राधे !!!
एकेकाळी उभ्या गोकुळाला
वेड लावणाऱ्या या बासरीला कधीतरी
तुझे ओठ लावून बघ ना...
तेव्हा तुझं तुलाचं कळेल की
त्या बासरीच्या अवीट सुरांमध्ये
माझ्या स्पंदनांची कर्तबगारी नव्हतीचं कधी...
तुझ्या-माझ्यातील दुष्कीर्त नात्याला
सांभाळताना तुझ्या स्वतःशीच चाललेल्या
अविरत झगड्यातून बाहेर पडणारे
अस्वस्थ उमाळेचं तिची ऊर्जा होती...
आप्त-स्वकीयांना फसवून,
साऱ्या जगाच्या नजरा चुकवून,
रोजंच केवढं मोठं दिव्य करून,
माझ्या वेड्या ओढीनं यायचीस तू ...
जगासाठी अनैतिक असलं तरी
गोकुळातल्या गाईं-वासरांना कळायची
तुझी माझ्यासाठीची उलघालं...
यमुनेच्या काठी,माझ्या खांद्यावर डोकं ठेवून
डोळे मिटून बासरीच्या तालात मुग्धपणे
हरवून जायचीस तू ...
वृंदावनातील जंगलात माझी वाट
पाहणाऱ्या तुझ्या डोळ्यांमधील
आर्त भाव चोरून पहात राहायचो मी
समोर न येता तुला सतावत राहायचो मी...
गोकुळ कायमचं मागे सोडून जाताना,
जीवांच्या आकांताने माझ्यामागे धावलेले,
काट्याकुट्यात रक्ताळलेले तुझे पाय,
पडून गेलेले पैंजण, फुटलेली कांकणं,
रडून रडून गालांवर पांगलेलं काजळ....
सारं-सारं काही आजही जसंच्या तसं
माझ्या डोळ्यांसमोर आहे...
अजूनही दिसतेस तू मला त्या
यमुनेच्या काठी, एकटीचं !!!
एखादया भग्न अवशेषासारखी...
माझीही अवस्था काही वेगळी नाही गं !!!
धर्म, ध्येय, कर्तव्य सगळं-सगळं सांभाळूनही
कुठंतरी अपुर्णचं आहे मी तुझ्याशिवाय ...
माझं प्रेम नक्कीचं तुझ्याइतकं निष्पाप नव्हतं
पण जग समजतं तितका मी स्वार्थीसुद्धा नव्हतो
माझ्या भूतकाळातील 'ही" कहाणी
कायमची अर्धीचं राहून गेली आहे गं राधे.....
एक वेडी राधा होती हे विसरलचं
जात नाही गं...
यदा-कदाचित जर पुन्हा एकदा
यमुनेकाठी माझ्या बासरीवरून
तुझी लांबसडक बोटं जर फिरलीचं कधी ...
तर उभ्या ब्रह्मांडाला झिडकारून
"शीतल" क्षीरसागराला त्यागून
घन-निळ्या नभात पितांबर वाऱ्यावर फडफडताना
हा सावळा श्रीकृष्ण तुला घट्ट बिलगलेला असेल....
अगदी कायमचा......
प्रतिक्रिया
2 Aug 2023 - 1:34 pm | चलत मुसाफिर
शब्दनशब्द खोलवर भिडला. माझ्या अव्यक्त भावनांना अचूक शब्दरूप दिलेत. त्रिवार धन्यवाद तुमचे.
किमान पाच वेळा वाचली असेल.
2 Aug 2023 - 10:30 pm | चौथा कोनाडा
व्वा, खुप सुंदर !
प्रवाही ओघवती रचना भारी आवडली !
व्वा .... सुंदरच !