समजून घेतल्यासारखे ठरते. लोभाच्या भावनेने पटापटा मनाचे श्लोक वाचून पुढे जाणारा तथाकथित धार्मिक व्यक्ती रावणाच्या पंथाचा मानला जाईल. भक्ती भावनेने वाचणारा श्रीरामाचा पाईक मानला जाईल. आणि अगदी अकारण का होईना सदविचार आणि सद्बुद्धी तसेच सदवर्तन मानणारा नास्तिक देखील रामदासांच्या विचारांचा सच्चा गुणग्राहक मानला जाऊ शकतो.

जय जय रघुवीर समर्थ

अरुण भास्करराव जोशी

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

क्लिष्ट आहेत ग्रंथ पण हळूहळू समजेल.

धर्मराजमुटके's picture

3 Sep 2023 - 8:11 pm | धर्मराजमुटके

पुनरागमनाच्या शुभेच्छा ! आता एवढ्यात परत शाब्दिक हाणामारी होऊन मिपासंन्यास घेणार नाही असे गृहित धरतो. लेख वाचून समजला तर परत लिहितो अन्यथा पोच गोड मानून घ्यावी.

arunjoshi123's picture

3 Sep 2023 - 11:06 pm | arunjoshi123

धन्यवाद

लेख जरा (किंबहुना बराच) क्लिष्ट वाटल्याने हळू हळू पचवता येईल. समर्थांच्या साहित्याबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल, कार्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. मी नववीत असतानापासून दासबोध वाचत आलेलो आहे.
अवांतरः तुम्ही पूर्वी दिल्लीत होता का? ( तुम्ही, मी आणि विवेक पटाईत असे तिघे महाराष्ट्र भवनात जेवायला गेलो होतो, ते तुम्हीच का?) फारा वर्षांनंतर मिपावर आगमन झालेले बघून समाधान वाटले.

होय. सध्याला कामात बराच व्यस्त आहे.

चित्रगुप्त's picture

4 Sep 2023 - 12:34 am | चित्रगुप्त

आभार. (व्यस्त की व्यग्र ?)
मराठीत - व्यस्तः सम आणि व्यस्त पैकी. व्यग्रः गुंतलेला busy.
(हिंदीत व्यस्त= busy )

अट्टाहास (मराठी) = मोठा प्रयत्न, चिकाटी
अट्टाहास (हिंदी) = मोठ्याने हसणे, हास्याचा गडगडाट.

अंदाज (मराठी प्रयोग ) 'हवामानाचा अंदाज' 'अंदाजे पन्नास लोक असतील'.
अंदाज (हिंदी) कटरिना का कातिल अंदाज.
असो.

दिल्लीतल्या वास्तव्यामुळे आमची मराठी व हिंदी यांची टोटल खिचडी झाली आहे.

विवेकपटाईत's picture

4 Sep 2023 - 11:13 am | विवेकपटाईत

लेख आवडला पण समजला नाही. अनेकदा वाचन करावे लागेल. समर्थांचे साहित्य विशेषकरून श्रीदासबोध उपनिषद परंपरेवर आधारित आहे प्रश्न विचारा आणि उत्तर शोधा.

वामन देशमुख's picture

4 Sep 2023 - 11:30 am | वामन देशमुख

आपल्या पुनरागमनाचे स्वागत!

arunjoshi123's picture

4 Sep 2023 - 1:00 pm | arunjoshi123

धन्यवाद.

अगोदर लेख एडीट करता यायचा. आता ती सोय आहे का? मी फर्स्ट कट व्हॉइस टाईप पेस्ट केला आहे. यात बर्‍याच सुधारणा आवश्यक आहेत.

कर्नलतपस्वी's picture

4 Sep 2023 - 8:50 pm | कर्नलतपस्वी

मन अशी गोष्ट आहे की जाम समजत नाही. काबूत येत नाही. जितके समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हढा खोलीत पाय जातो.

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ.....

arunjoshi123's picture

4 Sep 2023 - 9:16 pm | arunjoshi123

धन्यवाद.

arunjoshi123's picture

4 Sep 2023 - 9:24 pm | arunjoshi123

प्रिय वाचकहो,
१. मिपावर मागे प्रकाशित केलेला लेखही एडिट व्हायचा असे मला आठवते.
२. या लेखात किमान २५-३० ठिकाणी चूका दुरुस्त करायच्या आहेत.
३. हा लेख स्पीचनोट्स या अ‍ॅपवर व्हॉइस डिक्टेट करून लिहिला आहे, तिथे फक्त बोललेलेच मराठी टाईप होते, लिहिलेले इंग्रजी टाईप होते म्हणून हा फर्स्ट कट लेख अनेक चूका दाखवतो.
४. मी हा लेख मीपाच्या एडिटरवर घेऊन दुरुस्त करीन.
===
तसा मी लेखक या प्रकरणात मोडत नाही, मी फक्त एक प्रकटक आहे, म्हणून असे होत. पण वाचण्यातल्या त्रासाबद्दल क्षमस्व.