कळा ज्या लागल्या जीवा...

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जनातलं, मनातलं
22 Jul 2023 - 10:08 am

IMG-20230722-102149

ही पोट्टी मी तिच्याबरोबर केलेल्या गोष्टींचं उट्टं भरून काढायला लागलीये. मलाच अवदसा आठवली आणि 'दुखतंय का' असं प्राकृत भाषेत विचारण्याऐवजी शुद्ध मराठीत विचारलं, “ पेन होतंय का ? ” तिनेही 'हो' किंवा 'नाही' उत्तर न देता सांगितलं,“ पेन नाही गं, पेsन असतं ते आई.”
“ हा, तेच ते.“
“ तेच ते नाही, तू विचारतेस, ते पेन हे, p e n, ” हातात पेन नाचवत लेक म्हणाली आणि त्यापुढे “ I am enjoying being in your shoes now, ” अशी पुष्टी जोडायलाही बया विसरली नाही.
“ जा गं, आली मोठ्ठी शहाणी, माहितीये मला ते, It was a slip of tongue. डोकं दुखतंय का अजून, ते सांग आधी, ” मी.
“ नाही दुखत गं, पण तू यावर ' या निमित्ताने डोकं आहे हे कळलं ', वगैरे लेम जोक मारू नकोस. डोक्यात काही बिघाड असेल, तर डोकंच दुखायला पाहिजे, असं काही नसतं. As sometimes pain can be misleading too.”
“ दिशाभूल करणारं म्हणजे ? ” आता माझ्या ज्ञानात भर पडणार होती, हे निश्चित होतं.
“ म्हणजे असं, की बिघाड स्वादुपिंडात झाला असतो, आणि दुखतं मात्र पाठीत किंवा कधीकधी...”
“ हा... हृदयविकाराचा झटका येणार असतो, तेव्हा मान किंवा जबडा दुखतो, तसं? ” लेकीला मध्येच तोडत माझी ज्ञान पाजळण्याची खुमखुमी मी दाखवलीच.
“ बरोबर, त्याला ' Referred pain ' म्हणतात, चेतातंतूंच्या ( nerve fibres) एकात एक गुंतलेल्या रचनेमुळे हे घडतं. ...
....आणि एक तुला माहितीये, हल्ली सेल्फ हार्म करून घ्यायची टेंडेंसी वाढत चाललीये, शाळेतल्या मुलांमध्येदेखील. एखादी वेदना असह्य होत असेल, तर दुसऱ्या वेदनेकडे स्वतःचं लक्ष ओढून घेऊन पहिल्या वेदनेपासून मुक्ती मिळवण्याचा हा मार्ग निवडतात मग ही मुलं. शरीरावर छोटेमोठे कट्स, ब्रूझेस करून घेऊन.” लेकीने माहिती पुरवली.
“ हा कसला गं अघोरी उपाय ? आणि इतक्या लहान वयात ? आईवडिलांच्या पंखाखाली तर असतात ना ? अजून तर स्वतःच्या जीवावर उडणं बाकी असतं,” मी लेकीच्या दिसेल तेवढ्या शरीरावर घाबरून नजर फिरवत म्हटलं.
“ आई, माझ्याकडे अशी बघू नकोस गं, पण लहान वयात वेदना नसतात, असं कुणी सांगितलं? हा, त्याबद्दल कुणापाशी मोकळेपणाने बोलावं, असं कुणी बऱ्याचदा नसतं. मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांपैकी कुणी ते कसं घेईल, याची शाश्वती नसते. Fear of being judged, हे आणखी एक कारण. ” इति लेक.
“ हम्म, जन्माला आलेल्या जीवाला भोग चुकत नाहीत गं ! वेदना प्रत्येक जीवाला असते. शरीराला किंवा मनाला. कुठली ना कुठली, कुठच्या ना कुठच्या कोपऱ्यात राहणारी. कधी लपून सुप्तावस्थेत, कधी उजळ माथ्याने कायम ठुसठुसणारी ! वेदनेची संवेदना पोहोचू न देणारी वेदनाशामक औषधं, उपचार सापडतील, बऱ्यावाईट रुपात. ज्यामुळे भूलतील किंवा तुमच्या भाषेत गंडतील, मेंदूतील रसायने ( neurotransmitters) काही काळ. ती देणारे हात म्हणूनच खात्रीचे हवेत.
तुला महाभारतातला अश्वत्थामा आठवतो? ” कोविड काळात लॉकडाऊनमध्ये एकत्र महाभारत बघितलं होतं आम्ही. आठवेल तिला, असा अंदाज होता.
“ हा, कपाळावर जखम असते कायम ज्याच्या, तो नं? ”
“ हं, त्याची वेदना समजली सगळ्यांना कारण त्याची भळभळणारी जखम दिसत होती. पण असं कोणतं पात्र होतं त्यात, ज्याला वेदना नव्हती ? पितामह भीष्म असो वा धृतराष्ट्र, कुंती असो वा गांधारी, द्रौपदी असो वा उत्तरा किंवा कर्ण असो वा दुर्योधन...सगळ्यांच्याच मनात भळभळणाऱ्या जखमा होत्या... पण युद्धभूमीवर समोर आप्तस्वकीयांना पाहिलं आणि फक्त अर्जुनाला झालेल्या वेदनेमुळे विषादयोग सांगितला गेला गीतेतून. पुढे अर्जुन धर्मयुद्धास तयार झाला आणि पांडवांचा या युद्धात विजय झाला, हे तर तुला माहीतच आहे. याचं कारण हेच, की अर्जुन मनातली उलघाल व्यक्त करू शकला आणि ती व्यक्त करण्यासाठी योग्य व्यक्ती त्यावेळी त्याच्यासाठी तिथे होती.”
“ तेच तर सांगतेय आई, असा एक कृष्ण असायला हवा प्रत्येकाच्या पाठीशी.”
“ अहं, कृष्ण त्यावेळी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होता. म्हणजे समोर होता तो अर्जुनाच्या. कृष्ण ' केवळ पाठीशी ' असून चालणार नाही, तर तो प्रसंगी गरजेला असा ' समोर ' दिसायला हवा... कृष्ण समोर असायला हवा ...”

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

22 Jul 2023 - 10:19 am | वामन देशमुख

मुक्तक आवडलं.

लहान मुलं आपल्याला वाटतात तितकी लहान नसतात!

Bhakti's picture

22 Jul 2023 - 10:36 am | Bhakti

लहान मुलं आपल्याला वाटतात तितकी लहान नसतात!
आमच्याकडे तर explanation सुरू झालं की लेख तर अर्धातास माझंच लेक्चर घेते ;) :)

वामन देशमुख's picture

22 Jul 2023 - 11:22 am | वामन देशमुख

'
आमची अपत्ये अनुक्रमे १६ आणि १४ वर्षांची आहेत.

आधी ते खूप बडबडे असायचे. म्हणजे मी, ती, शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांनाच खूप बोलायचे. मागच्या दोन-तीन वर्षांपासून त्यांचं आमच्याशी बोलणं खूपच कमी झालं आहे.

म्हणजे आधी ते खूप बोलायचे, आम्हीही बोलायचो‌. घर भरून असायचं. आजकाल ते मोजकंच बोलतात. ते घरात असले तरीही खूपच शांत वाटत राहतं.

- पौगंडावस्थेत आईवडिलांची फारशी काही गरज वाटत नसावी का?
- त्यांच्या विश्वात आई-वडिलांना फारसं काही स्थानच नसत असेल का?
- पंख फुटल्यावर घरटं खूपच लहान वाटत असेल का?
- माझ्यावेळी मलाही तसंच वाटत होतं का?

अवांतराबद्दल क्षमस्व.
'

Bhakti's picture

22 Jul 2023 - 11:44 am | Bhakti

नक्की माहित नाही पण बाहेरच्या जगाशी जुळवून घेण्याची या वयात धडपड सुरू झाली असते,आकाश मोठं करावं याची धडपड सुरू असते.

थोड्या वेळापूर्वी वामन देशमुख यांचा वरील प्रतिसाद वाचला आणि आत्ता तूनळीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधे नेमका तसाच विनोदी प्रसंग दाखवालेला बघायला मिळाला: (सुरुवातीचा १६ मिनिटाचा भाग)
https://www.youtube.com/watch?v=FCS6C1_d_GE
'टीन-एजची मुले' हा विषय तसा मोठा आहे, यावर एक स्वतंत्र धागाच होऊ शकतो.

प्रचेतस's picture

22 Jul 2023 - 11:14 am | प्रचेतस

सहज सुंदर लेखन.

कंजूस's picture

22 Jul 2023 - 11:37 am | कंजूस

दहा वयापर्यंत (काहीही)विचारायचा धीटपणा असतो.
वीस पर्यंत मोठ्यांना शिकवणी
पुढे 'यांना काही सांगून उपयोग नाही '.

धर्मराजमुटके's picture

23 Jul 2023 - 1:24 pm | धर्मराजमुटके

एवढा सगळा लेख वाचून एकच प्रश्न मनात आला, तुमच्या पोट्टीच वय नेमक काय ? एकदा ते कळालं की वरील संवादाचे कशा पद्धतीने विश्लेषण करायचे (अर्थात मनातल्या मनात) ते ठरवता येईल. प्रश्न फारच वैयक्तीक वाटला तर उत्तर नाही दिले तरी चालेल.

विअर्ड विक्स's picture

25 Jul 2023 - 9:55 am | विअर्ड विक्स

. तरी अनेकदा कृष्ण जरी नाही मिळाला तरी कोणीतरी कानसेन हवा असतो . जो फक्त आपले बोलणे ऐकेल त्यावर मतमतांतरं न करता , अशा माणसामुळे मनांचे ओझे हलके होते.