खरं तर आज शाळेला सुट्टी होती , तरीही गुंड्याला भल्या पहाटे उठवले होते. सुट्टीचा दिवस असूनही त्याने अजिबात कुरबुर केली नाही , उलट आज स्वारीचा उत्साह दांडगा होता. कारण आज महाशिवरात्री होती. शंभू महादेव त्याचं आवडतं दैवत आणि उपवासाचा छान छान फराळ खायला मिळणार म्हणून अजून जास्त खुश. गुंडया जसा आंघोळ करुन तयार झाला तसं आईनं हातात बेलान भरलेली पिशवी दिली आणि सांगितलं - "हे बघ गुंड्या ह्यात एकशे आठ बेलाची पानं आहेत. मंदिरात जाऊन महादेवाला वाहून ये. पण तिथं जाऊन बद्द करून पिशवी पिंडीवर उलटी करून रिकामा होऊ नको. एकशे आठ वेळा एक एक पान ॐ नमः शिवाय म्हणत पिंडीवर वाहा. गावात बेल जास्त कुठे मिळत नव्हता म्हणून बाबांनी फार लांबून शोधून आणलाय हे लक्षात असू दे . तेंव्हा तो बेल नीट वाहा. इतक्या सकाळी तशीही गर्दी कमी असेल मंदिरात , व्यवस्थित होईल सगळं !"
धावत गुंड्या मंदिरात पोचला , चपला एका कोपऱ्यात सारल्या . पहिल्या पायरीला हात टेकून नमस्कार केला , पायऱ्या चढून उंबरठ्यापर्यंत आला. पुन्हा एकदा वाकून उंबऱ्याला नमस्कार केला. आत येऊन उंच उडी मारून घंटी वाजवली आणि तडक नंदीपाशी येऊन पोचला . नंदीच्या दोन्ही शिंगाला दोन बोटे लावून, तयार झालेल्या चौकोनातून गाभाऱ्यातला शंभू पाहिला. मग शेजारी ठेवलेल्या भस्माच्या वडीवर उजव्या हाताची तीन बोटे घासली आणि कपाळावर त्रिपुंड्र बनवले. सकाळची वेळ असूनही मंदिरात लोकांची रेलचेल होती. गाभाऱ्यात जाण्यासाठी छोटीशी रांग लागली होती. वाटलं दहाबारा तरी लोक आहेत , फार तर दहा मिनिटं लागतील . तो रांगेत उभा राहिला , अधूनमधून गाभाऱ्यात डोकावून पाहात. गाभाऱ्यावर तीन चार बायकांनी कब्जाच केला होता . छोट्या कळशीने पिंडीवर ओतणे , मग महादेवाला भस्म लावणे , फुले- अक्षता अर्पण करणे , अगरबत्ती , तुपाच्या फुलवाती , कापूर ओवाळणे , सोबत "कैलासराणा शिवचंद्रमौळी ...." सगळं कसलीही काटकसर न करता चाललं होत. पुजाऱ्याने गाभाऱ्याच्या दाराजवळ रांग अडऊन ठेवली होती आणि आतल्या लोकांना ते विणंती करत होते - " लवकर आटपा , बाहेर गर्दी वाढतीये ".
तसं गुंड्याच्या मांग खरंच रांग मोठी झाली होती आता . त्याच्या माग एक कंबरेत वाकलेल्या एक आजी काठीचा आधार घेऊन उभ्या होत्या . त्यांनी गुण्ड्याला विचारला -"बाळा बेल आहे का रे तुझ्याकडे? " गुंड्याने होकारार्थी मान हलवली, आजी म्हणाली - " मला एक पान देशील का रे बाळा , काल शोधला मी पण कुठंच मिळाला नाही बघ " गुंड्या मोठ्या संभ्रमात पडला , आईने सकाळी दिलेली सूचना आठवली. पण आजींना नकार देणं काही त्याला जमेना. शेवटी त्याने विचार केला -"एकच पान तर मागतायत त्या. एक बेल मी कमी वाहिला म्हणून असा किती फरक पडणार आहे . गणित मांडलं तर एक टक्का सुद्धा नाही. " त्याने एक पान आजीच्या हातावर ठेवलं. आपला थरथरणारा सुरकुतलेला हात आजीनं मायेनं गुंड्याच्या चेहऱ्यावरून फिरवला. गुंड्या पुढे वळून गाभाऱ्यात काय चाललंय पहात राहिला. गाभाऱ्यातल्या बायका बाहेर आल्या, रांग थोडी पुढं सरकली .
" ये म्हातारे , तुला कुठं घावला गं बेल ? आम्ही गाव पालथ घातलं काल, तरीबी एक पान सुदिक दिसलं नाही " - मागून एका गड्याचा आवाज गुंड्याला ऐकू आला. म्हातारी गुंड्याकडं बोट दाखवत त्याला म्हणाली -" ह्या लेकरान दिलं बघ मला एक पान". ती व्यक्ती गुंड्याजवळ येऊन म्हणाली - " म्हातारीला दिलंस नव्ह एक पान तसं मलाबी एक द्यायला पायजेस." गुंड्याला काही सुचलं नाही - " अजून एकच तर फक्त" असा विचार करत त्याने एक बेल त्याला सुद्धा दिला. तो गडी तडक तोंड फिरवून मागे रांगेत आपल्या जागी जाऊन उभा राहिला. पुढं एका पोराकडं पिशवी भरून बेल आहे ही बातमी हळू हळू जशी रांगेत मागं पसरत गेली तशी ज्यांच्याकडे बेल नव्हता ते एक एक जण पुढे येऊन गुंड्याकडून बेलाचं पान घेऊ लागले.
थोड्या वेळानं गुंड्याला गाभाऱ्यात सोडलं . आत जाऊन त्याने पिशवी चाचपली आणि किती पानं असतील ह्याचा अंदाज घेतला. फार तर चार पाच पाने असतील . ती हातावर घेऊन तो महादेवाकडे बघतच राहिला. " काय केलं मी हे , बाबांनी एवढ्या लांबून बेल शोधून आणला आणि मागचा पुढचा कसलाही विचार न करता वाटून टाकला मी . आईला सांगितलं होत मी एकशे आठ वेळेस ॐ नमः शिवाय म्हणत पिंडीवर बेल चढवणार म्हणून . पण आता कसं शक्य आहे ते . " तो बराच वेळ तसाच गोंधळलेल्या अवस्थेत तिथंच उभा राहिला .
थोड्या वेळानं अचानक पुजारी बुवांचा आवाज त्याच्या कानावर पडला - " काय झालं बाळ ? असा का उभारला आहेस कधीपासून ? " गुंड्या त्यांना म्हणाला - " आईने एकशे आठ वेळेस ॐ नमः शिवाय म्हणत पिंडीवर बेल चढवायला सांगितला होता. पण ..." त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी पुजारी त्याला म्हणाले -" समजलं मला . मी पहिला काय झालं ते रांगेत . तुला माहिती आहे का , एकशे आठ बेल स्वतः वाहून जे पुण्य तू कमावलं असतंस ना त्याच्या लाखो पटीनं जास्त पुण्य तू आज कमवाल आहेस. कारण तुझ्यामुळे महादेवाला बेल अर्पण करायच समाधान त्याच्या दारात आलेल्या कमीतकमी शंभर लोकांना तरी मिळालं आहे. आणि आपल्या भक्तांना मिळालेलं समाधान ह्याच्या इतकी दुसरी प्रिय गोष्ट महादेवासाठी काही नाही , अगदी बेलपत्र सुद्धा नाही . त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळ , तुझ्या हातून चूक तर झालीच नाही , उलट फार मोठं पुण्याचं काम घडलय. चढव तो उरलेला बेल "
गुंड्यानं हातातलं एक बेल पिंडीवर ठेवला तसं "ॐ नमः शिवाय" आपोआप त्याच्या ओठावर उमटलं. राहिलेली चार पानं घेऊन तो गाभाऱ्याच्या दाराजवळ आला . ती पानं त्यानं पुजारी बुवांच्या हातात दिली आणि त्यांच्या पायावर डोकं टेकवून नमस्कार केला. पुजारीबुवा त्याच्या हातावर तीर्थ देत म्हणाले - " खरं तर ज्यांनी ज्यांनी तुझ्याकडून बेल घेतला त्या प्रत्येकाने ही प्रार्थना तुझ्यासाठी महादेवाकडे करायला हवी होती . कुणीच केली नसेल बहुधा , पण मी करेन - कैलासनाथा, ह्या मुलाच्या पिशवीत असाच भरभरून बेल येत राहू दे !"
प्रतिक्रिया
4 Nov 2022 - 5:48 pm | शलभ
वाह. खूप सुंदर कथा.
4 Nov 2022 - 6:05 pm | सस्नेह
छानेय कथा. आवडली :)
4 Nov 2022 - 6:16 pm | कर्नलतपस्वी
लेखाचे शिर्षक वाचून वाटले हा लेख बहुधा राजकारणावर आसेल.
अनिल देशमुख, संजय राऊत यांनी १०८ वेळेस बेलकरता कोर्टात अर्ज वगैरे केला का काय😀.
पण धार्मिक, बाळबोध छोटेसाच लेख मस्त जमलाय.
धक्कातंत्र मस्त. शशक मधे कथेच्या शेवटी तर इथे कथा सुरू होण्या आगोदरच 😐
4 Nov 2022 - 6:18 pm | श्वेता व्यास
खूप आवडली कथा, साधं सोपं छान :)
4 Nov 2022 - 6:18 pm | सौंदाळा
सुंदर छोटुकली गोष्ट, मुलीला नक्की सांगणार
4 Nov 2022 - 6:25 pm | सरिता बांदेकर
आवडली कथा.
4 Nov 2022 - 6:26 pm | सरिता बांदेकर
आवडली कथा.
4 Nov 2022 - 8:27 pm | वामन देशमुख
अरे! इतकी नितळ सुंदर कथा!
शीर्षक पाहून काहीतरी राजकीय वगैरे असेल असं म्हणून धागा सहजच दुर्लक्षंणार होतो. पण मग म्हटलं एकदा नजर टाकून पाहावी तरी. आधी प्रतिसाद वाचले आणि मग कथा वाचली आणि मग अजून एकदा आणि मग पुन्हा एकदा वाचली. तरीही समाधान होत नाहीय. पुन्हा वाचेन.
पॉइंट ब्लँक भौ, या धाग्यापासून आम्ही तुमचे फॅन कूलर एसी झालोत!
शि सा न _/\_
- देवभोळा वामन
4 Nov 2022 - 8:49 pm | गवि
फारच सुंदर. क्या बात..!!
4 Nov 2022 - 9:04 pm | सरिता बांदेकर
कथा आवडली
4 Nov 2022 - 9:04 pm | सरिता बांदेकर
कथा आवडली
4 Nov 2022 - 9:04 pm | सरिता बांदेकर
कथा आवडली
4 Nov 2022 - 9:04 pm | सरिता बांदेकर
कथा आवडली
5 Nov 2022 - 6:12 am | कंजूस
अगदी अमेरिकन लेखन वाटतंय.
5 Nov 2022 - 6:16 am | कंजूस
फुलबाग नावाचे मासिक माहिमच्या एक जण काढायचा. ते फार आवडायचे. किशोर मासिकाबद्दल ऐकून होतो, ते एकदा वाचले पण क्लिष्ट वाटले. फुलबाग ची सर त्याला नव्हती.
5 Nov 2022 - 9:37 am | ॲबसेंट माइंडेड ...
सुरेख कथा.
5 Nov 2022 - 9:37 am | ॲबसेंट माइंडेड ...
सुरेख कथा.
5 Nov 2022 - 2:09 pm | Bhakti
छान कथा ,मुलीला one hundred eight होते त्यातले hundred बेल वाटले असं करून सांगावं लागलं :)
बच्चे मन के सच्चे!!
5 Nov 2022 - 2:48 pm | सुखी
छान कथुकली ... आवडली
12 Nov 2022 - 9:57 am | पॉइंट ब्लँक
12 Nov 2022 - 9:57 am | पॉइंट ब्लँक