एक चाहूल इवलिशी ती
कोकीळेच्या अंतरी आली
जीव कोवळा नाजूक साजूक
'आई' म्हणोनी साद घाली..
"ऐक सख्या रे अंतरी माझ्या
अंश आपुला अंकुरतो...."
घेई भरारी हर्षभरे तो..
कोकीळ कूजन करू लागतो..
ना वसंत ना पालवी नवी
ना आम्रतरू मोहरला..
कूजन ते अकल्पित नवे
सारा निसर्ग गहिवरला...
"गलिच्छ आणिक बेसूर वाटे
नको सख्या ती 'काक' सृष्टी...
आपुल्या खोपी जन्मेल तो
करू मायेची आपण वृष्टी.."
"हो राणी! झटेन मी पहा तू
त्या आपुल्या बाळासाठी..
हक्काचे घर देईन त्याला
उडण्या-बागडण्यासाठी.."
रात्रंदिन तो झटू लागला
जमवित काडी काडी धागा
आकार ना परि घेई खोपा
कोकीळ तो मग करी त्रागा..
"हरलो राणी !" बोले कोकीळ
"भिकार माझा जन्म सारा
गाण्याविन ना ठाव काही
कसा बांधू मी निवारा?"
उडे कोकीळा सैरभैर मग
कोकिळ तिजला सावरू पाही
"नकोस राणी! नको गं अशी...
दैवंच!... बाकी काही नाही.."
थकले भागले जोडपे ते
नकळत विसावे त्या तिथे...
सावळा 'गोळा' सोडून पाही
एक रिकामे घरटेच ते..!
- प्राजु.
प्रतिक्रिया
3 Jan 2008 - 9:53 am | प्राजु
कोकिळा नेहमी कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते..
या निसर्गनियमा वर हि कविता बेतली आहे... सावळा गोळा म्हणजे अंडे असा अर्थ घ्यावा.
- प्राजु.
3 Jan 2008 - 10:01 am | विसोबा खेचर
प्राजू, कथारूप कविता छान केली आहेस. परंतु शेवटी ते कोकिळ जोडपं कावळ्याच्याच घरट्यात अंडं घालतात हा उल्लेख आलेला नाहीये!
कवितेच्या सुरवातीला ज्या आमच्या काकसृष्टीला गलिच्छ आणिक बेसूर असं संबोधलं गेलं आहे त्याच काकसृष्टीबद्दल हे कोकिळ जोडपं आता काहीच बरं बोलताना दिसत नाही! नर कोकिळ फक्त 'हरलो राणी' असं स्वत:च्या बायडीजवळ कबूल करतो आहे पण आमच्या कावळ्यांची माफी कोण मागणार? :)
वा रे वा! :)
उत्तराच्या अपेक्षेत...
आपला,
(काकप्रेमी!) तात्या.
3 Jan 2008 - 10:04 am | प्राजु
ते घरटे कावळ्याचेच असावे असे काही नाही.. दुसरे हि असु शकेल.
सो नो माफि..
- प्राजु.
3 Jan 2008 - 7:44 pm | ऋषिकेश
फार फार आवडली कविता...
रात्रंदिन तो झटू लागला
जमवित काडी काडी धागा
आकार ना परि घेई खोपा
कोकीळ तो मग करी त्रागा..
इथपासुन तर कविता मस्त पकड घेते. पुलेशु
-ऋषिकेश
जाता जाता: कोकीळा कोणत्याही पक्षाच्या घरात अंडी घालते. भारतात कावळ्यांचा सुकाळ असल्याने व त्यांचा विणीचा हंगाम त्याच सुमारास असल्याने कावळ्याच्या घरट्याची शक्यता वाढते. :) ..
3 Jan 2008 - 7:52 pm | प्राजु
तात्या, ऋषिकेश ,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ऋषिकेश,
आपण दिलेल्या या माहितीबद्दलही मी आपली आभारी आहे.
- प्राजु.
10 Sep 2009 - 6:38 pm | विमुक्त
आवडली कविता...
10 Sep 2009 - 7:09 pm | मीनल
शेवटच्या कडव्यापर्यंत छान आहे.
पण शेवट थोडा विस्कळीत वाटला.
त्यातील पहिल्या ३ओळी कळल्या.
शेवटची? :/
मीनल.
10 Sep 2009 - 11:49 pm | बेसनलाडू
पण कविता मीनल म्हणतात तशी काहीशी विस्कळीत वाटते आहे. म्हणजे नक्की काय कसे हे मात्र आताच सांगता येत नाही, हेही खरे.
(सुसंघटित)बेसनलाडू
10 Sep 2009 - 11:53 pm | प्राजु
अरे मित्रांनो.. जुन्या कविता कशाला वरती काढता आहात??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/