जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात. मात्र सर्व अवयव असूनही मने अपुरी असणारे जीवनाचा मतितार्थ शोधण्यास असमर्थ ठरतात. या महापुरात कधी नात्यांचा ओंडका आधाराला येतो तर कधी अविश्वासाचा भोवरा श्वास गुदमरून टाकतो. हे परीक्षेचे क्षण नसतात. ही केवळ जगण्याची तयारी! पुढे एखादा असा टप्पा येतो, की तिथे चक्क महापुराची मजा वाटू लागते. सगळे भेदाभेद जीवन-प्रवाहाने व्यापून टाकलेले, सगळीकडे फक्त आपल्यासारखे जीवन, भावनांची चौफेर इतकी दाटी, की त्यातून वाट शोधताना वाऱ्याची सुद्धा दमछाक व्हावी. आणि आपण मात्र स्तब्ध, निश्चल, प्रवाहापासूनही विरक्त... कदाचित किंचितसे हवेतच! तो जीवनाच्या परीक्षेचा क्षण - सगळ्या लवाजम्याची निरर्थकता पटूनही त्यात अर्थ शोधण्याची आंतरिक ऊर्मी पेटून ती तेवत ठेवण्याची धडपड! या परीक्षेला केवळ सामोरे जाणे हेच परीक्षा पास करण्यासाठी पुरेसे ठरते. प्रश्नांच्या स्वरूपात जीवन कशाने सार्थकी लागणार याचे उत्तर मिळते. जिवंतपणाचे स्वागत आणि मृत्यूचे आभार मानता आले की जीवन सार्थकी लागते.
प्रतिक्रिया
30 Jun 2023 - 1:47 am | चित्रगुप्त
लेखकाने व्यक्त केलेले विचार मननीय आहेत, परंतु त्यांना प्रत्यक्ष अनुभवाचे अधिष्ठान देता आले तर उत्तमच.
-- धागाकर्त्यास नेमक्या कोणत्या प्रश्नांच्या स्वरूपात 'कशाने जीवन सार्थकी लागणार' याचे उत्तर मिळालेले आहे, हे स्पष्ट केल्यास वाचकांना या लेखाचा थोडासा उपयोग होऊ शकतो, आणि पुढे चर्चाही होऊ शकते. अन्यथा नुस्तेच शब्दांचे पोकळ बुडबुडे - उत्पद्यन्ते विलीयन्ते असे व्हायचे.
30 Jun 2023 - 10:08 am | गवि
चित्रगुप्त काका.
- आपल्याशी या विषयावर एकदा चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा.
- सखाराम गटणे
30 Jun 2023 - 2:20 pm | चित्रगुप्त
काहीही हं गवि. कसली डोंबलाची प्रतिभासाधना अन काय. बायकोने सांगितले तेच, तसेच आणि तेंव्हाच करणे हीच आमुची मुख्य साधना. तरी 'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक स. त. कुडचेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" हे तत्व चित्ती धरून आम्ही अधून मधून त्यातून जरा वेळ निसटून मिपावर येण्याचा प्रयास करीत असतो. त्यातून अलिकडे आमच्यावर अभद्र प्रतिसाद देण्याचे लांछन आलेले. बाकी चर्चा हाही आमचा प्राणवायु. केंव्हाही करुया. काय वांधा नाय.

30 Jun 2023 - 11:24 am | विवेकपटाईत
सध्या मोबाईलवर बिछान्यावर पडल्या पडल्या प्रतिसाद देत आहे.प्रतिसाद दिल्या शिवाय जीवन सार्थकी लागत नाही.
1 Jul 2023 - 11:31 am | विजुभाऊ
जीवनात सध्यातरी कसलेच गहन प्रश्न पडलेले नाहिय्येत.
प्रश्नच पडले नसतील तर जीवन सार्थकी कसे लागणार हा प्रश्न मात्र आता पडला आहे.
1 Jul 2023 - 6:33 pm | कर्नलतपस्वी
तर पहिलाच प्रश्न पडतो तो म्हणजे सार्थक म्हणजे काय?
जीवन सार्थकी लागणे म्हणजे नेमके काय होणे?
ज्यांचे जीवन सार्थकी लागले आहे असे कुणी आहे का?
असेल तर त्याची लक्षणे काय?
त्याला कसे ओळखावे?
जेव्हापासून समर्थ रामदास माहीत झाले तेव्हांपासून प्रश्न पडणे बंद झाले.
स्वामी म्हणतात,
जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तुची शोधोनी पाहे
याच प्रश्नात मन इतके गुंतले की बाकी प्रश्न उडन छू हो गये.
पुढे स्वामींनीच मार्ग दाखवला,
मना त्वाची रे पुर्व संचित केले
घडे भोगणे प्राप्त झाले
त्यामुळेच प्रश्न पत्रीका कोरी व म्हणून उत्तर पत्रीकाही कोरीच.
तरीही वरील प्रश्नांची उत्तरे कुणाला माहित असतील तर कृपया प्रतिसादावे.
5 Jul 2023 - 3:45 am | चित्रगुप्त
यात थोडा बदल करून -- "ज्याला आपले जीवन सार्थकी लागले आहे असे वाटते, असे कुणी आहे का ?" -- असा प्रश्न कराल तर त्याचे उत्तर "मै हूं ना" असे मला देता येईल. लवकरच यावर स्वतंत्र लेख लिहावा म्हणतो.
4 Jul 2023 - 6:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
आय्याम द यु इन द यु अँड शी इज इन द ह्यु---थोडक्यात डोक्याचे दही झाले आहे.
4 Jul 2023 - 7:19 pm | कर्नलतपस्वी
तुमचं आयुष्य सार्थकी लागले.
4 Jul 2023 - 7:37 pm | गवि
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलं आहे का?
5 Jul 2023 - 2:44 pm | राजेंद्र मेहेंदळे
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.260616
नाही बुवा, आपल्याला ईंग्लिश येत नाही फार वाचता. कामापुरते बोलतो/वाचतो. बाकी दासबोध आणि तुकोबांची गाथाच डोक्यावरुन जातेय, आणि अजुन कुठे ट्युन करु म्हणता?
5 Jul 2023 - 3:45 pm | गवि
हे नाही हो.. सुप्राकाँशसच्या लेव्हलवरुन ऑकल्ट एकस्पिरीयंस घेताना.. नाही तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच.. ;-))
5 Jul 2023 - 6:22 pm | मिसळपाव
अहो, तुम्ही वाचलंय का? :-)
5 Jul 2023 - 7:33 pm | गवि
वाचलंय?? ह्य ह्य ह्य...
5 Jul 2023 - 7:38 pm | टर्मीनेटर
वाचलंय? हॅ हॅ हॅ... काय सांगु साहेब...मीच लिहिलंय...
गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिही...
लिहुन टाकलं 😂
5 Jul 2023 - 7:55 pm | राजेंद्र मेहेंदळे
आता अक्षरधारा किंवा बूकगंगा मधे जाउन इन ट्युन विथ द ट्युन शोधणे आले :(
5 Jul 2023 - 8:11 pm | गवि
नका शोधू. ते या विश्वात नाही. भाईंच्या त्या समांतर विश्वात आहे. _/\_
5 Jul 2023 - 8:22 pm | टर्मीनेटर
नाही पण तुम्ही एकदा 'इन ट्यून विथ द ट्यून' वाचाच.. पाच रुपये किंमत आहे...
अक्षरधारा किंवा बूकगंगा वर उपलब्ध नाहिये, पण इथे (1:22:41 ते1:23:05) मोफत ऐकायला मिळेल 😂
4 Jul 2023 - 7:25 pm | कर्नलतपस्वी
जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे.
दोन पाच सेकंदातच आयुष्य सार्थकी लागेल.
सुरवात चुकली.
आयुष्याची आता झाली उजवण
किंवा...
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
अशी अवस्था केव्हा होते आशी काहीतरी सुरवात हवी होती.