इथल्या वास्तव्यात काही एटिकेट्स कानाला खडा लावून पाळायचे असतात...नव्हे ते तुम्हांला पाळावेच लागतात. इथे कुणाकडेही टक लावून पाहता येत नाही. आपल्याकडे काहीजण याला सौंदर्याला दाद देणे म्हणतील, तारुण्याचा सन्मान समजतील पण इथे मात्र देखणं ते कुरूप कुणाकडेही पाहणे त्यांना अवमानकारक वाटते. आपल्याकडे ट्रकच्या मागे सुद्धा 'पहा.. पण प्रेमाने' अशी सूचना मुद्दाम लिहिलेली असते. इथे गाड्यांकडे फार काळ प्रेमाने पाहताच येणार नाही अशा सुसाट स्पीडनं त्या जात असतात. बालिका - ललना - कुमारी - तरुणी - काकू - ताई - माई - आक्का - आजी कुणाकुणाकडेही अन्य स्त्री वर्गानेही पाहणे प्रशस्त नाही. त्यामुळे पुरुषवर्गाची काय कुचंबणा होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी! ह्या इथे विविध देशीय भेसळी आणि मिसळीमुळे एखादी गौरांगना काळ्या कुरळ्या केसात दिसते तर एखादी गहू ते कालकृष्णवर्णीय कन्या सुनहर्या केसांच्या बटा विखरून चालताना दिसते. वर्णावरून उच्च - नीच, खुमार - सुमार मानूच नये...ते प्रशस्तही नाही. वर्णभेदाला माझा वैचारिक - तात्विक - भावनिक असा सर्व स्तरावरचा विरोधच आहे. पण आकाराचे काय ? याला मात्र वजनीक - सात्विक - भारवाहिक मर्यादा स्वास्थ्यासाठी नकोत का?
इथे अत्यंत 'सुकड्या' म्हणाव्या अशा झिरोच काय मायनस फिगरच्या व्यक्ती दिसतात. 'हाडांची काड आणि रक्ताचे पाणी' करूनही यांच्या अंगावर मुठभर मांस चढत नाही. इथे सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या वासाने, दर्शनाने सुद्धा माझे एखादे किलो (अमेरिकेत 2.2 पौंड) वजन वाढेल अशी मला भीती असते. बहुतांशी पदार्थात मांसाहाराव्यतिरिक्त अंडी, चीज, बटाटे, बटर, क्रीमसह मध, मेपल सिरप किंवा विविध चवीचे जॅम - जेली - चॉकलेट्सचे थर, डोनट्स- केक - पॅन केक - वॅफल्सवर पसरून, थापून खातात. फलाहारही भरपूर उपलब्ध असतो. इतक्या सर्व पदार्थांकडे पाठ फिरवून अशी मायनस फिगर असणार्या सगळ्या व्यक्तीमध्ये मात्र प्रामुख्याने महिला दिसल्या. बहुतांशी पुरुष व्यक्ती बारीक असल्या तरी काटक - कणखर दिसले. त्यांना झिरो फिगरही म्हणता येणार नाही, मायनस तर नाहीच नाही. रस्त्यावरून फिरणारे होमलेस अथवा क्वचित एखाद्या पुलाखाली आडोशाला बसलेला पुरुष दुबळा - काटकुळा नव्हता. अगदी औषधालाही नाही इतके ते इथे दुर्मिळ होते.
मारुतीरायाला त्याची शरीरयष्टी प्रसंगी वाढवता किंवा कमी करता येत असे. त्याच्याकडे ती शक्ती योगाभ्यासने आली असावी. पण इथे वाढलेल्या मारुतीला चॅलेंज देऊन चितपट करतील की काय अशी शंका मनात यावी ह्या आकाराचे पुरुष आणि स्त्रियाही मी पाहिल्या. 'वजनी मारुती आणि उदरी गणपती' असा 2 हिंदू देवांना 'खुल्ला' चॅलेंज होता. यामध्ये मात्र स्त्री-पुरुष असा भेदभाव नव्हता. आपल्याकडे भारतात कोणी थोडा
सुस्थितीत यायला लागून भारदर्शन करायला लागला किंवा लागली तर मित्रमंडळी - नातेवाईक - घरचे सार्वजनिक ठिकाणीही स्पष्ट वाखाणणी करायला हयगय करत नाहीत. इथे अमेरिकेत मात्र अशा विशालकाय व्यक्तींकडे नजर गेली तरी त्या व्यक्तीकडे जाणीवपूर्वक संपूर्ण नजरअंदाज करून आपल्या नजरेलाच दुसरीकडे वळवायचं. आपल्याकडं एखाद्याला 'चांगलंच मानवलंय' किंवा 'वजन कमी कर हं..गुडघे दुखतील' किंवा 'किती टायर पोटावर ?' असे प्रश्न सार्वजनिक ठिकाणी स्पष्टपणे खणखणीत आवाजात विचारून आपल्याला वास्तवाची जाण सहज करून देतात. ते तुमच्या जवळचे असतीलच असेही नाही पण भारवर्धनाचे भान मात्र करून देतात. अमेरिकेत डबल एक्सएल हा नॉर्मल साईज असावा. ट्रिपल एक्सएल (50") ते फाईव्ह एक्सएल (60") पर्यंत मजल दरमजल करणाऱ्या व्यक्तींना पाहून कोणीही हसत नाही - बोलत नाही - सांगत नाही. बाकी कोणी नको बोलू दे पण स्वतः स्वतःशी तरी हे लोक बोलतात का? असा प्रश्न पडावा इतक्या आरामात ते स्वतःला कपड्यात दडपून बर्गर - पिझ्झा - केक दडपताना दिसतात. त्यांच्या जठराला आत हालचाल तरी सुलभपणे करता येत असेल का? अशी एक बालिश शंका मनात येऊन गेली.
रोजचे दैनंदिन कार्यक्रम करताना, घर घेताना, वस्तू हाताळताना यांना जमत कसं ? आम्हाला विमान प्रवासात बॅगांच्या वजनात वाढ झाली तर काय? असा घोर असतो. यांना स्वतःच स्वतःचे वजन कसं वाहून न्यायचं असा प्रश्न पडत नाही का ? त्यांना स्वतःला याचा त्रास नक्कीच होत असणार..पण त्याबद्दल कोणी बोलत नाही म्हणून हे असं इतकं होतं का? काही आजारांमुळे, वैद्यकीय कारणांमुळे वजन वाढत असेलही पण त्यावर ठोस उपाय करण्याऐवजी काहीसे निर्ढावल्यासारखे केवळ जिभेचे चोचले पुरवत राहणे हे आरोग्यदायी नक्कीच नाही. इथे अशा क्षुद्र ते महाकाय वजनाचे सर्व स्त्री पुरुष त्यांच्या पसंतीचे कपडे घालतात. 'शोभतयं का?' हा प्रश्न इथे विचारणं/म्हणणं वर्ज्य आहे. भारतात केवळ ते दर्शवून - सांगून थांबत नाहीत तर आपल्याला त्यावरचे उपायही हमखास सांगतात. Youtube ज्ञानीसुद्धा अशावेळी पुढे सरसावतात. आपल्याकडे याला 'भोचकपणा' न मानता तुमची काळजी किंवा प्रेम समजतात... अशी जाणीव करून देणं आपलं 'कर्तव्य' मानतात आणि..
भारतात कर्तव्यात कसुरीला माफी नाही!!
प्रतिक्रिया
1 Sep 2023 - 1:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेख आवडला, पण पेस्ट्ताना गंडलाय
अशी जाणीव करून देणं आपलं 'कर्तव्य' मानतात आणि यानंतर सगळी वाक्ये रिपीट झाल्येत. संमं ना सांगुन सुधारता आले तर पहा.
आता पुढचा भाग अमेरिकन खाद्य संस्कृतीवर आहे काय?
1 Sep 2023 - 2:42 pm | आनन्दा
हेच सांगणार होतो..
पण लेखक अमेरिकास्थित असल्यामुळे याला भोचकपणा म्हणतील की काय अशी भीती वाचल्यामुळे थांबलो..
1 Sep 2023 - 2:50 pm | निमी
लेखिका अर्थात आस्मदिक भारतात राहते आहे आणि जगाच्या पाठीवर कुठेही आपण राहिलो तरी चूक दाखवून देणे आवश्यकच आहे..किमान माझ्या बाबतीत तरी! म्हणून हा भोचकपणा जरुरी आहे
1 Sep 2023 - 2:46 pm | निमी
अगदी बरोबर..पेस्ताटना गंडला आहे चांगलाच गंडलाय.. त्याबद्दल मनःपूर्वक दिलगिरी
1 Sep 2023 - 2:52 pm | निमी
यातील तज्ञ व्यक्तींना शक्य असल्यास कृपया आवश्यक दुरुस्ती करावी ही नम्र विनंती.
1 Sep 2023 - 4:29 pm | कर्नलतपस्वी
दुरूस्त करून नवा लेख टाका. संपादक या आय डी वर व्य नी करा जुन लेख काढून टाकण्पा साठी.
1 Sep 2023 - 5:29 pm | निमी
संपादक मंडळ, अत्यंत आभारी आहे. सुयोग्य दुरुस्ती वेळेत केल्याबद्दल..
1 Sep 2023 - 6:31 pm | सुबोध खरे
Roughly two out of three U.S. adults are overweight or obese (69 percent) and one out of three are obese (36 percent).
https://www.hsph.harvard.edu/obesity-prevention-source/obesity-trends-or...(36%20percent).
Healthy BMI range: 18.5 kg/m2 - 25 kg/m2
म्हणजेच पाच फूट दहा इंच उंचीच्या पुरुषांपैकी ७० टक्के लोकांचे वजन ७७ किलो पेक्षा जास्त (BMI २५) आणि ३६ टक्के पुरुषांचे वजन ९२ किलो पेक्षा जास्त आहे (BMI ३०)
आणि
पाच फूट दोन इंच उंचीच्या स्त्रियांपैकी ७० टक्के स्त्रियांचे वजन ६० किलो पेक्षा जास्त (BMI २५) आणि ३६ टक्के स्त्रियांचे वजन ७२ किलो पेक्षा जास्त आहे. (BMI ३०)
सध्या आपण स्वतः कुठे आहोत याचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे.
1 Sep 2023 - 8:51 pm | MipaPremiYogesh
बरोबर आहे, माणसेच काय प्राण्यांकडे बघतांना पण असंच असते. एकदा मला थोडा वेगळा कुत्रा दिसला (कुत्रा न म्हणता डॉग म्हणावे), त्यामुळे मी जरा नीट बघत होतो तर त्याची मालकीण म्हणाली any problem ? मी आपला शांतपणे सॉरी म्हणालो आणि निघून गेलो :)
2 Sep 2023 - 12:05 pm | सुबोध खरे
पाळीव कुत्र्यांमध्ये लठ्ठपणा हि समस्या आताशा फार मोठ्या प्रमाणात आढळून येते.
काहीही कष्ट न करता अन्न मिळत गेल्यामुळे पाळीव कुत्रे लडदू होताना आढळतात. विशेषतः लॅब्रॅडॉर
2 Sep 2023 - 1:30 pm | निमी
लडदू हा शब्द अगदी योग्य! चपखल..
2 Sep 2023 - 1:29 pm | निमी
ह्या लेखमालेत आपल्याला एक लेख प्राणी प्रेमावर वाचायला मिळणार आहे.
2 Sep 2023 - 9:43 pm | स्नेहा.K.
अमेरिकेतील वाढीव वजनाचा तेथील restaurant मध्ये मिळणाऱ्या अवाजवी जास्त Portion size सोबत कार्यकारण संबंध नक्कीच आहे.

हे एक छोटे उदाहरण -
3 Sep 2023 - 8:52 am | निमी
अरे बापरे.. यु के आणि यु एस मध्ये सर्विंग कॉन्टिटीत इतका फरक असेल असे वाटलेच नव्हते.