अमेरिका ७ -आराम का व्यायाम

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
17 Aug 2023 - 9:04 pm

भारतात फार कमी लोक स्वतःच्या तब्येतीची-आरोग्याची काळजी घेतात आणि नगण्य लोक मनापासून व्यायाम करतात. अस्मादिकही त्यास अपवाद नाहीत. 'केला पाहिजे' म्हणून, डॉक्टरनी विचारलं तर होकार भरता यावा म्हणून किंवा स्वतःला फसवणं थोडं सोपं जावं म्हणून जितका व्यायाम करणं आवश्यक असेल तेवढाच मी करते. याबाबत थोडा अवमान गिळून कबूल करते की 'कळतंय पण वळत नाही' च्या धर्तीवर 'पटतंय पण उठवत नाही.' अशी पहाटे साखरझोपेत अवस्था असते. व्यायाम हा केवळ प्रातःसमयी करण्याचा असल्याचा पूर्वजांचा योग्य सल्ला आणि आमचा सोयीस्कर गैरसमज आम्ही मोफत पाळल्याने 'भल्या पहाटे ते सकाळी लवकर' इतकाच वेळ व्यायाम करणे आम्ही योग्य मानले आहे. खाण्यासाठी मात्र पुन्हा स्वसोयीने पूर्वजांचा सल्ला आम्ही धुडकावून पार फाट्यावर नेऊन ठेवलाय.

अमेरीकेत मात्र भल्या पहाटे ते उशिरा रात्रीपर्यंत लोक कधीही, कितीही, कसाही, कोणताही व्यायाम करताना दिसतात. भल्या पहाटे आम्ही बळेबळे उठून फिरायला जावं तर आपल्या बाजूने एखादा सायकलस्वार घामाने डबडबून तरीही अत्यंत जोमाने सायकल हाणत असतो. (आम्ही फक्त खाद्यपदार्थ हाणतो!) कुणी श्वानप्रेमी आपल्या लाडक्यास थंडी वाजू नये म्हणून त्याला मुलायम स्वेटर मध्ये गुरफटून 'सेहत के साथ..कुत्ते के बाद!' असे श्वानासह फेरफटका मारत असतात. इथे टेनिस कोर्टावर, बास्केटबॉल-फुटबॉल एरियात, कुठलीही तक्रार, कुरकुर न करता एकलव्यासारखा कुणी एकटाच 'ग्रुप गेम' चा सराव करत असतो. कोणी जोडीने खेळत असेल तर एक घाम गाळलेला टी-शर्ट बाजूला ठेवून नव्या दमाने दुसऱ्या टी-शर्टला घामाच्या धारांनी पावन करायला लागतो. पळणारे, धावणारे, चालणारे आपापल्या ॲपनुसार अखंड नामस्मरणासारखे अखंड फिरत असतात. आपल्या आधीपासून आलेले, आपण पावलं घराकडे वळवली तरी फिरत-पळतच असतात. किल्ली दिलेल्या खेळण्यांसारखी अव्यहात हालचाल करत राहतात. कुणी एखादी फिरता-फिरता आपल्या घरच्यांशी गप्पा मारताना पाहून भारतीय मॉर्निंग वॉक आणि टॉक काकूंची आठवण मात्र नक्की करून देते.

दहा ते पाच या ऑफिसच्या वेळेत जिममध्ये कोण जातय? असा विचार करून आम्ही एकदा दुपारी जिम मध्ये गेलो..तर एक अत्यंत फिट तरुणी ट्रेडमिल वर सुसाट धावत होती. थोडी जरी दमली तरी स्पीड कमी करायची आणि पुन्हा सुसाट वेग पकडायची. एक ताई वाटणाऱ्या आजी तितक्याच शांतपणे सायकल चालवत होत्या.. तर अजून एक दोन जणही आपापल्या आवडीचा व्यायाम करण्यात मग्न होते.
मुलीच्या बॅडमिंटन कोर्टवर एक दिवस गेलो होतो. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. दार उघडून आत गेल्यावर अंदाजे 25-30 कोर्ट्सवर एखादी टूर्नामेंट चालावी तशी अनेक जण खेळत होते. काही ठिकाणी तर एकमेकांना अनोळखी व्यक्ती सुद्धा एकमेकांसोबत मॅचेस खेळत होत्या. विषय जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या सर्व कोर्टवर बहुतांशी सर्व खेळाडू एशियन अर्थात चिनी, जपानी, भारतीय, कोरियन किंवा स्पॅनिश होते.

इथल्या अजून एका प्रकारच्या मॅचेसचा वेगळा प्रकार म्हणजे तुम्ही टीम म्हणून अंडर 80, अंडर 100, अंडर 110 खेळू शकता. याचा अर्थ विचारल्यावर फारच रंजक माहिती समजली. अंडर 80 मध्ये दोन्ही खेळाडूंच्या वयाची बेरीज 80 च्या खाली पाहिजे. त्यामुळे 55 वर्षांचे बाबा आणि 25 वर्षाखालील मुलगा एक टीम म्हणूनही खेळू शकतात. मुलीच्या बॅडमिंटन ट्रेनिंग कोर्ट वरही असंख्य फुलराण्या आणि राजे मनःपूर्वक प्रॅक्टिस करत होते. तिच्या चायनीज सरांनी 3 मोठ्या मोठ्या बास्केट्स भरून शटलस् आणली होती. प्रत्येकजण प्रॅक्टिस करत तरी होता किंवा प्रॅक्टिस घेत तरी होता. टाइमपास करत हसत खिदळत कडेला कुणीही बसलेले नव्हते. मुख्य म्हणजे कोणत्याही कारणास्तव मोबाईलवर रील पहात, व्हिडिओ पहात अथवा अवांतर वेळ न घालवता सगळेजण खेळत होते. रात्री 11 वाजता आम्ही कोर्टावरून निघालो तेव्हा कोर्टवरील स्टाफनेही आठ्या न घालता 'शुभ रात्री' म्हणून शुभेच्छा दिल्या.
व्यायामाच, फिटनेसच 'वेड' वाटावं इतका मनापासून व्यायाम करताना पाहून कठोर मेहनतीमुळेच क्रीडा क्षेत्रात हे देश पदकांची लयलूट करताना दिसतात. आमच्यासारखे मात्र 'आराम में राम है !' या वाक्यावर गाढ श्रद्धा ठेवून रामराज्य साकारत राहतात.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

18 Aug 2023 - 12:10 pm | कर्नलतपस्वी

मुलीच्या घरा जवळच मोठ्ठे राज्यस्तरीय क्रीडांगण होते. इनडोअर, आऊटडोअर, स्केटिंग ते आईस हाॅकी अशा सर्व प्रकारच्या खेळाची सोय.

बेसबॉल हा लोकप्रिय खेळ, बहुतेकांच्या आंगणात ट्रॅम्पोलीन व बास्केटबॉल ची सिंगल,स्टॅण्ड अलोन बास्केट होती.

मोठ्ठा ट्रॅक होता. नेहमीच सकाळी न चुकता जॉगिंग व संध्याकाळी खेळ बघण्यात रमायचो. असेच एक दिवस व्हॉलीबॉल बघत असताना मला खेळायला येता का म्हणून विचारले. नंतर जेव्हां जेव्हां खेळ बघायला गेलो तेव्हां आवर्जून मैदानात ओढले गेलो.

क्रीडांगणाचा रखरखाव अतीशय सुदंर व स्वच्छ होता.

पाळीव प्राण्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे माणसांच्या स्वच्छतागृहा इतकीच स्वच्छ होती.

जवळच अत्याधुनिक गोल्फ ग्राउंड होते.

सहा महिने नियमित जात असल्याने स्टाफ सुद्धा ओळखायला लागला होता. सर्व काही फुकट होते पण गैरवापर दिसला नाही.

मालीका छान चालली आहे. लेखन शैली साधी सोपी, गप्पा मारत आहे असे वाटते.

धन्यवाद सर.. खरंच तुम्ही अगदी बरोबर ओळखलं.. मला गप्पा मारायला आणि वेगळी चांगली माहिती ऐकायला, माणसं वाचायला मनापासून आवडते..त्यामुळे तेच ह्या मालिकेत नक्की जाणवेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Aug 2023 - 12:44 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान चाललिये मालिका.

मला वाटते भारतात शहरानुसार व्यायामाचे प्रकार्/प्रमाण बदलते. मुंबईत रोज सकाळी ७.१४ आणि ८.१६ ची लोकल पकडायला धावणार्‍या बिचार्‍या मंडळींचा तोच व्यायाम असतो. पुण्यात जरा सुशेगाद जीवनशैली असल्याने पहाटेपासुन रस्त्यावर्/बागेत्,टेकडीवर(पर्वती/तळजाई) प्रातःफेरी करणारे/पळणारे/सायकलिस्ट खूप दिसतात. शिवाय सोलारिस्,डेक्कन जिमखाना,पी वाय सी ईथे महागड्या गाड्या घेउन येणारे आणि भरमसाट पैसे देउन घाम गाळणारेही दिसतात. छोट्यामोठ्या जलतरण तलावांवरही गर्दी असते. सातारा/कोल्हापुरात पहाटे पळायला जाणार्‍यांचे प्रमाण बरेच आहे. ईतर शहरांचेही प्रकार असतील. एकुणात वैद्यकीय सेवा महाग होत चालल्याने का होईना, तब्येत राखण्याचे प्रस्थ वाढत आहे असे दिसते.

रच्याकने-अमेरिकेतील वैद्यकीय सेवा/सोयी याबद्दल काही निरिक्षणे असल्यास लिहा. शिक्षण पद्धतीबद्दलही लिहा. कॅनडामध्ये हे दोन्ही जवळपास फुकट( प्राथमिक/माध्यमिक शिक्षण आणि बेसिक आरोग्यसेवा) आहे, जे ओबामांना प्रयत्न करुनही मेडिकल आणि ईन्शुरन्स लॉबीच्या दबावामुळे अमेरिकेत करता आले नाही असे ऐकुन आहे.

मेडिकल ट्रीटमेंट,शाळा/ शिक्षण याबद्दल कदाचित अजून पहावे लागेल.. पुढच्या दौऱ्यात त्याचा नक्की विचार करेन. यावेळी खरंतर हे लिखाण मी माझ्या आनंदासाठी केले आणि काही आप्त/मित्रमंडळींनी मिपाची माहिती सांगून प्रोत्साहित केल्याने इथे पाठवण्याचे एक प्रकारे धाडस केले आहे.. तुम्हा अनेकांच्या प्रोत्साहनने खूपच धीर आला.. छान वाटले.

पहाटे उठून व्यायाम करणे हे सुशेगाद जीवनशैलीचे लक्शण आहे?

विंजिनेर's picture

19 Aug 2023 - 12:20 am | विंजिनेर

वाचतोय - पुढचे भाग येउद्या असेच.

अमेरिकेतली सुबत्ता, स्वच्छता, उत्तम दर्जाची रेस्टॉरंटस, मोठे रस्ते आणि त्यावरून सुळकरून जाणाऱ्या गाड्या इ. आपल्या मनावर प्रथमदर्शनीच छाप टाकतात आणि ते साहजिक आहे. याबरोबर, अमेरिकेतची दुसरी बाजू साधारणतः पांढरपेशा (उच्च) मध्यमवर्गीयांसमोर येत नाही - होमलेस शेल्टर्स,, गन व्हॉयलंस, ड्रग्ज इ. - तुम्हाला ही बाजू कितपत दिसली/जाणवून घेतली हे ही वाचायला आवडेल.
श्रीमंतीचा डौल प्रत्येक देशात निराळा असला तरी गरीबीचा चेहेरा सगळीकडे सारखाच असतो :)

पॉपकॉर्न's picture

7 Oct 2023 - 7:58 pm | पॉपकॉर्न

अच्यूत गोड्बोलेंच्या एका पुस्तकात त्यांनी याबद्दल खूप छान माहीती दिलेली आहे. ते त्यांच्या एका अमेरीका वारीत कुठल्याही पॉश हॉटेल मध्ये न रहाता गरीब वस्तीत कृष्ण कुटूंबासोबत राहीले त्याचा अनुभव सांगीतला आहे. पुस्तकाचे नाव आता आठवत नाही. मुसाफिर असावे बहूतेक

पर्णिका's picture

24 Aug 2023 - 4:17 am | पर्णिका

लेख आवडला.

अमेरीकेत मात्र भल्या पहाटे ते उशिरा रात्रीपर्यंत लोक कधीही, कितीही, कसाही, कोणताही व्यायाम करताना दिसतात.

हे मात्र खरे ! सुदैवाने घरातील अन जवळची मित्रमंडळी fitness freak असल्याने ( किंवा मग समानशीलव्यसनेन सख्यम् असे ही म्हणू शकता ) आठवठ्यातून ४-५ दिवस बऱ्यापैकी व्यायाम होतोच. यांत योगा, वॉल्क, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस यांपैकी काहीतरी ठरवतो. वीकांताला वेळ असेल तर ट्रेल, हायकिंग, कॅम्पिंग अशा आऊटडोअर ऍक्टिव्हिटीज जमेल तशा करतो.
मुलेही गॉल्फ, बास्केटबॉल, टेबल टेनिस, पिंग पॉंग खेळायची/खेळतात. आता तर कॉलेज गोइंग असल्याने नॅशनल पार्क्स, बीचेस अशा ग्रुप ट्रिप्सही त्यांची ती प्लॅन करतात आणि जाऊनही येतात. एकुणांत व्यायामाबरोबरच निसर्गात वेळ घालवणे/ फिरायला जाणे ही बहुतांशी अमेरिकन लोकांची आवड आहे.

सहमत.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढील काही लेखात विकेंड दर्शनही होईल..परंतु वेगवेगळे व्यायाम आणि त्यासाठीची आवश्यक उपलब्धता चांगल्या स्थितीत असते हे विशेष.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2023 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जमेल तसे, जमेल तिथे, व्यायाम झाला पाहिजे. शरिराच्या हालचाली झाल्या पाहिजेत. व्यायाम केलाच पाहिजे. व्यायामाचं महत्व सांगणारा भाग, आवडला हे सांगणे न लगे. कोणत्याच व्याधी नसतात तेव्हा व्यायाम केला पाहिजे. आपल्याकडे व्याधी निदर्शनास आल्या की व्यायाम सुरु होतो. व्यायाम जीवनाचा आणि जगण्याचा भाग झाला पाहिजे. अर्थात, मीही काही अपवाद नाही. नियमितता म्हणून आपली नसते. दोन-चार दिवस चाललो. हातपाय झटकले. एक दोन दिवस बॅडमिंटन चांगले सेट झाले की पायबीय मुरगळला की संपलं. संपला आपला व्यायाम.

वाचतोय लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

24 Aug 2023 - 4:09 pm | मुक्त विहारि

आमची आपली वंशपरापरागत, अकरा नंबरची बस

रोज साधारण पणे, 8-10 किमी, बस चालवायची

एकदा तर मी आणि आमचे पिताश्री, वय वर्षे फक्त 85, गंमत म्हणून 12-15 किमी , अकरा नंबरची बस फिरवली

मनसोक्त चालणे , इतपतच आमचा व्यायाम ....

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Sep 2023 - 8:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

८५ व्या वर्षी १२-१५ कि.मी?? दंडवत घ्या_/\_