चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरूजींची

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
11 Dec 2022 - 10:14 am

✪ तेजस्वी ता-यासारखं international space station!
✪ शनीची कडी, गुरूचे उपग्रह आणि तांबूस मंगळ
✪ सुंदर कृत्तिका- ४०० वर्षांपूर्वीचं दृश्य
✪ चंद्राचे खड्डे आणि मैदानं
✪ अहंकाराचे भ्रम दूर करणारं विराट विश्व
✪ नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या गमती जमती
✪ मुलांचा व पालकांचा उत्साह

सर्वांना नमस्कार. सध्या आकाश दर्शनासाठी उत्तम काळ आहे. मध्ये मध्ये येणारे तुरळक ढग सोडले तर रात्री सुंदर आकाश बघता येतं. अनेक ठिकाणी मुलांना आकाशाच्या गमती दाखवण्याची संधी मिळत आहे. आयुर्वेद व्यासपीठ परभणी ह्यांनी मुलांसाठी व मोठ्यांसाठी दि. ८ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या आकाश दर्शन सत्रामध्ये लहानांना व मोठ्यांनाही आकाशातल्या गमती दाखवण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सर्वप्रथम डॉ. कान्हे मॅडम, डॉ. संदीप चव्हाण सर, आयुर्वेद व्यासपीठाची टीम, सर्व आयोजक व मुलं- पालक ह्यांना धन्यवाद देतो आणि काल कोणत्या गमती बघितल्या ते आपल्यासोबत शेअर करतो. औरंगाबादमध्ये सलग तीन दिवस असे कार्यक्रम घेतले होते, पण कालच्या इतकं निरभ्र आकाश तिथे नव्हतं मिळालं. काल निरभ्र आकाश होतं आणि त्यामुळे प्रस्तावना- परिचय ह्यामध्ये न जाता थेट आकाशाकडे जाता आलं.

काही मुलं येत होती तोपर्यंतच आकाशातली एक गंमत बघायला मिळाली. उत्तरेकडून एक तेजस्वी कृत्रिम उपग्रह सरकताना दिसला. गुरू ग्रहासारखा तेजस्वी असलेला हा उपग्रह हळु हळु पूर्वेकडे जात होता आणि पाच- सहा मिनिट दिसून तो हळु हळु दक्षिण- पूर्व दिशेला गेला. त्याची गती व तेजस्विता बघूनच वाटत होतं की हे निश्चितच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक- ISS असलं पाहिजे आणि नंतर इंटरनेटवर कालची वेळ व ठिकाण देऊन तपासल्यावर ते बरोबर निघालं! त्यामुळे काल वेळेवर आलेल्या मुलांना स्पेस स्टेशनही बघता आलं!

प्रत्यक्ष निरीक्षणाची सुरूवात शनी ग्रहापासून केली. टेलिस्कोपमधून शनीची कडी सर्वांना बघता आली आणि ह्या दृश्याचा आनंद घेता आला. त्यानंतर गुरू ग्रह व त्याचे चार उपग्रह बघता आले. आणि थोड्या अवधीमध्येच गुरू ग्रहाच्या उपग्रहांची बदलणारी जागाही लक्षात आली. काल प्रतियुतीमध्ये म्हणजे opposition च्या स्थानी आलेला मंगळ (म्हणजे सूर्य- पृथ्वी- मंगळ- एका रेषेत असतानाची स्थिती) पृथ्वीला बराच जवळ असतो- म्हणजे सुमारे साडेसात कोटी किलोमीटर. त्याचंही लाल बिंब टेलिस्कोपमधून बघता आलं. त्याशिवाय अतिशय मनोहारी तारकागुच्छ असलेलं कृत्तिका नक्षत्र- Pleidies M45 छान दिसलं. मुलांनी त्यामध्ये टेलिस्कोपमधून दिसणारे तारेही मोजले. हे कृत्तिका नक्षत्र आपल्यापासून सुमारे ४०० प्रकाश वर्षं अंतरावर आहे. ह्या नक्षत्रापासून निघालेला प्रकाश आपल्याकडे ४०० वर्षांनी पोहोचतो. एका सेकंदात तीन लाख किलोमीटर वेगाने जाणारा प्रकाश! म्हणजे काल तिथले जे तारे दिसले ते सुमारे सन १६०० मधले होते!

आकाशातले हे विराट कल्पना न करता येणारं अंतर आणि पृथ्वी- सूर्याहून मोठे तारे बघताना एक प्रकारे ध्यानासारखा परिणाम होतो. मी म्हणजे कोणी बडा माणूस आहे किंवा माझंच दु:ख जगातलं सगळ्यांत मोठं आहे, हे दोन्ही भ्रम दूर होतात! कृत्तिकेनंतर चंद्र बघितला. पहिले तो २० पट मोठा बघितला आणि नंतर ५० पट मोठा करून बघितला. चंद्र कितीही बघितला तरी नेहमीच सुंदर दिसतो आणि सगळ्यांना आवडतो! आकाशाच्या ह्या शाळेतले म्हणूनच ते चांदोबा गुरूजी असतात.

हे सगळं बघत असताना मुलांना नुसत्या डोळ्यांनी दिसणारे रोहिणी (Aldebaran), ब्रह्महृदय (Capella), अग्रनद (Archenar), सतरा प्रकाशवर्षांवरचा श्रवण (Altar), अभिजीत (Vega), डेनेब, मीनास्य (Formalhaut), शर्मिष्ठामधले तारे, भाद्रपदामधले आणि ध्रुवतारा हेही स्टार पॉईंटरद्वारे दाखवता आले. हे दाखवताना मुलांना इतरही अनेक गमती सांगता आल्या, प्रश्नही विचारता आले. उगवताना- मावळताना चंद्र लाल का दिसतो, कान, डोळे, चष्मा, डिश टिव्हीची डिश, टॉर्चची काच ह्यामध्ये समान असलेली गंमत, एकाग्रतेची‌ जादू, मराठी महिने व नक्षत्रांचा संबंध, आकाश बघण्याची पद्धत ह्याबद्दलही मुलांशी बोलता आलं. मुलांचा आणि पालकांचा उत्साह विशेष असल्यामुळे त्यांना हे दाखवताना खूप समाधान मिळालं.

सर्व मुलांना व पालकांना आणि आयोजकांना मन:पूर्वक धन्यवाद!

(निरंजन वेलणकर- आकाश दर्शन सत्र व मुलांसाठी फन- लर्न सत्र. तसेच मोठ्यांसाठी फिटनेस व ध्यान सत्र. 09422108376)

तंत्रभूगोललेखअनुभव

प्रतिक्रिया

सरिता बांदेकर's picture

11 Dec 2022 - 5:09 pm | सरिता बांदेकर

व्वा चांगला उपक्रम आहे.
मी पण अशी शिबीरांमध्ये भाग घेतला आहे.
माहितीबद्दल धन्यवाद.

अनन्त्_यात्री's picture

12 Dec 2022 - 1:45 pm | अनन्त्_यात्री

उपक्रम!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Dec 2022 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडला
पैजारबुवा,

मार्गी's picture

16 Dec 2022 - 12:29 pm | मार्गी

सर्वांना धन्यवाद!