ना. धों. महानोर-एक सांगितिक श्रद्धांजली

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
4 Aug 2023 - 3:29 pm

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांनी ना. धों. महानोरांबद्दल मिपावर सुंदर लेख लिहीला आहेच, पण तरीही राहवले नाही म्हणुन माझ्याकडुनही चार ओळी
=======================================
ना. धों. महानोर गेल्याचे काल पेपरात वाचले. आणि सर्रकन मन भूतकाळात गेले. मी चौथी/पाचवीत असेन. नुकतेच रंगीत टि.व्ही. आले होते आणि त्यावर "चिंब पावसानं रान झालं आबादानी" गाणं लागलं होतं. सूर्/ताल वगैरे कळण्याचं वय नव्हतं तरीही ते धिन तांग तांग्,धिधिन तांग तांग डोक्यात बसलं. गाणं आवडुन गेलं. पुढे कित्येक दिवस तेच मनात घोळत होतं. मग रेडिओवर "मी काट्यातुन चालुन थकले" ऐकलं आणि तेही आवडलं. पुढे कधीतरी घरात टेप रेकॉर्डर वर आशा भोसलेंची कॅसेट ऐकत असताना "नभ उतरु आलं" ऐक्लं. तेव्हा हे गाणं जैत रे जैत चित्रपटातील आहे हे माहीत नव्हतच. पण त्या गाण्यातला गावरान गोडवा मनाला भावला. नवपरीणित आदिवासी जोडप्याचा शृंगार अगदी संयत रितीने त्यातुन व्यक्त होत होता. कोण बरं असेल हा कवी/गीतकार? असा विचार तेव्हा पहिल्यांदा मनात आला. कॅसेटवर ना.धों.महानोर असे नाव लिहीले होते. हळूहळू समजले की वर उल्लेख केलेली सर्जा चित्रपटाची आणि जैत रे जैत चित्रपटाची गाणीही त्यांनीच लिहीलेली आहेत.

मग त्यांची गाणी जमवण्याचा /ऐकण्याचा छंदच लागला. कधी सहज तर कधी कष्टाने शोधुन गाणी मिळत गेली आणि या निसर्ग कवीच्या शब्द प्रतिभेने मी थक्क होत गेलो. कवी समाजाला नक्की काय देतात? माझ्या मते तरी आपल्या भावना चपखलपणे व्यक्त करणारे शब्द निर्माण करणे ही त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी आहे. ती कविता /ते गाणे ऐकल्यावर असे वाटले पाहीजे की "अरे? मला हेच तर वाटतेय किवा म्हणायचे आहे"

नवीनच प्रेम जमले आहे ,आणि प्रेयसीबद्दलच्या ह्या भावना
गोर्‍या देहावरती कांती,नागिणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी,एकादीच रात
तुझ्या रुपाचं बाशिंग दोल्यात्,तुझ्यावाचुन सुन्नाट दिनरात

किंवा ह्याच ओळी पहा ना. नवपरीणित जोडपे आहे खरे, पण हे त्यांचे रितसर लग्न नाही, केवळ पाट लावला आहे(दुसरे लग्न).ईथे कमीत कमी शब्दात खूपकाही सांगुन जातो हा माणुस.
वल्या पान्यात पारा, एक गगन-धरा
तसा तुझा उबारा,सोडुन रितभात

एक होता विदुषक मधील ही लावणी घ्या

भरलं आभाळ, पावसाळी पाहुणा गं
श्रावणाचं उन मला झेपेना, पिवळ्या पंखांचा पक्षी नाव सांगेना

आर्या आंबेकरने (जज असताना) सारेगमप मध्ये एक अपिअरन्स दिला तेव्हा मी पहील्यांदा ही ऐकली. मला वाटले की नेहमीसारखी बैठकीची लावणी असेल. पण तूनळीवर बघितले आणि मी आतुन हललो. मधू कांबीकर आणि मोहन आगाशे यांनी जो काय लाजवाब अभिनय केलाय. एक तमासगिरीण पाटलाला रिझवण्यासाठी त्याच्या दिवाणखान्यात एकटयासमोर खाजगीत नाचतेय, मुरकतेय. साहजिकच तिचा हेतू पैसे मिळवायचा आहे. पण मधुनच ती खिडकीकडे जाते आणि दूरवर बसलेल्या , मिणमिणत्या दिव्याखाली अभ्यास करणार्‍या आपल्या मुलाकडे ती एक नजर टाकुन येते आणि पुन्हा आपल्या रिझवायच्या भुमिकेत शिरते तेव्हा काळजात लक्कन काहीतरी हलतं.

पावसाळा जोमात आहे आणि बाहेर ढग दाटुन येउन धरतीवर ओंजळ रिती करताहेत, तर ईथे शेतात आडोशाला वेगळाच डाव रंगलाय

घन ओथंबुन आले,पिकात केसर ओले
आडोशाला जरा बाजुला, साजण छैल छबिला, घन होउन बिलगला

याच्या उलट साध्याभोळ्या आदिवासी माणसाची जीवनातील सर्वस्व हरपल्याची भावना यातुन व्यक्त होते
पीक करपलं पक्षी दुरदेशी गेलं
गळणार्‍या झाडासाठी मन ओथंबलं

मग पुढे कधीतरी मी तबला शिकायला सुरुवात केली आणि तालासुरातले थोडेसे समजु लागले. आणि एक नवीनच दालन जणू माझ्यापुढे उघडले गेले. म्हणजे मी आधी सुद्धा गाणी ऐकत होतोच, पण आता मी फक्त स्वराकडे नाही तर वाद्यांकडेही तितकेच लक्ष देउन ऐकु लागलो. म्हणजे नक्की काय ते मला लिहुन सांगता येणार नाही, पण तसे झाले खरे. आणि मग एक दिवस सरांकडे कोणीतरी भेटायला आलेले असताना त्यांनी राजसा जवळी जरा बसा ऐकवले. ते पेटीवर म्हणत होते आणि सर ढोलकीवर साथ करत होते. हा माझ्यामते ना.धों. चा मास्टरपीस म्हणावा लागेल. त्यानंतर मी ह्या गाण्याने एव्हढा वेडा झालो की मी ते गाणे किती वेळा ऐकले असेल गणतीच नाही. एकतर चपखल शब्द, वर लताबाईंचा काळीज चिरत जाणारा आवाज, आणि विलंबित आणि द्रुत अशी दोन्ही लयीतील ढोलकीची साथ आहाहा!! काय पिक अप, काय ईंटरल्युड म्युझिक, वा!! एकदम माहोल.

ह्या तुम्ही शिकविल्या खुणा, सख्या सजणा, देह सकवार
सोसता न येईल अशी दिली अंगार

असो. लिहिता खूप येईल, पण हा लिहिण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा विषय आहे. तो ही त्या त्या वेळी जसा मूड असेल त्यानुसार अनुभुती बदलेल. त्यामुळे पुन्हा एकवार ह्या अवलियाला श्रद्धांजली वाहतो व लेख ईथेच आटोपता घेतो.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

4 Aug 2023 - 5:59 pm | कर्नलतपस्वी

जितके वर जाल तेव्हढी दृष्टी विशाल होईल.

राया माझे हात तुझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदण आलं लाज पांघरूनी

काय अप्रतिम उपमा आहे ,तोड नाही.

येणाऱ्या पिढ्यांसाठी हा खजीना ठेवून गेले.
आदरांजली.

आयला, "राजसा जवळी जरा बसा" पण यांचीच? अफाट आणि वेगळंच लिहायचा हा माणूस. आपल्याला मराठी कळत नाही याची जाणीव यांच्यासारख्या कवींनी प्रकर्षाने करून दिली. अजूनही अनेक शब्द अनोळखीच आहेत.

छान लेख पण फारच कमी‌ लिहिलाय‌. अजून‌ ‌जास्त भावना‌. व्यक्त व्हायला हव्यात कारण ‌आमच्याच. भावना ‌तुम्ही‌.
लिहितायत‌. असे‌. वाटतेय. म्हणून ‌सांगणयाचा खटाटोप.

मित्रहो's picture

5 Aug 2023 - 5:46 pm | मित्रहो

गावरान कविता छान आल्यात. आणखीन आल्या असत्या तर अजून छान झाले असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2023 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ना.धों.महानोर महाकवी आहेत, गीतकार म्हणून ते मोठेच आहेत पण त्यांच्या गीतांना ज्यांनी ज्यांनी साज चढवला त्यात गायक, संगीतकार, यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ही गाणी घराघरात आणि प्रत्येकाच्या ओठी झाली. श्रीधर फडक्यांनी गायलेलं 'अवेळीच केव्हा दाटला अंधार, तिला गळा जड झाले काळे सर' आहे. लता मंगेशकर यांनीच गीतांचं सोनं केलेलं 'आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या, एकांताच्या पारावर हीरमुसल्या डहाळ्या' यातलं 'काही केल्या करमेना, कसा जीवच लागेना' काळजात हुरहुर लावते. तसंच लता मंगेशकरांचंच 'किती जिवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरु टाकलं. हे एक वेगळंच गाणं. तर, घन ओथंबून येती याचं संगीत बोलांनी गाणं कायम मनात रुंजी घालते. अशी सगळीच गाणी ती वेगळी आहेत. जैत रे जैत मधली गाणी तशीच.

आता लिहिण्याचा कंटाळा आलाय नाय तर, मोठं दळण केलं असतं.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

8 Aug 2023 - 4:01 am | चौकस२१२

लिहा नक्कि आवडेल

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Aug 2023 - 9:59 am | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद!!

चौथा कोनाडा's picture

7 Aug 2023 - 5:21 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुप सुंदर !

पण हा लिहिण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा विषय आहे.

अगदी खरंय .. पण लिहून त्या अनुभावांना उजाळा दिलात ... क्या बात !

ना. धों. महानोरां यांच्या गाण्यांनी आपल्या हृदयाचा एक कप्पा कायमचा काबीज केला आहे !

सौंदाळा's picture

7 Aug 2023 - 6:57 pm | सौंदाळा

सुंदर लेख.
ना. धों ची केवळ निसर्ग कविता नाही तर शृंगारीक कविता पण छानच आहे.
थोडे अवांतर - सध्या मारुती चितमपल्ली यांचे 'रानवाटा' हे पुस्तक वाचत आहे.
ना. धों ना निसर्गकवी म्हटल्यावर मारुती चितमपल्ली हे निसर्ग लेखक म्हटले पाहिजे. खूप सुंदर लिहितात.

सुबोध खरे's picture

7 Aug 2023 - 7:23 pm | सुबोध खरे

ना धों महानोर यांची अनेक सुप्रसिद्ध गाणी येथे पहा

https://www.aathavanitli-gani.com/Geetkar/Na_Dho_Mahanor

कुमार१'s picture

10 Aug 2023 - 7:21 am | कुमार१

छान लेख !