घरी आलो तर आईनं तोंडाचा पट्टा सुरु केला.
" कुठं गेला होतास, तुला घर दार हाय कि नाय, उन्हा-तान्हातून दिवसभर उंडगत असतोस, थांब तुझ्या तंगड्याच तोडून ठेवता, जनमभर पोसायला झालं तरी चालल, डोक्याला ताप तरी राहणार नाय."
ती बोलत असलेला एक शब्दही आपल्याला ऐकू येत नाही, अशा अविर्भावात मी हात पाय धुवून जेवायला बसलो. जेवण उरकल्यावर खाटेवर शहाण्या मुलासारखा बसून राहिलो. थोड्या वेळानं आईच लक्ष नसल्याचं पाहून सटकलो. संज्याच घर वाटेत असल्यानं, तो घरी आहे का पाहावं? म्हणून त्याच्याकडे गेलो, तर तो जेवायला बसलेला. ओट्यावर कुणीतरी पायापासून डोक्यापर्यंत अंगावर घेऊन झोपलं होतं. त्या झोपलेल्या व्यक्तीच्या बाजूला एक कुत्रा; जेवत असणाऱ्या संज्याकडे टक लावून पाहत बसलेला.
" का रे, एव्हढा उशीर जेवायला?" मी चौकशी केली.
" जेवण नव्हतं झालं, आयेला बरं नाय ना!" संज्या म्हणाला.
म्हणजे अंगावर घेऊन झोपलेली व्यक्ती संज्याची आई होती.
" काय वाटतंय?"
"ताप आलाय. संज्या म्हणाला
संज्याचं जेवून होईपर्यंत थांबावं कि जावं विचार करत असताना, संज्या म्हणाला,
"अरे, ती पडवीत ठेवलेली काठी आण, आणि ह्याला जरा होलपटव,"
"का रे?" मी विचारलं.
" बघ ना, मघाशी एकदा भात टाकला तरी, हा वसाडा टूकत बसलाय." संज्या कुत्र्याकडे पाहत म्हणाला.
मी पडवीत ठेवलेली निगडीची काठी आणून कुत्र्यावर मारायला उगारली. आता आपल्या पाठीत काठीचा फटका पडणार हे ओळखून कुत्रा पळाला आणि मी मारलेला फटका तिथं झोपलेल्या संज्याच्या आईच्या पायावर बसला, त्याबरोबर तापाच्या ग्लाणीत असणाऱ्या संज्याच्या आईच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
" कुणी मेल्यानं मारलं?"
तिनं डोक्यावरून पांघरून उचलायच्या आत मी बाहेर पळालो. माझ्या पाठोपाठ संज्यासुद्धा हातात जेवणाचं ताट घेऊन बाहेर पळाला.
" वसाड्या बघून मारायची ना काठी," संज्या म्हणाला.
" अरे, बघूनच मारली, पण कुत्रा पळाला, त्याला मी काय करू?"
आम्ही घरापाठच्या ओसरीकडे गेलो, ओसरीवर बसून संज्या गप्पपणे जेवू लागला. तो कसला तरी विचार करत होता. मला माहीत होतं, संध्याकाळी आईनं विचारलं तर काय सांगावं याचाच तो विचार करत असणार,
" विचारलं तर सांगीन, तुला स्वप्न पडलं असलं," स्वताशीच बोलल्यासारखं संज्या म्हणाला.
"हो... हो ... आजारी माणसाला अशी स्वप्न पडतात," मी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला, तसा काळजीने काळवंडलेला त्याचा चेहरा जरासा उजळला. जेवण झाल्यावर संज्यान ताट कुडणात भाडी घासायच्या जागेवर ठेवून दिलं. पाणी आणायला घरी जावं लागणार होतं. पण तो घरी न जाता, तसाच दयाच्या घराकडं निघाला. मी सुद्धा काही न बोलता त्याच्या पाठीमागे चालू लागलो.
दयाकडे आलो तेव्हा सगळे अंगणात आमचीच वाट पाहत थांबलेले.
" वसाड्यानो, कुठं तडमडायला गेलेलात?" प्रकाशनं विचारलं.
त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता, संज्या दयाच्या घरात पाणी आणायला गेला. मी घडलेली सगळी हकीकत मित्रांना सांगितली, तसे सगळे हसायला लागले.
संज्या आल्यावर आम्ही घराच्या उजव्या बाजूला असणाऱ्या काजूच्या झाडाखाली गेलो. काजूच्या डाव्या हाताला एक मोठं फणसाचं झाड, आणि ह्या दोन झाडांना वेढून पाच-सहा आंब्याची झाडं, त्यामुळे कितीही ऊन असलं, तरी इथे कायम सावली असायची. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे, काजूखाली एक भला-मोठा कातळ अंग पसरून लवंडलेला. त्या कातळाला आम्ही साफ करून बसण्यासाठी जागा तयार केलेली. मुख्य म्हणजे, एक दयाचं घर सोडलं तर, आजूबाजूला कुणाचं घर नसल्यानं, इकडं कुणी फिरकायचं सुध्दा नाही. त्यामुळं आमच्या गुप्त बैठका याच ठिकाणी व्हायच्या. कधी शिकारीला जायचं असेल, कधी दुसऱ्या गावात क्रिकेटचा सामना खेळायला जायचं असेल, नदीवर पोहायला जायचं असेल, म्हणजेच घरी न सांगता करायच्या सगळ्या गोष्टी आम्ही याच ठिकाणी ठरवत असू. तिथे पोहचल्यावर प्रत्येकानं आपआपली जागा पकडली. आणि बंदुकीला काय काय साहित्य लागेल यावर चर्चा सुरु झाली.
गावात एकाकडे शेती संरक्षणासाठी मिळणारी ठासणीची बंदूक होती. हा माणूस आम्हाला कधी कधी शिकारीला घेऊन जायचा. आमचं काम नुसतं ओरडायचं, जाळीत डुक्कर किंवा इतर प्राणी बसला असेल तर बाहेर पडावा. पण जेव्हा जेव्हा मी त्याच्या सोबत गेलोय, एकदा सुद्धा शिकार सापडली नाही. नुसतंच दमायला झालं, आणि घरात ओरडा पडला तो वेगळाच, सगळ्यांच्या आया त्याच्या सोबत पाठवायला घाबरायच्या. कारण तो माणूस थोडासा चकणा होता, त्यामुळे सगळ्यांना वाटायचं हा बघेल एकीकडे आणि गोळी मारेल दुसरीकडे. सगळ्यांच्या आया असं म्हणत असल्यानं मलासुद्धा थोडी भीती वाटू. शेवटी मी शिकारीला जाणं बंद केलं.
बंदूक ठेवायची म्हणजे परवाना काढावा लागतो, नाहीतर पोलीस पकडून नेतात त्यामुळे बंदूक बनवल्यावर कुणाला दाखवायची नाही, हे पाहिलंच ठरवून टाकलं. बंदुकीला लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करत असताना लक्षात आलं. बंदुकीचा लाकडी दांडा सोडला तर, लोखंडी नळी पासून वरून आदळणाऱ्या क्लिप पर्यंत काहीच सहजा सहजी मिळणार नव्हतं. आणि जरी कुणाकडं असलं तरी घरची माणसं देणार नव्हती, पण आम्ही सुद्धा हार मानणारे नव्हतो. त्यामुळे प्रत्यकाने आपआपल्या माळ्यावर जाऊन काही सापडतं का पाहावं असं ठरलं.
"आमच्या माळ्यावर एक डबा आहे, त्यात पक्कड, स्क्रू ड्राइवर, करवत असं बरच सामान आहे, शिवाय खिळे, स्क्रू असलं किडुक मिडूक सामान सुद्धा मिळेल," मी म्हणालो.
प्रत्येक जण आपआपल्या घराकडं निघाला. मी अंगणात आल्यावर आधी आईला हाक मारली, कारण ती घरी असली आणि जर का तिच्या हाताला लागलो, तर नक्कीच धपाटे बसणार. पण नशिबानं ती घरात नव्हती, बहुतेक शेतात गेली असणार. मी माळ्यावर चढून डबा खाली आणायचा प्रयत्न करू लागलो. पण डबा भलताच जड होता. कुणालातरी बोलावल्या शिवाय तो खाली घेता येणार नव्हता. माळ्यावरून उतरून पुन्हा मी दयाकडे गेलो. दया अंगणातच जुन्या कमळछाप छत्रीच्या तारा काढण्यात गुंतला होता. म्हणजे छत्रीचा दांडा बंदुकीची नळी म्हणून वापरायचा होता. तशा ह्या छत्र्या चांगल्या मजबूत होत्या, पण बंदुकीची नळी म्हणून चालेल का? हि शंकाच होती.
दयाचं तारा काढण्याचं काम संपल्यावर आम्ही आमच्या घराकडं निघालो, वाटेत रवीला हाक मारून सगळ्यांना आमच्याकडं घेऊन यायला सांगून दोघे पुढं आलो, बाकीचे मित्र येईपर्यंत पडवीत ठेवलेल्या खाटेवर नुसतेच बसून राहिलो. सगळे आल्यावर मी आणि दया माळ्यावर चढलो, दोघांनी डबा उचलून खाली दिला. खाली उतरून डब्यातून धातू कापायची करवत घेऊन दया छत्रीचा दांडा कापू लागला. संज्याला कोयती देऊन बंदुकीचा लाकडी दांडा बनवायला सांगितला. संज्या तासकाम बऱ्यापैकी करायचा. आमच्या बॅट- स्टम्प तोच बनवायचा. बंदुकीची नळी तयार होती. लाकडी दांड्याचं काम चालू होतं, आता चाप ओढल्यावर वरून आढळणारी क्लिप हवी होती. अशी क्लिप मिळणं कठीण होतं. मुंबईतून चाकरमनी यायचे तेव्हा त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगांना दाबून बसवणाऱ्या क्लिप असायच्या. तशी बॅग कुणाकडे आहे का? म्हणून दयानं विचारलं.
" आमच्या माळ्यावर एक बॅग हाय, तिची क्लिप काढून आणू?" रवी म्हणाला.
" पण क्लिप काढल्यावर तुझी आई ओरडणार नाय?" मी विचारलं.
"लय जुनी हाय," रवी म्हणाला.
" जा मग घेऊन ये," दया म्हणाला.
डब्यातून पक्कड उचलून रवी त्याच्या घराकडे निघून गेला.
रवी येईपर्यत बंदूकीच पुढचं काम सुरु केलं. नळीच्या पाठच्या बाजूला लाकूड ठासून बसवल, जेणेकरून आत टाकलेली दारुपावडर पाठीमागे उडणार नाही. त्यापुढे एक छोटं भोक पाडून घेतलं, जिथं टिकल्यावाली फटाकडी ठेवायची होती. क्लिप फटाकडीवर आपटणार आणि फुटणार, त्याबरोबर आत भरलेली दारुपावडर पेट घेऊन आत टाकलेली गोळी उडून पुढे जाणार होती. नळी लाकडी दांड्याला व्यवस्थीत बांधून घेतली, तोपर्यंत रवी क्लिप घेऊन आला. स्क्रूच्या साहाय्याने लाकडाच्या वरच्या बाजूला क्लिप आणि खालच्या बाजूला चाप बसवला. रबराच्या साहाय्याने क्लिप चापाला जोडला. चाप ओढला कि रबर निघून क्लिप नळीवर आपटणार होती. आमची बंदूक तयार झालेली. डब्यात असणाऱ्या जुन्या बेरिंग घेऊन आत असणारे मणी काढून घेतले, त्यांचा उपयोग गोळ्या म्हणून करायचा होता. काढलेलं सगळं सामान डब्यात भरून, डबा माळ्यावर ठेवून दिला आणि पुन्हा आम्ही दयाच्या काजूकडे निघालो.
ह्या बाजूला नजर पोहचेपर्यंत सगळं उजाड. पाच एक मिनिटं डोंगर उतरत गेलं कि सारण, सारणीच्या पलीकडे परत चढण सुरु होते. चढणीच्या सुरवातीलाच गावाचा रस्ता, रस्त्याच्या वरच्या बाजूला गावातलं एकुलतं एक दुकान. संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता दुकान बंद झालं कि ह्या बाजूला कुणी फिरकत सुद्धा नाही, त्यामुळे बंदुकीचं परीक्षण करण्यासाठी हि जागा चांगली होती. लक्ष्मी बाराचं वरील कागदी आवरण काढून, आतील दारू एका कागदावर जमा केली. नारळाचं सोडणं आणून दगडाने ठेचून त्याचा काथ्या काढला. बंदुकीच्या नळीत दारू पावडर टाकून त्यावर थोडा काथ्या ठासला, पुन्हा दारू पावडर आणि मणी टाकून परत काथ्या ठासला. फटाकडी ठेवायच्या जागेवर थोडी पावडर भरून वर फटाकडी ठेवली. दया संज्याला म्हणाला,"जा आमच्या चुलीवर अगरबत्ती पेटवून घेऊन ये,"
ह्या वेळेस जायला संज्याच्या जीवावर आलेलं, म्हणून संज्या म्हणाला,
"आता अगरबत्ती कशाला? असाच चाप ओढ ना!"
"आवाज ऐकून दुकानातून कुणी बाहेर आलं तर, लगेच बार पेटवायचा,"
दयाच्या म्हणण्याला सगळ्यांनी दुजोरा दिल्यानं संज्याला जाणं भाग होतं.
"वसाड्यानो, मी येईपर्यंत चाप ओढू नका, सांगून ठेवतोय," संज्या काकुळतीला येत म्हणाला.
आम्ही होकार दिल्यावर संज्या निघून गेला, तो येईपर्यंत आम्ही फटाके फोडायला, आंब्याच्या पुढच्या बाजूला असणाऱ्या कातळावरचं गवत काढू लागलो.
थोड्याच वेळात संज्या अगरबत्तीं पेटवून घेऊन आला
बंदूकीचा चाप ओढायची पहिली बारी कोणाची हे सगळ्यांनाच ठाऊक असल्यानं कुणी मी पहिला, मी पहिला, म्हणून गोंधळ घातला नाही. दयानं बंदूक घेतली; एका दगडाचा नेम धरून चाप ओढला. चाप ओढताच क्लिपला लावलेला रबर निघून क्लिप फटाकडीवर जाऊन आपटताच बंदुकीचा बार झाला. आत टाकलेले मणी उडून गेले होते. तो एकदम खऱ्याखुऱ्या बंदुकीसारखा आवाज होता. आम्ही आनंदाने नाचू लागलो, पण बाराचा आवाज ऐकून पलीकडच्या दुकानातून एक माणूस बाहेर आलेला दिसला. बंदुकीचा आवाज कुठून आला हे पाहण्यासाठीच तो बाहेर आला असावा, असा संशय आल्याने दोन तीन लक्ष्मी बार पेटवले. " पोरं फटाके फोडत आहेत," हे पाहून तो माणूस दुकानात परत गेला. प्रत्येकाला एकदाच चाप ओढायला मिळणार होता. आमच्या ठरलेल्या नियमानुसार मोठ्यांपासून लहान, म्हणजे पहिला नंबर जो मोठा असेल त्याचा, त्यानंतर त्यापेक्षा लहान, नंतर त्यापेक्षा लहान असं करत करत शेवटी जो सर्वात लहान असेल त्याचा नंबर. हा नियम आम्हा मोठ्या मुलांसाठी खूप फायद्याचा होता, कारण आमचा नंबर लवकर यायचा. असा नियम नको म्हणून सुरवातीला लहान मुलांनी कुरकुर केली, पण दोन चार धपाटे खाल्यावर सगळे तयार झाले.
दोघा-तिघांचे नंबर झाले असतील तोच आमच्या पाठीमागे मंग्या उभा असलेला दिसला. मंग्या आम्हा सगळ्यापेक्षा मोठा, सुरवातीला तोच आमचा म्होरक्या होता, पण आता शाळा नसली कि कधी शेतात काम करायला गेलेला असायचा, तर कधी गुरं चरवायला. त्यामुळे त्याला खेळायला येणं जमायचं नाही. आमचं लक्ष जाताच तो आमच्या जवळ आला. रवीच्या हातातून बंदूक हिसकावून घेत म्हणाला,
" काय भारी हाय, कुठनं आणली?
" आम्हीच बनवलीय," दया म्हणाला.
मंग्यानं बरीच दारू पावडर नळीत ओतली,
" एवढी पावडर टाकू नको" म्हणून आम्ही त्याला सांगून पाहिलं, पण त्यानं आमचं ऐकलं नाही. त्यावर काथ्या चागला ठासून घेतला, मणी टाकून राहिलेली सगळी दारू पावडर ओतली, आम्ही नको नको करत होतो, पण तो आमचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी काथ्या टाकून चांगला ठासून घेतला. टिकलीवाली फटाकडी ठेवून चाप ओढला. त्याबरोबर खूप मोठा आवाज करत बार होऊन नळी मध्येच फुटली. आवाज एवढा मोठा होता कि दुकानातून दोन तीन माणसं बाहेर आली. आम्ही सगळे घाबरून गेलो, दोघा-तिघांनी लक्ष्मी बार घेऊन पेटवले. ती माणसं थोडा वेळ थांबून निघून गेल्यावर आम्ही मंग्याकडे वळलो. नळी फुटल्यान जळकी दारू त्याच्या छाती-पोटावर उडून तो भाजला होता. जर त्याने शर्ट घातला असता; तर तो भाजला नसता. पण नशीब, त्यानं शर्ट घातला नव्हता, नाहीतर शर्ट जाळला म्हणून आईकडून शिव्या आणि बापाकडून मार पडला असता, महत्वाचं म्हणजे आमच्या बंदुकीचं रहस्य सगळ्यांना कळलं असतं. तो भाजला आहे त्यापेक्षा आपल्या बंदुकीचे रहस्य कोणाला कळू नये, कुणी येण्याअगोदर बंदूक लपवणं भाग होतं. नाहीतर आपलं काही खरं नाही. सगळ्या पोरांना पोलीस पकडून नेतील. त्याही परिस्थितीत एवढ्या सगळ्या मुलांना पकडून नेण्यासाठी किती पोलीस येतील, याची कल्पना करून पाहिली, तर मला पोलिसांची जत्रा भरल्याचा भास झाला. मी इकडे कल्पनेत रमलेला असताना, दयानं तुटलेली बंदूक उचलून घराकडे धाव घेतली. आता आमचं सगळ्यांचं लक्ष दया कधी परत येतो, याकडं लागलेलं. एकटा मंग्या आपल्या ओठांचा चंबू करून छाती-पोटावर फुंकर मारत होता. तसं मुद्दामच आम्ही त्याच्याकडं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे आमची एवढी मेहनत वाया गेली होती.
दया आल्यावर संज्यानं विचारलं, " कुठं ठेवलीस?"
"माळ्यावर लपवून ठेवलेय," दया म्हणाला.
आता आम्ही मंग्याकडे वळलो. त्याच्या छाती पोटावर बऱ्याच ठिकाणी दारू पावडर चिकटलेली होती. तसं काळजी करण्याइतपत तो भाजला नव्हता. नाहीतरी कुणी भाजलं तर झाड पाल्याचं औषध त्याची आईच द्यायची. आसपासच्या गावातला एखादा माणूस भाजला असेल तर त्याला डॉक्टरकडे घेऊन न जाता मंग्याच्या आईकडून औषध घेऊन खडखडीत बरा करायचे एवढं जालीम औषध होतं ते. आणि औषध कोणत्या झाडापासून बनवतात हे मंग्याला चांगलं माहीत होतं. तेव्हा कुणाला कळू न देता औषध बनव, आणि भाजलेल्या जागी लाव हा मोलाचा सल्ला देण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. तसं त्याच्यासोबत जंगलात जाऊन झाडपाला आणला असता, पण तो आम्हाला सोबत घेऊन जाणार नव्हता, नाहीतर कुठल्या झाडापासून औषध बनवतात ते आम्हाला कळलं असतं आणि गावभर झालं असतं. त्यानं नुसताच मानेनं होकार भरला. चुकून एखादी ठिणगी उडाली असेल तर विझून जावी म्हणून, झाडाचे टाले तोडून, जिथे फटाके फोडले होते, त्या कातळाच्या आसपासच गवत झोडपून काढलं. मंग्या आम्हाला न सांगताच निघून गेला. आम्हीसुद्धा हिरमुसले होऊन घराकडं निघालो.
प्रतिक्रिया
6 Mar 2023 - 11:03 am | सौंदाळा
मस्त आहे गोष्ट, अजुन पुढचा भाग आहे का.
ग्राम्सेवकाच्या मुलाच्या बंदुकीचे काय झाले नंतर?
6 Mar 2023 - 1:04 pm | सुखी
बाबो लैच डोकेबाज की तुम्ही
6 Mar 2023 - 4:14 pm | टर्मीनेटर
कथा आवडली 👍
6 Mar 2023 - 4:26 pm | भागो
कथा आवडली >>+१
मला पण.
6 Mar 2023 - 5:31 pm | Deepak Pawar
सौंदाळा सर,सुखी सर, टर्मीनेटर सर, भागो सर सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
सौंदाळा सर दोनच भागाची गोष्ट आहे.
ग्रामसेवकाच्या मुलाची बंदूक काही कामाची नव्हती.